भाग्यश्री साने मैत्रिणींनो, गौरी गणपती, नवरात्रीची गडबड आता संपली असेल.सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या मैत्रिणी, कोणाची आई, कोणाच्या सासूबाई हळदीकुंकवासाठी घरी आल्या की किती आनंद होतो ना आपल्याला! सगळ्याजणी नटून थटून, सुंदर भरजरी साड्या नेसून, छान साजेसे दागिने घालून एकमेकींकडे जातो, एकमेकींना हळदीकुंकू लावतो, प्रेमाने दिलेलं छोटं-मोठं वाण घेतो, एकमेकींनी केलेल्या चविष्ट पदार्थांचं कौतुक करतो, मैत्रिणीनं केलेल्या सगळ्या सजावटीची आणि तिच्या सौंदर्यदृष्टीची स्तुती करतो. एवढंच नाही तर, नवरात्रीमध्ये आपल्या दक्षिण भारतीय मैत्रिणींच्या घरच्या गोलूलादेखील हौसेनं जातो. त्यांच्या परंपरेचं कौतुक करत या वर्षी कोणत्या बाहुल्या नवीन घेतल्या असं कुतूहलानं विचारतो. संक्रांत, चैत्रगौरी, सत्यनारायण पूजा, महालक्ष्मी, गोलू अशा वेगवेगळ्या समारंभांच्या निमित्ताने होणारं हे हळदीकुंकू आपल्या सामाजिक आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे हे नक्की!