स्लॅंग

मराठी लेखाला इंग्रजी शीर्षक दिलं की लेखाला उगाच भारदस्तपणा आल्यासारखं वाटतं. प्रत्यक्षात लेख कसा का असेना! मागे ’लिमिटेड माणूसकी’ नावाचा मराठी सिनेमा आला होता. तेव्हापासूनच इंग्रजी शीर्षकाची कल्पना माझ्या डोक्यात घोळ घालत होती. ‘स्लॅंग’ म्हणजेच बोली भाषेतील शब्द/वाक्प्रचार, जे लिहिण्यात शक्यतो येत नाहीत पण रोजच्या भाषेत सर्रास वापरले जातात. पण हाच अर्थ कळायला मला अमेरिकेत यावं लागलं. त्याचं असं झालं की माझा जन्म पुण्यातला! शाळेत घालायची वेळ आली तेव्हा ‘मुक्तांगण’ ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं की ‘न्यू इंग्लीश स्कूल’ ह्या मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं हा गहन प्रश्न माझ्या आई-बाबांना पडला होता. माझ्या आयुष्यातला विरोधाभास हा तेव्हा पासूनचाच. शेवटी मोठा भाऊ मराठी शाळेत जातो मग ह्याला कशाला इंग्लिशमध्ये घालायचं म्हणून किंवा आई-बाबा माझ्यासारखेच इंग्रजी नावाचे चाहते असतील म्हणून म्हणा शेवटी मराठी शाळेत गेलो. तेव्हा मला असं वाटायचं की सगळं जग मराठीतंच बोलतं. 

आता मराठी शाळेत कोण अमराठी माणूस आपल्या मुलांना पाठवणार? क्वचित एखादा बलदावा, बोलद्रा असे मारवाडी असायचे किंवा एखाददुसरा शहा असायचा. पण पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहायला असल्यामुळे त्यांची मातृभाषा मराठीच आणि त्यांना मराठीत मार्कसुद्धा माझ्यापेक्षा जास्त मिळायचे. तर मला आता सांगा, स्लॅंग हा इंग्रजी शब्द कानावर कुठून पडणार? पण मराठीतला स्लॅंग चक्क कानावर पडला आणि तोही ऐन दिवाळीत!

दिवाळीला नवीन कपडे घालून बाहेर फटाके उडवून झाल्यावर, कोणाच्या घरासमोर कागदांचा मोठा ढिगारा झालाय हे मोजताना अचानक शेजाऱ्यांचा अतुल म्हणाला, “काय रे ‘भापींग खातोस’ का?” ही माझी स्लॅंग शब्दाशी पहिली ओळख असावी. भापींग खाणे म्हणजे मिरवणे! नंतर भापींग शब्द जाऊन “काय रे, ‘शाइनिंग मारतो ‘का?” हा चालू झाला. लहानपणी ‘ऐकत नाही आजकाल’, ’मस्त रे कांबळी’, ’गेलास उडत’, ’बोऱ्या वाजला’ असे विविध स्लॅंग शब्द मी सहज वापरत होतो. कॉलेज पुण्यात असल्यामुळे म्हणा किंवा माझाच मित्र म्हणून म्हणा - पुष्पिंदरसिंग नावाचा सरदारजीही मराठी स्लॅंग शिकला. माझ्याशी एकदा बोलताना म्हणाला “ह्या सिव्हीलच्या सबमिशननी ‘डोक्याची मंडई ‘केली आहे!” खरं तर पुष्पिंदर अमृतसरचा पण दहावीनंतर पुण्यात आला आणि “माझा पेन हरवला होता” असे चुकीचे लिंग वापरत असेल पण पाच-सहा वर्षांत पुणेरी स्लॅंग मात्र एकदम अचूक वापरायचा.

पुढे अमेरिकेत आलो आणि इंडियन स्टुडंट असोसिएशनमधल्या, अपार्टमेंटमधल्या आणि नेबरहुडमधल्या महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आलेल्या मराठी मुलांशी ओळख आणि ‘घष्टण’ मैत्री ही स्लॅंगमुळेच झाली. पहिल्या दिवशी एका सीनियरने दुसऱ्याशी माझी ओळख करुन दिली, “हा मधुर. He is from ‘United States of Pune’!” ह्या वर्षी पुण्यातून खूप ‘बारकी पोरं’ आली आहेत. बारकी पोरं म्हणजे ज्यूनिअर्स! ऑन कॅम्पस जॉब कुठे करायचा आणि कसा मिळवायचा ह्याची चर्चा एकाशी करताना तो म्हणाला, अरे रेझ्युमे वर थोडी ‘गर्दी’ करायची. ‘गर्दी करणं’ म्हणजे बहुदा ‘जुगाड’ करणं असावं. पण सगळेच सिनीयर्स हा सल्ला द्यायचे. प्रोफेसरच्यासमोर थोडी गर्दी करायची म्हणजे तो कोर्सला ऍडमिट देईल आणि ‘चेंगराचेंगरी’ केली तर रिसर्च असिस्टंटशीपसुद्धा देईल.

अमेरिकेतल्या शिक्षणपद्धतीत रोज असणारा होमवर्क आणि अचानक होणारे पॉप-क्विज ह्यातून कंटाळलेला आमचा मित्र (ज्याला आम्ही ‘काका’ म्हणायचो) म्हणाला, "ह्या पॉप-क्विजचं 'चोकणं' आणि रोजच्या होमवर्कची 'मगजमारी' कधी संपणार देव जाणे!" लातूरचा नवल एकदा आमच्याकडे जेवायला आला होता तेव्हा बोलता बोलता म्हणाला, “युनिव्हर्सिटीमध्ये उन्हाळ्यात कोर्सेस असतात,’मात्र’ ते तुमच्या ऍडवायजरकडून परवानगी घेऊन घेता येतात.” ‘मात्र’ हा शब्द बोलण्यात वापरलेला मी पहिल्यांदा त्याच्याकडून ऐकला. उन्हाळ्यात काही मित्र भारतात सुट्टीसाठी जात एकाला खूप स्वस्तात तिकीट मिळालं तेव्हा माझा रूममेट आक्या म्हणाला, “'आई टकली' मध्या! त्यानं एवढ्या स्वस्तात कसं काय तिकीट मिळवलं?" 'आई टकली' म्हणजे काय हे मला अजूनही समजलेलं नाही पण ग्रॅज्यूएट शाळेत सगळे तो वापरायचे. हळूहळू नोकरीत स्थिरावल्यावर मग वॉटरकूलरपाशीच्या चर्चेमध्ये वापरलेल्या एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ बघितल्यावर कळायला लागलं की हा स्लॅन्ग आहे, त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ बदलतो. कधीकधी दादा कोंडके स्टाइल म्हणा किंवा कधी आचार्य अत्रे सांगतात त्यापैकी एखाद्या विनोदनिर्मितीच्या प्रकारासाठी वापरले गेलेले अनेक स्लॅंग शब्द कानावर पडले आहेत. कधी त्यांचा अर्थ लावला, कधी उत्सुकतेपोटी “गूगल” सुद्धा केला. शेवटी बघा, बोली भाषेतले हे खास शब्दच भाषेला जीवनाशी सुसंगत करतात. माणसांना जवळ आणतात. बोली भाषेची खरी गोडी स्लॅंगमुळेच चाखता येते.

गेले अनेक दिवस 'डोक्याची मंडई' करुन, 'मगजमारी' करुन मैत्रसाठी लिहायचं 'चोकणं' आज अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पूर्ण केलं. आता संपादक मंडळाशी 'गर्दी' करुन बघतो छापतात का?


मधुर पुरोहित: 

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी