संपादकीय
एप्रिल २०२२ अंक २ |
मैत्र संपादक मंडळ २०२२ वरदा वैद्य विदुला कोल्हटकर रोहित कोल्हटकर कपिल धाकड मधुर पुरोहित
बाममं कार्यकारिणी २०२२ अध्यक्ष मोनिका देशपांडे उपाध्यक्ष रुचिरा महाजन उपाध्यक्ष- विपणन शिल्पा बेंगेरी चिटणीस स्मितेश लोकरे खजिनदार दीपान्विता काळेले सह-खजिनदार रमा गंधे |
नमस्कार मंडळी,
जुन्यास कोणी म्हणते सोने
‘चैत्र पाडवा’ ह्या मंगला गोखलेंच्या कवितेतील ह्या काही ओळी. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. नवीन वर्षाची सुरुवात नव्या संकल्पांनी करण्याची कल्पना तशी जुनीच. गतवर्षातील कडू-गोड घडामोडी मागे सोडून आपणही नव्या वर्षाला नव्या उमेदीने सामोरे जाण्याचा प्रण करूया. होलिकेच्या अग्नीमध्ये झाले-गेले समर्पित करून, नव्या आशेची गुढी उभारत, रामनवमीच्या निमित्ताने वासंतिक नवसर्जनाचे सोहळे साजरे करण्यासाठी बाल्टिमोर मराठी मंडळाने वसंतोत्सवाचा कार्यक्रम केला त्यात तुम्ही सहभागी झाले असालच. जानेवारी महिन्यात संक्रांतीचा कार्यक्रम झूमवर झाला असला तरी वसंतोत्सवासाठी मात्र आपण जातीने एकत्र जमलो. अनेक महिन्यांनी सर्वांना एकत्र जमण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली.
मुखपृष्ठ
मुखपृष्ठ चित्रकार - नम्रता केळकर
कालबाह्य ते सोडून देणे
नव्या मनूचे पाईक व्हा
हेच सांगतो गुढीपाडवा ।
नववर्षाचा सण हा पहिला
वसंत ऋतूने सुरू जाहला
प्रण करूया मनी नवा
हेच सांगतो गुढीपाडवा ।
वसंत ऋतू म्हणजे नवसर्जनाचा ऋतू. हवेत अजूनही गारठा असला तरी नवजीवनाचे कोंब जमिनीतून बाहेर डोकावत थंडीला निरोप देण्यासाठी सज्ज होतात. आपणही उन्हाळ्याच्या तयारीला लागतो. बिया पेरून रोपे तयार करून ठेवतो. रात्रीचे तापमान गारठवणारे असले तरी स्वच्छ ऊन पडून दिवस उबदार असला की अंगण, गराज वगैरेंची स्वच्छता करतो. भारतातल्या आंब्याच्या मोहराची आठवण काढत भारतीय दुकानातून कैऱ्या घेऊन येतो. उन्हाळी सुट्टीचे, त्यात होणाऱ्या भारतवारीचे बेत आखतो. तर मंडळी, ह्या उन्हाळी सुट्टीत तुम्ही काय काय करणार आहात? तुमच्या प्रवासांबद्दल, बागकामाबद्दल, उन्हाळी प्रकल्पांबद्दल आम्हाला लिहून कळवा. मैत्रचा पुढला अंक जुलैअखेरीस प्रकाशित होईल. त्यासाठी लेखन १५ जुलैच्या आत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर आम्हाला पाठवा. आम्ही वाट पाहात आहोत.
२०२२ वर्षातील हा दुसरा अंक. ह्या अंकासाठी लेखन पाठवलेल्या सर्वांचे अनेक आभार. ह्यापुढील अंकांसाठीही तुम्ही लेखन पाठवत राहाल अशी आशा करतो. हा अंक नेहमीप्रमाणे विविध साहित्यप्रकारांनी सजलेला आहे. गुढीपाडव्याच्या आठवणी आणि पावनखिंड चित्रपटावरील अनुभव आणि कविता ह्या अंकात आहेत. अभ्रकांच्या खाणीत काम करणाऱ्या बालकामगारांच्या पुनर्वसनासंबंधी, जागतिक आरोग्य दिनाविषयी आणि डोपामिनच्या शरीरावरील परिणामांबाबत माहिती सांगणारे लेख ह्या अंकात वाचता येतील.
‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर गेल्या अंकापासून सुरु केले होते. त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. ह्या चित्रांवरून सुचलेले लेख, स्फुट विचार, कथा आणि कविता यांचा ह्या प्रतिसादांमध्ये अंतर्भाव आहे. ह्या सदराअंतर्गत वेगळी चार चित्रे पुढे दिलेली आहेत. त्यावरून सुचलेले लेखन तुम्ही आम्हाला जुलैच्या अंकासाठी पाठवायचे आहे आणि त्यात कविता, लेख, अनुभव, स्थलवर्णन, स्फुट विचार, कथा वगैरे कोणत्याही साहित्य प्रकाराचे स्वागत आहे.
कलाकार ओळख ह्या सदरामध्ये ह्यावेळी नम्रता केळकर ह्या चित्रकर्तीची ओळख करून घेऊ. अंकाचे मुखपृष्ठही नम्रताच्या चित्राने सजले आहे. भाषाविचार सदरामध्ये एक शब्दकोडे आणि एका मराठी क्रियापदाविषयीचा लेख समाविष्ट आहे. हा अंक तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नव्या वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
कळावे,
संपादक मंडळ
अतिशय देखणे मुखपृष्ठ
ReplyDeleteमुखपृष्ठ वसंतऋतुला साजेसे झाले आहे !
ReplyDeleteनम्रता अभिनंदन !
अतिशय सुंदर मुखपृष्ठ! अभिनंदन नम्रता!!
ReplyDeleteGreat.keep it up 👌👌👍
ReplyDeleteSimply wonderful.
ReplyDelete