राजधान्या, डोंगर बर्फाचे आणि बरेच काही….
अरूंधती सरपटवारी |
शाळेत असताना सामान्यज्ञान (General Knowledge) विषयासाठी देश व त्यांच्या राजधान्या पाठ करताना त्यांची वेळोवेळी उजळणी व्हायची. सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत घोकणे चालू राहायचे. ज्या दिवशी ते सर्व पाठ झाले त्या दिवशी माझी ताठ झालेली मान व पाठीवरचा शाबासकीचा हात आजही आठवतो. एक ना एक दिवस हे सर्व देश व राजधान्या पाहायच्याच, जग पहायचे असे स्वप्न मनाने रंगवणे सुरू केले होते.
माझ्या काकांना हस्तरेखाशास्त्राबद्दल आदर व कुतूहल असल्यामुळे, दोन-तीन वेळा मला माझा हात दाखवण्याची संधी मिळाली. हात पुढे करून माझा पहिला प्रश्न असे, “काका, मला परदेशाची रेषा आहे का?“ त्या वेळी इतर गोष्टींपेक्षा परदेशाचे वेड जास्त होते. मग माझा हात पाहून झाल्यावर त्यावरील रेषा दाखवत जेव्हा, “हो, नक्की आहे परदेशात जाण्याची संधी,” असे काकाचे शब्द कानावर यायचे तेव्हा माझ्या स्वप्नांत आणखी रंग भरले जायचे.
सकाळी बोटीवर विजयपताका फडकावली. बोट ‘Ultima Esperanza Fjord’मधून कूच करत करत एका मोठ्या झऱ्याच्या जवळ वेग कमी करत थांबली. आम्ही कॅमेरा, सेलफोन घेऊन डेकवर पळालो. डोक्यावर पाणी पडत आहे असे परिपूर्ण दृश्य टिपेपर्यंत सेल्फींना उत आला होता. मग हळूहळू वेग वाढवत बोट झऱ्यापासून दूर निघाली तेव्हा गंगा धारण करणाऱ्या शंकराची मूर्ती डोळ्यांसमोर आली.
तिथून पाय निघत नव्हता, पण टोरेस डेलपेन गावातले हॉटेल रीयो सेरानो दोन दिवसांकरता आमची आतुरतेने वाट बघत होते. रीयो सेरानो हॉटेल व जवळचे निसर्गसौंदर्य अवर्णनीय होते. दोन दिवस फार कमी वाटले. पुन्हा येऊ तेव्हा पाच-सहा दिवस राहायचे पक्के ठरवले.
दुसऱ्या दिवशी ‘रीयो सेरेनोस’हून ‘एल कॅलाफॅटे’ला कूच केले. एल कॅलफॅटे, लहानसे टुमदार गाव, संध्याकाळी फेरफटका मारत, थोडी खरेदी करून ‘पूरा वीदात’ जेवण उरकून लवकरच परतलो कारण दुसऱ्या दिवशी ‘लॅास ग्लेशियर नॅशनल पार्क’मधील ‘पेरीटो मरीनो’ हिमनदी बघायला जाणार होतो. पेरीटो मरीनो हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थान (World heritage site) म्हणून घोषित केले होते म्हणून ते पाहायची उत्सुकता वाढली होती. नॅशनल पार्कला पोचताच हिमनदीकडे जायची वाट पकडली. पायापेक्षा ह्रदय जोरात धावत होते. डोळ्यांना डोंगरांच्या रांगा दिसल्या. त्या रांगा झाडे, दगडांनी नव्हे तर निळसर-हिरवट रंगाच्या बर्फाने नटलेल्या दिसल्या. निसर्गाची किमया त्या दिवशी भरभरून दिसली. वर्णन करावे तरी कसे? ही जगातील तिसरी मोठी हिमनदी आहे (पहिली अंटार्क्टिकामध्ये, तर दुसरी ग्रीनलँडमध्ये आहे). निसर्गाने बनवलेले बर्फाचे डोंगर पिस्ता आईस्क्रीम किंवा मऊ डेझर्टची आठवण करीत होते. सगळीकडे शांतता होती पण मधूनच बर्फ तुटून पाण्यात पडतानाचा आवाज शांततेला भेदून जात होता. डोंगर जणू त्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करीत होता. त्या डोंगरांना वंदन करून परत एल कॅलफॅटला परतलो.
घरी नेहमी रामायण, महाभारत, पंचमहाभूते, समुद्र, नद्या, वगैरे गोष्टींवरच्या चर्चांना पूर यायचा. आई बाबांबरोबर निसर्गरम्य ठिकाणांच्या भेटी व्हायच्या तेव्हा आपल्यापेक्षा निसर्ग किती अफाट, अचाट आहे याची कल्पना यायला लागली. समुद्र, नदी यांचे अथांगत्व पाहून मन अचंबित होत असे. डोंगराचे उत्तुंगत्व व त्यांची आकाशाला भेटणारी शिखरे अजूनही मनात घर करून आहेत. समुद्रकाठी चालताना दूरवर असलेले क्षितिज पाहून वाटायचे की जहाजात बसून जावे व त्याला भोज्जा करून परत यावे.
पण म्हणतात ना, स्वप्न कधी कधी खरी होतात. परदेश गमनाची हातावरील रेषा आणि भविष्य खरे ठरले. जहाजातून नाही, पण विमानात खिडकीजवळ बसण्याचा योग आला. क्षितिज हुडकता हुडकता, डोंगरदऱ्या आधी सापडल्या. उंच उंच डोंगर शिखरांवर जाऊनही क्षितिज मात्र दूर धावत होते. भारताची राजधानी पाहण्याआधीच वॉशिंग्टन डीसी ही अमेरीकेची राजधानी डोळ्यांसमोर नाचू लागली होती. चला एक राजधानी जिंकली. आनंदी आनंद झाला. दिवसांमागून दिवस गेले. बालपणीच्या आठवणी धूसर होत होत्या. नवीन जीवनात नवीन ओळखी होत होत्या, पण निसर्गाबद्दलचे जुने प्रेम वाढतच होते.
“या वर्षी आपण दक्षिण अमेरीकेला जाणार आहोत गं, तिथे गरम व थंड वातावरणाचे कपडे लागणार आहेत,” असं म्हणत मिस्टरांनी फोन ठेवला. दोनच आठवड्यांत निघणार म्हणून मला विचार करायलाही वेळ नव्हता. कुठे जाणार, काय काय पाहणार याकडे दुर्लक्षच झाले. दोन बॅगा खच्चून भरल्या व विमानतळ गाठले. पाच तासांच्या प्रवासानंतर पहिल्या टप्याला थांबलो, त्या गावाचे नाव होते बोगोटा. ते नाव ऐकताच मी थबकले. नाव ओळखीचे वाटले. विमानातून उतरताना मधुर आठवणींनी पिंगा घालायला सुरुवात केली. “काय झालं?” चेहऱ्यावरचे हसू पाहून, मिस्टर म्हणाले. मी म्हटले, “स्मरणशक्ती व सामान्यज्ञान शाबूत आहे अजून. बोगोटा ही तर कोलंबियाची राजधानी, तिथे आलोत ना आपण ?” “हो, अगदी बरोबर!” हे मिस्टरांचे शब्द पाठीवरच्या शाबासकीची आठवण करून गेले. दोन तास बोगोटात पाय रोवून नवीन विमान घेऊन आमची स्वारी पुढच्या मोहिमेला निघाली. पुन्हा पाच तास भागदौड करीत “सॅन्टीयागो गाव आले,” अशी हवाई सुंदरीची घोषणा ऐकताक्षणी झोप उडाली. सामान्यज्ञान जागे झाले व मी “सॅन्टियागो चिलीची……” वाक्य पूर्ण करण्याआधीच मिस्टरांनी “राजधानी” म्हणत वाक्य पूर्ण केले.
सॅन्टीयागोतील हॉटेल मध्यवस्तीत होते. जवळच गावातील सर्वात उंच इमारत होती त्यावरून (Sky Constanera) पूर्ण गाव पाहायला मिळाले. अँडीज पर्वतरांगांनी गावाला कवेत घेतले आहे असे वाटले. नगर दर्शन करून, महानगर प्राधिकरण (metropolitan region), सॅन क्रिस्टोबल टेकडी (San Cristoball hill) पाहून, बोहेमियन वस्तीमधील रंगवलेल्या घरात रंगलो. चिलीच्या प्रसिद्ध वाईनरीत भिजलो.
दुसऱ्या दिवशी पुंटा अरीनसला (हे चिलीचे शेवटचे टोक) विमानतळावर उतरून पोर्टा नटालीसला रवाना झालो. रस्त्यात रीओ पेनीटेंटे रॅंचवर मस्त जेवण केले व मेंढ्यांची लोकर कशी काढतात पाहिले. इथले हवामान मिनीटामिनीटांत बदलत राहते. वारा, पाऊस, उन आणि थंडी यासाठी आमची पूर्ण तयारी होती. नशीबाने इथे फक्त वायूदेवाचे जोरदार दर्शन झाले. ज्यांना चक्रीवादळाचा नेहमी सामना करावा लागतो अशा लोकांची तीव्रतेने आठवण झाली व त्यांच्या धैर्याचे कौतुकही वाटले. पोर्टो नटालीसचे कॉस्टऍस्ट्रोलीस हॉटेल अगदी समुद्रासमोर होते. खोलीची किल्ली घेतली, पण खोलीत न जाता व सामान खोलीत पोचण्यापूर्वीच आमची स्वारी तडक समुद्रास भेटण्यास गेली. थंड हवा, शांत समुद्र, वर ढगांची सुंदर वरात! अधाशी डोळे संध्याकाळच्या जेवणाला विसरून तुडुंब समाधानाच्या पंगतीत निसर्गसौंदर्य चाखत चाखत आनंदात गुंगले. फोटो टिपत टिपत, जड पडलेल्या पावलांनी हॉटेलची खोली गाठली. आनंदात आनंद म्हणतो तसे खोलीत जाऊन खिडकीचा पडदा उघडला तर समोर लबाड सूर्य समुद्रात डुबकी घेण्याच्या तयारीत होता. खोलीतूनही सौंदर्याचे घसघशीत दर्शन होत होते. दुसऱ्या दिवशी आम्ही बोट घेऊन दोन थंड हिमनद्या (Glaciers) पाहायला जात आहोत या विचारांत, उबदार पांघरूणाची मदत घेत पलंगाचा कब्जा घेतला.
बोट बालमसेडा (hanging glacier) जवळ पुन्हा थांबली. हॅंगिंग ग्लेशिअर म्हणजे हिमनदी डोंगरावरून खाली येते व थांबते, पाण्याला भेटत नाही. तो बर्फाचा निळसर रंग मन हरखून गेला. अजून रंगात रंगावे वाटत होते पण वेळेअभावी हिमनदी सोडून जाणे भाग पडले. पूर्तो टोरोला बोट थांबली, सेरिनो हिमनदीची भेट दुरून नको म्हणून गिर्यारोहण करीत सेरेनो हिमनदीला अगदी जवळून भेटून तुष्टता वाटली. निसर्ग कारागिराने विणलेले निळ्या रंगाचे बर्फाचे गालिचे बघून थक्क झालो.
सकाळी बस घेऊन टॉरेस डेलपेन नॅशनल पार्कला निघालो. तिथे जगप्रसिध्द ग्रॅनाइटचे तीन खांब पाहिले. ते जसे निसर्गाने बनवले आहेत तसेच उभे राहून त्यांच्या प्राचीनत्वाची साक्ष देत होते. तिथून जवळ असलेल्या मोठ्या ग्रॅनाइट दगडावर एका घोडेस्वाराचे चित्र दिसले व दुसऱ्या दगडावर शंकराची पिंड दिसली. हे चित्र कोणी काढले असेल, पिंड कोणी, कशी बनवली असेल वगैरे अनेक प्रश्न मनात उठत होते. पण रस्त्याच्या बाजूला बसलेल्या एका पूमाने सर्व प्रश्नांना पळवून लावले.
दुसऱ्या दिवशी सकाळी, बोट घेऊन ‘स्पेगझीनी’ हिमनदीजवळ जेवणासाठी थांबलो. नॅशनल पार्कमधील ती सर्वात उंच हिमनदी आहे. हिमनदीकाठी जेवण करून नंतर बोटीने ‘उप्साला’ हिमनदीकडे निघालो. जसजसे ‘उप्साला’ जवळ यायला लागला तसे लहान-मोठ्या आकारांचे बर्फाचे तुकडे पाण्यात तरंगत नाचताना दिसू लागले, ते जणू आमच्या स्वागताकरता हिमनदीने पाठवले आहेत असे वाटत होते. त्या वेगवेगळ्या शिल्पांना पाहून आमच्या आश्चर्याचे तरंगही त्या शिल्पांसोबत नाचत होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे बोटींना हिमनदीजवळ जाण्याची परवानगी नव्हती. बऱ्याच वेळ स्पेगझीनीच्या जवळ घालवून, निरोप घेऊन एल कॅलफॅटेला परतलो.
चिली व अर्जेंटीना यामधील विभागलेल्या भागाला पॅटागोनीया म्हणतात. चिलीतील पॅटागोनीयाला मागे सोडून अर्जेंटिनाला विमान घेऊन पुढे निघालो आणि ब्युनॉस आयर्सला उतरलो. अरे वा, परत एक राजधानी गाठली. ब्युनॉस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी. “जनरल नॉलेज की जय हो” म्हणत दोघे हसत सुटलो. निघण्यापूर्वी या सहलीत काय पाहणार याची कल्पना नव्हती ते एका दृष्टीने चांगलेच झाले. अज्ञानात सुख असते म्हणतात ते खरे ठरले. एकाच सहलीत तीन देश, तीन राजधान्या, डोंगर बर्फाचे आणि बरेच काही पाहिले. एवढे पुरे नाही का? पण नसेल तर करू अजून एक, दोन मोहीमांची तयारी!
Comments
Post a Comment