कलाकार ओळख - सौ. योगिनी (स्नेहा) दहिवदकर

सौ. योगिनी (स्नेहा) दहिवदकर

बाल्टिमोर परिसरांत राहणाऱ्या मराठी समाजामध्ये चित्रकारी, लेखन, अभिनय, हस्तकला, गायन, वादन आणि इतर अनेक कलाक्षेत्रांमध्ये वावर असणारे अनेक गुणी कलाकार आहेत. ह्या अंकामध्ये चित्रकारी करणाऱ्या योगिनी दहिवदकरची एक कलाकार म्हणून ओळख करून घेऊ. दर अंकातून एक वा दोन कलाकारांची ओळख करून देणारचा मानस आहे. तुमच्यातील कलागुण लोकांसमोर आणण्याची ही संधी तुम्ही घेऊ इच्छित असाल तर आम्हाला Editor@BaltimoreMarathiMandal.org ह्या पत्त्यावर संपर्क करा. ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ तत्वावर कलाकारांची माहिती पुढील अंकांमध्ये प्रसिद्ध होईल.

Blessings! – May heavenly light bless upon you & may your life be full of colors and fragrance.

‘मैत्र’च्या मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार! तुम्हा सर्वांना ह्या अंकाच्या मुखपृष्ठावरील जलरंगातील चित्र ‘Blessings!’ आवडले असेल अशी आशा करते.

तुम्हा सर्वांना दसरा आणि दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! चित्राच्या शीर्षकाप्रमाणेच तुम्हा सर्वांवर परमेश्वराची कृपा असावी हीच सदिच्छा.

माझ्या पेंटिंगची सुरुवात म्हटले तर लहानपणी काकूच्या हातच्या रांगोळ्या पाहण्यापासून झाली. ती रांगोळ्या खूप सुंदर काढायची. मी आणि माझ्या बहिणी बाजूला बसून दुसरी रांगोळी काढायचो आणि काकू रंगसंगती सांगायची. १०वी नंतरच्या उन्हाळ्यात काय करायचे म्हणून ऑइल पेंटिंगचा क्लास महिनाभर लावला. पण लगेच ज्युनियर कॉलेज सुरु झाले आणि पेंटिंग बंद झाले. लग्नानंतर अमेरिकेत आल्यानंतर काही वर्षांपूर्वी टिव्हीवर बॉब रॉसचे व्हिडिओ पाहून प्रोत्साहित झाले आणि काही बोर्डस बनवले होते.

दोन वर्षांपूर्वी ‘हॉवर्ड काउंटी पार्क्स अँड रिक्रिएशन’चे मासिक चाळत असतांना "पोर्ट्रेटस इन वॉटरकलर" (“Portraits in Watercolor”) हा क्लास पाहिला. वॉटर कलर आणि मी? पोट्रेट आणि मी? कधीच शक्य नाही! असे मला वाटायचे. आधी २-४ वेळा वॉटर कलरमध्ये प्रयत्न केला होता पण अजिबात जमले नव्हते. हे आपण कधीच करू शकणार नाही हेच बरीच वर्षे डोक्यात असल्याने ह्या माध्यमाला नंतर कधीच हात लावला नव्हता. पण डोक्यात सतत खंत असायची. हा क्लास बघितला आणि क्लासची वेळपण उत्तम जमण्यासारखी होती. मग काय, एका तिरात दोन पक्षी मारायचे हा विचार करून मी ह्या क्लासात माझे नाव नोंदवले. क्लासच्या पहिल्या दिवशी पाहिले तर तिथे मीच सर्वात लहान. बाकी सर्वच वयाने ६०-६५च्या वरचे. मला वाटले मी चुकीच्या क्लासला आले. माझी खूपच निराशा झाली. पण लगेच २-३ क्लासमध्ये लक्षात आले की ह्या सर्व बायका खूप वर्षांपासून आमच्या शिक्षिकेच्या प्रत्येक क्लासला येत आहेत. त्याचे कारण आमच्या शिक्षिकेची शिकवण्याची पद्धत. मी एकच क्लास करायला गेले होते, पण त्यानंतर मी पण ३-४ क्लासेस केले आणि खूप काही शिकले.

मी ऑइल, ऍक्रेलिक, मिक्स मीडिया आणि वॉटर कलरमध्ये पेंटिंग करते. पण सध्या वॉटर कलर हे माध्यम माझे आवडते आहे. वॉटर कलर पेंटिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते. पुढच्या एकावर एक येणाऱ्या रंगाच्या थरांचा विचार आधीपासूनच करावा लागतो, कारण खालचा थर आणि नवीन थर मिळून कुठला रंग तयार होईल ह्याचे ज्ञान असणे आणि त्याप्रमाणे ते प्रत्यक्षात आणणे खूप आव्हानात्मक आहे. तेवढेच नाही तर, पाणी किती, कसे आणि कधी वापरायचे ह्याचा ताळमेळ खूपच महत्त्वाचा असतो. माझ्याकडून अजूनही चुका होतात, अजून बरीच प्रॅक्टिस करायची आहे. झालेली चूक कधी ठीक करता येते तर कधी नाही. एकदा का कागदाचा पांढरा भाग दुसऱ्या रंगाने रंगला की परत तो पहिल्यासारखा पांढरा होत नाही. वॉटर कलरमध्ये पांढरा रंग खूपच कमी वापरला जातो. पण ह्याच आव्हानामुळे मला हे माध्यम खूप उत्सुकता वाढवणारे वाटते. ह्यामध्येपण खूप टेक्निक्स आहेत आणि ती शिकण्यासाठी सध्या यू ट्यूब (Youtube) आणि इंस्टाग्राम (Instagram) चा भरपूर उपयोग करते. इंस्टाग्राम हे प्रेरणा घेण्यासाठी तर यू ट्यूब टेक्निक्स शिकण्यासाठी. सध्या करोनामुळे घराबाहेर जाणे जास्त होत नाही त्यामुळे ही कला वेळ घालवण्यासाठी मस्त आहेच, शिवाय मेंदूला क्रिएटीव्ह व्यायामपण मिळतो. पेंटिंग करताना जो आनंद मिळतो तो शब्दांत सांगणे कठीण आहे. शिवाय व्हाट्सऍपवर (Whatsapp) मित्र-मैत्रिणींकडून जे कौतुक होते त्यामुळे ही कला जोपासण्यास आणखी प्रोत्साहन मिळते. आपल्या ह्या मंडळात अजून कोणी चित्रकार असतील तर मला त्यांच्यासोबत बोलायला,भेटायला (सध्या व्हर्चुअल) नक्कीच आवडेल. ह्या अंकात माझी आणखी काही पेंटिंग्स प्रकाशित होत आहेत. त्या विषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या किंवा तुम्हाला सर्वात जास्त कुठले पेंटिंग आवडले ते नक्की कळवा.

 

वणवा




लिओ


मनीचे भाव


रंगपंचमी


गेटवे ऑफ इंडिया


विंटर वंडरलँड


स्माईल



 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी