अकस्मात

रोहित कोल्हटकर

“अग मनिषला फोन केलास का?” गेल्या चार दिवसांत दहा वेळा तरी विभावरीने मनालीला हा प्रश्न केला असेल. मनिषला फोन केलास का? त्याचा काही फोन आला का? त्याची तब्येत कशी आहे? ह्या प्रश्नांचा तिने भडिमार केला होता, आणि मनिष मात्र गेले आठवडाभर फोनला उत्तर देत नव्हता.  

कोविड-१९च्या वातावरणात तशी काळजी वाटणं साहजिकच होतं म्हणा, परंतु मनालीला कॉलेजमध्ये असताना ह्याच मनिष नावाच्या मित्रापासून जरा दोन हात लांबच रहा, असं सांगणारी तिची आई विभावरी आज मात्र रात्रंदिवस मनालीकडे त्याची विचारपूस करीत होती.

भारतातून अमेरिकेला यायच्या प्रवासात मनिषने विभावरीला खूप मदत केली होती म्हणूनच असेल कदाचित. तसा भारत अमेरिका हा प्रवास विभावरीच्या अंगवळणी पडला होता. मोठा मुलगा संजय, मधली हिमानी आणि आता गेल्या २ वर्षांपासून धाकटी मनाली अशी तिन्ही मुलं अमेरिकेत असल्यामुळे तिच्या नवऱ्याबरोबर ३-४ वाऱ्या, त्यानंतर एकटीच्या २-३ वाऱ्या अशा बऱ्याच वाऱ्या झाल्या होत्या. नागपूरवरून निघायचं, एक रात्र मुंबईला मुक्काम करायचा, युरोपमध्ये कुठेतरी ब्रेक आणि शेवटी अमेरिका गाठायची, हा प्रोटोकॉल ठरलेला होता. पण कोविड-१९च्या प्रोटोकॉलबरोबर हा नेहमीचा प्रोटोकॉल करणं अवघडच गेलं असतं. मनालीचा मित्र मनिष अमेरिकेला येणारच होता. त्यामुळे मनिषची सोबत विभावरीला मिळेल, असा विचार करून मुद्दाम त्याच फ्लाईटचं तिकीट मनालीने विभावरीसाठी काढलं होतं.

मनिषने प्रवासात विभावरीची चांगलीच बडदास्त ठेवली होती. तसा नागपूर-मुंबई-लंडन हा प्रवास व्यवस्थित झाला होता, परंतु लंडनवरून विमान उडाल्या उडाल्या लगेचच विमानावर वीज पडल्यामुळे विमानाला परत उतरावं लागलं होतं. वीज पडल्यामुळे झालेल्या काही किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे हिथ्रो विमानतळावर तब्बल १५ तास काढायला लागले होते. तेव्हा मनिषची खूप मदत झाली होती. वयोमानापरत्वे आता भराभरा गोष्टी करणं, तसं विभावरीला कठीण होतं. त्यातून वेगळा देश, वेगळी भाषा आणि अचानक विमानतळावर १५ तास काढणं, केवळ मनिष होता म्हणूनच सहज शक्य झालं होतं. मनिषचा स्वभाव एकदम दिलखुलास आणि मनमिळावू होता. तिच्या आणि मनिषमधे वयाचं अंतर असूनसुद्धा अनेक गमतीदार किस्से सांगून मनिषनं तिचं मन रमवलं होतं. विभावरीची ब्याद गळ्यात नसती तर त्यानं सगळं विमानतळ फिरून आणखीन २-४ किस्से सांगता येतील अशा गमती केल्या असत्या. हिथ्रो विमानतळावर भारतीय पद्धतीच्या चहाबरोबर मनिषने चक्क बटाटेवडेसुद्धा आणून दिले होते.

“बरं काकू, मी जातो. मला लवकर निघायला पाहिजे. माझं कनेक्टींग फ्लाईट आहे शिकागोसाठी. तुमचं सामान इथेच येईल. तुम्ही या दारातून बाहेर गेलात की बाहेर मनाली उभी असेलच. आणि मी तसा तिला फोनही करून ठेवतो. जमेल ना तुम्हाला? का थांबू मी?” हे जेव्हा अमेरिकेत पोहचल्यावर मनिष म्हणाला तेव्हा आपण दहा पावलं चालून बाहेर जाऊ शकू की नाही, ह्याबद्दलसुद्धा विभावरीला शंका यायला लागली होती.

“अरे नाही, तू थांबू नकोस नाही तर तुझं विमान चुकायचं. थँक्यू, सगळ्या प्रवासात तुझी फार मदत झाली. शिकागोला पोहोचलास की नक्की फोन कर. तुझा दोन आठवड्यांचा quarantine संपला की सुद्धा एकदा फोन कर म्हणजे काळजी लागायला नको.” हे शब्द बोलताना विभावरीच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. मनिषने केलेल्या मदतीबरोबरच ह्या प्रवासाने तिला तिच्या एका पूर्वीच्या प्रवासाची, त्यात भेटलेल्या अश्याच एका दिलखुलास माणसाची आणि त्या प्रवासानंतर घडलेल्या दुर्घटनेची आठवण करून दिली होती. Baggage Claim पाशी सामानाची वाट बघताना समोर फिरणारा बेल्ट बघता बघता तिच्या मनातली चक्रंसुद्धा फिरायला लागली.   

तीस पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मनालीचा जन्मसुद्धा व्हायचा होता. हिमानी अगदीच लहान, संजय त्यातल्या त्यात मोठा. उन्हाळ्याची सुट्टी होती. त्यातून अमेरिकेत स्थायिक झालेला भाऊ मुंबईला काही दिवसांसाठी येणार म्हणून सगळ्या माहेरच्या मंडळींनी भेटायचं ठरवलं होतं. म्हणूनच विभावरी दोन लहान मुलांना बरोबर घेऊन माहेरपणासाठी मुंबईला गेली होती. म्हणता म्हणता आठवडा कसा गेला, ते कळलंच नाही आणि परत जायची वेळ आली. नागपूर-मुंबई असा दूरचा प्रवास करून आलो आहे म्हटल्यावर पुण्याच्या नातेवाईकांना सुद्धा भेटून जाऊया, ह्या विचाराने तिनं परतीचं तिकीट पुण्याहून काढलं होतं. पुणे-मुंबई प्रवास विभावरीच्या अगदी अंगवळणी पडलेला होता. दादरला गाडीत बसल्यावर तीन चार तासात पुण्याला उतरायचं. दोन लहान मुलं असली तरी विभावरीला काळजी नव्हती. पण घरच्यांना चिंता. शेवटी मोठ्या भावानं - राजेशनं, त्याच्या एका मित्राबरोबर विभावरीचं तिकीट काढलं. सगळ्यांना रीतसर निरोप देऊन विभावरी दोन मुलांसह दादर स्टेशनला पोहोचली. सामानाची आवराआवर होईपर्यंत भावाचा मित्र रमाकांतही पोहोचला. त्याला बघताच मात्र विभावरी मनातून चमकली. पण मनातले भाव चेहऱ्यावर न आणता विभावरीने पुढची दहा-पंधरा मिनिटं इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात घालवली.  शेवटी गाडी सुटण्याची वेळ झाली आणि विभावरी, दोन लहान मुलं, आणि रमाकांत असे सगळेजण काहीतरी विरंगुळ्याची साधने शोधायला लागले. विभावरीच्या डोक्यात मात्र विचारांचं चक्र फिरायला लागलं. राजेशने ज्या मित्राशी तिची सोबत करून दिली होती तो रमाकांत कॉलेजमध्ये असताना तिला फार आवडायचा. अर्थातच  त्या वेळेस त्या प्रेमभावना कधी व्यक्त झाल्या नाहीत. रमाकांतलाही ते कळणार नाही, याची खबरदारी विभावरीने घेतली होती. ३०-३५ वर्षांपूर्वी लगेच ‘I love you’ म्हणायची पद्धत नव्हती आणि मुलीनं म्हणणऺ म्हणजे तर अगदीच वावगं. तिनं मनातल्या प्रेमभावना अगदी व्यक्त केल्या असत्या तरी ते प्रकरण विभावरीच्या घरच्या मंडळींना मान्य होणं अवघडच होतं. लवकरच कॉलेजचे शिक्षण संपायच्या सुमारास विभावरीचं लग्नपण ठरलं. त्यापुढे रमाकांतचा विचार नंतर कधी तिच्या डोक्यात आला नाही, पण आज तोच रमाकांत अचानकपणे पुन्हा समोर आला म्हटल्यावर विभावरीच्या पूर्वीच्या भावना जागृत झाल्या होत्या. विचारपूस करताना तिच्या लक्षात आलं की रमाकांत आता अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्यावर कामाला आहे आणि आता तिथेच स्थायिक होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे आपली निवड वाईट नव्हती, असा पण एक विचार विभावरीच्या डोक्यात घोळू लागला. आगगाडीच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यानं मनाला आणखीन वाहवत नेलं आणि उगाचच तुलनात्मक गोष्टींचे विचार विभावरीच्या मनात घोटाळू लागले. त्यावेळेस आपण आपल्या मनातलं बोलून दाखवलं असतं तर? निदान रमाकांतला तरी सांगून बघायला हवं होतं. जवळपास रोज तो राजेशबरोबर आपल्याकडे यायचा. कदाचित त्याच्या साथीने घरच्यांना पटवता आलं असतं. तसं रमाकांत सोडून आपल्याला इतर कोणाबद्दल असं वाटलं नव्हतं, मग सांगायला काय हरकत होती? कदाचित चुकलंच आपलं, हे विचार विभावरीच्या मनात गोंधळ करू लागले. तसे वरवर ती रमाकांतशी व्यवस्थितच गप्पा मारत होती. तोही त्याच्या दिलखुलास स्वभावाला साजेल अशा बर्‍याच गमतीदार गोष्टी सांगून विभावरीचं आणि तिच्या मुलांचं मन रमवत होता.

म्हणता म्हणता गाडीने कर्जत स्टेशन गाठलं. सर्व प्रवाशांनी चहा नाश्ता केला. कर्जतच्या बटाटेवड्यांचा समाचार घेतला. मुंबई सोडली होती त्यामुळे हवेत गारवा जाणवू लागला होता. आता गाडी घाटातून जाणार म्हणजे बाहेरील सृष्टीसौंदर्य अप्रतिम दिसणार. दोन्हीकडून हिरवेगार डोंगर, वेगवान गाडी, मग प्रवासाची मजा काही औरच. पण कसलं काय नी कसलं काय. कर्जत सोडून गाडी खंडाळ्याकडे धावत असताना मंकीहिलच्या आधीच मोठा आवाज झाला आणि गाडी कचकन थांबली. अर्धा-एक तास वाट पाहिल्यानंतर हळू हळू एक एक करून प्रवासी खाली उतरू लागले. काय झालं आहे, हे पाहण्यासाठी पुढे गेले. पंधरा-वीस मिनिटांनी समजलं की गाडीवर इलेक्ट्रिकचा खांब पडला आहे आणि गाडी कमीत कमी चार तास तरी जागची हलणार नाही. घाटातच गाडी तळ ठोकून बसली होती. प्रवासी विचार करू लागले काय करायचे? जे सडेफ़टिंग होते ते भराभरा पायी चालू लागले. पण मुंबई-पुणे मेन रोड जरा लांबच होता. रेल्वेरुळावरुन बरेच पायी चालून थोडंसं चढलं की मग मेनरोड. रमाकांतदेखील तसा एकटाच असता तर केव्हाच गेला असता, पण विभावरी आणि तिच्या मुलांची ब्याद त्याच्या गळ्यात. ‘नाही’ ‘हो’ म्हणता म्हणता शेवटी हिय्या करून विभावरीनेदेखील पायी जायचा निर्णय घेतला. विभावरीच्या कडेवर हिमानी, हाताला धरून राजेश आणि सामान बिचाऱ्या रमाकांतने घेतलं. मजल दरमजल करीत दोन तास चालल्यावर शेवटी सगळेजण मेन रोडवर येऊन पोहोचले. सर्वांचीच दमछाक झाली होती. नंतर रिक्षा, ट्रक किंवा मिळेल त्या इतर वाहनांनी जमेल तशी सगळीजण संध्याकाळी साडेपाचला पुण्याच्या घरी पोहोचली. रमाकांतला खरं म्हणजे वाटेत चिंचवडला जायचं होतं. पण तरीही तो विभावरीला गावातल्या घरापर्यंत पोहोचवायला गेला होता. “आम्ही जाऊ व्यवस्थित.” असं विभावरीने सांगूनही तिचं न ऎकता तो आपुलकीने त्यांना घरापर्यंत सोडायला गेला होता. त्या दिवशी रमाकांत होता म्हणूनच आपण व्यवस्थित पोहोचू शकलो, अशी विभावरीची पक्की खात्री झाली होती. राजेशला बरी सुबुद्धी झाली आणि रमाकांतची सोबत मिळाली, असं म्हणून विभावरीनी देवाचे आभार मानले होते.

दोन दिवस पुण्यात राहून नागपूरला पोहचल्यावर विभावरीचं तिच्या घरी नेहमीचं रुटिन सुरू झालं. पण तरीही का कोणास ठाऊक, मधून मधून विभावरीला रमाकांतची आठवण यॆत राहिली. विभावरीचं मन मधूनच भरकटायचं. तिचा नवरा वाईट होता, असं मुळीच नाही. विभावरीच्या मनातही तसं वाईट काहीच नव्हतं. झालेला प्रकार तिच्या नवऱ्याला सांगून ती मोकळी झाली होती. असे आठ-पंधरा दिवस जातात तोच धक्कादायक बातमी आली- विभावरीच्या अडचणीच्या प्रवासात तिला मदत करणाऱ्या रमाकांतचं दुःखद निधन!! पंधरा दिवसांपूर्वी ज्या कणखर हातांनी तिला मदत केली अशा तरण्याबांड, तब्येतीने कणखर, मनाने सज्जन अशा नि:स्पृह व्यक्तीवर देवाने का घाव घालावा? बातमी तिला पटतच नव्हती. शेवटी ईश्वराची इच्छा. त्याला ज्याला उचलून न्यायचं त्यासाठी छोटंसं  कारणही पुरतं.  गॅंगरीनच्या छोट्या कारणाने त्याच्यावर यमाने अचानक घाव घालावा यासारखी धक्कादायक बातमी ती काय? माणसाचं मनसुद्धा किती विचित्र पद्धतीने स्वतःची समजूत घालत असतं नाही का? दोन आठवड्यांपूर्वी स्वतःच्या प्रेमभावना प्रकट न केल्याबद्दल विचारात पडलेली विभावरी रमाकांतची वाईट बातमी कळल्यावर मात्र ‘बरं झालं आपण त्यावेळेस काही बोललो नाही’ असं म्हणून उगीचच स्वतःच्या मनाची समजूत काढू लागली होती.

“काकू अजून इथेच? अजून सामान आलं नाही?” मनिषच्या प्रश्नाने विभावरीची तंद्री तुटली.
“अरे तू इथे कसा? तुला पुढचं विमान पकडायच होतं ना?”
“नाही मघाशी तुमचा चेहरा बघितला. म्हटलं तुम्हाला जमेल का नाही? म्हणून माझं तिकीट बदललं.  विचार केला  तुम्हाला बाहेर सोडावं आणि मग रात्रीचं विमान पकडावं.”
विभावरी आणि मनाली ह्यांची भेट घालून दिल्यावरच मनिष शेवटी शिकागोला गेला.

प्रवास संपून दिवस उलटू लागले तरी विभावरी दोन प्रवासांमधल्या साधर्म्यांमध्येच गुंतली होती. त्यातून मनिषचा फोन येत नाही म्हटल्यावर विभावरीला मनिषची जास्त काळजी वाटू लागली.   रमाकांतसारखं मनिषचंही काही बरंवाईट होणार नाही ना, ह्या विचाराने तिला भीती वाटू लागली. प्रवासातल्या बऱ्याच छोट्या गोष्टींमधलं साधर्म्य तिला प्रकर्षाने जाणवू लागलं. मनिषचा स्वभाव म्हणजे रमाकांतच्या स्वभावासारखाच, अगदी दिलखुलास. मनिषने बटाटावडेच का आणून द्यावेत? समोसे सगळीकडे उपलब्ध असताना बटाटेवडे का? रेल्वेवर विजेचा खांब पडावा आणि विमानावर वीज पडावी? रमाकांत चिंचवडला न थांबता थेट गावापर्यंत आपल्याला सोडायला आला आणि मनिषपण ठरलेलं शिकागोचं विमान सोडून आपल्याला बाहेरपर्यंत सोडायला आला? फरक फक्त एकच होता आणि तोही भीतीदायक.  ३५ वर्षांपूर्वी कुठला pandemic चालू नव्हता, पण सध्या जगभरामध्ये कोविड-१९ चा प्रदुर्भाव चालू होता. विभावरीच्या मनातली चलबिचल वाढायला लागली. अखेर मनावरचा ताण असह्य होऊन विभावरीने मनालीला ३५ वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगितली. आपलं मन हलकं होण्यासाठी ती बोलली खरी पण मनाली आणि मनिषचं एकमेकांवर प्रेम आहे हे समजल्यावर तिची भीती आणखीच वाढली.

“अगं तू काळजी करू नकोस. मनिषचा स्वभाव खूपच चांगला आहे. तो सगळ्यांनाच अशी मदत करतो. ह्याआधीपण त्याने विमानतळावर खूप जणांना मदत केलेली आहे. आणि उद्यापर्यंत मनिषचा फोन आला नाही तर आपण सरळ गाडी काढू आणि शिकागोकडे प्रयाण करू.” अशी शाश्वती मनालीने दिल्यानंतर विभावरीच्या जिवात जरा जीव आला. उद्या त्यांच्या प्रवासाला बरोबर १५ दिवस पूर्ण होणार होते. रमाकांत विषयीची वाईट बातमी तिला बरोबर १५ दिवसांनी कळली होती. जे काय व्हायचं ते उद्यापर्यंत होइल आणि कळेल अशी मनाची समजूत काढता काढता रात्री कधीतरी तिच्या डोळ्याला डोळा लागला.

मनालीने आईला जरी धीर दिला असला तरी आईने सांगितलेलं दोन प्रवासातलं साधर्म्य ऎकून तिलापण मनातून तशी हुरहूर लागली होतीच, रात्रभर तिचाही डोळ्याला डोळा लागेना. तिने रात्री अपरात्री मनिषला आणखीन एक-दोन वेळा फोन करून बघितला पण काही उपयोग झाला नाही. तिलापण रात्री उशिराच झोप लागली असावी. सकाळी ८ च्या सुमारास फोनच्या रिंगनेच तिची झोप उडाली. फोन मनिषचा होता आणि शेवटी मनालीच्या जिवात जीव आला.

“अरे असं काय करतोस मनिष? इतके दिवस का नाही फोन केलास?” सावरलेल्या मनालीचा आता पारा जरा चढला होता. इतरांना मदत करण्याचा मनिषचा स्वभाव असला तरी तिला फोन करण्यामध्ये तो खूप निष्काळजीपणा करतो, हे तिला माहीत होतं.   
“आईला किती काळजी लागली होती!”
“काय? तू दवाखान्यात होतास? You are Covid positive? काल रात्रीच ICU मधून बाहेर आलास?
खरं म्हणजे हे ऎकून मनालीच्या पायाखालची जमीन हादरली होती, पण आता मनिष बरा आहे, म्हटल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. तिला आईची आठवण झाली.

“एक मिनिट थांब, आईला फोन देते, तिला तुझी खूप काळजी वाटत होती. तुझा फोन आला आहे, म्हटल्यावर तिला खूप बरं वाटेल, बोल तिच्याशी जरा.” बोलत बोलत मनाली आईच्या खोलीत पोहोचली. रोज सकाळी ६ वाजता उठणारी आई आज अजून कशी उठली नाही, ह्याचं खरं तर तिला आश्चर्य वाटत होतं.

“आई अग ऊठ, बघ मनिषचा फोन आलाय. तू म्हणत होतीस त्यात काहीतरी तथ्य होतं बर का. मनिष खरोखरच आजारी होता. काल रात्रीच ICU मधून बाहेर आलाय, पण आता बरा आहे.”
“आई, अगं ऊठ! ८ वाजलेत. इतके दिवस वाट बघत होतीस ना मनिषच्या फोनची? बघ त्याचा फोन आलाय.”
“आई अगं…”
आई, आई,  आई…..
आईSSSSSSS
 

Comments

  1. अगदी छान सरळ सोपी शब्द रचना पणं शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी. - काका

    ReplyDelete
  2. Itna dukkhi shevat nako hota

    ReplyDelete
  3. Nice story , Rohit

    ReplyDelete
  4. कथा मस्तच झाली रोहित

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी