मुंबई एक स्वप्ननगरी

Inset Photo of Gateway of India,
by Ameya Deshmukh

'मुंबई, बम्बई, बॉम्बे','The City that Never Sleeps', 'Financial Capital of India', 'भारताचं न्यूयॉर्क' ! असं काय आहे खास मुंबईच्या पाण्यात? यामागे दडलाय तो मुंबईचा बहुसांस्कृतिक इतिहास, ज्यातून मुंबईसारख़े सुंदर रंगीबेरंगी फूल उमलले. येथील माणसे जणु या फुलाच्या अनेक पाकळ्या. काळानुसार एकेक पाकळी उमलत गेली आणि प्रत्येक पाकळीत त्यांच्या भाषेचा, चविष्ट खाण्याचा, रीती-परंपरांचा अर्क मिसळत गेला. असे अनेक पदर असलेले फूल म्हणजेच मुंबई.

इतिहास म्हटलं की एखादा पुणेकर, कोल्हापूरकर अर्ध्या झोपेतदेखील साम्राज्य, युद्ध वगैरे घडाघडा ऐकवू शकतो, पण मुंबईचा इतिहास पण तितकाच जुना आहे, बरं का!! मुंबईच्या लोकल ट्रेनचा प्रवास मुंबई-बाहेरच्या माणसाला ज्वालामुखीच्या उद्रेकासारखा वाटत असला तरी मुंबईची निर्मितीच ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली असल्याने आम्हाला त्याचे फार काही वाटत नाही. मुंबईची सात बेटे म्हणजे Isle of Bombay, परळ, माझगाव, माहीम, कुलाबा, वरळी आणि Old Woman's Island. आमच्या व्यापार-परंपरेची रेखा थेट अगदी शूर्पारक बंदरापर्यंत जाऊन पोचते. पहिल्या शतकातील शूर्पारक बंदर (सध्याचे नाला सोपारा) एक महत्त्वपूर्ण व्यापारकेंद्र होते आणि रोमशी व्यापारी संबंध होते. मुंबईत एक चर्चा तुम्हाला नेहेमी नक्की ऐकू येईल - तुम्ही मुंबईतले की बाहेरचे? पण मुंबईत स्थलांतर सतत सुरूच आहे. अगदी दुसऱ्या शतकातील शिलाहारांच्या काळापासून आता ह्या क्षणापर्यंत कुणी ना कुणीतरी मुंबईत सेटल होतच आहे. तेराव्या शतकात देखी सल्तनतच्या काळात बांधलेला हाजी अली दर्गा किंवा अगदी त्याही आधीच्या काळी कोरली गेलेली जोगेश्वरी लेणी; एलिफंटा लेणी; वाळकेश्वर मंदिर; बाणगंगा टँक लेणी ही चांगली उदाहरणे म्हणून देता येतील.

पंधरावे शतक: पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला त्यावेळी Island of Bombay आणि वरळी येथे पोर्तुगीज, कोळी, भंडारी, जे मुळचे समुद्री व्यापारी होते; कुणबी, आग्री, जे शेतकरी होते; व माळी समाज स्थायिक झाला. उत्तरेच्या बेटांवर माहीम, परळ, वडाळा आणि सायन गावात प्रभू, ब्राह्मण, वाणी आणि पारशी यांशिवाय कोळी आणि भंडारी समाज स्थायिक झाला. या बरोबर कावेल, कोलभट, नायगाव, डोंगरी आणि काही लहान गावे वसली. या काळात, अनेक ख्रिस्ती गिरिजाघरे बांधली गेली आणि हजारों लोकांना ख्रिस्ती धर्मात परिवर्तन करण्यास जबरदस्ती करण्यात आली. समाजात यामुळे अशांतता वाढली आणि हळू हळू लोकसंख्या आणि व्यापार कमी झाला.

सोळावे शतक: ब्रिटिश राज्य आले आणि वार्षिक भाड्यावर मुंबईला East India Company ला देण्यात आले. त्यांनी मुंबईत किल्ला, रस्ते बांधले, इमारती उभारल्या, कोठारे आणि रुग्णालय बांधली. मुंबई कारागीर, व्यापारी आणि उद्योगपतींचे संपन्न शहर बनले. त्यानंतर लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली. १६४७ मधे पारशी समाजातील विणकर आणि इतर कारागीर मुंबईत आले आणि १६७३ मधे त्यांनी मुंबईतल्या मलबार हिल येथे पहिला Dakhma, Tower of Silence बांधला. १६८६-१६९६ मधे Malaria आणि Plague मुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कमी झाली. 

सतरावे शतक: पुनर्वसन सुरू झाले अणि मुंबईत पुन्हा धंद्यात भरभराट होऊ लागली. East India Company चे या काळात राजकीय शक्ती म्हणुन रूपांतर झाले. Old Woman's island वर Gunpowder Mill आणि डोंगरी येथे तुरुंग बांधण्यात आले. डॉक्स बांधून नौदलाची तैनात झाली. पहिला बगदादी यहुदी (Jew), जोसेफ सेमा, १७०३ मध्ये सूरतहून मुंबईला आला, आणि बेने इस्त्राईल समुदायाचा पहिला सदस्य मुंबईच्या दक्षिण कोकण खेड्यातून शहरात आला. १७९६ मध्ये Samuel Ezekiel Divekar यांनी "The Gate of Mercy" synagogue स्थापित केले. १७२० मधे पहिली बँक बांधून व्यापारास प्रोत्साहित केले गेले. लोकसंख्या वाढत गेली. याच शतकात, साष्टी बेट, एलिफंटा, हॉग बेट, कारंजा, वसई, खंदेरी आणि इतर बेटे East India Company ने मराठ्यांकडून बळकावली. १७८० मधे मुंबईची लोकसंख्या एक दशलक्ष झाली. १७८२ मधे प्रथमच देवीच्या साथीदारम्यान (Smallpox) लसीकरण सुरू केले. १७९० मधे गुजरातमध्ये दुष्काळ पडला आणि पारशी मोठ्या प्रमाणात मुंबईत आले.

अठरावे शतक : १८०३ मध्ये जुना किल्ला, तेथील घरे आणि बाजारपेठ येथे प्रचंड आग लागून बरीच वित्त आणी जीवित हानी झाली. मर्यादित जागा आणि वाढती लोकसंख्या यामुळे ब्रिटिशांनी भरणी टाकून बेटे जोडायचा प्रकल्प सुरु केला. या आगीनंतर येथील मुसलमान वस्तीतील बरेच लोक जुना नागपाडा व इतर भागात क्रॉफर्ड (महात्मा फुले) मार्केटच्या उत्तर-पश्चिमेकडे स्थायिक झाले, आणि मग जेव्हा ब्रिटीश पायदळ (infantry) रेषा बांधल्या गेल्या तेव्हा त्यांना पायधुनीच्या उत्तरेस, मांडवीतील भेंडीबाजारच्या भागात हलविण्यात आले. मुंबई बेटाला साष्टी बेटाबरोबर जोडणारा 'सायन कॉजवे' १८०३ मध्ये पूर्ण झाला. हॉर्नबी वेल्लार्ड, नावाच्या समुद्री भिंतीमुळे सखल भागाची पुनर्प्राप्ती झाली आणि सुमारे ४०० एकर जमीन पुरविली गेली. महालक्ष्मी, कामाठीपुरा, ताडदेव आणि भायखळयाचा भाग स्थायिक झाला. कामाठी कामगार कामाठीपुरामध्ये वसले आणि मग जशी जशी नगरी वाढत गेली तसे ते धोबी तलाव, गिरगाव, चौपाटी आणि खेतवाडी या जागेत वसले. व्यापार करणारे समुदाय (कच्छी आणि पारशी) मुंबईत येत राहिले आणि आता किल्ल्याबाहेर मांडवी, चकाला आणि उमरखेडी या ठिकाणी वसू लागले. उमरखडी, खेतवाडी, तरवडी, माहीम, भेंडीबाजार आणि डोंगरी या जागेची लोकसंख्या वाढू लागली.

१८१९मध्ये राज्यपाल Mountstuart Elphinstoneच्या अधिपत्याखाली व्यापाराचा विस्तार आणि शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली. व्यापार वाढत गेला आणि १८३६मध्ये Bombay Chamber of Commerce ची स्थापना झाली. १८३७मध्ये मोठ्या प्रमाणात पारशी मुंबईत आले. १८३८ मध्ये 'कुलाबा कॉजवे' पूर्ण झाला. १८५३ रोजी, मुंबईला ठाण्याशी जोडणारी भारतातील पहिल्या प्रवासी रेल्वेमार्गाची स्थापना झाली. १८५७ मध्ये पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर East India Company वर गैरव्यवस्थेचा आरोप झाला आणि ब्रिटिश राजाने मुंबई ताब्यात घेतली. १८५८ मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी बांधण्यात आली. १८६१ - १८६५ American Civil War च्यावेळी हे शहर जगातील प्रमुख कापूस व्यापारकेंद्र बनले. १८६९ला Suez Canal उघडला आणि मुंबई शहर अरबी समुद्रावरील सर्वात मोठे बंदर बनले. १८७०मध्ये गटार बांधकामात काम करण्यासाठी अनेक लोक मुंबईत आले.

मुंबई महानगर पालिकेची स्थापना १८७२मध्ये झाली. १८७३मध्ये 'बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ प्रस्थापित झाले आणि गोदी(docks) बांधण्यात आल्या. फ्लोरा फाउंटेन आणि व्हिक्टोरिया टर्मिनस, हँगिंग गार्डन आणि सरोवर याच काळात बांधण्यात आले. वस्ती वाढत गेली. माझगांव, मलबार हिल, मार्केट, मांडवी, उमरखडी आणि भुलेश्वर, गिरगाव, भायखळा, चिंचपोकळी, पांजरपोळ येथे नविन घरे उभी राहिली. किल्ल्यात दोन मोठे बाजार- चायना बाजार आणि चोर बाजारामध्ये गोदामांची गर्दी झाली. १८७६ - १८८१मध्ये देवीची साथ (Smallpox) पसरली. १८८८ मधे मुंबई महानगर पालिका स्थापित झाली. १८९८ला मुंबईमध्ये गिरण्यांची (Mills) संख्या १३६ पर्यंत वाढली. या काळात पारशी समाज, गोआनीज, रेशीम विणकर, धान्य व्यापारी, बेने-इस्त्राईली, मजूर लोक, कोळी समाज, मुसलमान, अरब आणि ब्राम्हणांची मुंबईतील वस्ती वाढली.

१९२० मध्ये कामानिमित्त मुंबईत स्थलांतर करणारे अनेक दक्षिण भारतीय माटुंगा आणि धारावीच्या उत्तरेकडे असलेल्या झोपडपट्टीत स्थायिक झाले. स्वातंत्र्य चळवळीत मुंबईने पुढाकार घेतला. १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पाकिस्तानमधील शरणार्थीं (सिंधी समाज) मुंबईत आले. त्यांनी लोकसंख्येमध्ये आणखी भर घातली. १९४७मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्य तयार झाले. १९५० मध्ये मुंबई उपनगरी जिल्हा व मुंबई शहर विलीन करून मुंबईच्या महानगर पालिकेच्या हद्दीत वाढ करण्यात आली. आज मुंबई महानगर पालिका, मुंबई महानगर प्रदेशाचा भाग आहे. मुंबईत बदल घडत गेले आणि शहर वाढत गेले. टेक्सटाईल इंडस्ट्री गेली, फ़िल्म् इंडस्ट्री आली. नवीन व्यवसाय व त्याबरोबर येणारी नवी माणसे आली. या शहराने येथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मुंबईकर करून टाकले. जो इकडे आला आणि राहिला तो इकडचा झाला. जरी काही कारणाने तो बाहेर गेला, तरी त्याचा मुंबईच्या प्रती ओढा कमी झाला नाही. अशी ही मुंबई येथील स्थायिक मुंबईकराच्या निरनिराळ्या रंगात रंगली.

--------------------------------------

बाममं आणि मराठी कला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या साहित्याची देवाणघेवाण ह्या नव्या उपक्रमाअंतर्गत 'हितगुज'च्या आगामी अंकामधील दोन लेख झलक स्वरूपात सादर करत आहोत. मैत्रच्या ह्या अंकातील गड्या आपुला गाव बरा सदारांतर्गत मुंबई-ठाणे-कोकण ह्या भागातील शेजाऱ्यांशी आपली ओळख होणार आहे. त्याच प्रदेशांविषयी माहिती देणारे हितगुजच्या अंकांमधील लेख प्रकाशनार्थ निवडले आहेत. दोन्ही लेख अनेकपानी आहेत. मैत्रच्या पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे दोन्ही लेखांतील सुरुवातीचे भागच केवळ प्रकाशित केले आहेत. संपूर्ण लेख हितगुजच्या मे महिन्यात प्रकाशित होणाऱ्या अंकात वाचण्यास मिळतील.

लेखक चमू - अभिजित देवधर, माधवी आगाशे, प्रीती फडके, सुजाता देशमुख, अतुल पत्की, महेश्वर पाटील, सोनाली आंब्रे-तेरेदेसाई

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी