लक्षणीय महेश्वर
नीलिमा कुलकर्णी |
रेस्टन, व्हर्जिनिया
|
काही ठिकाणं अशी असतात की तेथील वास्तूच्या भिंती, आणि भोवतालचा परिसर इतिहासाची पानं उलगडू लागतात. शाळेत असतांना इतिहासाच्या वर्गात वाचलेलं जग अचानक जिवंत होऊन आपल्या पुढ्यात येतं. इंदौरच्या (मध्य प्रदेश) जवळचे महेश्वर हे यातलंच एक गाव !
ज्या काळात स्त्रिया नवऱ्याच्या चितेवर उडी घेऊन सती जात होत्या, त्या काळात, झाशीच्या राणीच्या जवळजवळ १०० वर्ष आधी (१७५४), नवरा गेल्यानंतर, सासूसासऱ्यांच्या आग्रहास्तव सती न जाता, धनुर्विद्या, तलवार चालवणे, इ. शिकून , महिलांचं पथक घेऊन मोहिमेवर जाणारी, नऊवारी पातळ नेसून सेनेचं नेतृत्व करणारी, दारूगोळ्याच्या कारखान्याची देखरेख करणारी तेजस्वी अहिल्याबाई! सासूसासऱ्यांनी म्हटलं होतं, ‘तू आमचा मुलगा होऊन रहा.’ त्या वचनाला जागणारी, युद्धकालानंतर शांततेच्या काळात जनहिताय काम करणारी – ३० वर्ष समर्थपणे राज्य चालवणारी एक देदीप्यमान स्त्री! एक पुण्यश्लोक स्त्री, देवी, साध्वी, जिने अनेक देवळांचा उद्धार केला, घाट बांधले, जनतेसाठी झिजली, त्या अहिल्याबाईंचे हे गाव! तिच्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा दिपून जाण्याची संधी महेश्वरच्या आमच्या ट्रिपमध्ये मिळाली.
इंदौरपासून ९१ किलोमीटर अंतरावरील हे नर्मदाकाठचं गाव. आम्ही महेश्वरच्या ‘नर्मदा रिट्रीट’ या मध्यप्रदेश पर्यटनाच्या रिसोर्टमध्ये पोहोचलो. नर्मदा रिट्रीट’चं प्रवेशद्वार आकर्षक होतं. आतमध्ये त्यांचंच रेस्टोरंट, सुंदर सुसज्ज कॉटेजेस आणि वाखाणण्याजोगी स्वच्छता होती.
आमच्या कॉटेजच्यामागे स्विमिंग पूल, व त्यापलीकडे नर्मदा दिसत होती. नदीपर्यंत जायला बांधून काढलेल्या सिमेंटच्या पायऱ्या होत्या. नर्मदास्नान नाही, पण पाय बुडवून यावं म्हणून आम्ही नदीपर्यंत गेलो. तिथे पाटी होती, “इथे पाणी ३०० फुट खोल असल्यामुळे पाण्यात उतरण्यास मनाई आहे.” नदीचं अथांग पात्र शांत होतं. प्रवासी नावा नदीवर डोलत होत्या. सूर्याचा लोहगोल अलगद पात्रात उतरला आणि नदीच्या पात्रावर पसरलेली अनोखी लाली पाहून मन हरखलं. नदीच्या पात्राच्या मध्यभागी एक मंदिर होतं. सूर्यकिरणं तिथे जणू काही साष्टांग नमस्कार घालून हळूहळू मागे परतली. हे नर्मदादर्शन विलोभनीय होतं. नर्मदा- पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या केवळ दोन भारतीय नद्यांपैकी एक नदी. इतर नद्यांप्रमाणे समुद्राला न मिळणारी आगळी नदी. भडोचजवळ, हिच्या संगमाच्या ठिकाणी समुद्रात ५-६ कि.मी. आत गेल्यावरही गोडं पाणी लागतं म्हणून नर्मदेचा संगम न होता ती ‘कुवारी’ राहिली आहे असं इथले लोक मानतात. नर्मदा परिक्रमा करणारे त्या जागेपर्यंत जातात. अशी ही अनोखी नदी – इथे ३०० फूट खोल तर इथून ४ कि.मी.वर खडकांवरून उड्या मारणारं उथळ पात्र!
दुसऱ्या दिवशी महेश्वरचा ‘होळकर किल्ला’ बघावयास गेलो. गाडी पार्क करून थोडं चढून वर गेल्यावर किल्ल्याचा दिंडी दरवाजा लागला. दोन–चार ‘गाईड’ जवळ आले. त्यांच्याशी बोलताना एक म्हणाला, “हम आपको देवी अहिल्याबाई की गाथा भी सुनायेंगे।” त्याचं अभिजात हिंदी आणि ‘गाथा’ शब्द. गाथा म्हणजे धार्मिक कथा, किंवा हकीकत (उदा. वीर गाथा). अहिल्याबाईंचे पूर्ण आयुष्यच त्या शब्दांत प्रतिबिबिंत झाले होतं. आम्ही त्याला निवडलं. आम्हाला घेऊन तो दिंडी दरवाजाजवळ आला व म्हणाला, “किल्ल्यात शिरण्यापूर्वी थोडा इतिहास माहीत असायला पाहिजे. हा किल्ला अकबराने बांधला, आणि मल्हारराव होळकरांनी तो जिंकून आपल्या ताब्यात घेतला. पण माळव्याची राजधानी इंदौरहून इथे हलवली ती देवी अहिल्याबाई होळकरांनी.”
मल्हारराव होळकर हे पेशव्यांचे सुभेदार होते. एकदा पुण्याला जात असताना, अहमदनगर जिल्ह्यातील चौंडे गावच्या पाटलांची आठ वर्षांची मुलगी अहिल्या शिंदे त्यांच्या दृष्टीस पडली. ज्या काळात मुली लिहीत-वाचत नव्हत्या, (सावित्रीबाई फुल्यांच्या अर्धशतक आधी) त्या काळात लिहिता-वाचता येणारी चुणचुणीत मुलगी मल्हाररावांना अतिशय आवडली, व त्यांनी आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी सून म्हणून पसंत केली. १७४५ मध्ये अहिल्याबाई इंदौरला आल्या. त्यांना मालेराव नावाचा मुलगा झाला. १७४८ मध्ये एक मुलगी झाली. त्यानंतर १७५४ मध्ये दुर्दैवाने खंडेराव एका मोहिमेत मारला गेला. २९व्या वर्षी अहिल्याबाईंना वैधव्य आलं. त्या सती जाण्यास निघाल्या. तेव्हा मालेराव जेमतेम ९ वर्षांचा होता. मल्हारराव व त्यांच्या पत्नीने अहिल्याबाईंना सती न जाण्याची गळ घातली. “आता तूच आमचा मुलगा हो” म्हणून विनवणी केली. अहिल्याबाईने ते मान्य केलं.
मल्हारराव नुसते ‘मुलगा हो’ म्हणून थांबले नाहीत. मुलाला शिकवावं तसं त्यांनी आपल्या सुनेला धनुर्विद्या, तलवार चालवणं शिकवलं. त्याचबरोबर राजकारण व समाजव्यवस्थेचे, अर्थकारणाचे धडे दिले. १७६१ मध्ये मल्हारराव पानिपतच्या धुमश्चक्रीत गुंतले असताना समाजव्यवस्थेचं काम त्यांनी अहिल्याबाईंवर सोपवलं. त्यानंतर अहिल्याबाई मोहिमेवरही जात. १७६५ मध्ये अहिल्याबाईंना लिहिलेल्या एका पत्रात मल्हारराव म्हणतात, “तुम्ही ग्वालेरचा किल्ला जिंकल्याचे जासुदाकरवी कळले. आता ग्वालेरच्या दारूगोळ्याच्या कारखान्याकडे जातीने लक्ष द्यावे.’ समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था पहाण्यापासून तर मोहिमेवर जाणं, दारूगोळ्याच्या कारखान्याची देखरेख करणं ही सर्व कामं त्यांचा मुलगा होऊन अहिल्याबाई करीत होत्या. स्वत:चा मुलगा मोठा होऊन गादीवर बसेपर्यंत त्यांना हे सांभाळायचं होतं. १७६६ मध्ये मल्हाररावांच्या मृत्यूनंतर मालेराव गादीवर बसला, पण दुर्दैवाने जेमतेम एक वर्ष राज्य करून तोही मृत्यूमुखी पडला.
त्यावेळी राज्य आपल्याकडे सोपवावं अशी विनवणी अहिल्याबाईने पेशव्यांना केली. स्त्रीचं राज्य म्हणजे राघोबादादा पेशव्यांना पोरखेळ वाटला. इंदौरच्या मालमत्तेत त्यांनी हात घालायचा प्रयत्न केला. पण “ही मालमत्ता इथल्या जनतेसाठीच वापरली पाहिजे” असं अहिल्याबाईंनी ठामपणे सांगितलं. राज्यकारभाराला सुरवात केल्यावर, सैन्य आणि दारुगोळ्यांचा कारखाना तुकोजी होळकरांवर सोपवून त्या जनसेवेत लागल्या.
अशा प्रकारे पार्श्वभूमी सांगून मगच त्या गाईडने आम्हाला आत नेलं. किल्ल्याच्या आत काही घरं होती, वारली चित्रकला कुंपणाच्या भिंतीवर दिसत होती. “हा अहिल्याबाईंचा राजवाडा!” एका लाकडी इमारतीकडे बोट दाखवून गाईड म्हणाला. राजवाडा कसला, पुण्यातल्या वाड्यांसारखा सागवानी लाकडाचा वाडा होता. मराठी नातं जाणवायला लागलं. व्हरांड्यात मेणे ठेवले होते. लाकडी प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला एक बेलाचं झाड होतं. बेलाचं पान त्रिदल असतं. या बेलाला नऊ पानं, म्हणजे नऊ दलाचा हा खास बेल, तीनशे वर्षं जुना आहे. अहिल्याबाई शिवभक्त होत्या. त्यांचा बराच वेळ पूजा-अर्चेत जायचा. झाडाजवळच्या वऱ्हांड्यात राजगादी होती – अगदी साधी गादी! त्यावर अहिल्याबाईंची प्रतिमा ठेवली होती. पांढरी नऊवारी साडी, कपाळाला चंदनाचा टिळा आणि हातात शिवलिंग घेऊन त्या न्याय करायला बसत. त्यांनी प्रतिज्ञा केली होती, ‘परमेश्वराने माझ्यावर टाकलेली जाबाबदारी मला पार पाडायची आहे. सामर्थ्य आणि सत्ता याच्या जोरावर मी काहीही करू शकते. पण त्याचा जबाब मला परमेश्वराला द्यावा लागेल. माझं इथे काहीच नाही. ज्याचं त्याला (जनतेला) अर्पण करीत असते. जे काय थोडं फार घेते ते ऋण आहे, मी कधी चुकवू शकेन कोणास ठाऊक.” प्रतिज्ञेप्रमाणे निस्पृहपणे त्यांनी राज्य केलं. रस्ते बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नवी मंदिरे बांधली. महेश्वराच्या परिसरात १०० च्या जवळपास मंदिरे आहेत. राज्यातील उद्योग-व्यवसायांकडे जातीने लक्ष दिले.
१७६७ मध्ये महेश्वरला राजधानी आणल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणच्या विणकरांना तिथे बोलावलं. कापसाचं सुत आणि रेशीम मिळून या साड्या विणल्या जात. काठ दोन्ही बाजूने सारखा असतो त्यामुळे साडी उलटी वा सुलटी नसते. सुरवातीला रंग नैसर्गिक म्हणजे वनस्पतींपासून तयार केलेले असत. पहिल्यांदा नऊवारी साड्या काढल्या गेल्या. या साड्या वजनाला हलक्या असल्याने खूप लोकप्रिय झाल्या. माहेश्वरी साड्यांचे उत्पादन वाढून एक मोठा उद्योग झाला. अशा प्रकारे राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन दिल्यामुळे, त्यांच्या कारकीर्दीत माळव्याचं उत्पन्न ७५ लाखावरून १ कोटी ५ लाखावर गेलं.
महेश्वरच्या विणकऱ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य कळलं - अहिल्याबाईनी जेव्हा पहिल्यांदा विणकर आणले, त्यातले अर्धे मुस्लीम होते. हिंदू-मुस्लीम विणकर एकत्र काम करीत. त्यांचं सहजीवन सुरु झालं. तेव्हापासून आजही ते सर्व गुण्यागोविंदाने रहातात. इथे एकदाही दंगल झालेली नाही. एवढच नव्हे तर त्यांची एक मिश्र संस्कृती निर्माण झाली आहे. मुस्लीम लोक इथे गणपती, नवरात्री गरब्यात भाग घेतात, तर हिंदू इदेला ताबूत बांधतात. हे सगळे लोक देवी अहिल्याबाईंना खूप मानतात. माहेश्वरी साड्यांमध्ये सुत आणि रेशीम धागे जसे सुबकपणे विणले असतात, तसे हिंदू-मुस्लिमांचे सहजीवन विणलेले आहे. साडीसाठी नव्हे पण या संस्कृतीची आठवण म्हणून मी काही साड्या विकत घेतल्या.
“अहिल्याबाईंनी राज्यात शांती आणि समृद्धी आणली. पण ती शांती जपताना त्यांनी काही कठोर निर्णय घेतले.” गाईड सांगत होता.
“उदाहरणार्थ?” मी
“पुढे चला, नंतर प्रत्यक्ष दाखवेन. पण त्या आधी देवी अहिल्याबाईंचं देवघर आणि अहिल्येश्वराचं मंदिर पाहू.” तो.
होळकरवाड्याला वळसा घालून आम्ही मागच्या बाजूला गेलो. तिथे भिंतीवर मघाशी सांगितलेल्या प्रतिज्ञेचा फलक लावलेला होता. थोडं पुढे गेल्यावर अहिल्याबाईंच्या देवघरासमोर आलो. तेथील अंगणात एक वटवृक्ष होता. या चारशे वर्षांच्या जुन्या वृक्षाला पारंब्या नाहीत. त्याला ‘सिद्धवट’ म्हणतात. त्याच्या बुंध्यावर जमिनीपासून फुटभर उंचीवर एक साधारण इंचभर रुंद मूळ वेटोळी घालून होतं. गाईडने दाखवलं. मुळाच्या एका टोकाला सापाची दोन तोंडं असावीत अशी गाठ होती. – नागाचा जोडा असल्यासारखी. “इथे प्रत्यक्ष शिवाचा वास आहे,” गाईड म्हणाला. लिंग म्हणजे ‘इंडिकेटर’. जिथे शिवाचं अस्तित्व जाणवतं ते शिवलिंग. जाळीच्या दारातून आम्ही देवघरात डोकावलो. तिथे राधाकृष्ण होते, नर्मदेत सापडलेल्या अनेक शालिग्रामांना चांदीची पिंड लावून तयार केलेली अनेक शिवलिंग होती. तिथे रोज मातीची हजारो शिवलिंग करून मग नर्मदेत विसर्जित केले जात. आजही मातीची शिवलिंग करण्याची प्रथा आहे. तिथे शिवलिंगाबरोबर माहेरचे मल्हारी मार्तंड आहेत. भवानीमाता आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी ज्या परमेश्वराच्या श्रद्धेवर ३० वर्षं राज्य केलं तो हा परमेश्वर. मग इथे त्याचं अस्तित्व न जाणवलं तरच नवल!
“चला, अहिल्येश्वर मंदिर बघायचं आहे,” गाईडने आमची समाधी भंग केली. आम्ही काही दगडी पायऱ्या उतरून अहिल्येश्वराच्या मंदिराच्या अंगणात आलो. एक विस्तीर्ण पटांगण, त्यात काही छोटी मंदिरं. भोवती बुलंद परकोट, उजव्या बाजूला अहिल्येश्वराच्या मंदिराचं भव्य प्रवेशद्वार. एकेका दगडावरची शिल्पं प्रेक्षणीय आहेत. द्वाराच्या बाजूला कोरीव काम केलेल्या व्हरांड्यांच्या कमानी आहेत. प्रवेशद्वार, त्याच्या बाजूला दोन मजली कातीव कोरीव भिंत! प्रवेशद्वारातून आत गेलं की दोन बाजूला दोन भव्य दीपस्तंभ आहेत. मंदिराचा सभामंडप भव्य आहे. हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. मुख्य म्हणजे हे सगळे उत्तम स्थितीत जपलं आहे. होळकरांच्या वंशजाचे तिथे दोन दिवसांनी लग्न होणार होते म्हणून आम्हाला आत जाता आले नाही.
शिवभक्त अहिल्याबाईंनी सगळ्या भारतभर मंदिरांचा उद्धार केला, ठिकठिकाणी घाट बांधले. हृषीकेशपासून ते रामेश्वरपर्यंत, काशी, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, इ. २९ ठिकाणी त्यांचं कार्य दिसतं. प्रसंगी निजाम किवा इतर मुस्लीम राज्यकर्त्यांशी त्यांना संपर्क साधावा लागला. तेही काम त्यांनी निर्भयपणे केलं.
नंतर आम्ही मधल्या मंदिरांकडे वळलो. ‘हे विठ्ठलेश्वराचं मंदिर. त्याच्यामागची तीन - मंदिरं नसून ‘छत्र्या’ आहेत. अहिल्याबाईंच्या मुलीचा मुलगा नाथोबा फणसे हा गैरवर्तनी होता. त्याच्या अनेक गंभीर तक्रारी अहिल्यादेवींकडे येत. एकदा त्याने अतिशय गंभीर गुन्हा केल्यावर त्याला हत्तीच्या पायाखाली तुडविण्याची शिक्षा देण्यात आली. (गंभीर गुन्हा म्हणजे नक्की काय हे गाईडने सांगायचे टाळले.) अहिल्याबाईंचा मुलगा आधीच गेलेला. राहिली एकच मुलगी! तिचा हा एकुलता एक मुलगा म्हणजे तोच गादीचा वारस झाला असता. अशा नातवाला ही कठोर शिक्षा देताना त्यांना छातीवर दगड ठेवून किती निर्धाराने न्याय करावा लागला असेल! माझ्या अंगावर काटे आले. नाथोबाला हत्तीच्या पायाखाली मारल्यानंतर त्याच्या दोन बायका सती गेल्या. त्या तिघांच्या ‘छत्र्या’ (स्मारक /समाधी) तिथे आहेत. त्याच्या समोरच्या परकोटाच्या भिंतीवर हत्तीखाली तुडवण्याच्या प्रसंगाचं शिल्प कोरलेलं आहे. व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठं असतं. वैयक्तिक भावना दूर ठेवून स्वत:च्या राज्याचं संरक्षण व संवर्धन करणारी ही कर्तबगार स्त्री!
बोलतबोलत आम्ही परकोटाच्या दिंडी दरवाजातून नदीकडे बाहेर आलो. तिथला भव्य घाट आणि नर्मदेचं शांत, अथांग पात्र – अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वासारखं! शेजारचे बुलंद बुरुज – त्यांच्या कठोर न्यायबुद्धीचे साक्षी. पलिकडे दिसणारा अहिल्या किल्ला, तोही भरभक्कम आणि सुंदर आहे (आता तिथे हॉटेल झालं आहे), सगळंच दिपवून टाकणारं होतं. घाटावर होळकर कुटुंबाच्या अनेक छत्र्या होत्या. अनेक शिवलिंग होती. कुठल्या कुठल्या हिंदी सिनेमांची शुटींग तेथे झाली हे गाईड सांगत होता. माझे तिकडे लक्ष नव्हतं. आसमंत एका अद्भुत शक्तीने भारावला होता.
मी अजूनही अहिल्याबाईंचा विचार करीत होते. केवढी कर्तृत्ववान बाई! आणि तिला घडविणारा तिचा क्रांतीदर्शी सासरा! निसर्गरम्य म्हणून, मंदिरांच्या शिल्पांसाठी म्हणून महेश्वर प्रेक्षणीय आहेच, पण मला भावलं ते एका मराठी स्त्रीच्या कर्तृत्वाचं शिल्प जिथे कोरलं आहे ते लक्षणीय महेश्वर!
Comments
Post a Comment