कासावीस

सौ सोनाली पानसरे-जोग


कासावीस

माझा प्राण ...
माझे प्रतिबिंब ...
माझी प्रेयसी राधा ...
आज मजपासून कोसो दूर आहे ...
...आणि सोळासहस्र अर्धांगिनी असूनही,
मी (द्वारकाधीश) कृष्ण,
तिच्यासाठी कासावीस आहे;

स्वतंत्र असूनही बंधनात आहे,
रुक्मिणीच्या अस्सिम प्रेमाने
मला सीमित केले आहे…
धर्म व आदर्शांचा संस्थापक मी,
परी तिच्या प्रेमात (हळवा) झालोय ...
...आणि प्रेमवेड्या मीरेचा गिरिधर,
मी कृष्ण, त्या राधेसाठी,
फक्त तिच्याचसाठी कासावीस आहे;

ही तळमळ, ही हुरहूरच
प्रेमाची सर्वोच्च अनुभूती आहे...
'ती' जवळ नसतानाही,
प्रतिक्षण तिच्याचबरोबर जगणं आहे...
एकरूप होण्यापरी, क्षणोक्षणी
झुरण्यातच (प्रेमाची) उत्कटता आहे ...
...आणि अगणित गोपीकांचा गोपीश्वर,
मी कृष्ण, त्या राधेसाठी,
फक्त तिच्याचसाठी कासावीस आहे;

खरंच हे अपूर्णत्वातील पूर्णत्व,
समजायला फार कठीण आहे..
विरहाच्या वणव्यातील जशी
सुखाची एक झुळूक आहे...
पण ज्यास समजले त्यासच उमजले -
राधेचाच कृष्ण आणि
फक्त कृष्णाचीच राधा आहे!

Comments