हरवले ते गवसले तेव्हा

‘हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?’ हे पी. सावळाराम यांनी लिहिलेलं आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं स्वतःशीच गुणगुणत मी गाडी चालवत घरी येत होतो. एखादी गोष्ट अनपेक्षितरित्या मिळाली तर त्याचा आनंद जास्त होतो.

त्या आनंदाच्या तंद्रीतच मी घरी आलो. ‘लकी’ असणं म्हणजे काय, याचा अनुभव मी घेत होतो. घडलं असं की मी काही घरगुती सामान आणायला म्हणून कॉस्कोमध्ये गेलो होतो. गाडी लावताना लक्षात आलं की गाडीचं चाक पंक्चर झालेलं आहे. त्यामुळे ताबडतोब कॉस्कोमध्येच गाडी दुरुस्तीला टाकली आणि सामान घेऊन झाल्यावर गाडी मिळण्याची वाट बघत थांबलो. जेव्हा गाडी तयार झाली तेव्हा सामानाची कार्ट बाहेरच ठेवून किल्ली आणायला आतमध्ये गेलो. 

खरं म्हणजे अमेरिकेतले मेकॅनिक इथल्या गिऱ्हाईकांना आतमध्ये शॉप फ्लोअरवर घेऊन जात नाहीत, परंतु त्यावेळेच्या मेकॅनिकला माझी गाडी चालू करता आली नाही त्यामुळे त्याने मला आतमध्ये बोलवलं आणि गाडीच्या किल्ल्या तिथेच दिल्या. जी गोष्ट मेकॅनिकला करता आली नाही ती आपण रोज सहजरित्या करतो अशा वेगळ्याच खुमीमध्ये त्या मेकॅनिकसमोर मोठ्या आविर्भावात गाडी चालू करून मी त्या शॉप फ्लोर मधून जे निघालो ते तडक घरी. सध्या कोविड-१९चा प्रादुर्भाव चालू असल्यामुळे बाहेरून आलो की मी आंघोळ कटाक्षाने करतो. आंघोळ करून झाल्यावर डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली की आपण विकत घेतलेलं सामान ठेवलेली कार्ट तर टायर शॉपच्या बाहेरच राहिली. झालं, म्हणजे परत एकदा कॉस्को मध्ये जायला लागणार. मनात विचार घोळायला लागले. त्यातून आता पावणेसहा वाजलेत म्हणजे पोहोचेपर्यंत कॉस्को बंद व्हायची वेळ येईल. त्यातून कार्ट तिथे असेलच का याची खात्री नाही. झालं शंभर-दोनशेचा चुना लागला. पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे म्हणून परत बाहेरचे कपडे घालून गाडी कॉस्कोच्या दिशेने हाणायला सुरुवात केली. जाता जाता डोक्यात विचारांचं द्वंद्व चालूच होतं, त्या शंभर-दोनशेच्या सामानासाठी आपण जोरात जातोय खरं, पण उगाचच शंभर-दोनशेचे स्पीडींग तिकीट नको मिळायला. पण त्या दिवशी अस्मादिकांचं नशीब बलवत्तर होतं. दुकान बंद व्हायच्या चक्क पाच मिनिटं आधी स्पीडींग तिकिटं न मिळवता मी कॉस्कोमध्ये पोहोचलो. गाडी अक्षरशः दरवाज्यासमोरच लावली आणि पाहतो तर काय कॉस्कोचा एक कर्मचारी नेमका त्याच वेळेला माझी कार्ट घेऊन आत जायला निघाला होता. पटकन गाडीतून बाहेर पडून त्याला गाठला. त्याचा पहिल्यांदा माझ्यावर विश्वासच बसेना, परंतु त्या कार्टमध्ये असलेला कॉफीचा कप मी डायरेक्ट तोंडाला लावला हे बघून त्या माणसाने फार आढेवेढे घेतले नाहीत. माझं तरी काय भाग्य! सहसा मी कॉस्कोमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ घेत नाही, पण त्या दिवशी गाडी दुरुस्तीला टाकलेली असल्यामुळे कॉफी घेतलेली होती आणि अर्धवट प्यायलेली कॉफी अशी उपयोगात येईल याची कल्पना नव्हती. जर आपल्याला आंघोळीला उशीर झाला असता तर? जर आपण गाडी पार्किंग लॉटमध्ये पार्क करत बसलो असतो तर? त्या कर्मचाऱ्याने ५ मिनिट आधीच ती कार्ट आतमध्ये नेली असती तर? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आता गरज नव्हती. हयाउलट, बरोबर वेळेत तिथे पोहचून आपलं सामान मिळाल्यामुळे मला जो आनंद झाला होता तो एखाद्या हिंदी चित्रपटातील कथेप्रमाणे लहानपणी जत्रेत बिछडलेल्या जुळ्या भावांना तरुणपणी एकमेकांना भेटल्यावर जो आनंद होतो त्या सरीचा होता आणि म्हणूनच ‘हरवले ते गवसले का’ हे गाणं गुणगुणत मी आरामात गाडी चालवत घरी येत होतो. 


तसं म्हंटलं तर हरवून गेलेल्या गोष्टी परत मिळण्याचा असा प्रसंग माझ्यासाठी काही नवीन नव्हता. लहानपणी एकदा ‘खेळून परत येताना ब्रेड घेऊन ये’ अशी आईने ताकीद दिलेली असल्यामुळे एक दिवस मैदानावरून तडक बेकरी गाठली. ती बेकरी आमच्या घराच्या अगदी जवळ म्हणजे घराला अगदी लागूनच, त्यामुळे मैदानावर नेलेली आणि मैदानापासून बेकरीपर्यंत आणलेली सायकल बेकरीपाशीच ठेवून, मी चालतच घरी गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा बहिणीला सायकल हवी होती तेव्हा सगळा प्रकाश डोक्यात पडला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. एक सायकल रात्रभर बेकरीसमोर थोडीच राहणार? पण गंमत बघा, आठवड्याभरानंतर तीच सायकल आमच्या जवळच्याच भाजीवाल्याकडे दिसली. तडक त्याच्याकडे जाऊन घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्यावेळेच्या माझ्या साळसूद आणि रडवेल्या चेहर्‍याकडे पाहून कदाचित त्याला माझी दया आली असावी आणि अर्थातच घडलेला प्रकार खरा असल्यामुळे त्याने सायकल परत केली. त्यावेळेस पहिल्यांदाच वडिलांनी शाबासकी दिल्यागत नजरेने माझ्याकडे बघितले. तेवढी आपुलकीची नजर म्हणजे सुद्धा त्यावेळच्या काळात खूप मोठं बक्षीस होतं. आजकालच्या मुलांचं जे उठसुठ कौतुक चालू असतं तशी पद्धत त्यावेळी नव्हती. किमान आमच्या घरी तरी नव्हती. त्यामुळे त्यावेळी नजरेची शाबासकीसुद्धा मन भारावून गेली.

त्यानंतर जवळपास पंधरा वीस वर्षांपर्यंत तरी काही हरवल्याचं आठवत नाही. किंबहुना, हरवलेल्या गोष्टी मिळाल्याचं आठवत नाही. कारण अर्थातच तेवढ्या काळात तीन-चार चष्मे, एक दोन कंपास (स्वतःचा आणि बहिणीचा), एक पाकीट, एक सायकल अशा काही किरकोळ तर रेशन कार्ड आणि बँकेचं पासबुक अशा महत्त्वाच्या गोष्टी माझ्या हातून गहाळ झाल्या. त्या गोष्टी परत मिळाल्या नाहीत त्यामुळे त्या बद्दल लिहिण्यात काही मजा नाही.

आता पुढची जी गंमत आहे ती साध्या किरकोळ कॅमेर्‍याच्या बॅगची आहे. मिझौरीतल्या सेंट लुईसमध्ये एक मोठं प्राणीसंग्रहालय आहे. त्या प्राणीसंग्रहालयात मी सासरची मंडळी आणि काही मित्र परिवार यांच्याबरोबर गेलो होतो त्यावेळेस फोटो काढता काढता आणि मुलीला सांभाळण्याच्या नादात कॅमेऱ्याची बॅग मात्र हरवली. बरीच शोधाशोध केली, पण काही मिळाली नाही. माझ्या मित्राच्या सांगण्यावरून बाहेर पडताना लॉस्ट अँड फाउंड मध्ये आहे का ते पण बघून आलो, पण तिथेही ती नव्हती. त्यांनी एक फॉर्म भरून द्यायला सांगितला. तो एक औपचारिकता म्हणून भरला आणि आम्ही हॉटेलला परतलो. साधी कॅमेऱ्याची बॅग होती त्यामुळे त्याबद्दल जास्त काळजी नव्हती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा लॉस्ट अँड फाउंड मधून बॅग मिळाल्याचा फोन आला तेव्हा जो आनंद झाला तो काही औरच होता. त्यावेळेपासून अमेरिका या देशाबद्दल आणि इथल्या लोकांच्या एकूणच वागण्याबद्दल भारतातून आलेल्या ज्येष्ठ मंडळींना आणखीच आदर वाटायला लागला. त्या प्रकारानंतर कुठेही गेलो की माझी लॉस्ट अँड फाउंडला एखादी भेट असतेच.

अशातलाच आणखी एक प्रकार घडला दोन-तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी बायको आणि मुलीबरोबर हर्शी पार्कमध्ये गेलो होतो. माझं आणि पाण्याचं नातं जरा औरच आहे, आणि उन्हाळ्यात पाणी बघितलं की मला आणखीच चेव चढतो. बरं जेवढं पाण्याचं प्रेम मला आहे तेवढीच बायकोला त्याची भीती, त्यामुळे पाण्याच्या कुठल्याही प्रकारात मुलीबरोबर जायची कामगिरी माझीच असते. हर्शी पार्कमध्ये लेझी रिव्हरमध्ये मुलीबरोबर छान वेळ चालला होता. पण कसं काय कोणास ठाऊक अचानक माझी ट्यूब उलटली आणि मी पाण्यात दोन-चार गटांगळ्या खाल्ल्या. मला पोहता येत असल्यामुळे तशी भीती नव्हती पण माझा चष्मा मात्र त्या प्रकारात पाण्यात पडला. काही हरकत नाही, पाणी स्वच्छ आहे, जरा बघू तळापाशी जाऊन असं म्हणून जवळपास अर्धा तास माझी तळाशी शोधाशोध चालू होती. अर्थात चष्मा नसल्यामुळे ती एका आंधळ्याचीच शोधाशोध होती. काही वेळाने लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. हा मनुष्य पाण्याखाली जाऊन नक्की काय बघतोय? बरं, चष्म्याशिवाय मला फार दिसत नाही हे फक्त मला माहिती, बाकी लोकांना त्याची कल्पना नव्हती. शेवटी वैतागून तिथल्या एका कर्मचाऱ्याला चष्मा पाण्यात पडल्याचं सांगितलं. हायस्कूलमधला विद्यार्थीच तो, त्याने फार लक्ष दिले नाही. तरीपण कोणाच्या पायाला त्या चष्म्याची काच लागून दुखापत होऊ नये म्हणून मी त्याला सांगितलं आणि माझ्या जबाबदारीतून मोकळा झालो. उरलेला दिवस मुलगी आणि बायको यांच्या नजरेतून बघावा लागला. तरी जाता जाता माझ्या त्या फाटक्या नजरेला लॉस्ट अँड फाउंडचं ऑफिस दिसलंच. परत एकदा एक औपचारिकता म्हणून तिथे भेट द्यायला गेलो. अर्थातच माझा चष्मा काही तिथे नव्हता. माणसाने नेहमीप्रमाणे एक फॉर्म भरायला सांगितला. लगेच मला सेंट लुईसचा प्रकार आठवला. दुसऱ्या दिवशीपर्यंत आम्ही काही इथे राहणार नव्हतो. मग ‘फॉर्म भरायचा का नाही भरायचा?’ या माझ्या आणि बायकोच्या भांडणात पाच-दहा मिनिटांचा वेळ गेला असेल. शेवटी एकदा फॉर्म भरायचा असं

ठरलं म्हणून तो फॉर्म भरून मी तिथल्या माणसाला दिला आणि बाहेर पडलो. निघता निघता एका माणसाकडे सहज नजर गेली कारण त्याच्या हातात ६/७ स्विमिंग गॉगल्स होते आणि तो मनुष्य लॉस्ट अँड फाउंडच्या दिशेने चालला होता. आत्तापर्यंतच्या खटाटोपाला अनुसरून या मनुष्याकडे आपला चष्मा आहे का हे बघणं प्राप्त होतं. अर्थातच मी पुन्हा त्या ऑफिसमध्ये गेलो आणि खरोखरच माझा चष्मा त्या माणसाकडे होता. काचेचा चष्मा, त्या लेझी रिव्हरमध्ये पडून, जिथे शेकडो माणसं चालत, पोहत होती त्या सगळ्या माणसांच्या पायांना झिडकारून, परत आलेला होता. तो परत आलेला चष्मा माझ्याकडे माझ्याच नजरेनं बघतोय आणि त्याच्या काचेवर असलेले ते पाण्याचे थेंब म्हणजे त्याचे आनंदाश्रू आहेत असा भास मला होणे साहजिकच नाही का? त्या माझ्या शरीराबाहेरच्या अवयवाला मी छानपणे गोंजारून, पुसून पुन्हा माझ्या चेहऱ्यावर घातला तेव्हा ‘अमर अकबर अॅंथनी’ चित्रपटातल्या निरुपा रॉयला गेलेली दृष्टी अचानक परत मिळाल्यावर काय आनंद झाला असेल ते माझ्या लक्षात आलं.

तोच चष्मा मागच्या वर्षी अटलांटिक समुद्राच्या लाटांशी खेळता खेळता मी सागराला अर्पण केला, आणि त्याचा शाप म्हणूनच की काय त्याच दिवशी माझा उजवा पाय फ्रॅक्चर होऊन पडला.

रोहित कोल्हटकर: 

Comments

  1. लेख मस्त खुसखुशीत झालाय

    ReplyDelete
  2. रुचिराAugust 7, 2020 at 2:11 PM

    तुझा लेख वाचून, अमेरीकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या काही हरवलेल्या गोष्टी आणि सुयोगाने त्या मिळेपर्यंतच्या क्षणांच्या आठवणी मनाला सुखद समाधान देउन गेल्या!

    ReplyDelete
  3. स्वानुभवावर आधारलेला लेख चांगला जमला आहे

    ReplyDelete
  4. स्वानुभवावर आधारलेला लेख चांगला जमला आहे

    ReplyDelete
  5. मस्तच लिहिलाय, तुझ्याबरोबर होतो या सर्व प्रसंगी असं वाटलं 👍

    ReplyDelete
  6. खरंतर वयोमानानुसार असे घरों😀😆

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog