ट्वॅं आणि तिचे सोबती

लेखक: मनीष लिमये, चित्रांकन: सौम्या लिमये


मॉमी जिराफ फारच गडबडीत होत्या. शाळेला सुट्टी लागली की त्यांची गडबड वाढायची. गडबडीतच त्या म्हणाल्या, “ट्वॅं, जा बाबाला डबा देऊन ये, हा बघ भरून ठेवलाय.”

ट्वॅं तर वाटच बघत होती की कधी आई तिला डबा द्यायला पाठवते आणि कधी ती घराबाहेर पडते. आईने सांगितल्या सांगितल्या ट्वॅं उठली, डबा घेतला आणि तिने बाहेर धूम ठोकली.

"सरळ डबा द्यायला जा गं, मध्येच जाऊ नको कुठे!" आईने मागून ओरडून सांगितलं, पण ट्वॅं तेवढ्यात कुंपणावरून उडी मारून पसार झाली सुद्धा!

थोडं पुढे गेल्यावर तिला गजू हत्ती दिसला. एका तळ्यापाशी तो अंगावर पाणी घेत होता त्याच्या सोंडेने, शॉवर सारखं!

गजू आणि ट्वॅंची एकदम बट्टी होती. ट्वॅंची स्वारी लगेच गजूकडे वळली. ट्वॅंला बघून गजू ला एकदम आनंद झाला. तो मोठ्यांदा म्हणाला, "ए ट्वॅं, ये इकडे आपण पाण्यात खेळूया!"

ट्वॅं म्हणाली "नको आत्ता, मला बाबाला डबा नेऊन द्यायचाय, तूच येतोस का माझ्याबरोबर?" गजू लगेच तयार झाला, अंग टॉवेल ला पुसल्यासारखं करून, तो लगेच ट्वॅंबरोबर निघाला.

ट्वॅं आणि गजू गप्पा मारत जात होते, तेवढ्यात त्यांना झुब्बू झेब्रा कट्ट्यावर बसलेला दिसला. पाय हलवत तो बसला होता, तशी सवयच होती त्याला.

झुब्बू एकदम डॅम्बीस होता, पण या दोघांचा चांगला मित्र होता. त्याने ट्वॅंकडचा डबा बघितला आणि तो जोरात ओरडला, "आई गं! खूप दुखतोय!".

"अरे बापरे, काय झालं!" गजूने काळजीने झुब्बू ला विचारलं. गजू अगदी साधा भोळा होता. झुब्बू म्हणाला "अरे पाय दुखतोय रे खूप, थोडं खायला मिळालं तर बरं वाटेल कदाचित!".

गजू ट्वॅंकडे बघत म्हणाला, "अगं ह्याला डब्यातलं देतेस का काहीतरी?"

पण ट्वॅं एकदम हुशार होती. तिने लगेच झुब्बूचा डाव ओळखला आणि म्हणाली "ए झुब्बू, फसवू नको आम्हाला. भुकेनी कधी पाय दुखतो का!? मी चालले बाबाला डबा द्यायला. तुला यायचं तर चल, नाहीतर मी निघाले." असं म्हणत ट्वॅं पुढे गेली सुद्धा!

झुब्बू लागला हसायला, आणि तिच्या मागे धावत जात म्हणाला "गम्मत गं, थांब, थांब जरा, येतोय मी."

गजू पुटपुटला, "अरे, बरं वाटलं वाटतं ह्याला!" आणि तोही त्यांच्या मागून जायला लागला.

शेवटी सगळे जण ट्वॅंच्या बाबाकडे पोचले. बाबा शेतात काम करत होता, तो त्यांना बघून खुश झाला. त्याने ट्वॅं कडून डबा घेतला आणि तो म्हणाला "थँक यू ऑल! मी आता जेवून घेतो छान छान, तुम्ही पळा!" झुब्बूला पोटात गुडगुड झाल्यासारखं झालं, त्याने हात हळूच पोटाकडे नेला. त्याला वाटलं होतं की ट्वॅंचा बाबा सगळ्यांना घेऊन बसेल जेवायला! तर काय!
बाबा झुब्बूकडे बघून हसायला लागला. “अहो झुब्बू राव, गम्मत केली. ट्वॅंची आई तुम्हाला काही देणार नाही, असं होईल का!? चेहरा पाडू नका एकदम, चला सगळेजण बसू खायला.”

मग सगळे जण झाडाखाली बसले. डबा उघडला, एक एक पदार्थ बाहेर यायला लागला - पोळी, भाजी, लोणचं, भात, वरण आणि १ पिझ्झा! ट्वॅं, गजू, आणि झुब्बू एकदम ओरडले "ओह, यम्मी!"

The end!

Comments

  1. अरे व्वा, छान लिहिली आहे गोष्ट.good efforts,keep it up.अशाच छान छान गोष्टी लिहीत जा.

    ReplyDelete
  2. Nice story and very good drawing

    ReplyDelete

Post a Comment