विश्व मराठी एकांकिका स्पर्धेत कलाब्रेशनचे नेत्रदीपक यश

रोटरी क्लब ऑफ पुणे हेरीटेज या संस्थेने आयोजित केलेल्या विश्व मराठी एकांकिका स्पर्धेमध्ये बाल्टिमोरच्या ‘कलाब्रेशन’ ह्या नाट्यसंस्थेने पदकांची लयलूट केली. ह्या स्पर्धेत जगभरातून सतरा देशांमधील मराठी नाट्यसंघांनी भाग घेतला होता. अशा अटीतटीच्या स्पर्धेत कलाब्रेशनच्या चमूने तब्बल सहा बक्षिसांवर आपले नाव कोरले. कलाब्रेशनच्या वतीने पुणे येथे प्रेरणा मोहोड यांनी बक्षिसे स्वीकारली. 

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रांतपाल पंकज शहा, श्रीकांत कानेटकर, महेश ओझा, मधुमिता बर्वे आणि विनिता पिंपळखरे ह्या नामवंतांच्या उपस्थितीत पारितोषिक सोहळा संपन्न झाला. स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक आदित्य इंगळे, अभिषेक केळकर आणि पौर्णिमा मनोहर ह्यांनी केले. विक्रम गोखले ह्यांनी मराठी नाटकासाठी महत्वाचे योगदान दिल्याबद्दल स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आणि रोटरी क्लब हेरीटेजचे कौतुक केले.परदेशात राहूनही आपले मराठी बांधव नाटकांद्वारे आपली संस्कृती, साहित्य जोपासत असल्याबद्दल मिलिंद जोशी ह्यांनी स्पर्धकांचेकौतुककेले.अविनाश ओगले आणि लीना गोगटे ह्यांनी आपल्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आणली.

कलाब्रेशनने जिंकलेली पारितोषिके -

.उत्कृष्ट अभिनेता प्रथम क्रमांक - संदीप सावंत (एक एप्रिल)
.उत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक - लीना मालवणकर (श्री तशी सौ)
.उत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय क्रमांक - माधवी तावडे भोसले (एक एप्रिल)
.उत्कृष्ट नाटक तृतीय क्रमांक - एक एप्रिल
.उत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ - रोहित कोल्हटकर (एक एप्रिल)
.उत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ - संदीप सावंत (श्री तशी सौ)

कलाब्रेशनविषयी थोडक्यात :
कलाब्रेशन ही मराठी नाट्यसंस्कृतीच्या संवर्धनासाठी झटणारी अमेरिकेतील बाल्टिमोर परिसरातील महत्वाची नाट्यसंस्था आहे. बाल्टिमोरमधील नाट्यरसिकांचे मनोरंजन व सामाजिक प्रबोधन ही संस्था गेली काही वर्षे करत आली आहे. विविध नाट्य/एकांकिका स्पर्धा, मोठ्यांसाठी तसेच बाळगोपाळांसाठी नाट्य प्रशिक्षण वर्ग, बालनाट्य/एकांकिका असे विविध उपक्रम कलाब्रेशनतर्फे चालवले जातात. नजीकच्या काळात बालनाट्यमहोत्सव व व्यावसायिक नाटक आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे.

कलाब्रेशनचा इतिहास - वेडात मराठी वीर दौडले सात -
२०११ पासून बाल्टिमोर भागात नाट्यसंस्कृती जोपासणाऱ्या सात जणांनी एकत्र येऊन २०१४ साली कलाब्रेशनची स्थापना केली.  सुरुवातीलाच सादर केलेल्या 'एक एप्रिल' आणि 'प्रेक्षकांनी क्षमा करावी' ह्या दोन एकांकिकांवर प्रेक्षकांनी तुफान प्रेम केले. त्यानंतरच्या वर्षी 'तुला मी मला मी' आणि 'ब्लॅक गेम'ने प्रेक्षकांचा गेम केला. त्या पुढचा टप्पा म्हणजे विजय तेंडूलकर लिखित  'कमला' हे नाटक. त्यानंतर 'वास्तव' आणि योगेश सोमण यांची 'श्री तशी सौ' ही ही धमाल एकांकिका.

३० जून २०१९ रोजी कलाब्रेशनने एकांकिका महोत्सव यशस्वीरीत्या तडीला नेला. एकापेक्षा एक सरस अशा चार एकांकिकांचा आस्वाद त्यानिमित्ताने नाट्य रसिकांना घेता आला. त्या पाठोपाठ सई परांजपे लिखित ‘पत्ते नगरीत’ हे तब्बल १६ बालकलाकारांचा समावेश असलेले बालनाट्य बल्टीमोर मराठी मंडळाच्या दिवाळी कार्यक्रमामध्ये यशस्वीरीत्या सादर करण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले. त्याव्यतिरिक्त मोठ्यांसाठी एक व लहानांसाठी एक अशी दोन नाट्य शिबिरेदेखील कलाब्रेशनने समर्थपणे आयोजित केली.
         
मराठी भाषा व नाट्य संस्कृतीचा झेंडा कलाब्रेशन अमेरिकेत ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ असाच डौलाने लहरत ठेवेल, ह्यात तिळमात्र शंका नाही.


निलेश मालवणकर 

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी