आमचा कपडेदान उपक्रमाचा अनुभव

मी जो भारतासाठी कपडेदानाचा उपक्रम केला होता त्याबद्दल आपल्यापैकी बहुतेक जणांनी ऐकलेच असेल. या दरम्यान मला आलेले अनुभव मी आपल्याला कथन करू इच्छिते. बऱ्याच जणांनी मला हा प्रकल्प राबवण्यामागच्या माझ्या प्रेरणेबद्दल विचारणा केली होती. मला आठवते तेव्हापासून माझे आई-वडील आम्हाला नेहमी सांगायचे कि दुसऱ्यांसाठी जितके काही करता येईल तितके करावे, त्यातच खरा आनंद सामावलेला असतो. मलाही हाच अनुभव नेहमी आलेला आहे. आपण दुसऱ्याला मदत करतोय ही भावनाच आपल्यासाठी खूप मोठे बक्षीस असते.

मी आणि माझे पती आशिष-आम्हाला अमेरिकेत आल्यानंतर येथील गरिबी समजून घेणे बरेच कठीण गेले. येथील गरिबी बऱ्याचवेळा लपलेली असते. भारताप्रमाणे ती उघड्यावर दिसत नाही. हळूहळू आम्हांला गरिबांना मदत करण्याचे अनेक मार्ग समजू लागले. येथील गरीब कुटुंबांसाठी, शाळांसाठी, व मुलांसाठी नि:स्वार्थीपणाने काम करणाऱ्या अनेक स्फुर्तीदायी व्यक्तींशी आमचा परिचय होऊ लागला. आम्ही येथे चाईल्ड केअर सेंटरसाठी व गरीब वस्तीतील शाळांसाठी जुनी पुस्तके दान करण्यास व होमलेस शेल्टर्स साठी अन्नदान करण्यास सुरवात केली. आम्ही आपल्या बरोबर गाडीत सँडविचेस व फळे घेऊन जाता-येता बाल्टिसमोर शहरातील सिग्नलपाशी असलेल्या बेघर लोकांना वाटायचो. नेहमी मोठा प्रश्न पडायचा की जुन्या भारतीय कपड्यांचे काय करायचे? माझ्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हाच प्रश्न पडत होता. मुलांचे कपडे इतरांच्या लहान मुलांना देता येतात, पण मोठ्यांचे भारतीय कपडे येथे कोणाला देणार?

भारतात जाताना शक्य तितके जुने कपडे मी बरोबर घेऊन जात असे. एवढे करूनही बरेच कपडे मागे उरायचे आणि ते मला ‘गुडविल’ला द्यावे लागायचे. माझ्या भारतातील वास्तव्यात मी अनेक एनजीओंशी बोलले. माझ्या लक्षात आले की, जर मी येथून भारतात कपडे पाठवू शकले तर ते स्वीकारायला त्यांना नक्कीच आवडेल. मध्यंतरीच्या काळात माझा सर्व वेळ कामात व मुलांच्यात जात असल्यामुळे हा विचार मागे पडला. तरीपण त्याविषयी काहीतरी केले पाहिजे अशी टोचणी मला सलत होती आणि मी खालील दोन गोष्टींचा तपास करू लागले: एक म्हणजे येथून जाणारे कपडे नव्या कपड्यांसारखेच असल्यामुळे ते योग्य ठिकाणी गरजू कुटुंबांकडे जातील अशी खात्री देणारी संस्था शोधणे. ते संस्थेने विकायचे ठरवल्यास त्यांचा सर्व व्यवहार पारदर्शक असावा. दुसरे म्हणजे भारतात कपडे पाठवण्याचा योग्य मार्ग शोधणे. त्यावेळेला आमचेच कपडे एक दोन सुटकेसमध्ये भरून पाठवण्याचा माझा विचार होता. मोठ्या प्रमाणावर कपडे गोळा करून ते पाठवण्याचा माझा विचार नव्हता. मी प्लॅनेट एड या कंपनीशी संपर्क साधला, बराचश्या पार्किंग लॉट्स मध्ये त्यांच्या कपडे व बूट गोळा करण्यासाठी पेट्या आहेत. एल्करीज येथे त्यांचे ऑफिस आहे. कपडे घेण्यास त्यांची तयारी होती पण त्यांनी मला सांगितले की, ते फक्त आफ्रिका व दक्षिण अमेरिका येथेच कपडे पाठवतात, भारत बराच दूर असल्यामुळे तेथे कपडे पाठवणे त्यांना शक्य नाही. माझ्या प्रश्नांचे उत्तर मला आई-बाबांकडून मिळाले. ते पुण्याजवळील तळेगावच्या शांत वातावरणात वास्तव्यास आहेत. ते आसपासच्या लोकांना लागेल ती मदत करत असतात. ते तळेगावातील प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या सामाजिक सहयोग उपक्रम संस्थेचे (CAP) सक्रिय सभासद आहेत. ही संस्था दुर्गम भागातील तळागाळातील लोकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करते आणि शाळेतील मुलांबरोबर सण साजरे करते, कपडे, भांडी व वह्या पुस्तकांचे नेहमी वाटप करते. त्या संस्थेची संस्थापक सौ. नयना आभोळ ही एक अत्यंत प्रामाणिक, उत्साही, तडफदार अशी व्यक्ती आहे. त्यांना भेटल्यावर मला ह्या संस्थेशी निगडित होण्याची इच्छा झाली. मी कपडे भारतात पाठवण्याचा विचार केला. मला देणगीवजा कपडे माफक दरात भारतात नेणाऱ्या बऱ्याच कंपन्या मिळाल्या परंतु ते कपडे येथून अमेरिकेन बंदरापर्यंत आपणच पोहोचवायचे होते आणि मुंबईतून ते पुढे नेण्याचे काम कोणीतरी करावयास हवे होते व ते काही मला शक्य नव्हते. बऱ्याच शोधानंतर मला अशी एक शिपिंग कंपनी मिळाली की जी माझ्या घरून थेट तळेगावपर्यंत कपडे पोहचवण्याची व्यवथा करेल. हे सामाजिक कार्य असल्यामुळे त्यांनी मला योग्य दरही सांगितले. दोन्ही देशातील कस्टम व चेकची जबाबदारी घेण्याचे त्यांनी कबुल केले. मला फक्त कपडे बॉक्सेस मध्ये पॅक करायचे होते. याचे नियोजन करताना माझ्या लक्षात आले की बरेच जण असे कपडे दान करण्यास उत्सुक आहेत. म्हणून मी आणि आशिषने हा सामाजिक प्रकल्प करण्याचे ठरविले. ज्यांना ज्यांना कपडे दान करायचे आहेत अशा सर्व लोकांकडून कपडे स्वीकारून ते भारतात पाठवण्याचे ठरले. यासाठी प्रत्येकाकडून एक ठराविक छोटी रक्कम आम्ही घेतली. एके दिवशी मी फेसबुक आणि वॉट्स अँप वर जाहीर विनंती केली. पुढे घडलेली घटना आश्चर्यकारक होती. एका महिन्याच्या आतच आमच्याकडे २५ मोठे बॉक्सेस भरतील इतके कपडे आणि १००० डॉलर्स जमा झाले. आमचा हॉलवे आणि स्टडी पिशव्यांनी भरून गेली होती. दारापर्यंत जायला आम्हाला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागे.


या संपूर्ण महिन्याभरात आम्हाला अनेक नवीन माणसे भेटली व काही जणांशी तर आमची घट्ट मैत्रीही झाली. सर्व अत्यंत उत्साही व सकारात्मक होते. कधी कधी हा कामाचा डोंगर बघून आमची छाती दडपून जात असे आणि त्याचवेळी कोणी उत्साही दानशूर व्यक्ती आणखी कपडे व पैसे आणून आम्हाला भरभरून धन्यवाद देत असे आणि आमचा उत्साह वाढवत असे. या प्रतिसादामुळे आम्ही हे कार्य करू शकलो. हा दानाचा उपक्रम संपेपर्यंत आमच्या लक्षात आले की एकट्याने हे कपडे पॅक करणे अशक्य आहे. लोकांनाही यामध्ये सक्रिय भाग घेण्याची भरपूर इच्छा व उत्साह होता म्हणून आम्ही एक ‘पॅकिंग पार्टी’ आयोजित केली. त्यात सर्वजण एकत्र येऊन कपड्यांचे सॉरटिंग व पॅकिंग करता करता चहा फराळ व गप्पांचाही आनंद घेतील. हा पार्टीचा दिवस एक क्रेझी दिवसच झाला आणि तरीही खूप धमाल व मजेत गेला. आम्ही या पार्टीचे जाहीर आमंत्रण दिले होते व किती जण येतील ह्याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. पण आमची निराशा झाली नाही - तीस पेक्षाही जास्त माणसे व आणखी मुले मदतीला आली. संपूर्ण घर मुले माणसांनी भरून गेले होते.


प्रत्येकजण सॉरटिंग करण्यात, बॉक्सेस मध्ये पॅकिंग करण्यात आणि बॉक्सचे वजन करण्यात गर्क झाला होता. संपूर्ण घर हास्य विनोदाने व कलकलाटाने फुलून गेले होते. आमच्या मुलांनी देखील भरपूर मदत केली. दुपारी एक वाजता सुरु झालेले काम संध्याकाळी साडेआठपर्यंत चालू होते. आता आमच्याकडे २५ बॉक्सेस पॅक होऊन शिपिंगसाठी तयार होते. नंतर मी पेमेंट करून बॉक्सेसवर लेबल्स लावून ते पिक-अप करण्याची व्यवस्था केली. २५ मोठे बॉक्सेस पाहून यु पी एस चा ड्रायव्हर थोडा नाराजच झाला. मलादेखील त्याची दया आली. जेव्हा त्याला सत्कार्याची कल्पना आली तेव्हा तो देखील उत्सहाने पुढे झाला.


आम्ही जमवलेले बहुतेक सर्व कपडे तळेगावातील सामाजिक सहयोग उपक्रम संस्थेला व शिपिंग कंपनीचा आधार असलेल्या एका अंध विद्यालयाला पाठवले गेले. तीन महिन्याच्या सागरी प्रवासानंतर एप्रिलमध्ये सर्व कपडे शेवटी तळेगावला पोहचले. ते कपडे गरीब व गरजू लोकांना (एका अनाथ मुलींच्या वसतिगृहाला, बांधकामाच्या कामगारांच्या वस्तीत, दुर्गम खेड्यातील लोकांमध्ये) सामाजिक सहयोग उपक्रम संस्थेने वाटले. एक एसयूव्ही भरून वेस्टर्न कपडे (फॉर्मल वेअर ) हॉवर्ड काउंटी येथील एका गरिबांना मदत करणाऱ्या संस्थेला दान करण्यात आले. बरेचसे अत्यंत खराब स्थितीतील कपडे (जे भारतात पाठवण्यासारखे नव्हते) ते माझ्या एका मैत्रिणीने सालव्हेशन आर्मीला दिले. कोणी कुठलीही टाकलेली वस्तू ती कितीही टाकाऊ असली तरी तिचा आनंदाने आणि कृतज्ञतेने स्वीकार करणाऱ्या कोणीतरी व्यक्ती असतातच. आमच्या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना हा अत्यंत महत्त्वाचा व मौल्यवान असा धडा शिकायला मिळाला. ह्या संपूर्ण अनुभवातून आम्हा सर्वाना एक अत्युच्य आनंद मिळाला. माझे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी सर्वानी अत्यंत उत्साहाने व आनंदाने ह्या कार्यात सहभाग घेतला हे बघून मला खूपच समाधान मिळाले. आपल्या ध्येयात अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेल्या यशाच्या आनंदाबरोबर ही देखील जाणीव झाली की आपण केलेले कार्य हे अथांग सागरात पाण्याच्या एका थेंबासारखे आहे. जरी हा उपक्रम माझा वैयक्तिक उपक्रम म्हणून सुरु झाला आणि मी ह्या उपक्रमाची मुख्य बनले आणि जरी सर्वानी हा उपक्रम सुरु केल्याबद्दल मला भरभरून धन्यवाद दिले तरी खऱ्या अर्थाने हा एक सामाजिक प्रकल्प झाला. शिपमेंटच्या खर्चासाठी मिळालेल्या आर्थिक मदतीशिवाय आणि महत्त्वाचे म्हणजे बॉक्सेस पॅकिंग करण्यासाठी मिळालेल्या सर्वांच्या सक्रिय हातभाराशिवाय हा प्रकल्प होऊच शकला नसता.

जेव्हा मी विचार केला की एवढे श्रम घेउन केलेल्या ह्या प्रकल्पाचे काय साध्य झाले तेव्हा माझ्या लक्षात आले की त्यामुळे दोन वेग-वेगळ्या समाजांच्या गरजा भागवल्या गेल्या - एका सुखवस्तू समाजाला कपड्यांचे दान करण्याची तीव्र इच्छा असते त्याच वेळी दुसऱ्या एका समाजाला त्या कपड्यांची अत्यंत गरज असते. बहुतेक लोकांना जुन्या कपड्यांचे दान करायचे असते पण ते कुठे व कसे करायचे हे माहीत नसते किंवा ह्या कामासाठी वेळही नसतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारतामध्ये अशा दान केलेल्या कपड्यांची अत्यंत गरज आहे. मी जेव्हा हे करण्याचे व त्यात इतर लोकांचा सहभाग घेण्याचे ठरवले तेव्हा मला कल्पनाही नव्हती की हे कार्य वाढत जाऊन इतके मोठे होईल. यामुळे लोकांच्या चांगुलपणावरचा माझा विश्वास दृढ झाला. आपल्या सर्वाना काहीतरी चांगले करण्याची, दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा असते. हा आपल्या मनुष्यस्वभावाचा एक भागच झालेला असतो. फक्त कोणीतरी मार्ग दाखवण्याची गरज असते. कोणी एकाने जर सुरुवात केली तर त्यांच्या पाठीशी आनंदाने व उत्सहाने उभे राहायला सर्वजण तयार असतात.


यावर्षी कोविड १९ मुळे आपली डोनेशन ड्राईव्ह लांबणीवर पडली आहे. सर्व गोष्टी सुरळीत होताच आपला हा उपक्रम लगेच आपण सुरु करूया!



बीना सोनाळकर 
बक्षी:

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी