आमटीभात आणि इतर….

मैत्रेयी कुलकर्णी

आमटीभात आणि इतर….

पुरणपोळी मला कधीच भयानक वगैरे आवडली नाही. घरी अक्षरशः उठता बसता पुरणपोळी आवडणारे लोकं असताना असा नतद्रष्टपणा कुठून आला काय माहित! खरंतर आसपास अत्यंत सुरेख आणि खासियतीने वगैरे पुरणपोळ्या करणाऱ्या सुगरणी. एकीची साखरेची, एक गुळवाली, एक मिक्स मारके, एक ठासून भरलेली, जायफळवाली, एक कमी पुरण आणि वरून पिठीसाखर लिंबूवाली, एक हरभरा अधिक मुग पंथातली, एक खव्याची की पुरणाची म्हणावी अशी करामती आणि शिवाय काय काय. बरं, ह्या पोळ्या म्हणजे गंमत नाही! बायका एकदा ओट्यापाशी उभ्या राहिल्या की चवडच्या चवड पुरीच करून सोडणार. इथे आमच्या चार साध्या पोळ्या सलग सारख्या होत नाहीत अजून आणि ह्यांच्या कश्या सगळ्या एकसारख्या, सुरेख वळणाच्या, एका घडणीच्या पोळ्या, की त्या पाहूनच खाव्या वाटाव्यात!

तर मुद्दा असा की असं सगळं पोषक वातावरण असतानाही अस्मादिकांची पुरणपोळीची उडी ही वर्षातून अगदीच एखाद्या वेळेला स्वतः मागून, आवडीने खाण्याइतपतच. मग त्या एखाद्या वेळेला स्वतःच पुरतं कौतुक करून घ्यायचं. सणाच्या दुसऱ्या दिवशी आईने उरलेल्या पुरणाच्या पोळ्या परत करायला घ्याव्यात, छानशी पोळी तव्यावरून ताटात यावी, तव्यावर असताना बिलकुल तूप लावायचं नाही, पण खाली ताटात आल्यावर तिला गरम तुपात न्हाऊ घालायचं, छानसा रोल करायचा आणि अहाहाहाहा.. सुख हो सुख! त्याबरोबर दुसरं काही नको. पुरणपोळी असताना तोंडीलावणं इत्यादींना लांबच ठेवायचं. गरम पोळी आणि तूप. खूप झालं. अश्या एकीनेच तृप्त व्हावं. खूपच मुड असेल तर अजून एखादी. आमची आवड इतकीच, पण ह्याचा सोहळा करायचा. ‘खातंय ग लेकरू आवडीने’च्या तालावर नाचून घ्यायचं आणि १० मिनिटं शांत बसायचं. हवी तर पन्नासपावली सुद्धा करायची.

जरा वेळ गेला की मग सुरु करायची खरी मजा! एक खोलगट कुंडा घ्यायचा, त्यात मस्त ताजा गरम वाफाळता भात, कालच्या सणासुदीच्या जेवणातली नेहमी लागते त्यापेक्षा जरा जास्त गरम कटाची आमटी आणि किंचित मीठ घालायचं. ठेऊन द्यायचं हे मिश्रण १ मिनिट तसंच, निवांत. तेवढ्या वेळात लिंबाची एक करकरीत फाक करून घ्यायची. आणखी एका वाटीत तशीच गरम आमटी घेऊन त्यात कालची उरलेली ४ भजी कुस्करायची आणि ती वाटी द्यायची सरकवून बाजूला. आता परत मगाशीचा खोलगट कुंडा घ्यायचा, त्यात चांगलं चमचाभर तूप घालून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करायचं, आळल्यासारखं वाटत असेल तर जरा अजून आमटी घालायची, लिंबू पिळून परत व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि ओरपायला चालू करायचं. आईशप्पथ सांगते मगाशीच्या पुरणपोळीची काय मिजास! ह्यासारखं अप्रतिम, भन्नाट सुख, अद्वितीय, रुचकर व्यंजन कुठे दुनियाभरात सापडायचं नाही!

आईशप्पथ सांगते! सणासुदीच्या दुसऱ्या दिवशी भाताबरोबर खाण्यासाठी लागणारा कटाच्या आमटीसारखा पदार्थ पैदा करायलाच पुरणपोळी घराघरांमध्ये बनत असेल, ह्याबद्दल मला बिलकुलच शंका नाही. म्हणजे ती त्या दिवशी पण महानच लागते पण दुसऱ्या दिवशी अशी भन्नाट मुरते आणि जरा जास्त स्पेशल होते. आणि अरे हो...मगाशीचं राहिलंच की! तर तो भात अर्धा अधिक खाऊन झाला की त्यात आपण कुस्करून ठेवलेलं भज्यांचं मिश्रण घालायचं, लहर आली तर चमचाभर घट्ट आंबट दही (दही आंबटच असतं! ते अधमुरं, गोड वगैरे सगळ्या अफवा असतात. वेगळं काही मला सांगायला येऊ नका.. भांडणं होतील आपली.) कालवायचं आणि परत तुम्ही ब्रह्मानंदी टाळी लावायला मोकळे! अश्याप्रकारे जेवण झालं की कुणी सुख म्हणजे नक्की काय असतं हे वेगळं विचारायला पण येऊ नये.

ह्या कटाच्या आमटीची मुळं पण पसरत गेलेली. आमच्याकडे प्रत्येकाची करायची पद्धत तशी म्हटली तर सारखी तरी वेगळी. अप्रतिम चव हा त्यातला समान गुण. पण कृती विचारली तर, "काय, नेहमीचीच तर आमटी असते!" नाही गं माय!! नेहमीची नसते. त्रिवार नसते! आई, सासू, आत्या, काकू, मावशी, मामी, आज्जी.. झाडून सगळ्यांना विचारून झालंय माझं. सगळ्यांच्या आमट्या चोख, चाखत राहाव्या अश्या. पण त्यांची चव आणणं निव्वळ अवघडच. तो पूर्णपणे त्यांच्या हाताचा गुण. अर्थात हे मी माझं करून घेतलेलं समाधानही असेल, पण हे आमटीभात प्रकरण त्याच्या त्याच्या चवीचंच राहावं. आईची जराशी गोडसर, बाबांची वाटून घाटून, सासूची अगदी सहज, मावशीची झणझणीत, काकूचं सढळहस्ते खोबरं... कुणाकुणाची ती कॉपी करावी!

कॉपी करून तरी काय भलं होणार म्हणा! खाणं जसं पोटासाठी तसंच आठवणीसाठीही. ज्यांचं तुम्हाला आवडतं, ते घुसलेच तुमच्या पोटात. दर वेळेला काही विशिष्ट खाताना आठवतात ते तुम्हाला. खाण्यावरून सुरु होऊन आणखी कुठकुठल्या आठवणींच्या गल्ल्यांमध्ये तुम्ही भटकता, खुश होऊन जाता. स्वतः केलेलं अन्नही मग नेहमीपेक्षा किंचित जास्त गोड़ लागायला लागतं. तुम्ही तेवढ्यावर थांबत नाही, एखादा फोन तर फिरवताच! समोरच्याचापण दिवस गोड होतो. काय करणार नुसती कॉपी करून! त्यापेक्षा हे आठवणं, छान वाटणं, सांगणं केव्हाही उत्तम!

बरं हे सगळं आज का म्हणे? तर मध्ये कोणे एकेकाळच्या दिवाळीचे फोटो गूगलच्या आठवणीत वर आलेले. लक्ष्मीपूजनाच्या जेवणाचं भरगच्च ताट! पुरणपोळी आणि बरंच काही… लक्ष्मीपूजनाच्या उरलेल्या फळांचा पाडव्याला फ्रूट सॅलड! बरोबर दाल बाटी आणि अर्थातच वर म्हटलं तसा आमटीभात. सुख! फोटोत सगळं रंगीबेरंगी जेवण आणि चेहेरे दिसले आणि बरोबर तेच सगळं लगेच पाहिजे असं वाटायला लागलं! अर्थातच ना! अशा वेळेस उगाच मोठं झालो असं वाटतं मग! घरापासून, आपल्या लोकांपासून लांब राहणं कठीण वाटायला लागतं. ती वर्षातून एकदा होणारी पुरणपोळी खायची इच्छा होऊन जाते. मन हट्टी होतं आणि त्याला कोणे एकेकाळी खाल्लेलीच राहुरीच्या आजीच्याच हातचीच आमटीच आठवते. जे जेवणात करायचं ठरलेलं असतं ते अगदी मुद्दाम नको वाटतं. १० मिनिटं दुसरं काही नको नको होतं...

मग अकराव्या मिनिटाला आपण शांत होतो, मोठ्ठे झालो की नाही आपण! असं नाही वागायचं! स्वतःला सुनावतो आणि अगदी पुरण नाही पण स्वाभाविकपणे कुकर लावायला घेतो. भात मस्त जमून येतो. हरभऱ्याची डाळ अर्थात नसते, तुरीवर काम चालवता येतं. व्यवस्थित शिजलेलं, घोटून घेतलेलं वरण चुरचुरीत फोडणीवर पडलं की चेहरा आपोआप खुलायला लागतो. नेहमीच्या भाज्यांत फारसा न वापरला जाणारा आई स्पेशल गोडा मसाला आमटीत जातो. चिंचेचा कोळ नसतो, चिंचेची तयार चटणी घातली की गुळाचंही काम होऊन जातं. आठवण ठेऊन अर्ध्या मुळ्याला आज आमटीत स्थान मिळतं. आमटी उकळायला लागली की ओलं खोबरं न विसरता भुरभुरलं जातं आणि मग अस्सा आमटीभात जमून येतो ना महाराजा! आईशप्पथ सांगते, ह्यासारखं अप्रतिम, भन्नाट सुख, अद्वितीय, रुचकर व्यंजन कुठे दुनियाभरात सापडायचं नाही! आपलीच चव आपल्याला विशेषकरून आवडायला लागते. दिवस मग अतिउत्तम जातो. साजरा होतो. पुरणपोळी जमते का बघूया का येत्या एखाद्या सणाला? उगाचंच पिल्लू सोडून आपण आपल्यालाच ‘अन्नदाता सुखी भव’ आशीर्वाद देऊन पानावरुन उठतो.

सोबत जोडलेल्या फोटोबद्दल - तीच, वरचीच आमटी, तपकिरी भात, जबरदस्त भेंडीची भाजी आणि उगाचची आपली घासफूस.
ता.क. - आमटीभात कायम खोलगट भांडं/वाडगं/कुंड्यात खावा, असं आपलं माझं वैयक्तिक मत. बाकी ही मूद आणि महिरप म्हणजे उगाच आपले फोटोसाठीचे नखरे.

Comments