संपादकीय

गेल्या काही वर्षांत जग झपाट्याने बदलले. पत्र पाठवण्याचा काळ कधीच मागे पडला. केवळ घरी असताना फोनवर संभाषण हे देखील इतिहासजमा झाले. आता यत्र तत्र सर्वत्र सगळ्यांकडे फोन असतात आणि वाटेल तेव्हा वाटेल तिथून फोनवर बोलता येते.

आता नव्या पिढीत तर फोनवर बोलणे मागे पडून केवळ मेसेज पाठवणे यासाठी फोन नामक यंत्र वापरले जाते. ह्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय प्रवास बराच सोपा, सुरक्षित झाला. त्यामुळे कोव्हीडची जागतिक साथ सुरु झाल्यापासून अचानक जोरात जाणाऱ्या गाडीला ब्रेक लागावा तसे आपले नियमित, अनियमित बेत अचानक धक्का लागून रद्द झाले. सुरुवातीला काही महिने एकत्र भेटून प्रत्यक्षात होणारे कार्यक्रम जालावर झूमच्या साहाय्याने सुरु झाले. मात्र प्रत्यक्ष भेटींतील मजा त्यात नाही. हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे. आत्ता अचानक जादू झाली आणि कोव्हिडची साथ संपली तर दिवाळी आणि त्यानंतर येणारे थॅंक्सगिविंग आणि ख्रिसमस किती जोरदार साजरे होतील याची कल्पना देखील सुखकारक आहे! सणांच्या निमित्ताने नवनवीन पदार्थ करणे, खरेदी करणे, एकमेकांकडे जाणे, सार्वजनिक कार्यक्रमांत उत्साहाने भाग घेणे, ह्या सगळ्यांचा आनंद नव्याने घेता येईल. इतकी वर्षे नेमेचि येतो मग पावसाळा, त्याप्रमाणे नेमेचि येतो मग दिवाळी-दसरा असे वाटून उत्साह जरा कमी झाला होता का? तर मग या अचानक लागलेल्या ब्रेकने कदाचित पुढच्या वर्षी जास्त उत्साह वाटेल. या अनपेक्षित बदलामुळे त्या आधीच्या काही गोष्टी तपासून घेण्याची संधी मिळेल. बदलत्या काळाशी जुळवून घेत नव्या-जुन्या चांगल्या गोष्टींची सांगड घालत आपण पुढे जाऊया! 

२०२० मधला हा शेवटचा अंक. ह्या अंकात कथा, व्यक्तिचित्र, अनुभवकथन अशी साहित्याची रेलचेल आहे,तसेच नेहमीप्रमाणे छोट्या दोस्तांसाठी एक प्रश्नसंचपण आहे. बाममं आणि मराठी कला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमांतर्गत ‘हितगुज’च्या दिवाळी अंकात प्रकाशित होणारे पुस्तक परीक्षण ह्या अंकात आहे. दिवाळीच्या फराळाप्रमाणेच हा साहित्य फराळ तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. भारताच्या विविध भागातून बाल्टिमोर परिसरात आलेल्या आपल्या शेजाऱ्यांची ओळख "गड्या आपुला गाव बरा" या सदरातून आपल्याला होत असते. या सदराच्या समारोपी भागात आपण महाराष्ट्राबाहेरून आलेल्या मराठी शेजाऱ्यांशी ओळख करून घेणार आहोत. 

पुढच्या वर्षीच्या पहिल्या अंकापासून पाककृतींचे नवीन सदर सुरु करत आहोत. संपादक मंडळ एखादा पदार्थ वा मुख्य जिन्नस सुचवेल आणि त्या पदार्थाची वा तो जिन्नस वापरून केलेली पाककृती तुम्ही आम्हाला पाठवायची आहे. दिवाळीच्या निमित्ताने घराघरांत लाडू केले जातात. त्यामुळे ह्या सदराची सुरुवात लाडवांच्या पाककृतींनी होणार आहे. येणाऱ्या सणासुदीच्या निमित्ताने तुम्ही लाडू करणार असाल तर पदार्थांचे प्रमाण व कृती टिपून ठेवायला विसरू नका. तसेच पाककृतीसोबत पदार्थाचा फोटो, पाककृती करतानाचा तुमचा अनुभव, त्या पदार्थाशी निगडित आठवणींत राहिलेला एखादा प्रसंग वगैरे खुमासदार भर त्यात घातलीत तर दुधात साखर!

बाल्टिमोर परिसरांत राहणाऱ्या आपल्या मराठी समाजामध्ये अनेक गुणी कलाकार आहेत. विविध कलाक्षेत्रांमध्ये त्यांचा वावर आहे - चित्रकारी, लेखन, अभिनय, हस्तकला, गायन, वादन, छायाचित्रण आणि इतर अनेक कला. छंद म्हणून कला जोपासणारे हौशी कलावंत ते अगदी व्यावसायिक पातळीवरचे कलाकार आपल्यात आहेत. काहींबद्दल आपल्याला माहिती असते, पण अनेकांकडचे कलागुण आपल्याला माहीतच नसतात. ह्या अंकामध्ये चित्रकारी करणाऱ्या योगिनी दहिवदकरची एक कलाकार म्हणून ओळख करून घेऊ. दर अंकातून एक वा दोन कलाकारांची ओळख करून देणारे सदरही ह्या अंकापासून सुरू करत आहोत. तुमच्यातील कलागुण लोकांसमोर आणण्याची ही संधी तुम्ही घेऊ इच्छित असाल तर आम्हाला संपर्क करा. ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ तत्वावर कलाकारांची निवड केली जाईल.

नेहमीप्रमाणे तुमचे इतर साहित्य - लेख, कविता, रेखाचित्रे आणि छायाचित्रे- असतील तर ती मैत्रच्या पुढच्या अंकामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याकडे जरूर पाठवा. मैत्रचा पुढचा अंक नवीन वर्षात म्हणजे २०२१ च्या जानेवारी अखेरीस प्रकाशित होईल. त्या अंकासाठी तुमचे लेखन व चित्रे Editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर १५ जानेवारीपर्यंत पाठवा. तसेच नवीन वर्षामध्ये जर कुणाला संपादक मंडळामध्ये सामील व्हायचे असेल तर आमच्याशी Editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर संपर्क साधा.

मैत्रचे संपादक मंडळ आणि बाममं कार्यकारिणीतर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा !!

कळावे,
संपादक मंडळ



 

 

Comments

  1. संपादकीयाने अंकाची छान सुरुवात केली आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी