कवितेचं पान - गणपत वाणी

अनिल मायभाटे

कधीकधी आम्हा मित्रमंडळींत विज्ञानातल्या काही “गहन” (म्हणजे आम्हाला न समजलेल्या!) गोष्टींवरून चर्चा, वाद सुरु होतात.

सगळेच स्वत:ला मोठ्ठे विद्वान समजणारे! त्यामुळे लोकांसाठी निरर्थक असलेले हे वाद अगदी शिरा ताणताणून तावातावाने होतात. कुठल्याही, वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नांना मग कधी न जाणवलेली "खोली" येते! आणि तर्ककुतर्कांची ओढाताण करून हे वाद एका क्षणी हटकून एका मुद्द्यापाशी येऊन अडकतात आणि स्वत:च खणून ठेवलेल्या या तात्त्विक खड्ड्यांमध्ये आमची गाडी रूतून बसते.

मुद्दा असा, की मला, म्हणजे कुणाही, एखाद्याला एक रंग "पिवळा" म्हणून जो आणि जसा दिसतो तोच आणि तसाच इतरांनाही दिसत असेल आणि त्यालाच ते "पिवळा" म्हणत असतील हे कशावरून? म्हणजे असं की मी ज्या रंगाला पिवळा म्हणायला कधीतरी लहानपणी शिकलो आहे, त्याच रंगाला इतरही सर्वजण "पिवळा" म्हणायला शिकतात, हे खरं. पण म्हणून माझी त्या रंगाची समज आणि "पिवळा" या शब्दाने माझ्या डोळ्यांसमोर जो रंग उभा राहतो तो रंग, हे दोन्ही इतर कुणालाही असलेली त्या रंगाची समज आणि त्यांना दिसणारा तो रंग हे एकच आहेत, याला पुरावा काय? रंग आणि त्याची अनुभूती ही काही यंत्राने मोजता येण्यासारखी गोष्ट नाही. जरा खोलवर गेलं की लक्षात येतं की या गोष्टीचा कोणताही पुरावा निर्माण करणं केवळ अशक्य आहे! मग ज्याला जो रंग "पिवळा" म्हणून दिसतो त्याच रंगाला प्रत्येकाने नेहेमी "पिवळा" म्हणत राहणं हा एकच पर्याय शिल्लक राहतो. फक्त एवढंच की आज मी ज्याला पिवळा म्हणतोय त्यालाच उद्या हिरवा म्हणेन, परवा केशरी म्हणेन, असं नाही करता येणार!

हे असले वाद सुरु झाले की मला नेहमीच बा. सी. मर्ढेकरांचा "गणपत वाणी" आठवतो.

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनि डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशिच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवई.

अशा काहीशा विनोदी ओळींनी हा गणपत वाणी आपल्या समोर येतो! कुठल्यातरी छोट्याशा आडगावात, रस्त्याकडेला अर्धवट मिणमिण प्रकाशात, आणि एका अस्ताव्यस्त अजागळ पसाऱ्यात मधोमध आपल्याच नादात राहणारा, रिकामटेकडा आणि एका अर्थाने संपूर्ण नगण्य, अगदी ‘बिच्चारा’ जीव. खपाटीला गेलेलं पोट आणि त्या पोटालाच शोभेल अशा हडकुळ्या अंगात तेलकट सदरा, खाली चट्टेरी पट्टेरी मळकट लेंगा किंवा फारफार तर एखादी डागाळलेली जुनाट विजार, तोंडात अजून न पेटवलेली बिडी आणि ती पेटवण्यासाठी तोंडातच ठेवलेली, दातांना चाळा म्हणून बराच वेळ चावत ठेवलेली काडी. बरेच दिवस सुखाची शांत झोप न झाल्यामुळे तारवटलेले डोळे आणि चेहेऱ्यावर सततचा त्रासलेला भाव!

या चार ओळींनंतर काहीतरी विनोदी, उपहासात्मक असेल या अपेक्षेने आपण पुढे वाचत राहतो, आणि पुढच्या काही ओळी ती अपेक्षा पूर्णही करतात.

गिऱ्हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

यातून पुढे येतो तो एक कंटाळवाणं आयुष्य जगणारा, समाजाने झिडकारून टाकण्याच्याच लायकीचा, लौकिकार्थाने काहीसा तुच्छ, नगण्य जीव.

कवितेचा रंग हळुहळू दिसतोय, कळतोय असं वाटू लागतं. वाचता वाचता आपण थोडे स्मित करतो. हे असं कंटाळवाणं आयुष्य आपल्या वाट्याला नाही आलं या भावनेने क्षणभर सुखावतो. बेसावध होतो. आणि तोच, अचानक कुणीतरी गालावर खाड्कन एक चपराक मारावी, किंवा दोरी दोरी म्हणून उचलायला जावं आणि सर्रकन नागाने फणा काढून डंख मारावा तशा पुढच्या ओळी येतात आणि ही कविता समोर उभी राहून दचकवते. वरवर नगण्य वाटणारा हा गणपत वाणी आपलं खरं रूप दाखवत समोर दत्त म्हणून उभा राहतो. एखादा रंग पिवळा म्हणत आयुष्य काढावं आणि अचानक एक दिवस तो खरंतर लाल आहे हे कळावं तसा काहीसा.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

या ओळी वाचताना भीतीची एक थंड लहर पाठीच्या कण्यातून सरसरत जाते आणि ही कविता तिच्या अर्थासकट, त्यांच्या वेगवेगळ्या पदरांसकट जागी होते, धगधगत्या ज्वालेप्रमाणे समोर उभी राहते. डोळ्यांत अंजन घालते. हा गणपत वाणी आता जिवंत नाही हे पहिल्यांदा कळतं.

म्हणजे हा विनोद नाही. उपहास तर नाहीच नाही. काहीतरी भयाण, भीतीदायक, अप्रिय, नग्न सत्य डोळ्यांसमोर फेर धरून नाचायला लागतं. मृत्यूचं भय! जवळच्या एखाद्याचा अचानक, अकाली मृत्यू झाल्याची बातमी कळाली की आपल्या मनात कसली अनामिक भीती जन्म घेते? पण ती फक्त मृत्यूचीच भीती आहे का? की आणखी काही जाणवत राहतंय?

आपण सर्वांनीच कितीही वैज्ञानिक, विचारवंत, तत्त्वज्ञ किंवा इतर काही मुखवटे घातले तरीही आपल्या प्रत्येकात एक गणपत वाणी आहे. सामाजिक दृष्टीने कर्तृत्वाचे कितीही झेंडे गाडले तरीही एका व्यापक अर्थाने त्याला धणे, जिरे, आणि तिळीचे तेल विकून हिशेब कोळीत बसण्यापलीकडे फार अर्थ, अस्तित्व नाही. या नगण्यतेची भीती आपल्याला वाटते का?

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

ही सगळी आपल्या हाडांची काडे करून आपण जे कर्तृत्वाचे डोलारे उभे करतो तेही शेवटी याच "दुकानातल्या जमिनीत" जाऊन रुतून बसणार आहेत! आता लक्षात येऊ लागतं की ही वरवर साधी, विनोदी वाटणारी कविता काहीतरी शाश्वत सांगू पहाते आहे, जे पचवणं सर्वांनाच थोडं जड जातं.

पण हे सत्य निराशावादी नाही. रोजच्या कंटाळवाण्या आणि निरर्थक आयुष्याला एक अखेर आहे. मृत्यू म्हणजे फक्त भीतीदायक सत्य नाही. माणसाला लाभलेलं ते एक वरदान आहे, अशा अर्थाचा एक कोपरा उजळत शेवटच्या ओळी येतात आणि "इन दि एन्ड वि ऑल डाय" या प्रसिद्ध ओळींची आठवण देऊन जातात.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

आपल्यातला प्रत्येक "गणपत वाणी" हा असाच गळीत धान्यें विकत, बिडी पितांपितांना एक दिवस मरून, संपून जाणार आहे. पण तेही एखाद्या आंधळ्याला एक मागता दोन डोळे मिळावेत तसं वरदानच आहे. अमरत्वाची भाबडी आशा करणं हे आंधळेपणाचं लक्षण आहे. मृत्यू हे मानवी आयुष्याचं अंतिम सत्य आहेच, पण तो येत नाही तोवर तत्त्वज्ञानाच्या एखाद-दोन काड्या चावायला मिळणे हे ही एक मागता दोन मिळावेत तसे अनपेक्षित वरदानच!

Comments

  1. कवितेचं रसग्रहण छान केलंय.
    Nilesh Malvankar

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय