एका बागेची गोष्ट

आरती-राणे वाळवेकर
शब्दांकन: अभिजित वाळवेकर
 

असे पाहुणे येती ... तुम्ही म्हणाल की बागेच्या गोष्टीमध्ये पाहुणे कुठून आले? आणि ते पण कोरोनाच्या काळात? आता तर पाहुणे अजिबातच अपेक्षित नाहीत. घराची बेल वाजली तर घाबरायला होतं. कोण आलं असेल? आणि का बरं आलं असेल? जे कोणी आलं असेल त्यांनी मास्क घातला असेल का?आणि अगदी अशा संभ्रमात आमच्याकडे एक पाहुणा आला. तर त्याचं असं झालं की शुक्रवार संध्याकाळ होती. सकाळपासून मी आणि माझा नवरा अभिजित दोघेही ऑफिसच्या कामात व्यग्र होतो. मुलं नेहमीप्रमाणे युट्युबमध्ये व्यग्र होती. मी अभिजितला अंगणातलं गवत कापायची आठवण करून दिली. नेहमीप्रमाणे कामं उद्यावर टाकणाऱ्या नवऱ्याने होकार देताच मला पण बरं वाटलं. अभिजित बाहेर गेला आणि थोड्या वेळात मला त्याची हाक ऐकू आली. तो मला आणि मुलांना बोलवत होता, जरा घाईतच बोलावत होता. आम्ही सगळेजण बाहेर आलो आणि बघतो तर काय, आमच्या अंगणात साधारण थाळीच्या आकाराचं, पिवळं आणि तपकिरी रंगाचं एक इवलुसं कासव आलं होतं . छानशी नक्षी होती त्याच्या टणक पाठीवर. चौकोनी नक्षी आणि प्रत्येक चौकोनात अजून छानशी नक्षी. जणू काही कोणीतरी कोरीव काम केलं असावं. त्याला बघून माझी दोन्ही मुलं जाम खुश झाली होती. मला माझ्या लहानपणी मी पाळलेलं कासव आठवलं. त्याचं नाव लकी होतं. छोटंसं कासव माझ्याबरोबर खेळायचं. मी त्याला पाण्यामध्ये ठेवायचे. त्याला कोबीची पानं खूप आवडायची.


आता असंच एक कासव माझ्यासमोर होतं. मागील सहा - सात वर्षांत इथे कधीच कासव आलेलं आठवत नाही आणि आता अचानक हा पाहुणा बघून खूप आनंद झाला. मुलं म्हणाली की त्यांना तसापण एक पाळीव प्राणी हवाच होता आणि मागे लागले की आपण त्याला घरी घेऊन जाऊ.

मुलं जवळ आलेली बघून ते बिचारं कासव घाबरलं आणि गुलाबाच्या झुडुपाखाली लपलं. मी आणि अभिजित मुलांना समजावत होतो की त्याला घाबरवू नका पण मुलं त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. माझी मुलगी युक्ती आत गेली आणि त्याच्यासाठी स्ट्रॉबेरी घेऊन आली. कासवाला बहुतेक भूक नव्हती, त्याने ढुंकूनही बघितलं नाही. खूप वेळ आम्ही सगळे तिथे अंगणात होतो. आमचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्यांनीही येऊन कासवाला बघितलं. समोरची जूही, जी मागच्या चार महिन्यात दिसलीपण नव्हती, तीपण बाहेर आली आणि कासवाला बघून गेली. आम्ही मुलांना समजावलं की वन्य प्राणी बाहेर निसर्गात असलेले बरे असतात. कदाचित आतापर्यंत कासवालापण कळलं होतं की त्याला इथे तसा धोका नाही. त्याने सगळ्यांना त्याच्या पाठीला हात लावू दिला आणि शांत बसून राहिलं.

आता तर अंधार पडला होता आणि आमचा पाहुणा तिथेच होता. आम्ही त्याच्या जवळ कोबीची पानं ठेवली, एका ताटलीत पाणी ठेवलं आणि ठरवलं की त्याला थोडं एकटं सोडावं. पण खिडकीतून सगळे त्याला सारखं बघत होतो. कासव एका ठिकाणी छान आराम करत राहिलं. जशी रात्र झाली तसं कासवाची मान, पाय आणि शेपूट त्याच्या कवचात गेली आणि ते कवच गुडूगुडू हालत होतं. जणू काही कासवाला झोपेत स्वप्न पडलं होतं आणि ते धूम ठोकून पळत होतं.  

मी रात्री विचार करत होते. ते कासव इथे का आलं असेल? त्या निमोच्या गोष्टीसारखं ते घरापासून दूर आलं असेल का? त्याचे आई आणि बाबा त्याची काळजी करत असतील का? पण कासवाचं वय तर खूप असतं, कदाचित ते १०० वर्षांचं असेल. इथली सगळी घरं बांधायच्या आधीपासून राहत असेल पण नक्कीच ते चुकून आलं असेल. ते एकटं आहे म्हणून काळजी लागली. आम्ही रात्रीतून अनेकदा त्याला बघायला गेलो आणि ते तसंच गुडूगुडू हालत होतं. शनिवारची सकाळ झाली. सकाळी उठल्यावर अभिजित कासवाला बघायला बाहेर गेला. साधारण साडेसात झाले असतील आणि कासव आमच्या अंगणात मान वर करून फिरत होतं. कोबीची पानं तशीच होती. तासाभरात मी खाली आले आणि आल्याआल्या कासवाबद्दल विचारलं. अभिजितने सांगितलं की कासव बाहेरच फिरत आहे. मी बाहेर गेले पण कासव नव्हतं. आम्ही सगळ्यांनी त्याला शोधलं. पण ते कुठेच नाही सापडलं.  

जणू काही ते आम्हाला टाटा करायला थांबलं होतं आणि सकाळी निरोप घेऊन परत निघालं. बहुतेक त्याला कळलं होतं की आदल्या दिवशी खूप उशीर झाला होता आणि आमची बाग बहुदा त्याला सुरक्षित वाटली. कदाचित निमोसारखं बंडखोर असावं आणि आता परत आपल्या आई आणि बाबांकडे गेलं असावं. तर असा हा पाहुणा आमच्या बागेत आला आणि अशी ही आमच्या छोटाश्या बागेची गोष्ट.
 

Comments

  1. मस्त. आम्हाला पण २ आठवल्यापूर्वी रस्त्यावर एक कासव दिसल होत त्याची आठवण झाली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी