वैकुंठ

(अनुवादित कथा)
मूळ लेखक: रवि कोप्परपु
अनुवाद: वरदा वैद्य

डॉ. रवि कोप्परपु यांनी लिहिलेल्या “वैकुंठम”
ह्या मूळ तेलुगू कथेच्या त्यांनीच केलेल्या इंग्रजी
अनुवादावरून हा मराठी अनुवाद केला आहे.
मूळ तेलुगू कथा प्रतिलिपी संकेतस्थळावर
प्रकाशित झाली आहे.
ही कथा ‘मैत्र’च्या ऑक्टोबर २०१९ अंकात
प्रकाशित झालेल्या ‘पाताळ’ ह्या
कथेचा पुढचा भाग आहे.
पाताळ कथा कृपया इथे वाचावी - 

‘मैत्र’ ऑक्टोबर २०१९

चंद्रयान-१ हा भारताने चंद्रावर पाठवलेला पहिला उपग्रह. २००८ च्या ऑक्टोबरात इस्रोने हा उपग्रह चंद्राच्या पृष्ठभागाची चाचणी करण्याकरता पाठवला. मात्र २००९ च्या ऑगस्ट महिन्यात तो बंद पडून काम करेनासा झाला. घातक प्रारणांपासून उपग्रहाचे रक्षण व्हावे म्हणून त्यावर संरक्षक कवच चढवलेले होते. हे कवच निकामी झाल्यामुळे हा उपग्रह वेळेआधीच नादुरुस्त झाला. अंतराळात कोणकोणत्या प्रारणांशी उपग्रहाची टक्कर होऊ शकते हे लक्षात घेऊन खरे तर हे कवच तयार केले होते. तरीही हे संरक्षक कवच निकामी का झाले असावे हा प्रश्न काही काळ अनुत्तरित राहिला. ह्या उपग्रहांसाठीच्या इस्रोने गोळा केलेल्या दूरमिती (टेलिमेट्री) नोंदींचा अभ्यास करता शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की हा उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून प्रदक्षिणा घालत असताना त्या भागातून बाहेर पडणाऱ्या अज्ञात प्रारणांचा परिणाम म्हणून हे संरक्षक कवच निकामी झाले आणि त्याची परिणती उपग्रहाने मान टाकण्यात झाली. ही अज्ञात प्रारणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या एका विवरातून आली असावीत असे नोंदींवरून दिसत होते. नासानेही ह्या उपग्रहाच्या दूरमिती नोंदी घेतल्या होत्या. त्यांचाही अभ्यास करावा म्हणून इस्रोने नासाकडे त्या नोंदींची मागणी केली. नासाच्या LRO (Lunar Reconnaissance Orbiter) उपग्रहाच्या साहाय्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या त्या विवराचे अतिवियोजित (high resolution) फोटो काढावेत आणि अज्ञात प्रारणांच्या स्रोताचा माग काढावा अशी मागणी इस्रोने नासाकडे केली. LRO ने काढलेल्या फोटोंमध्ये त्या विवरापाशी एक प्रकाशमान बिंदू आढळला आणि तिथूनच ही अज्ञात प्रारणे बाहेर टाकली जात असावीत असे दिसत होते. 

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यांचा हा शोध भारताच्या पंतप्रधानांना कळवला. त्यावर बराच काथ्याकूट होऊन शेवटी ह्या प्रकाशित जागेचा अभ्यास करण्यासाठी आणखी एक उपग्रह चंद्रावर पाठविण्यात यावा असे ठरले. त्या उपग्रहाला त्यांनी चंद्रयान-२ असे नाव दिले. ह्यावेळी ह्या उपग्रहातून एक चांद्रबग्गीही (rover) पाठवण्यात आली. ही बग्गी त्या विवरात जाऊन प्रारणस्रोताचा अभ्यास करणार होती. ह्या बग्गीचे ‘विक्रम’ असे नामकरण करण्यात आले.

जगाचे लक्ष आता विक्रमला चंद्रावर उतरवणाऱ्या  उपग्रहाकडे लागले होते. ही बग्गी चंद्रावर सुखरूप उतरू शकली तर आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या प्रगत राष्ट्रांमध्ये भारताचीही गणना झाली असती. नासाही विक्रमवर  बारीक लक्ष ठेवून होते. चंद्रयान-२ चंद्राभोवती फिरू लागले आणि लँडर विक्रमला घेऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे निघाले.  चंद्रापासून अगदी २ किलोमीटर अंतरावर असताना अचानक विक्रम लँडरचा सर्वांशी संपर्क तुटला. कितीही प्रयत्न केला तरी विक्रमशी संपर्क पुन्हा साधणे कोणाला जमले नाही. इस्रोचे अध्यक्ष फारच अगतिक झाले. पंतप्रधानांनी त्यांचे सांत्वन केले. आता विक्रमही हरवला होता. काही महिन्यांनी चंद्राभोवती फिरणाऱ्या चंद्रयान-२ ला विक्रम सापडला. त्या प्रकाशमान बिंदूपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर विक्रम कोसळला होता. चंद्रयान-१ ला ज्या प्रारणांनी निकामी केली तीच प्रारणे विक्रमालाही निकामी करण्यास कारणीभूत झाली होती. त्या प्रकाशमान बिंदूतून प्रारणे बाहेर पडतच होती.
---------------------
मी माझे काम करत बसलो असताना मला अध्यक्षांच्या कचेरीत बोलावल्याचा निरोप मिळाला. मी तिथे गेलो तेव्हा बाकी सगळे तिथे आधीच जमलेले होते. तिथल्या गर्दीवरून मी एकदा नजर फिरवली. ओळखीचे बरेच जण त्यात होते. त्यातले काही जण प्रसिद्ध, महत्त्वाचे आणि उच्चपदस्थ होते. ही मंडळी इथे काय करत असावीत असा प्रश्न मला पडला.  ह्या ‘वलयांकित’ मंडळींच्या जोडीला मला इथे पाचारण का करण्यात आले असावे असाही प्रश्न माझ्या मनांत येऊन गेला. माझ्या कामाचे स्वरूप संपर्क क्षेत्राशी (communications) संबंधित होते.  

सभेला सुरुवात झाली. आमचे अध्यक्ष म्हणाले, “आपल्याला समजलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेबद्दल सांगण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत.  मोठा गहन प्रश्न आहे. आपल्याला सर्वांगांनी चर्चा करून काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.”
“कोणती घटना?” एकाने पृच्छा केली.
क्षणभर थांबून अध्यक्ष शांत स्वरात म्हणाले, “तबकडी यानाकडून संदेश आला आहे.”
सर्वांना ते ऐकून धक्का बसला. सर्वांच्या तोंडातून एकाचवेळी आश्चर्योद्गार बाहेर पडले. लोकांनी आपापसात कुजबूज सुरु केली. यानाकडून संपर्क? तोही इतक्या युगांनंतर? कसे शक्य आहे? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वासाचे मिश्रण होते. ते यान आता हातचे गेले अशीच समजूत प्रत्येकाने करून घेतली होती.
“तुमच्यासमोर  एक फाईल ठेवलेली आहे. त्यात यानाने आपल्याला पाठवलेला संदेश आहे. त्याशिवाय आपण पकडलेला दुसरा एक संदेशही त्या फायलीत आहे. दोन्ही गोष्टी नीट काळजीपूर्वक वाचा.” अध्यक्षांच्या शब्दांनी सर्व भानावर आले.

मी गोंधळून गेलो असलो तरी काहीश्या उत्साहानेच मी फाईल उघडली. तो पकडलेला दुसरा संदेश म्हणजे एक अहवालवजा पत्र होते - एका अंतराळ संशोधन संस्थेतील अधिकाऱ्याने त्यांच्या देशाच्या मंत्र्याला पाठवलेला अहवाल.
----------------------------------------
प्रति,
सन्माननीय संरक्षण मंत्री,
‘चंद्रयान - ३’ ह्या प्रकल्पाबद्दलचा हा अहवाल मी तुम्हाला पाठवत आहे. त्या प्रकल्पांतर्गत चंद्रावर पाठवलेल्या अंतराळवीरांना आढळलेल्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवणे हा ह्या अहवालाचा उद्देश आहे. तांत्रिक कारणांमुळे आपले चंद्रयान-१ आणि चंद्रयान-२ प्रकल्प काही तडीस गेले नाहीत, वेळेआधीच बंद पडले, हे तुम्हाला माहीत आहेच. चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावरील विवरातून बाहेर पडणाऱ्या प्रारणांमुळे हे दोन्ही प्रकल्प बंद पडले. नासाच्या LRO उपग्रहाने घेतलेल्या अतिवियोजित छायाचित्रांचा अभ्यास करता आम्हाला काही अनपेक्षित गोष्टी आढळल्या. ती छायाचित्रेही ह्या अहवालासोबत जोडली आहेत.

छायाचित्रांवरून तुमच्या लक्षात येईल की ही प्रारणे सुमारे १०० फूट व्यासाच्या एका वर्तुळाकार चपट्या वस्तूमधून येत आहेत. ह्या चपट्या वस्तूच्या मध्यभागी जो प्रकाशमान भाग दिसत आहे ते ह्या प्रारणांचे उगमस्थान आहे. एखाद्या विज्ञानकथेत वर्णन केलेली उडती तबकडी असावी तशी दिसणारी ही वस्तू आहे. मात्र ही वस्तू नेमकी काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही. पृथ्वीवरील कोणताही देश ह्या प्रचंड
आकारमानाची वस्तू तयार करून ती चंद्रावर पाठवू शकेल असे प्रगत तंत्रज्ञान बाळगून नाही. आपले उपग्रह, याने वा बग्ग्या ह्या वस्तूसारख्या दिसत नाहीत. ह्या तबकडीचा अभ्यास करण्यासाठी आपण अंतराळवीरांची तुकडी चंद्रयान-३ प्रकल्पांतर्गत चंद्रावर पाठवली होती हे तुम्ही जाणताच.

अंतराळवीरांच्या ह्या तुकडीने पाठवलेल्या अहवालाचा सारांश ह्यापुढे लिहीत आहे. अंतराळवीरांची तुकडी ह्या वस्तूपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर उतरली आणि एका बग्गीच्या साहाय्याने ते ह्या वस्तूजवळ पोहोचले.  त्यांनी त्या वस्तूचे जवळून निरीक्षण केले. त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रारणांचा सविस्तर अभ्यास करून त्यांना पुरून उरतील असे स्पेससूट ह्या तुकडीसाठी तयार करण्यात आले होते. हे स्पेससूट त्या
प्रारणांमध्ये किमान तीन तास टिकावेत अशी अपेक्षा असल्यामुळे सर्व काम ह्या तुकडीला तेवढ्या वेळात उरकणे गरजेचे होते. छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणे ही खरोखरच एक उडती तबकडी होती. ती मानवाने तयार केलेली असणे अगदीच शक्य नाही. कृपया सोबत जोडलेली तबकडीची छायाचित्रे पाहावीत.

आपल्या अंतराळवीरांच्या तुकडीने प्रवेशद्वार शोधत ह्या तबकडीभोवती प्रदक्षिणा घातली, मात्र दरवाजासदृश कोणतीही जागा त्यांना दिसली नाही. कदाचित ह्या वस्तूच्या आत जाण्याची ह्या वस्तूच्या कर्त्यांना गरजच नसावी. ह्या वस्तूचा पृष्ठभाग कोणतेही चरे वा पोचे नसलेला, अतिशय गुळगुळीत होता. काळजीपूर्वक परीक्षणानंतर त्यांना त्या वस्तूच्या खालच्या भागावर एक छोटा खळगा दिसला. तो खळगा दाबल्यावर दहा बाय दहा आकाराचा वस्तूचा पृष्ठभाग अदृश्य झाला आणि तिथे आत जाण्यासाठीची जागा दिसू लागली. ते आत जाताच ही भिंत पुन्हा पूर्ववत झाली.

आपण स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशा वस्तू ह्या तबकडीच्या आत अंतराळवीरांना दिसल्या. तिथे तरंगणारे, परंतु स्थिर असलेले गोलक होते. तळपणाऱ्या गोट्या असाव्यात तसे. आपल्या उपकरणांनुसार त्या प्रत्येक गोटीचे वजन एक टनाच्या आसपास असावे. मोठी घनता असलेल्या पदार्थांपासून ह्या गोट्या तयार केलेल्या असाव्यात. तिथे दिसलेले दृश्य असे होते की ज्यामुळे ही तबकडी मानवाने तयार केलेली नाही ह्याची खात्रीच पटावी. तेथे मोठ्या आकाराच्या खुर्च्या होत्या आणि त्यातील काही खुर्च्यांवर अजस्त्र आकारांचे - किमान ८ ते ९ फूट उंचीचे - सांगाडे होते. हे सांगाडे आपल्याला ज्ञात असलेल्या कोणत्याही प्राण्यांसारखे दिसत नव्हते. हे प्राणी बऱ्याच काळापूर्वी मेले असावेत. सांगाडे हाडांचे असावेत असे दिसत होते.

चंद्रावर हवा आणि पाण्याचा अभाव असल्यामुळे हे प्राणी चंद्रावर उत्क्रान्त झाले असण्याची शक्यता वाटत नाही. हे  प्राणी पृथ्वीवरून आलेले असणेही शक्य नाही. ह्याचा अर्थ ते परग्रहांवरून आलेले असावेत. हे प्राणी सौरमालेतील कोणत्याही ग्रहावरून आलेले असण्याची शक्यताही कमीच आहे हे तुम्हाला पुढील अहवाल वाचून लक्षात येईलच.

ही तबकडी चंद्रावर कशी पोहोचली, कुठून आली असावी ह्याचा विचार केल्यावर आम्ही एक शक्यता सुचवू इच्छितो. मात्र ही शक्यता दुर्दैवीच म्हणावी लागेल. तबकडीच्या अंतर्भागाचे परीक्षण करत असता अंतराळवीरांचा हात लागून अनवधानाने तेथील एक उपकरण सुरू झाले आणि त्यामुळे त्या तबकडीची संपर्क प्रणाली (communication system) कार्यरत झाली. ह्या उपकरणाने एक संदेश अंतराळात प्रक्षेपित केला. त्या सांकेतिक भाषेतील संदेशाचे लिप्यंतरण करणे त्यांना खूप प्रयन्त करूनही जमले नाही.  मात्र त्यांच्या लक्षात आले की हा संदेश मकर राशीतील एका ताऱ्याच्या दिशेने प्रक्षेपित झाला होता. ह्या संदेशामुळे पुढे काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही. हे संपर्क उपकरण बंद करण्यात अंतराळवीरांना यश आले नाही. ती तबकडीच नष्ट करणे हा एक उपाय होता, पण त्यामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांनी तसे केले नाही.

नुकताच एका रशियन शास्त्रज्ञाने - डॉ. मेवडेव यांनी - पृथ्वीच्या पोटात २५ किलोमीटर खोलीवर राहणाऱ्या, तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या समाजाचा शोध लावला होता, हे तुम्हाला माहीत असेलच. सामान्य लोकांना ह्या समाजाबद्दल अजिबात कल्पना नाही. हा समाज पृथ्वीवरील मानवी समाजासाठी घातक सिद्ध होऊ शकतो असे मेवडेवने  सांगून ठेवले आहे. चंद्रावरची ही तबकडी कदाचित ह्याच समाजाने पाठवलेली असू शकते. मात्र ती कशासाठी पाठवली असेल ह्याचा अंदाज कोणाला बांधता आलेला नाही. शिवाय ह्या तबकडीने त्यांचा संदेश पृथ्वीच्या दिशेने पाठविण्याऐवजी  मकर राशीच्या दिशेने का पाठवला असावा असाही प्रश्न आहे. कदाचित आमचा ह्या तबकडीच्या मालकांबाबतचा अंदाज चुकीचाही असू शकतो. दुर्दैवाने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्यासाठी आमचे शोधकार्य सुरू आहेच, मात्र आतापर्यंत मिळालेली माहिती महत्त्वाची असल्यामुळे आम्ही हा अहवाल तुमच्याकडे पाठवत आहोत. कृपया इतर देशांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही ही माहिती कळवावी ही विनंती.

कळावे,
राजा राम
--------------------------------
हे पत्र वाचून झाल्यावर मी एक दीर्घ उसासा सोडला. बाकीच्यांनाही हे पत्र वाचल्यावर काय बोलावे ते सुचत नसावे.
“परिस्थिती किती भयंकर आहे ह्याची तुम्हाला कल्पना आली असावी” आमच्या अध्यक्षांनी शांततेचा भंग करीत  म्हटले.
“आपल्याला वाटलं होतं की युद्ध संपून युगं लोटली. पण ह्या संदेशानुसार ते ‘पाताळात’ जाऊन दडले असं दिसतंय.” कुणीतरी म्हणाले.
सभागृहात शांतता पसरली होती. सगळेच काळजीत पडले होते.
“आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये आलेल्या पुसट उल्लेखांनुसार पृथ्वीलोकी देवा-दानवांमध्ये युद्ध झालं, तेव्हा देव ह्या तबकडी यानांतून पृथ्वीच्या दिशेने गेले होते. ह्या यानांची माहिती कालौघात नष्ट झाली आणि उल्लेख तेवढे मागे राहिले. त्यातलेच हे एक तबकडी यान चंद्रावर कोसळले असावे. मात्र हा चंद्रलोक आणि पृथ्वीलोक नेमका कुठे आहे ह्याचा माग आपल्याला आजवर काढता आला नव्हता. आपल्या ग्रंथांमधले त्याबद्दलचे उल्लेख फारच ओझरते होते. त्यावेळी पृथ्वीलोकी मानवजात फारशी उत्क्रान्त नव्हती. मात्र आता मानवसमाज प्रगत झाला असावा असं दिसतंय. तरी दानवांच्या तुलनेत ते कमीच असणार. आपल्याला यानाकडून मिळालेल्या ह्या संदेशाच्या दिशेवरून हा पाताळलोक कुठे असावा हे आता माहीत झालं आहे. आता तिथे जायची वेळ आली आहे.” आतापर्यंत शांत असलेल्या एका जाणत्या अधिकाऱ्याने बोलायला सुरुवात केली. सर्वांनाच ह्या अधिकाऱ्याविषयी, त्याच्या कामाविषयी आदर होता. त्याने सुचवलेल्या गोष्टी सहसा अंमलात आणल्या जात असत.
“नेमकं कशासाठी जायचं तिथे? तिथे जाऊन काय उपयोग होणार आहे?” एकाने विचारले.
तो जाणता अधिकारी उत्तरला, “आपण देवगण इथे देवलोकी सुखाने, शांततेत राहात आहोत. पण त्या संदेशात लिहिल्यानुसार  ते पाताळवासी जर पृथ्वीवर आले तर ते मानवजातीला नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत. दानवांची कुवत फार मोठी होती असे आपले ग्रंथ सांगतात. त्यांची जय्यत तयारी सुरूच असणार. मानवांना वाचवायचे असेल तर आपल्याला लवकरात लवकर हालचाल करणं गरजेचं आहे. “
“इतर लोकांकडून मदत मागावी का?” अध्यक्षांनी विचारले.
त्या अधिकाऱ्याने लगेच उत्तर दिले नाही. काही क्षण खोल विचार केल्यावर ते अधिकारी म्हणाले, “ठीक आहे. सत्यलोकी संदेश पाठवा. आपल्या वैकुंठाच्या सर्वात जवळ तोच लोक आहे.”

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी