एक घटना

संध्या गंधे
सगळेजण मला विसराळू म्हणतात. "अशी कशी गं तू इतकी महत्त्वाची गोष्ट विसरलीस?" असे अनेक वेळा ऐकावे लागते. घरच्यांनी आणि मैत्रिणींनी थकून अखेर माझा हा विसराळूपणा स्वीकारलाआहे. माझ्या ह्या विसराळूपणामुळे मी माझा लाखमोलाचा मुलगा काही काळाकरता गमावला होता ही अनेक वर्षांपूर्वीची घटना माझ्या मनाच्या कोपऱ्यात मी दडवून ठेवली आहे. त्या घटनेची आठवण जरी झाली तरी मन शहारते.

त्याकाळी आम्ही इंदोरला वल्लभनगर येथे राहात होतो. माझ्या धाकट्या दिरांचे लग्न १५ दिवसांवर आले होते, म्हणून माझ्या सासूबाईंनी आम्हा सर्वांना चंद्रलोक येथे राहाण्यास बोलावले होते. पूर्वी लग्नासाठी १५ दिवस आधीपासून पाहुणे यायला सुरुवात होत असे. माझ्या मिस्टरांची फिरतीची नोकरी असल्याने मी व दोन्ही मुले  चंद्रलोक येथे राहाण्यास गेलो.

मे महिन्याचे दिवस होते, बाहेर रणरणते ऊन होते. चंद्रलोक सोसायटी तशी गावापासून दूर होती. सकाळचे ११ वाजले होते. माझ्या सासूबाईंनी मला बऱ्याच कामांची यादी दिली होती. घरात सगळी मुलं दंगा करत होती. दीड वर्षाचा अनिरुद्धपण तिथेच रमला होताम्हणून साडी बदलून, पर्स उचलून मी सटकण्याच्या बेतात होते. पण खुर्चीमागे लपलेल्या अनीने मला पाहिले. आई बाहेर चाललेली आहे ह्याचा त्याला अंदाज आला व मला बाहेर घेऊन चल म्हणून मागे लागला. खूप आमिषे दाखवूनसुद्धा काही फायदा झाला नाही म्हणून त्याला घेऊन बाहेर पडले. कडेवर अनिरुद्ध, त्याची बॅग, पर्स आणि वर आग ओकणारा सूर्यनारायण. बरेच चालल्यावर मेन रोड आला. तिकडे गावाबाहेर असल्याने रिक्षा सहज मिळत नसत म्हणून बसस्टॉप वर उभी राहिले. खूप ऊन लागत होते म्हणून अनिरुद्ध खूप रडत होता. अगदी वैताग आला होता मला. अखेर बस आली पण भरलेली. कंडक्टरने पहिलेच वॉर्निंग दिली, "मॅडम स्टँडिंग जाना पडेगा." बसमध्येगार वारा लागल्याने अनिरुद्ध झोपला. शेजारच्या सीटवर बसलेल्या महिलेला माझी दया आली. "बेबी को मेरे पास देदो" असे म्हणाली. बसमधे खूप गर्दी होती. प्रत्येक स्टॉपवर माणसं भरत होती. त्यामुळे नकळत ढकलली जाऊन मी दाराजवळ पोहोचले. "वल्लभनगर" असे कंडक्टर म्हणाला आणि मी नादात पटकन खाली उतरले व चालत घरी पोहोचले. माझ्या बाबांनी पाठवलेल्या पेटीतला आंबा काढून धुवून चिरला व अनीला द्यायला बाहेर आले आणि लक्षात आले, अरे अनीतर बसमध्येच राहिला!

क्षणभर सुन्न झाले. काय करावे कळेना. तडक निघाले, कॉर्नरवर रिक्षा केली व शेवटचा स्टॉप "राजवाडा” असल्यानेतिथे गेले. तिथे चौकशी केल्यावर कळाले की ती बस परत प्रवासी भरून उलट्यादिशेने गेलीसुद्धा होती. आता काय करू, मला ब्रह्मांडच आठवले. ती बाई कुठे असेल? तिला कसं शोधू? माझा एवढासा बाळ, त्याला नाव सुद्धा सांगता येत नाही. रडत रडत इकडे तिकडे फिरत होते पण कोणी काहीच सांगू शकले नाही. माझ्या मिस्टरांचा रागीट चेहरा सारखा सारखा डोळ्यासमोर येत होता. अशी कशी वेंधळी तू? असे मला रागवत आहेत असा भास होत होता. शेवटी पोलिसांकडे जायचे ठरवले आणि पोलिस स्टेशनवर गेले तर महाशय पोलिसाच्या कडेवर मस्त बसले होते. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी धावत जाऊन त्याला घ्यायला गेले तर त्याने मानच फिरवली. जणू तो त्याचा राग व्यक्त करत होता. 

पण आता मला वेगळीच भीती वाटली. आता मी पोलिसांना कसे पटवू की हा माझाच मुलगा आहे? तो तर माझ्याकडे यायलासुद्धा तयार नाही. पण पोलीसपण माणसचं असतात. माझा रडून रडून लाल झालेला चेहरा व अनीच्या आणि माझ्या चेहऱ्यातले साम्य पाहून काही फॉरमॅलीटीज पूर्ण करून त्यांनी अनी मला परत दिला. ही गोष्ट घरी आल्यावर कुणालाच सांगितली नाही. अनी इतका लहान होता की त्याने सांगण्याचा प्रश्नच नव्हता.आज त्याच अनीकडे मी बाल्टिमोरला आले आहे. 

संध्या गंधे

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी