The Moment – तो क्षण

अपर्णा वाईकर 
विवेकानंद मंचातर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला आलेल्या लोकांनी संगम सभागृह तुडुंब भरले होते. सर्व उपस्थितांचे स्वागत करून झाल्यावर निवेदक म्हणाले,आणि आता मी श्री.संतोष राठी व सौ. बापटताई ह्यांना मंचावर आमंत्रित करतो. आपण राठीसाहेबांना श्री सुपर मार्केटचे मालक म्हणून ओळखतो,पण आज मी त्यांची एक वेगळीच ओळख करून देणार आहे. गेल्या महिन्यात पुण्यात आलेल्या पुराच्यावेळी ह्यांनी एका महिलेला आणि छोट्या मुलीला पाण्यात वाहून जाणाऱ्या गाडीतून वाचवले. ज्यांचा जीव संतोषदादांनी वाचवला त्या म्हणजे बापटताई! त्या प्रसंगाबद्दल बोलण्यासाठी मी बापटताईंना बोलवतो.
नमस्कार माझं नाव संध्या बापट२५ सप्टेंबर हा दिवस मी कधीही विसरणार नाही. जीवन आणि मरण ह्यात किती कमी अंतर असतं हे मला त्या दिवशी कळलं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि ती वेळ आली नाही त्याला कारण संतोषदादा! मला तो दिवस काल घडल्यासारखा आठवतो. मी आणि माझी छोटी मुलगी गाडीतून घरी निघालो होतो. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि मला माझी गाडी कंट्रोल करणं अवघड झालं होतं. त्या लोंढयाबरोबर माझी गाडी वाहून रस्त्याच्या कडेच्या कठड्याजवळ जाऊन अडकली. मी दार उघडायचा आणि बाहेर पडायचा खूप प्रयत्न करत होते पण काहीही उपयोग होत नव्हता. खूप वेळ दार ढकललं पण ते उघडायला तयार नव्हतं आणि कोणीही माझ्या दिशेने येताना पण दिसत नव्हतं. नेहमी इथल्या गर्दीला शिव्या देणारी मी, कोणीतरी येवू दे आणि आम्हाला वाचवू दे अशी प्रार्थना करत होते. गाडीभोवती सगळीकडे पाणी आणि चिखल दिसत होता. किती वेळ गेला माहीत नाही पण मला कोणीतरी येत आहे असं वाटलं म्हणून मी त्यांचं  लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती पुढे जायला लागली. माझा धीर सुटायला लागला होता. जणू काही ही शेवटची संधी म्हणून मी खिडकीवर जोरजोरात हात आपटायला लागले. मनात म्हंटलं की देवा प्लीज त्या व्यक्तीला परत पाठव. देवाने जणू काही प्रार्थना ऐकली आणि ते गृहस्थ म्हणजे संतोषदादा परत गाडीजवळ आले आणि दार उघडायचा प्रयत्न करू लागले,पण दार उघडेना!त्यांनी मला थांबा असं खुणेने सांगितलं आणि कुठूनतरी दगड आणून मागची खिडकी फोडून माझ्या मुलीची आणि माझी सुटका केली. संतोषदादा थॅंक यू! मला त्या दिवशी जगण्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. नेहमी आपण समजतो की आपल्याकडे खूप वेळ आहे.खूप साऱ्या गोष्टी आपण गृहीत धरतोहे किती क्षणभंगुर आहे त्याचा मला प्रत्यय आला. जणू काही हा प्रसंग माझ्यासाठी एक वेक-अप कॉल होता. खरंच अशा संकटाच्या वेळी भेटतात ती कोण कुठली अनोळखी माणसं, एकमेकांच्या आयुष्यात थोडा वेळ येऊन, आयुष्यभरासाठी ठसा उमटवून जाणारी! एक सांगू?मला नंतर कळले की संतोषदादांच्या दुकानात त्या दिवशी पाणी शिरून त्यांचं खूप नुकसान झालं होतं. त्याच विचारात ते रस्त्यावर विमनस्क मनःस्थितीत हिंडत होते तेव्हा आम्हाला ते भेटले. स्व:ताचं दु:ख विसरून त्यांनी आमचे प्राण वाचवले ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही. संतोषदादा तुम्ही आता दोन शब्द बोलावेत अशी मी तुम्हाला विनंती करते.

नमस्कार,मी संतोष राठी आणि माझा सत्कार केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. संध्याताई तुम्ही मला थॅंक यू म्हणून लाजवू नका. मी जे केलं त्यात विशेष काहीही नाही, माझ्या जागी कोणीही असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. तुमच्या नकळत तुम्ही मला कशी मदत केलीत हे तुम्हाला माहीत नाही. तुमच्याप्रमाणे मीही तो दिवस कधी विसरणार नाही. त्या दिवशी सकाळपासून पाऊस पडत होता,पण मला त्याचं विशेष काही वाटलं नाहीवाटलं नेहमीसारखाच पाऊस चालू आहे.पण अचानक ओढ्याची भिंत पडली असा ओरडा झाला आणि बघता बघता  पाण्याचा मोठा लोंढा आला. काही कळायच्या आत पाणी दुकानात शिरलं.जवळजवळ तीनसाडेतीन फूट पाणी दुकानात साठलं. जमिनीलगतचे सगळे कप्पे पाण्याने भरले आणि एका क्षणात लाखों रुपयांच्या वाणसामानाचे नुकसान झालंनेमकं किती नुकसान झालं आहे हे पाणी उतरल्याशिवाय कळणार नव्हतं. आता पुढे काय ह्या विचाराने मला काहीही सुचत नव्हतं. डोकं बधीर झालं होतं. पहिला धक्का ओसरल्यानंतर मी विचार करायला लागलो की काय हा दैवाचा खेळ! सगळं सोडून माझ्याच वाट्याला हे काय आलं? मी काय कोणाचे वाकडं केलं आहे म्हणून देवाने मला हे दु:ख दिलं? काय हा देवाचा न्याय आहे?जी लोक खोटी वागतात त्यांचं सगळं नीट होतं आणि मला मात्र हा त्रास! मला वाटलं आता सगळं संपलं, आता ह्या परिस्थितीतून मी कसा बाहेर येणार? एवढं नुकसान झालंय, भरून यायला किती वेळ लागेल काय माहीत? घरात बसून डोकं शांत होणार नाही म्हणून अत्यंत निराश, खचलेल्या मनःस्थितीत मी बाहेर पडलो आणि दिसेल त्या रस्त्यावर चालायला लागलो. चालता चालता सातारारोडवर कधी आलो कळलचं नाही. रस्त्याच्या कडेला कठड्याजवळ मला एक गाडी दिसली. फार लक्ष द्यायच्या मनःस्थितीत मी नव्हतो. मनात म्हटलं  कुणा बिचाऱ्याची गाडी वाहत आली आहे कोण जाणेम्हणजे बघा,काही कारण नसताना आणखी कोणाचं तरी नुकसान! तसाच  पुढे निघालो पण एकदम गाडीत काहीतरी हलल्यासारखा वाटलं. म्हटलं जवळ जाऊन बघावं, पाहतो तर काय गाडीत एक बाई आणि छोटं बाळ! मी गाडीचं दार उघडायचा खूप प्रयत्न केला. काही केल्या दार उघडत नव्हतं. मी खिडकी फोडण्यासाठी दगड शोधायला लागलो पण सगळीकडे नुसता चिखल आणि राडारोडा होता. मी ताईंना थांबा अशी खूण केली. त्यांच्या चेहऱ्यावरून मला कळतं होतं की मी गेलो तर काय अशी भीती त्यांना वाटतं होती. मी खाणाखुणा करून त्यांना सांगितलं मी आलोच काळजी करू नका. काही अंतरावर मला एक दगड मिळाला,पण आत बाळ असल्यामुळे मागची खिडकी फोडायची ठरवली. शेवटी ताईंना आणि बाळाला बाहेर काढलं. तुम्ही दोघी गाडीतून बाहेर आलात तेव्हा मला काय वाटलं हे शब्दात सांगणं अवघड आहे. तुम्हा दोघींना त्या गाडीत पाहिल्यापासून मी, माझं दुकान, झालेलं नुकसान, भविष्याची भीती.... अगदी सगळं विसरलो. तुम्हा दोघींना गाडीतून बाहेर काढणं एवढंच काय ते डोळ्यांसमोर दिसत होतं.आणि ज्या क्षणी तुम्ही दोघी गाडीतून सहीसलामत बाहेर आलात तेव्हा मला जग जिंकल्यासारखं वाटलं. माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक निराशेच्या क्षणी, ज्यावेळी मला वाटत होतं की सगळं संपलं आहे, आता कशात काही अर्थ नाही आणि माझे  झालेलं हे आर्थिक नुकसान मी कसं भरून काढणार,अशा वेळी तुम्ही मला भेटलात. मी तुम्हाला नाही तर एका अर्थी तुम्ही मला वाचवलं आहे. ज्या देवाला मी दोष देत होतो त्यानेच मला योग्य वेळी योग्य ठिकाणी पाठवलं. स्वत:च्या नफ्यातोट्याशिवाय ह्या जीवनात आणखीही महत्त्वाचं काहीतरी असतं हे दाखवून मला एक मोलाचा धडा दिला. जिथे काही लोकांची घरदारासकट सगळी कमाई एका क्षणात नष्ट झाली होती, काहींची जवळची माणसं कायमची त्यांना सोडून गेली होती, त्यांच्या समोर माझ्या फक्त मालमत्तेच्या नुकसानाचं एवढं काहीच नाही!आणि ते काय आज नाही तर उद्या नक्कीच भरून निघेल ह्या विचाराने मी नव्या जोमाने कामाला लागलो. त्यामुळे ताई मीच तुमचा आभारी आहे, मला त्या दिवशी भेटल्याबद्दल आणि माझा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला मदत केल्याबद्दल!
 
निवेदक परत स्टेजवर आले आणि म्हणाले ,"मी आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री.राठीसाहेब, सौ.बापटताई  आणि सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानतो. आज राठीसाहेब व बापटताईंचे अनुभव ऐकताना मला भावलेली गोष्ट म्हणजे आयुष्यात येणारा तो एक क्षण जेव्हा आपण आयुष्याकडे वेगळ्या नजरेतून पहायला लागतो. आपला जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. ह्या दोघांच्याही जीवनात बदल घडवणारा तो क्षण आणि त्यातला निराशेकडून आशेकडे जाणारा त्यांचा प्रवास नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा असेल अशी आशा करतो.”

- अपर्णा वाईकर 

ही कथा २५ सप्टेंबर २०१९ ला पुण्यात आलेल्या पुराच्या वेळी घडलेल्या सत्यप्रसंगावर आधारित आहे. 


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी