रघु

श्री. बाळकृष्ण पाडळकर

बाळकृष्ण माधव पाडळकर यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे गंगापूर व औरंगाबाद येथे झाले. महाविद्यालयात शिकत असतांना स्वातंत्र्यसैनिक व जेष्ठ सामाजिक नेते कै. गोविंदभाई श्रॉफ यांच्या श्री. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत सेवा करण्याचा योग आला. त्यामुळे भाईजींचे सामाजिक कार्य फार जवळून पाहायला मिळाले. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर व मुंबईच्या डावर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बिझिनेस मॅनेजमेंटची पदविका प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र शासनात दीर्घकाळ सेवा बजावली. याचवेळी दै. लोकमत, दै. अजिंठा, दै. प्रजावाणी आणि नंतर दै. मराठवाडा, दै. सकाळ व दै. लोकसत्तेत भरपूर स्फुट लिखाण केले. शासकीय सेवेतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर पाडळकरांनी ‘किशोर संगणकविश्व’ या मासिकाच्या संपादकाची जबाबदारी स्वीकारली. मुलांना लवकरात लवकर संगणकाची ओळख करून देणाऱ्या या संस्थेकरता महाराष्ट्रभर किशोर संगणकविश्व मासिकाचा प्रचार व ‘सॉफ्ट किड्स संगणक केंद्र’ या संगणकाची ओळख करून देणाऱ्या केंद्राची स्थापना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केली. प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनीही या कार्याची नोंद घेतली. औरंगाबादचे तत्कालीन खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी श्री. बाळकृष्ण पाडळकरांसारखी उत्साही व्यक्ती संस्थेला लाभली आहे, तेव्हा त्याचा फायदा संस्थेने अवश्य करून घ्यावा, अशा शब्दात पाडळकरांचा गौरव केला. पाडळकरांनी ‘लो, लो बजेट युरोप सहली’ हे पर्यटनविषयक पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाला ट्रॅव्हल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने प्रायोजित केले होते. वीणा ट्रॅव्हल्स, मुंबई यांनी या पुस्तकाची प्रशंसा केली. अमेरिकेच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकणारे ‘अमेरिकेचे अंतरंग’ हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर दै.महाराष्ट्र टाइम्स , दै . सकाळ यांनी या पुस्तकाची सकारात्मक नोंद घेतली . डॉ . आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंनीही या पुस्स्तकावर आपले सकारत्मक मत प्रदर्शित केले . या पाठोपाठ”कोरांटी “ कविता संग्रह , “श्रीमद्भगवद्गीता सार “ , “सु-विचार -धारा “आणि “कथनी “ ही आध्यात्मिक आणि कथा संग्रह असलेली पुस्तके प्रकाशित केली . श्री ‘ पाडळकरांना शिकागो येथे झालेल्या ब्रहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात कविता वाचण्याकरिता पाचारण करण्यात आले होते अमेरिकेतील ‘भारतीय टेम्पल ‘च्या “रचना” या त्रैमासिकाच्या उप- संपादकांची धुरा सांभाळली . श्रीमद्भगवद्गीतेच्या सातशे श्लोकांचे ओवीस्वरूप मराठी भाषांतर केले व त्याची डी व्ही डी तयार करून अमेरिकेतील भारतीय मंदिरांतून भाविकांसाठी उपलब्ध केली . आमदाबादेहून प्रकाशित होणाऱ्या “मराठी माणसं “ या मासिका करता वर्षभर लिखाण केले आगामी “महाभारतातील व्यक्ती - रेखा” या ग्रंथाच्या प्रकाशनाचे काम हाती घेतले आहे .

दहिगाव तसं शांत गाव. अजगरासारखं सुस्त, हालचाल न करणारं. परंतु दहिगावात राहणारी एक एक व्यक्ती म्हणजे कमालीची बिलंदर. सरळ चालणाऱ्याला सरळ चालू न देणारी आणि वाकड्याला अजून कसं वाकडं चालवता येईल, या फिकरीत असणारी व्यक्ती हमखास दहिगावची आहे म्हणून समजावी.

आता रघुनाथचंच पहा ना! रघुनाथ माहीत नाही अशी व्यक्ती दहिगावतच काय दहिगावच्या पंचक्रोशीत सापडणं मुश्किल. त्याला पुरुषच नाही तर बायासुद्धा चांगलं ओळखून असत कारण त्याचे कारनामेच एवढे भारी असत की सगळ्यांनाच त्याची नोंद घ्यावी लागे. रघुनाथ तसा काही फार शिकलेला नव्हता पण त्याच्या शिक्षणाच्या मानाने त्याचा मेंदू फार भारी होता. चाणाक्ष माणसाला ज्या कल्पना सुचत नाहीत त्या रघुनाथ लीलया अंमलात आणत असे. उंच अंगकाठी असलेला रघुनाथ बऱ्याच दिवसांचा उपाशी असल्यासारखा वाटे कारण त्याच्या अंगावर मांसाचा कुठे पत्ताच नव्हता. अंगात पांढरी लांब विजार, पांढऱ्या रंगाचा सदरा अन् डोक्यावर गांधी टोपी या पेहेरावामुळे तरी त्याची फक्त हाडं असलेली शरीरयष्टी थोडी बरी दिसे. अंगातला अंगरखा काढल्यास डोक्यापासून पायापर्यंतची हाडे सहज मोजता यावी असा त्याचा देह होता. दहिगावात तो नेमका कुठे राहत असे हे सांगणे कोणालाही शक्य नव्हते. कारण रात्र झाल्यापासून तो जे गायब व्हायचा तो थेट सकाळी शनीच्या पारावर अथवा मारुतीच्या देवळासमोर नजरेस पडायचा, नाही म्हणायला गावाबाहेर त्याचे एक शेत असल्याचे तो नेहमी सांगत असे. बहुधा रात्री तो झोपण्यासाठी त्या शेतावरील छोटेखानी घरात जात असावा. 

एकदा मधली सुट्टी झाली असता शाळेतली पोरं शाळेच्या मैदानावर खेळत होती. पंधरा-वीस पोरांना रघुनाथ त्याच्या शेतावरून येतांना दिसला. त्यातील एका पोरानं हात उंच करून रघुनाथाला एकेरी नावानेच हाक मारली, रघुनाथनेही हात उंचावून पोरांना प्रतिसाद दिला आणि लांब लांब ढांगा टाकीत पोरांच्या घोळक्यापर्यंत पोहोचला. घोळक्याजवळ येताच पोरांनी त्याला बसायला जागा करून दिली. रघुनाथ ऐसपैस मांडी घालून बसला. गावातली एवढी मोठी प्रतिष्ठित व्यक्ती आपल्यात येऊन बसल्यामुळे मुलांना फार समाधान वाटले. त्यांनी रघुनाथची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याला विचारले, “रघुनाथ! एवढा घामाघूम होईपर्यंत असा कुठे गेला होतास?”
रघुनाथला पोरांच्या प्रश्नामुळे उभारी आली. रघुनाथ सरसावून बसला आणि पोरांकडे एक बेरकी नजर टाकून म्हणाला, “अरे पोरांनो! काय सांगायची कहाणी? रात्री मोठा राडाच झाला.“
पोरं एकदम कोरसमध्ये ओरडली,”राडा झाला? कशाचा?”
“पोरांनो! काल आवस होती ना? आवसेला त्यांना लई फुरण येतं!”
“कोणाला?“ एका पोरानं दबक्या आवाजात विचारलं.
“त्या भुतांना! आवसेला अजून कोणाला फुरण येणार?“
“त्याच असं झालं,” रघुनाथ पुन्हा सावरून नीट बसला अन् काल रात्री घडलेला किस्सा सांगू लागला. “मी सांजच्याला गावातून शेतावर माझ्या घरी गेलो. भाकर-तुकडा खाल्ला अन् खाटल्यावरी पडलो. मला दोन चार दिवसांपासून माझ्या शेतातली बाजरी सोंगायची फिकीर लागली होती. गावात शोध शोध शोधून सोंगायकरता बायांना धुंडाळीत होतो पण बाया काही गवसंना. मला लई फिकीर पडली. पाखरं दिवसा कणसांवर बसून कणसं रिकामी करीत होती. दाणा टपूरा झाल्यामुळं बाजरी सोंगनं लई अर्जंट होतं.
मग माला एक आयडिया सुचली. काल आवास होती, गावातून तेल, बेसन, गव्हाचं पीठ घेऊन मी सांजच्यालाच शेताकडे गेलो. भाकर -तुकडा खाऊन घटकाभर खाटल्यावरी पडलो. थोड्या ऐळान इस्टू पेटवला, रात्री बारा वाजेच्या आदुगर टोपलीभर बोंडं, पुऱ्या, कुर्डया तळल्या अन् भुतांना आवतण दिलं. माझ्या देवळीच्या एका दोस्तानं माला चार -पांच वर्ष झाली, भुतांना आवास, पुनवेला बोलावून काम करून घेण्याचा मंत्र सांगितला होता. तळनं तळून झाल्यावर मी तो मंत्र म्हणालो, तसे दहा -बारा भुतं येऊन माझ्यासमोर हात जोडून उभे राहिले अन म्हणाले, रघुनाथ, काय काम आहे? लवकर सांग! मी त्यांना, ‘पहिले भजे, कुरडया खा’ म्हनताच त्यांनी पांच मिनिटात मी तळलेल्या तळनाचा फडशा पाडला. खायला मिळाल्यामुळे खुश झालेल्या भुतांना आता आपण काम सांगायला हरकत नाही, असं मला वाटलं. मी त्यांना म्हणालो, शेतात बाजरी उभी आहे तेव्हडी सोंगून द्या, गड्यानो! मग तुम्ही जाऊ शकता. मी तोंडातून शब्द काढायचा अवकाश, सगळी भुतं बाजरीला भिडली अन त्यांनी एक दीड तासात बाजरी सोंगून त्याच्या व्यवस्थित पेंढ्या बांधल्या अन शेताच्या बांधावर गंगाकडच्या बाजूला रचून ठेवल्या. त्या भुतांपैकी एक भूत म्हणालं, ‘बाजरीची ताटं लई निब्बर झाली होती, त्यातल्या त्यात खदानीच्या जवळ असणारं एक ताट फारच मोठं अन जाडजूड होतं पण आम्ही ते उपटलं’. मी तिथे जाऊन पाहिले तर त्यांनी बाजरीचं ताट समजून बाभूळ उपटून फेकली होती. मला त्यांच्या अजब शक्तीचं नवल वाटलं. शेतातलं काम संपवून भुतं निघून गेली. सकाळी आजूबाजूच्या वस्तीवर असणाऱ्या शेजारी पाजाऱ्यांनी शेत पाहिलं तर त्यांना बाजरी सोंगलेली दिसली. त्यांना रात्रीतून मी बाजरी कशी सोंगून घेतली याचं नवल वाटलं.“ एव्हडं बोलून रघुनाथ उठला, त्याला कोर्टात एका खटल्यात साक्ष द्यायला जायचं होतं. पोरांना रघुनाथची किमया ऐकून फार नवल वाटलं. काही पोरं तर पार घाबरून गेली. रघुनाथाने खरोखरच त्याचं शेत भुतांकडून सोंगून घेतलं होतं का? पोरं विचार करीत बसली. त्याची शहानिशा करण्याची कोणामध्येही हिम्मत नव्हती. परंतु त्याने खरोखरीच भुतांकडून शेत सोंगून घेतलं असेल तर रघुनाथ ग्रेटच म्हणावा लागेल.

रघुनाथ कोर्टात साक्षीकरता उभा राहिला. त्याने त्याचे नाव, गाव, वय, धंदा एखाद्या शिकलेल्या माणसाप्रमाणे न अडखळता, न गोंधळता सांगितला. एका खून-खटल्यात त्याची साक्ष होती. त्याच्या वकिलांकडे खून झाल्याचा सबळ पुरावा नव्हता व असलेला पुरावा कमजोर होता. वकिलाला सबळ पुरावा असलेल्या साक्षीदाराची आवश्यकता होती. खून तर झाला होता. नातेवाईकांना न्याय मिळावा ही गोष्टही खरी होती पण सबळ पुराव्याअभावी केस कमजोर झाली होती. रघुनाथ वकिलाच्या मदतीला धावून आला. वास्तविक खून झाला तेव्हा रघुनाथ शेजारच्या घरात बिर्याणी चापीत होता. साक्ष देतांना त्याने असं काही प्रतिपादन केलं की कोणालाही त्याचं म्हणणं पटावं. नंतर काही दिवसांनी खटल्याचा निकाल लागला व त्यात खून झालेल्या माणसाच्या नातेवाईकांना न्याय मिळाला.

पंधरा ऑगस्ट असो, सव्वीस जानेवारी असो अथवा कोणताही राष्ट्रीय उत्सव असो, खेळाच्या मैदानात प्रभात फेऱ्यांमध्ये रघुनाथ दिसणार नाही असे होणे शक्यच नव्हते. खेळात आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे रघुनाथ आपले परमकर्तव्य समजत असे. प्रभात फेऱ्यात “गांधीजी कि जय“,“ स्वातंत्र्य-दिन अमर रहे“अशा घोषणा द्यायला रघुनाथाला भारी स्फुरण येई. दहिगावचा रघुनाथ ना कुठला अधिकारी होता ना पदाधिकारी. तो एक सामान्य नागरिक होता, तरीही त्याचा सहभाग उत्स्फूर्त असे. पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारीच कशाला? तो दहिगावमधील प्रत्येक लग्नातदेखील अतिमहत्त्वाचा वऱ्हाडी म्हणून सामील असे. मागे एकदा त्याच्याबरोबरच दहावीत शिकणाऱ्या एका देखण्या, सुंदर मुलीचं लग्न ठरलं. ते घराणं दहिगावात श्रीमंत घराणं म्हणून ओळखलं जात होतं. ज्या मुलीचं लग्न ठरलं होते, ती अत्यंत सौंदर्यवान, गोरी, पण तेव्हढ्याच खडूस स्वभावाची होती. तिने आयुष्यात कोणत्याही तरुणाला आपल्याजवळ फिरकू दिलं नव्हतं. रागीटपणा हा तिचा स्थायीभाव होता. परंतु तिच्या लग्नसमारंभात रघुनाथाला अग्रभागी पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. वधूचे पिता तर उठसूठ ‘रघुनाथ, रघुनाथ‘ करीत होते, याचं सगळयांना नवल तर वाटलंच, पण हे काय गौडबंगाल आहे हे कोणीही जाणू शकलं नाही.

ही झाली लग्नाची गोष्ट. परंतु दहिगावात कोणी गचकलं तर रघुनाथ पहिल्या प्रथम तिथे हजर असे. तो लगबगीने शेजाऱ्यापाजाऱ्यांना, नातेवाईकांना स्वर्ग-रथ यात्रा केव्हा निघणार, कोणत्या स्मशानभूमीत जाणार, याची माहिती देई. तो घटना घडलेल्या घरासमोर तिरडी बांधतांनाही दिसे. मृत व्यक्तीला घरच्या नातेवाइकांसमवेत जणू काही तो त्यांच्याच घरचा सदस्य असावा अशा पद्धतीने नमस्कार करतांना पाहिलं म्हणजे पाहणाऱ्यांचं डोकं चक्रावून जात असे. पहिल्या चौघात रघुनाथ खांदेकरी नाही असे कधीही झाले नाही. गेलेल्या व्यक्तीचे गुणगान तो अशा पद्धतीने त्यांच्या नातेवाईकांकडे करी की त्यांनादेखील मृत व्यक्ती एवढी गुणवान होती हे ती व्यक्ती हयात असतांना न कळल्याची हळहळ वाटे. पंढरपूरची दिंडी वारी वाटी लावण्यातही रघूनाथ अग्रभागी असे. कपाळाला बुक्का, गोपीचंदन लावून, गळ्यात तुळशीमाळा घालून, टाळ बडविण्यापासून पावली खेळण्यापर्यंत त्याचा सहभाग असे. दिंडी गावापासून मैल-दोन मैल जाईपर्यंत रघुनाथ त्या दिंडीसोबत जाऊन मगच माघारी फिरे. रामनवमी, नवरात्र अथवा गणपतीसारख्या धार्मिक सणांमध्ये रघुनाथचा सहभाग नाही असे कधीही झाले नाही. रामनवमी, नवरात्रात रघुनाथ मारवाडी, गुजराथी स्त्रियांसोबत अस्खलित मारवाडी, गुजराथीत बोलायला लागला म्हणजे भले भले तोंडात बोट घालीत. तो स्त्रियांशी त्यांच्याच भाषेत बोलत असल्यामुळे त्यांना रघुनाथ आपल्यापैकीच एक आहे असे सहज वाटे व त्याच्या विषयी आत्मीयता निर्माण होई.

कोजागिरी पौर्णिमेला रघुनाथला एका ठिकाणचे आमंत्रण आले. रघुनाथला हा आपला सन्मानच वाटला. रघुनाथ त्या ठिकाणी पोहोचला त्यावेळी तेथे बरीच मंडळी होती. त्यात लहान, थोर, स्त्रिया, पुरुष सगळ्यांचा समावेश होता. एखाद्या प्रमुख पाहुण्यांप्रमाणे रघुनाथचे स्वागत झालं. रघुनाथ तसा अंगी लावून घेणाऱ्यांपैकी होता. त्याच्या स्वागताने त्याला उभारी आली, आपणही कोणीतरी आहोत असे त्याला विनाकारण वाटलं. तिथे उपस्थित असलेल्या स्त्रियांनीही त्याचे ‘रघुनाथभाऊ‘ म्हणत स्वागत केलं. त्यापैकी दोन मारवाडी स्त्रियांबरोबर रघुनाथ अस्खलित मारवाडीतून बराच वेळ बोलत राहिला. सगळेजण त्याच्या सफाईदार बोलण्याकडे, त्याच्याकडे कौतुकाने पहात होते. धार्मिक विधी, आरती पार पडल्यानंतर गप्पाष्टकाची बैठक रंगली. रघुनाथ मध्यवर्ती व्यक्ती होता. बोलण्याच्या ओघात तो म्हणाला, “मला जास्त वेळ थांबता येणार नाही, मी लवकरच जाईन.“ त्याच्या या बोलण्यावर एका ज्येष्ठ व्यक्तीने विचारलं,“कां? एवढी काय जाण्याची घाई आहे?“ यावर रघुनाथ म्हणाला, “मला लवकर गेलं पाहिजे, सकाळी दोन वाजता उठून स्नान आटोपून पांडुरंगाच्या मंदिरात जायचं आहे. हल्ली कार्तिक स्नान चालू आहे ना!” “हो ! पण कार्तिक स्नानाकरिता सकाळी दोन वाजता उठण्याची काय गरज?” मघाच्या ज्येष्ठ व्यक्तीने प्रतिप्रश्न केला.
हा प्रश्न ऐकताच रघुनाथ सरसावून बसला. थोडं पुढे सरकला अन् म्हणाला, “हो! दोन वाजताच उठावं लागतं. अंघोळ झाल्यावर पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्याचा दरवाजा उघडून आत जावं लागतं. आत देव म्हणजे पांडुरंग तयारच असतात. मी गेल्याबरोबर पांडुरंगाची अन् माझी गळाभेट होते आणि ‘ज्ञानोबा तुकाराम’ या भजनाला आम्ही सुरवात करतो. अत्यंत मधुर, स्वर्गीय आवाजात, टाळ-चिपळ्यांच्या नादात भजन सुरु असतं. प्रत्यक्ष देव हातात चिपळ्या घेऊन बेभान होऊन नाचतात आणि ज्ञानोबा तुकारामाचं भजन करतात, मीही माझा आवाज त्यांच्या मधुर आवाजात मिळवून भजनात तल्लीन होतो. साधारणतः तीस -चाळीस मिनिटं झाल्यावर देव त्यांच्या पूर्वस्थितीत म्हणजे विटेवर जाऊन उभे राहतात. मीही गाभाऱ्याचे दार बंद करून बाहेर येतो. तोपर्यंत पुजारी येण्याची वेळ झालेलीच असते. पुजाऱ्याला आमच्या काही वेळापूर्वी रंगात आलेल्या भजनाचा ठावठिकाणाही लागत नाही.” रघुनाथचे देवळात सकाळी लवकर जाण्याचे कारण ऐकताच सगळ्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. आपल्या रघुनाथ बरोबर देव स्वतः येऊन नाचतात, हे ऐकताच त्याची प्रतिमा चारचौघात उंचावली. कित्येकांनी हात जोडून रघुनाथला साष्टांग नमस्कार घातला. एक-दोन बायका तर थेट रघुनाथपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी त्याच्या पायांना स्पर्श केला. तसा रघुनाथ ओशाळून म्हणाला, “मी देव नाही, देवाच्या पाया पडा!” त्यावर कोणीतरी म्हणालं,”अहो! तुम्ही देवाच्या संपर्कात असता, म्हणजे तुम्हीही देवच आहात की!”रघुनाथ यावर काही बोलला नाही,पण तो सूचक हसला.
रघुनाथने मैफिल जिंकली होती. तो जायला निघाला. सगळ्यांनी त्याला डोळे भरून पाहून घेतले आणि विनम्रपणे नमस्कार केला. रघुनाथ आपण मारलेल्या लोणकढीवर खुश झाला. समाजात त्याची प्रतिष्ठा वाढली. स्त्रियांना रघुनाथसारख्या देवमाणसाला भेटून धन्य वाटलं. रघुनाथला त्याच्या झालेल्या स्तुतीमुळे फार हलकं हलकं वाटू लागलं. तो जाता जाता सरोजबेन नावाच्या एका गुजराथी तरुणीकडे पाहून म्हणाला, “सरोजबेन, तमे आवि साको छो, मंदिरमा?”
त्याला हात जोडीत सरोजबेन म्हणाली, “हू तमन जानवीश.“
तो म्हणाला, “सारो.“
सगळ्यांचा निरोप घेऊन रघुनाथने पायात चपला सरकवल्या आणि तो तिथून सटकला. तो निघून गेल्यावर मंडळी बराच वेळ त्याच्याविषयी उत्साहाने बोलत होती.

आज रघुनाथाला एका वेगळ्याच ठिकाणी जायचे होते. सार्वजनिक वाचनालयात कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावातली मंडळी आणि कथाकथन करणाऱ्या व्यक्तींना बोलावण्यात आलं होतं. कार्यक्रम रंगणार असं एकंदर वातावरणावरून जाणवत होतं. हॉलमध्ये गावातले स्त्री, पुरुष, मुलं जमल्यामुळे हॉल तुडुंब भरला होता. रघुनाथाला कथाकथन करण्यासाठी आमंत्रण नव्हतं, तो एक श्रोता म्हणून या कार्यक्रमाला हजर होता. कथाकथनाचा कार्यक्रम सुरु झाला. एका एका कथाकाराने आपल्या कथा श्रोत्यांना ऐकवल्या आणि त्यांना मंत्र-मुग्ध केलं. फार चांगल्या कथांचे सादरीकरण करण्यात आलं. कार्यक्रम संपत आला. इतक्यात कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ताराबाई थोड्या अंतरावरून रघुनाथकडे पाहून म्हणाल्या, “रघुनाथभाऊ! थारी कथा कठं हं?“ मारवाडी भाषेतून प्रश्नाला न डगमगता रघुनाथने उत्तर दिलं, “म्हणं कथा वथा नही आवं.”

रघुनाथ असं म्हणताच श्रोत्यांमधून दोन तीन जण उठले आणि रघुनाथाला कथा निवेदन करण्याचा आग्रह करू लागले. रघुनाथ तयारीत नव्हता. परंतु थोड्या वेळातच त्याने आपल्या मनाशी निश्चय केला आणि कथा कथन करण्याचं मान्य केलं.
रघुनाथ श्रोत्यांसमोर येऊन उभा राहिला अन् म्हणाला, “मला कथा बिथा काही माहीत नाही, पण काही दिवसांपूर्वी घडलेली एक सत्य घटना मी तुम्हाला सांगणार आहे.“ रघुनाथने घसा साफ केला आणि तो सांगू लागला, “ आपल्या गावाच्या पश्चिमेला कालिकामातेचं मंदिर आहे. त्या मंदिरात कालिका माता सिंहावर आरूढ होऊन राक्षसाचा संहार करीत असल्याची मूर्ती तुम्ही कित्येक वेळा पाहिली असेल. नवरात्रात तिथे घटस्थापना होते, दसऱ्याला सांगता होते. पंधरा दिवसांपूर्वी एक अजब घटना घडली. मी थकून भागून माझ्या घरी झोपलो होतो. दिवसभराच्या दगदगीने अंथरुणावर पडताच माझा डोळा लागला. रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास मला एक भयंकर स्वप्न पडलं. स्वप्नात कालिका माता ज्या राक्षसाचा वध करते तो राक्षस आला आणि म्हणाला, ‘रघु, उठ! मला तंबाखू खाण्याची लहर आली आहे, माझ्यासाठी तंबाखू आणि चुन्याचा डबा घेऊन मंदिरात ये!’ असं म्हणून तो राक्षस अदृष्य झाला. मी झोपेतून खडबडून जागा झालो, पाहतो तर मी माझ्याच बिछान्यावर झोपलेलो. राक्षस गायब. परंतु स्वप्नातल्या त्या राक्षसाचे रूप पाहून मला घाबरल्यासारखे झाले. शेवटी मी विचार केला, स्वप्न ही स्वप्नच असतात, क्षणात दिसतात, क्षणात गायब होतात. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे काही कारण नाही. अशी मनाची समजूत घालून मी पुन्हा अंथरुणावर कलंडलो. परंतु हैबत खाल्यामुळे झोप येईना. जागेपणीही त्या राक्षसाचा अक्राळविक्राळ देह नजरेसमोर दिसू लागला. शेवटी कशीबशी झोप लागली. झोप लागून थोडा अवधी झाला नसेल तोच पुन्हा कानात आवाज आल्यासारखा भास झाला, ‘मला तंबाखूची जोरदार तलफ आली आहे. झोपू नकोस, तंबाखू, चुना घेऊन मंदिरात ये.’ मी खडबडून जागा झालो. आता सकाळ होईपर्यंत झोपायचेच नाही असा निर्णय मी घेतला. दिवा लावला आणि बिछान्यावर बसून राहिलो. सकाळ झाल्याची जाणीव बाहेर झाडावर चिव-चिव करणाऱ्या चिमण्यांनी दिली, तेव्हा जीवात जीव आला. थोड्याच वेळात उजाडले म्हणजे आपल्या कामाला सुरवात करू असा निश्चय करून मी उठलो. पण उभे राहताच मला कोणीतरी मागे मागे ओढतो आहे, असा भास झाला. मागे पाहतो तर कोणी नाही. मी त्याचा संबंध रात्री पडलेल्या स्वप्नाशी लावला. त्या स्वप्नांचा, त्या राक्षसाचा, मला मागे मागे ओढण्याशी संबंध असावा असं मला वाटायला लागलं. दिवसभर कारण नसतांना इकडे तिकडे फिरत मी वेळ घालवला. रात्र झाली तशी मला भीती वाटू लागली. झोपण्याकरता बिछाना तर घातला, पण त्याच्यावर झोपण्याची हिम्मत होईना. रात्र वाढू लागली तरी मी बिछान्याकडे जाण्यास तयार नव्हतो. मध्यरात्र व्हायची वेळ झाली, वाटलं, आता पडल्या पडल्या झोप लागेल, म्हणून आडवा झालो आणि काय आश्चर्य, पडल्या पडल्या झोप लागली. परंतु पुन्हा काल पडलेलं स्वप्न आजही पडलं. यावेळी राक्षसाने दम देऊन सांगितलं, ‘उद्या रात्री तंबाखू, चुना घेऊन ये. नसता माझ्याशी गाठ आहे!’ मी घशाला कोरड पडली असतांनाही त्याला ऐकू जाईल एव्हढ्या मोठ्या आवाजात होकार दिला. राक्षस गायब झाला. मला थोडा वेळ झोप आली नाही, परंतु मग केव्हा झोप लागली कळलंच नाही. माझ्या होकारामुळे मला रात्री पुन्हा स्वप्नही पडलं नाही आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर मला कोणी मागेही ओढलं नाही.”

“दिवसभरात मी तंबाखूची एक पेंढी आणि एक चुन्याचा दोन किलोचा भला मोठा डब्बा विकत आणून ठेवला आणि रात्री कालिका मंदिरात जाण्याचा माझा निश्चय पक्का केला. बरोबर कोणाला न्यावं तरी पंचाईत, न न्यावं तरी पंचाईत. दिवसभर या द्विधा मनस्थितीत असतानाच संध्याकाळ झाली. थोडा अंधार पडल्यावर मी कालिका मंदिराकडे राक्षसाचं साहित्य घेऊन निघालो. कालिका मंदिराचा पुजारी सगळं काही आटोपून पथारी मारण्याच्या बेतात होता. मला अपरात्री देवळात पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने माझं येण्याचं कारण विचारलं. मी म्हणालो, उद्या सकाळीच देवीला अभिषेक करायचा आहे. गावातून यायचं, परत जायचं यात वेळ जातो. म्हणून मुक्कामी आलो.“ पुजाऱ्याला माझं कारण पटलं नाही, परंतु यावर तो काहीही न बोलता झोपायला गेला.”

”मी बाहेर असलेल्या एका बाकावर बसलो. राक्षस केव्हा प्रकट होईल याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे बसून राहण्याशिवाय काहीही मार्ग नव्हता. रात्रीचे अकरा वाजले होते. बहुधा बारा वाजता तो प्रकट होईल, असा माझा अंदाज होता. मध्यरात्र उलटून गेली तरी मंदिर परिसरात काही हालचाल नव्हती. मी पूर्वीपेक्षा जास्त अस्वस्थ झालो, पण काहीही करणं शक्य नव्हतं. मी मात्र वाट पाहून पाहून थकून गेलो होतो. रात्रीचे दोन वाजले होते. दाणदाण पावलं टाकत, मी बसलो होतो त्या दिशेने मंदिरातल्या मूर्तीमध्ये बंदिस्त असलेला राक्षस माझ्याकडे येतांना दिसला. कालिकेचं वाहन असलेल्या सिंहाने त्याच्यावर हल्ला केला असल्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं. तो माझ्याजवळ आला, त्याने माझ्या हातातली तंबाखूची पेंढी आणि चुन्याचा डब्बा जवळ जवळ हिसकावूनच घेतला, आणि माझ्या खांद्यावर त्याचा प्रचंड हात ठेवून म्हणाला, ‘बैस! मी तुला काहीतरी खायला देतो’, म्हणत त्याने मला नारळाएव्हढा बटाटावडा दिला आणि मानेनेच तो खाण्याची खूण केली. एव्हढा प्रचंड वडा मी पहिल्यांदाच पाहिला. संपूर्ण वडा खाणं मला शक्य नव्हतं. थोडा खाऊन झाल्यावर मी तो वडा कचरापेटीत टाकणार होतो, तोच त्या राक्षसाने वडा माझ्या हातातून गायब केला आणि म्हणाला, ‘थोडा वेळ थांब, मी येतोच.’ आणि तो अदृश्य झाला. मघाशी त्याने माझ्या खांद्यावर ठेवलेल्या त्याच्या हाताचं नख लागून माझ्या खांद्यातून बरंच रक्त येत होतं. त्यामुळे शर्टाची उजवी बाही रक्तानं माखून निघाली होती. थोड्या वेळाने तो पुन्हा आला आणि मला डोळे मिटायला सांगितले. थोडा वेळ डोळे न उघडण्याची सूचनाही दिली. मी डोळे बंद करताच हवेत आपोआप उचललो गेल्याचा भास मला झाला. डोळे उघडतो तो मी माझ्या घरासमोर उभा आहे याची मला जाणीव झाली. सकाळी सकाळी राक्षसांना दुप्पट बळ येतं असे मी कुठे तरी वाचल्याचं मला आठवलं. अद्याप उजाडलं नव्हतं. मी घरात शिरलो. बिछाना अद्याप तसाच पडलेला होता. प्रचंड तणावामुळे थकलेलो असल्यामुळे मला पडताक्षणी झोप लागली.”
भीती, क्रौर्य, अघटित घटनांचा क्रम असलेलं नाट्य रघुनाथने श्रोत्यांना सांगितलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती, आश्चर्य ओसंडून वाहत होतं. रघुनाथच्या शौर्याचा, त्याच्यावर गुदरलेल्या प्रसंगांचा, श्रोत्यांवर व्हायचा तोच परिणाम झाला. एव्हढ्या मोठ्या दिव्यातून रघुनाथ सुखरूप दहिगावला परत आला म्हणून कालिका मातेचे उपकार दहिगावकर मानायचे विसरले नाहीत. वेगळ्या नजरेने दहिगावकर रघुनाथकडे पाहू लागले. त्यांना काय बोलावं समजत नव्हतं. रघुनाथकडे आदराने पाहत एक एक जण आपले घर जवळ करू लागला.

दिवसभर भटकंती करणारा, ज्याचे-त्याचे उंबरठे झिजवणारा रघुनाथ कोणता व्यवसाय करीत असावा? त्याचा चरितार्थ कसा चालत असावा? याविषयी फारच थोड्या दहिगावकरांना माहिती होती. रघुनाथाचा व्यवसाय मिस्त्रीचा होता. तो गवंडी होता. पण त्याने कधीही, कोणाचेही गवंडीकाम दिवसा केलं नाही. रात्री मोठंमोठाले दिवे लावून तो गवंडीकाम करीत असे. ज्याघरचे काम तो करी त्या घरच्या लहान थोर मंडळींना गप्पागोष्टीत रमवून तो ते काम रात्री करीत असे. ही त्याची खुबी होती. गप्पाष्टकामुळे घरातील लहानथोर रघुवर खुश असत. रघूच्या गप्पांमध्ये विविध प्रकारचा मसाला ठासून भरलेला असे त्यामुळे लोकांना तो न आवडण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच्या गप्पांमध्ये दहिगावच्या लहानथोर मंडळींचे चांगले-वाईट किस्से, देवादिकांच्या, भुताखेतांच्या, राक्षसांच्या सोबतचा खरा-खोटा अनुभव आणि राजकारण यांचा समावेश असे. आता रघुनाथ थकला होता. तो हल्ली फारसा फिरतांना दिसत नसे. मुलीच्या घरीच बिछान्यावर पडलेला अथवा बसलेला दिसे. कधी मधी घराच्या ओट्यावर शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मुलांना गोष्टी सांगण्यात तो गढून गेलेला दिसे. मुलेही त्याच्या गोष्टीत रंगून गेलेली दिसत. पूर्वीपेक्षा जास्त कृश झालेला रघुनाथ आताशी बाहेर फिरण्यावरही नियंत्रण ठेवी, गप्पा मारण्याचे त्याचे प्रमाणही कमी झाले होते. हळूहळू दहिगावकर रघुनाथशिवाय जगायला शिकू लागले होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी