ॲक्शन मुव्ही

निलेश मालवणकर
अँड धीस इयर्स फिल्म फेयर ॲवार्ड फॉर बेस्ट डायरेक्टर फॉर ॲक्शन मुव्ही गोज टू... अवर डिअर मिस्टर मंगेश कदम... टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. स्पॉटलाईट मंगेशच्या दिशेने वळला. कॅमेर्यांचे फ्लॅश चमकू लागले. उपस्थित सारे फिल्मी जगत एका सुरात मनापासून टाळ्यांचा कडकडाट करत होते. आणि का नाही करणार, त्यांच्या समोर होता, मराठी चित्रपट सृष्टीचा नवीन तारणहार, साऱ्यांचा लाडका एकमेवाद्वितीय मंगेश कदम. "येस्स..."

हाच तो क्षण होता ज्याची गेली वीस वर्षे मंगेशने आतुरतेने चातकासारखी वाट पाहीली होती. हा क्षण येणार याची मंगेशला पुरेपूर खात्री होती आणि आज तो प्रत्यक्षात उतरला होता. निवेदिकेने पुन्हा अनाउन्स केले, " मंगेश, प्लीज कलेक्ट युवर ॲवार्ड." मंगेश खुर्चीतून उठला. फिल्मी जगतातले किती तरी दिग्गज त्याच्याकडे पाहून हात हलवत होते. मंगेशने प्रत्युत्तरादाखल हात उंचावून त्याचा स्वीकार केला. निवेदिकेने मंगेशला हलकेसे आलिंगन देऊन त्याचे स्वागत केले. चित्रपट सृष्टीतले एक बुजुर्ग ॲवार्ड घेऊन उभे होते. मंगेश त्यांच्या पाया पडला. पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. मंगेशने ॲवार्ड उंचावून म्हटले, "मी शतशः ऋणी आहे माझ्या आई वडिलांचा, कुटुंबीयांचा, माझ्या मित्रांचा आणि साऱ्या चाहत्यांचा. आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मी आज येथे उभा आहे. तुम्हा साऱ्यांमुळेच मी हे यश संपादन करू शकलो. पण.... पण त्याच बरोबर मला हे सांगावेसे वाटते कि मला फार पूर्वीपासून माहीत होते कि मी एक यशस्वी ॲक्शन मुव्ही काढणार जी साऱ्या चित्रपट सृष्टीला हादरवून टाकेल. त्या चित्रपटातील स्टन्ट एव्हढे उत्कंठावर्धक असतील कि प्रेक्षक तो पूर्ण चित्रपट खुर्चीच्या टोकावर बसून पाहतील. हा चित्रपट साऱ्या चित्रपट सृष्टीतली मरगळ दूर करेल आणि ॲक्शन चित्रपट म्हणजे मंगेश हे समीकरण रूढ होऊन जाईल.” मंगेशच्या या वाक्यांवर पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. मंगेश साऱ्यांना अभिवादन करून निघणार तोच मघाचीच टंच निवेदिका पुन्हा त्याला आलिंगन द्यायला पुढे आली. मंगेश तिला आलिंगन देणार, तेवढ्यात त्याची बायको म्हणाली, "अहो, चहा थंड झाला तुमचा.” आपल्या बायकोला कुठे काय बोलायचे याची अक्कल नाही, हेच खरे असे म्हणून मंगेशने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तो पुन्हा त्या निवेदिकेकडे वळला. पण त्याच्या बायकोने काही हार मानली नाही.ती पुन्हा म्हणाली, "अहो, चहा थंड झाला तुमचा!” आता मात्र मंगेश चिडला,"अगं, ॲवार्ड सोहळा एन्जॉय करायचा सोडून चहाचा कसला विचार करते आहेस?” "अरे देवा, पुन्हा ॲवार्ड सोहळा. अहो कल्पनेच्या दुनियेतून जरा वेळ बाहेर या आणि चहा प्या तुमचा!” बायकोने मंगेशचे विमान यशस्वीपणे वास्तवाच्या धावपट्टीवर उतरवले.

पण एक दिवस आपण हे स्वप्न सत्यात उतरवणार याची मंगेशला खात्री होती. कॅलिफोर्नियातल्या आपल्या बंगलोच्या गॅलरीत बसून तो चहाचे घुटके घेत बाहेरचे निसर्गसौंदर्य न्याहाळू लागला. मंगेश अमेरिकेतल्या हजारो सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सपैकी एक. गेली बारा वर्षे अमेरिकेत होता. या वर्षांत बराच पैसा कमावला होता. पण भारताची ओढ त्याला कायम होती. आणखी फक्त दोन-तीन वर्षे अमेरिकेत काम करून थोडा आणखी पैसा कमवून भारतात परतायचे असा त्याचा विचार होता. ‘आणखी फक्त दोन-तीन वर्षे...’, असा विचार तो गेली बारा वर्षे करत होता. पण अलीकडे त्याला या चौकटीतल्या आयुष्याचा कंटाळा आला होता. काही तरी वेगळे, आपल्या आवडीचे करावे असे विचार त्याच्या डोक्यात घोळू लागले होते.
तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजला. मोबाईल वर बँकेचा अकॉउंट बॅलन्स कळवणारा एस एम एस होता. त्याने अकौंट बॅलंस पाहिला, सॅलरी अकौंटमध्ये जमा झाली होती. करोडपती झाल्याबद्दल त्याने स्वतःचे अभिनंदन केले. भारतात जाण्याचा त्याचा विचार बँक बॅलंस पाहिल्यावर काहीसा डळमळीत झाला. तो एस एम एस बद्दल बायकोला सांगणार होता, पण ती युरोप ट्रीपसाठी हट्ट करून बँक बॅलंसला खिंडार पाडेल अशी भीती त्याला वाटली. पण मग या पैशांचे करायचे तरी काय असा प्रश्न त्याला पडला. आणि लगेच त्याला उत्तर सापडले सुद्धा. या पैशांत एक मराठी ॲक्शन मुव्ही नक्कीच बनेल. मराठी चित्रपटातल्या हल्लीच्या तरण्याबांड नट्या त्याच्याभोवती फेर धरून नाचू लागल्या. त्याला  स्वत:ला बॉण्ड झाल्यासारखे वाटले.माय नेम इज कदम, मंगेश कदम!!

तो जेम्स बॉण्डच्या स्टाइलने बोलला. त्याला मनाशी गुदगुल्या झाल्या. झाले तर. आता मंगेशचा निर्णय पक्का झाला. आपण आता भारतात परतायचे. मंगेशला लहानपणापासूनच मसाला ॲक्शन चित्रपटांची आवड होती. सुरुवातीला अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि नंतर सनी देवल हि त्याची दैवते बनली होती. त्यांचे चित्रपट तो फर्स्ट डे फर्स्ट शो पहात असे. मास्तर वर्गात येताना एकदा त्याने चुकून "कुत्ते कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा" हे वाक्य उच्चारले. त्यावर मास्तरांनी त्याला बदड बदड बदडला होता. सनी देवलवर त्याचे एवढे प्रेम होते कि "ये ढाई किलो का हाथ..." हा डायलॉग वर्गातल्या गुंड मुलासमोर त्याने उच्चारला होता. नंतर तोच हात बँडेजमध्ये अडकवून त्याला दोन महिने शाळेत यावे लागले होते ही गोष्ट वेगळी. पण त्याने त्याच्या सनीवरच्या प्रेमाला अजिबात धक्का लागला नाही. सनीवर त्याचे एवढे प्रेम होते कि तो त्याच्यासारखा (म्हणजे मंगेश सनी सारखा... सनी मंगेश सारखा नव्हे.) नाचतही असे.नंतर नंतर त्यांच्या हिरोंमध्ये जेम्स बॉण्ड, जॅकी चान, सिल्वेस्टर स्टॅलॉनची भर पडली. मधल्या काळात हैद्राबादला जॉब करताना त्याने रजनीकांतचे काही चित्रपट पाहिले. त्याचे लार्जर दॅन लाइफ कटऔट्स, पोस्टर्स आणि स्टन्ट पाहून मंगेश पुरता भारावला. मराठी लोक सिनेमावर असे प्रेम करायला कधी शिकणार असा त्याला प्रश्न पडला.तर सांगायचा मुद्दा असा कि मंगेशने भारतात येऊन मराठी ॲक्शन मुव्ही बनवायचा विचार पक्का केला. बायकोने हे कळल्यावर आकांडतांडव करून दोन मजली बंगला डोक्यावर घेतला. भारतात गेल्यावर सासू सासऱ्यांबरोबर राहायचे म्हणजे आपले संपूर्ण स्वातंत्र्य नाहीसे होणार. टी-शर्ट, शॉर्टस् आणि मिनीजऐवजी पुन्हा सलवार कमीज घालायचे ही कल्पनाच तिला सहन होईना. तरी मंगेश ऐकेना म्हणून तिने ही गोष्ट त्याचा खास मित्र सचिन ठाकूरच्या कानावर घातली. पण मंगेशचा निश्चय आता ठाम होता. "एक बार जो मैने कमीटमेंट की तो मैं खुद कि भी नही सुनता," त्याने सचिन ठाकूरला सुनावले.
साऱ्यांचा विरोध मोडून मंगेश एकदाचा मुंबईला आला. विमानतळावर उतरताच आपण बॉलीवूडच्या भूमीवर पाय ठेवला या विचाराने त्याला गदगदून आले. आता हीच आपली कर्मभूमी, त्याने स्वत:ला बजावले.आल्याबरोबर पहिल्या प्रथम त्याने एका फिल्म डायरेक्शनच्या कोर्सला ॲडमिशन घेतली. डायरेक्शनचा त्याला पूर्वी अनुभव होता तो म्हणजे शाळा- कॉलेजच्या गॅदरिंगचा. फिल्म डायरेक्शन फार वेगळे होते. पण मंगेशने जिद्दीने कोर्स पूर्ण केला.

दरम्यानच्या काळात त्याने कथा लिहून काढली. ही कथा म्हणजे त्याने आजपर्यंत पाहिलेल्या साऱ्या ॲक्शन चित्रपटांचा अर्क होती. त्याने पाहिलेल्या चित्रपटातले आवडलेले घटक त्याने या कथेत एकत्र केले होते. मराठीमध्ये ॲक्शन चित्रपट चालणार का अशी शंका काही शंकासुरांनी उत्पन्न केली, पण नुकत्याच हिंदीत हिट झालेल्या दबंग, रेडी, गजीनी, बॉडीगार्ड या चित्रपटांनी त्यांची तोंडे परस्पर बंद केली. उलट मंगेशनेसुद्धा आपल्या चित्रपटाच्या कथेला साउथ इंडियन टच द्यावा अशी सूचना ते करू लागले. मंगेशने ही सूचना आनंदाने स्वीकारली.आता शोध सुरु झाला ॲक्शन चित्रपटाच्या हिरोचा. मंगेशच्या डोक्यात नाव आले अजिंक्यकुमारचे. त्यांची पर्सनॅलिटी रांगड्या ॲक्शन हिरोला साजेशी होती. अजिंक्यकुमारचा "गर्जा" हा बैलावरचा ॲक्शन चित्रपट फार लोकप्रिय झाला होता. पण नंतरचे मराठी ॲक्शन चित्रपट एकंदरीतच तितकेसे चालले नव्हते. या चित्रपटाने अजिंक्यकुमारला पुन्हा लाँच करायचे असे मंगेशने ठरवले. सुदैवाने अजिंक्यकुमारनेसुद्धा चांगला प्रतिसाद दिला. शुटींग सुरु झाले.

अजिंक्यकुमार आणि इतर कलाकारांनी मंगेशला चांगले सहकार्य केले. त्यामुळे चित्रपट वेळेत आणि बजेटमध्ये पूर्णसुद्धा झाला. आपल्या पहिल्या चित्रपटासाठी मंगेश फार हळवा झाला होता. चित्रपटाची रिळे त्याने कोल्हापूरची अंबाबाई, साईबाबा आणि बालाजी यांना वाहिली.चित्रपटासाठी प्राइम स्लॉट मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला.पण एका राजकीय पक्षाने काही चित्रपटगृहाच्या काचा फोडण्याची धमकी दिल्यानंतर थोडासा फरक पडला. चित्रपटाचा पहिला शो. चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. स्वतः अजिंक्यकुमार मंगेशच्या बाजूला बसले होते. मंगेश मनात झाडून साऱ्या ३३ कोटी देवांचा धावा करत होता. आणि एकदाचा चित्रपट सुरु झाला. आपल्या ॲक्शन हिरोची एन्ट्री एकदम साउथ इंडियन हिरोसारखी दणक्यात आणि लार्जर दॅन लाइफ प्लॅन केली होती. पहिल्याच सीनला टाळ्या आणि शिट्ट्याची बरसात झाली पाहिजे असा सीन मंगेशने लिहिला होता. सारे व्हिलन आपल्या गाड्या रस्त्यावर उभ्या करून हिरोला अडवून चोपण्यासाठी हिरोची वाट पहात असतात. बराच वेळ हिरो न आल्यामुळे तो घाबरला असे समजून ते हिरोची खिल्ली उडवू लागतात. तेवढ्यात जमीन धरणीकंप झाल्याप्रमाणे थरथरू लागते. सारे व्हिलन काय होते आहे हे न कळल्याने गोंधळून जातात. तेवढ्यात त्यांना समोरून हिरो येताना दिसतो. तो रणगाडा घेऊन आलेला असतो. ह्या सीनला मंगेश आणि अजिंक्य शिट्ट्या आणि टाळ्यांची अपेक्षा करत होते, पण अचानक रणगाडा आलेला पाहून लोक हसू लागले. मंगेशने दचकून अजिंक्यकडे पाहिले, तो सुद्धा चकित होऊन मंगेशकडेच पहात होता. मंगेशने पटकन नजर पुन्हा पडद्याकडे वळवली. पण पुढच्या सीनबद्दल मंगेशला खात्री होती कि या सीनला तर शिट्ट्या आणि टाळ्या नक्कीच येणार.पुढचा सीन म्हणजे रणगाड्यातून हिरो खाली उडी मारतो. व्हिलन त्याला मारायला येतात, त्याबरोबर रागाने हिरो जमिनीवर पाय जोरात आपटतो. एवढ्या जोरात की जमिनीला भेगा पडतात आणि सारे व्हिलन आणि त्यांच्या गाड्या तोल न सावरल्यामुळे त्या भेगांमध्ये जाऊन पडतात. पण इथेसुद्धा मंगेशचा पुरता अपेक्षाभंग झाला. शिट्ट्या, टाळ्या मारण्याऐवजी या सीनला लोक पोट धरधरून हसू लागले. काही तरी नक्कीच मोठ्ठा घोळ झाला होता. मंगेशने भीत भीत चोरून डोळ्यांच्या कोपऱ्यातून अजिंक्यकुमारांकडे पहिले, तर खुर्ची रिकामी होती, अजिंक्य कुमार उठून चित्रपटगृहाच्या बाहेर निघाले होते. "अजिंक्य सर.." मंगेशने त्यांना हाका मारून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या न ऐकल्यासारख्या करून अजिंक्य तडक चित्रपटगृहाच्या बाहेर निघून गेले.

मंगेशला एसीमध्ये दरदरून घाम फुटला. त्याचे डोके गरगरू लागले. त्याने बनवलेल्या ॲक्शन मुव्हीचे हसे झाले होते. त्याचे डोके गरगरू लागले. या साऱ्या प्रकारात त्याने आतापर्यंत स्वतःचे पन्नास-साठ लाख घातले होते, त्या नोटांमधून त्याला धूर निघताना दिसू लागला. झाली तेवढी शोभा पुरे, म्हणून तो सरळ कुणालाही न सांगता पार्किंग लॉटमध्ये आला. ड्रायव्हरला गाडी तडक घराकडे घ्यायला सांगितली.मोबाईल स्वीच ऑफ केला. तडक बेडरूममध्ये येऊन बेडवर स्वतःला झोकून दिले. पण झोप येईना.

"तू माझं करियर उद्धवस्त केलंस, मूर्ख माणसा!" अजिंक्यकुमार बोट रोखून त्याला म्हणताना दिसू लागला. "तुम्ही आपल्या सुखी आयुष्याची वाट लावलीत," त्याची बायको त्याच्याकडे बोट रोखून म्हणत होती,"तरी मी सांगत होते, पण तुम्ही ऐकाल तर शपथ." वर देणेकऱ्यांचे चेहरे फेर धरू लागले. ते आपल्या पैशांसाठी हट्ट करू लागले. दार ठोठावू लागले. मंगेशने घाबरून दाराशी पलंग लावला. पण देणेकरी दार ठोकण्याचे थांबवेनात. आतापर्यंतच्या थकव्यामुळे आणि ताणामुळे मंगेशला ग्लानी आली. "तुम्ही आता इथून निघून जा. मी तुम्हा साऱ्यांचे पैसे व्यवस्थित चुकवीन. मला थोडा वेळ द्या" असे ओरडत असताना केव्हा कोण जाणे मंगेशची शुद्ध हरपली, पण डोळे मिटत असताना त्याला दिसले कि काही देणेकरी दरवाजा तोडून आत शिरले होते.

मंगेशला शुद्ध आली, तेव्हा बायको बाजूला बसली होती.
"आता कशी आहे तुमची तब्येत? “ तिने प्रेमाने विचारले.
"ठीक आहे. सरिता, मी तुझे ऐकायला हवे होते. मला माफ कर."
"माफ कशाबद्दल?" सरिताने विचारले.
"मी इतकी वर्षे मेहनतीने कमावलेले सारे एका मूर्ख लहरीच्या नादात उधळून टाकले आणि रस्त्यावर आलो."
"अहो काय बोलताय काय तुम्ही?” सरिताने गोंधळात पडत विचारले, "अहो तुम्ही तर इतिहास घडवलाय!”"म्हणजे?” मंगेशने गोंधळून विचारले."अहो तुमचा चित्रपट सुपर ड्युपर हिट झाला आहे!” "काय सांगतेस काय? पण मी तर लोकांना ॲक्शन सीन्सना हसताना, त्यांची खिल्ली उडवताना पाहीले," मंगेशने गोंधळून म्हटले. "अहो, तुम्ही ॲक्शन चित्रपट म्हणून काढला असेल, पण लोकांना मात्र तो तुफान विनोदी वाटला. त्यांनी तो विनोदी समजून पहिला. अहो लोक प्रत्येक सीनला पोट धरधरून हसत होते. कितीतरी लोक हसता हसता खुर्च्यांवरून खाली पडले. अजिंक्य साहेबसुद्धा प्रेक्षकांच्या प्रतिसादाने फार खुश झाले. ते तुम्हाला शोधत होते. तुमचा मोबाईल पण ट्राय केला, पण तो स्विच्ड ऑफ होता." "काय सांगतेस अजिंक्यने चित्रपट पूर्ण पहिला? पण मी तर त्याला दुसऱ्याच सीनला उठून जाताना पहिले."मंगेशने म्हटले. "अहो त्यांना घरून फोन आला म्हणून ते मध्ये उठून गेले होते, पण परत आल्यावर पाहतात तर तुम्ही गायब होता. चित्रपट संपल्यावर आम्ही घरी आलो तर तुम्ही कडी लावून घेतली होती. दरवाजा उघडेना म्हणून शेवटी फोडावा लागला."
"अरे देवा, असा घोळ आहे तर!" मंगेशने कपाळावर हात मारला,"मला वाटले कि पिक्चर फ्लॉप झाले, म्हणून सगळ्यांना चुकवण्यासाठी घरी येऊन लपलो." "शाबास! म्हणजे या स्टोरीवर सुद्धा एक नवीन विनोदी चित्रपट बनवता येईल." आनंदाने सरिता चित्कारली. "बाई ग, आता वर्ष भर तरी सिनेमाचे नाव नको काढू. झाला तेवढा घोळ पुरे झाला", मंगेशने हात जोडून विनवले.पुढचे काही महिने अभिनंदन, सत्कार समारंभ स्वीकारण्यात गेले. मंगेशच्या "ॲक्शन" पटाने तब्बल २५ कोटींचा धंदा केला. मराठी सिनेमा सृष्टीचे उत्पन्नाचे सारे विक्रम तोडले. मंगेशला विनोदी चित्रपटांसाठी हिंदीतूनही बऱ्याच ऑफर्स आल्या.
***

काही महिन्यांनतर -
“ॲन्ड धीस इयर्स फिल्म फेयर ॲवार्ड फॉर बेस्ट डायरेक्टर फॉर कॉमेडी मुव्ही गोज टू... अवर डिअर मिस्टर मंगेश कदम...”, टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. स्पॉटलाईट मंगेशच्या दिशेने वळला. कॅमेर्यांचे फलॅश चमकू लागले. उपस्थित सारे फिल्मी जगत एका सुरात मनापासून टाळ्यांचा कडकडाट करत होते. आणि का नाही करणार, त्यांच्या समोर होता, मराठी चित्रपट सृष्टीचा नवा तारणहार, साऱ्यांचा  लाडका एकमेवाद्वितीय मंगेश कदम. "येस्स..." हाच तो क्षण होता ज्याची गेली 20 वर्षे मंगेशने आतुरतेने चातकासारखी वाट पाहीली होती. हा क्षण येणार याची मंगेशला पुरेपूर खात्री होती आणि आज तो प्रत्यक्षात उतरला होता. निवेदिकेने पुन्हा अनाउन्स केले,"मंगेश, प्लीज कलेक्ट युवर ॲवार्ड." मंगेश खुर्चीतून उठला. फिल्मी जगतातले किती तरी दिग्गज त्याच्याकडे पाहून हात हलवत होते. मंगेशने प्रत्युत्तरादाखल हात उंचावून त्याचा स्वीकार केला. निवेदिकेने मंगेशला हलकेसे आलिंगन देऊन त्याचे स्वागत केले. चित्रपटसृष्टीतले एक बुजुर्ग ॲवार्ड घेऊन उभे होते. मंगेश त्यांच्या पाया पडला. पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. मंगेशने ॲवार्ड उंचावून म्हटले, "मी शतशः ऋणी आहे माझ्या आई वडिलांचा, कुटुंबीयांचा, माझ्या मित्रांचा आणि साऱ्या चाहत्यांचा. आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मी आज येथे उभा आहे. तुम्हा साऱ्यांमुळेच मी हे यश संपादन करू शकलो. पण.... पण त्याच बरोबर मला हे सांगावेसे वाटते कि मला फार पूर्वी पासून माहित होते कि मी एक यशस्वी कॉमेडी मुव्ही काढणार जी साऱ्या चित्रपटसृष्टीला हलवून टाकेल. त्या चित्रपटातील विनोद एव्हढे उत्तम असतील कि प्रेक्षक चित्रपट बघताना हसता हसता खुर्च्यांवरून खाली पडतील. हा चित्रपट साऱ्या चित्रपट सृष्टीतली मरगळ दूर करेल. आणि कॉमेडी चित्रपट म्हणजे मंगेश हे समीकरण रूढ होऊन जाईल.” मंगेशच्या या वाक्यांवर पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. कॅलिफोर्नियामध्ये सचिन ठाकूर आणि त्याची पत्नी हा सोहळा मोठ्या कौतुकाने पाहत होते. मध्येच मीनल सचिनला म्हणाली,"सचिन, तुला आठवते, तू कॉलेजमध्ये असताना माउथ ऑर्गन आणि गिटार सुरेख वाजवायचास. खरे तर तुझ्या त्या कलागुणांवर भाळूनच मी तुला होकार दिला होता. तुला नाही वाटत तू ही वाद्ये पुन्हा वाजवायला सुरुवात करावी?" सचिन आ वासून मीनलकडे पाहत राहिला.
-
निलेश मालवणकर

ही कथा 'माझी वाहिनी' मासिकाच्या जून २०१४ च्या अंकामध्ये प्रकाशित झाली होती.

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी