डेटिंग
लीना परांजपे
|
जगामध्ये डेटिंग ही संकल्पना प्रचलित आहे आणि गेल्या काही वर्षांत तरुणांनी ती सहजपणे स्विकारली पण आहे. अशा तरुणांना त्यामधील खाचखळगे कळावेत आणि त्यांनी ‘ब्लाइंड डेटिंग’ पेक्षा ‘स्मार्ट डेटिंग’ करावं जेणेकरून त्यांना डेटिंग संस्कृतीचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल हा ह्या लेखामागचा उद्देश आहे.
सध्या ज्यांना ‘स्मार्ट डेटिंग’ कसं करावं हे माहीत नाही त्यांना त्यामधून होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे. जगभरातील अशा तरुणाईला आणि खास करुन मराठी तरुणांना मदत करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे.
नातेसंबंध हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक मोठा भाग असतो. नात्यांमधील भीती आणि अनिश्चितता कमी करण्याबाबत मी मिलेनिअल पिढीतील मुलामुलींना मदत करते. डेटिंग, गंभीर नातेसंबंध (serious relationship), विवाह (wedding) आणि पुढे विवाहोत्तर जीवन (post-wedding) ह्यादरम्यानच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या समस्या असतात.
लग्न हे एक अतूट बंधन आहे, प्रेमाचा छान प्रवास आहे. मग असे बंध जुळवताना विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असते. आजच्या ‘तत्काळ’ (instant) युगात निर्णय सुद्धा तत्काळ घेतले जातात. नव्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर हेच तत्काळ लग्न थोडं डळमळू लागतं. हळूहळू सुरू होणारे वाद, भांडणं संसाराचा पाया पोखरायला कधी सुरुवात करतात हे मात्र ह्या जोडप्याला कळत नाही. थोडक्यात, संसार कसा सांभाळतात हेच ह्या मिलेनिअल जोडप्यांना माहीत नसतं आणि मग साथीदाराला सोडून जाणं, वेगळं राहणं, अगदी घटस्फोट घेणं हेच पर्याय आहेत असं समजून तत्काळ पाऊल उचललं जातं. अशा मिलेनिअल जोडप्यांच्या मदतीसाठी मी काम करते.
गेली ३० वर्षं प्रशिक्षण (training) क्षेत्रात आणि २०१६ पासून नाती सांभाळण्यासाठी मी अथक प्रयत्न करीत आहे. नातेसंबंध प्रशिक्षक, अर्थात रिलेशनशिप कोच म्हणून हाताळलेल्या काही प्रकरणांचे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. (नावे गोपनीयतेसाठी बदलली आहेत.)
अंकित आणि प्रियांका एका डेटिंग मिक्सरमध्ये भेटले आणि एकमेकांना डेट करू लागले. साडेतीन महिन्यांनंतर अंकितने तिला टाळायला सुरुवात केली कारण तो एक कॅज्युअल डेटर होता आणि प्रियांका डेटिंगबद्दल गंभीर होती. तिने ही डेट एक गंभीर नातं असल्याचं गृहीत धरलं आणि हे नातं शेवटी लगेच तुटलं (ब्रेकअपमध्ये संपलं). प्रियांकाला यातून बाहेर येण्यास पूर्ण ६ महिने लागले. तिची कथा डेटिंगमधील स्पष्टतेचं (Clarity) महत्त्व स्पष्टपणे दर्शवते. तुम्हाला डेटिंगमागील एकमेकांचे हेतू माहीत असले पाहिजेत आणि डेटिंगचा हेतू समोरच्याला स्पष्टपणे सांगता आला पाहिजे.
अभि आणि मीरा दूरस्थ नातेसंबंधात (distant relationship) होते आणि खूप प्रेमात होते. अभि कॅनडामध्ये राहत होता आणि मीरा भारतात होती. ते दोघं एक वर्ष एकत्र होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मीरा लग्नानंतर कॅनडाला शिफ्ट झाली, पण थोड्याच दिवसांत परिस्थिती खराब झाली. मधुचंद्राचा काळ (Honeymoon phase) संपल्यानंतर अभिने वेगळं वागायला सुरुवात केली आणि तो मीराच्या दिसण्यापासून तिच्या वागण्यापर्यंत सर्व गोष्टींबद्दल टीका करू लागला. ती गोंधळली,खूप दुखावली गेली आणि तिने तिचा आत्मविश्वास गमावला. माझ्याशी संपर्क साधता हे लक्षात आलं की तिचं नातं अवास्तव अपेक्षांवर आधारित होतं आणि जेव्हा ते वास्तविकतेला भेटलं तेव्हा ते नातं तुटलं. तिने त्याचं घर सोडलं, एक अपार्टमेंट भाड्याने घेतली आणि एकटी राहू लागली. तिने माझ्यावर विश्वास ठेवल्याने मला तिची परिस्थिती समजू लागली. भावनिक अत्याचारामुळे ती आधीच त्याच्यापासून दूर राहात असल्याने त्याच्यापासून वेगळं होणंच तिच्यासाठी चांगलं होतं. योग्य प्रशिक्षण (coaching), मार्गदर्शनाची साधनं (mentoring tools) आणि पद्धती वापरून तिने स्वतःवर काम करायला सुरुवात केली. तिने तिचा आत्मविश्वास परत मिळवायला सुरुवात केली आणि एक छोटासा व्यवसायही सुरू केला. आता ती एक आनंदी आणि आत्मविश्वासू उद्योजक आहे.
या प्रकरणांमधून आपण पाहू शकतो की जेव्हा तरुण प्रथम स्वतःचं व्यक्तिमत्त्व तयार करणं, स्वतःमध्ये आनंदी राहणं, आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं ह्या गोष्टींची तयारी करतील तेव्हाच ते नातेसंबंधासाठी सक्षम होतील. जेव्हा तुम्ही एखाद्याला डेट करत असता तेव्हा कळतं की तुमची मूळ मूल्यं त्यांच्याशी जुळतात की नाही आणि जेव्हा हे समजून तुम्ही नातेसंबंध सुरू करता तेव्हा नात्याचा पाया मजबूत होतो. जरी नातेसंबंध तुटत असले तरीही, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि बदल करण्याच्या इच्छेने जोडपी त्यांचं नातं पुन्हा निर्माण करू शकतात आणि त्यांच्यातील नातं नव्याने दृढ होऊ शकतं.
वेदान्त आणि आर्य या तरुण जोडप्याची एक विशिष्ट कथा आहे, जे त्यांचं नातं पुन्हा जागृत करण्यासाठी धडपडत होते. ते वर्षानुवर्षं एकत्र होते पण उत्साह आणि उत्कटतेचा अभाव असलेल्या आरामदायी दिनचर्येत अडकले होते. मार्गदर्शक सत्रांच्या मालिकेद्वारे आम्ही संवाद सुधारणं, आत्मीयता पुन्हा जागृत करणं आणि सामायिक उद्दिष्टं निश्चित करणं यावर काम केलं. त्यांची कथा नातेसंबंधातील मार्गदर्शनाच्या (रिलेशनशिप कोचिंगच्या) सामर्थ्याचा पुरावा आहे आणि सर्वात आव्हानात्मक नातेसंबंधदेखील बरे केले जाऊ शकतात असा आम्हाला विश्वास आहे.
आज स्वतःच्या लग्नातील चढउतार अनुभवत, त्यातून सावरत मी जर हे नातं यशस्वीपणे सांभाळू शकते, तर आजचे तरूण का नाही करू शकणार? आजच्या मिलेनियल्सना फक्त नातं कसं सांभाळतात ह्याचं तंत्र (टेक्निक) जाणून घेण्याची गरज आहे. असा विचार करून ह्यालाच मी माझ्या आयुष्याचं ध्येय बनवलं आहे. जागतिक मिलेनियल्सपैकी किमान १ टक्का तरुणांपर्यंत पोहोचण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आपली साथ नक्कीच आवडेल.
काही प्रश्न वा शंका असल्यास माझ्याशी इंस्टाग्रामवर (@leennaparannjpe) संपर्क करा
अथवा माझ्या संकेतस्थळाला भेट द्या - www.leennaparannjpe.com
Comments
Post a Comment