संगीतप्रेमी- केदार सुळे

पूनम दिघे सुळे

शेक्सपिअरने म्हटलंच आहे, "There is nothing in the world so much like prayer as music is." खरंच, संगीतासारखे प्रार्थनेचे दुसरे स्वरूप नाही! अशाच एका संगीत कलोपासकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत.

लुईस आर्मस्ट्रॉंगने म्हटलेल्या "Music is life itself" या गोष्टीचा खरोखरीच अनुभव येणारा हा संगीतप्रेमी गायक म्हणजे केदार सुळे. केदारचा अनुभव सांगत ‘कलाकार ओळख’ सदरासाठी हा लेखनप्रपंच. केदारच्या बालपणापासूनच घरातील वातावरण शास्त्रीय संगीतासाठी पोषक आणि अनुकूल होतं. त्याचे वडील श्री. अरुण सुळे स्वतः शास्त्रीय संगीत शिकलेले आहेत. त्यामुळे केदारला संगीताचे बाळकडू घरातच मिळालं. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे ‘तानसेन व्हायचे असेल तर कानसेन व्हावे लागेल’ या संस्काराची पायाभरणी घरातच झाली.

लहानपणी ऐकायला आवडलं तरी गाणं म्हणणं झाल नाही. ३-४ वर्षांचा झाल्यावर मात्र त्याचा वडिलांबरोबर सराव सुरु झाला. आईला संगीत आवडतं म्हणून केदारचा प्रवास त्या दिशेने सुरु झाला. संगीतशिक्षणाच्या प्रवासात आईची अपार मेहनत होती. केदार नाशिकचा. गाण्याचा क्लास दूर होता पण तरी ही आई जा-ये करून क्लासला नेत असे ज्यामुळे संगीताची आवड जोपासता आली. त्या वयात मराठी नोटेशन लिहिता येत नसे मग ते कामही आईच करत असे. घरी सराव तीच करून घेत असे. त्या काळात खेळायला जाता येत नाही म्हणून दुःखही व्हायचे, कारण तेवढी जाण नव्हती, पण आज त्याला त्याचं महत्त्व कळतं. अशी तारेवरची कसरत करता करता वयाचा ६-७व्या वर्षापर्यंत कारसूळकार बाईंच्या क्लासमधून त्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या ३ परीक्षा झाल्या. याच दरम्यान वयाच्या ५व्या वर्षी नाशिकच्या कालिदास सभागृहात त्याने सारंग राग गायला आणि ह्या बालकलाकाराला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. शाळेमध्ये असताना कोलगेटच्या बालकलाकारांच्या वाद्यवृंदात गाण्याची संधी मिळाली. असा प्रवास सुरु असतानाच ऑल इंडिया रेडिओच्या गायिका नामजोशी बाईंकडे पुढच्या २-३ परीक्षा झाल्या. मग मात्र औपचारिक संगीत शिक्षणात खंड पडला तरीही रियाज आणि वडिलांकडून गायकी चे शिक्षण चालूच राहिले.

१२वी नंतर Physiotherapyच्या शिक्षणासाठी नागपूरला जाणं झालं. त्या कॉलेजचं नावही लता मंगेशकर मेडिकल कॉलेज. म्हणजे तिथेही सुरांशी असलेलं अतूट आणि आपुलकीचं नातं आणखी दृढ झालं. कॉलेजमध्ये असतानाही त्याने महाविद्यालयांतर्गत आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अनेक बक्षिसं मिळवली. त्यावेळी नागपुरात असताना गुरुवर्य अप्पासाहेब इंदूरकर गुरु म्हणून लाभले अन संगीतयात्रा पुन्हा सुरु झाली. अप्पांकडे शिकत असतानाच ‘चरडे गुरुजी विदर्भस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धे’मध्ये भाग घेण्याचा योग आला.

या स्पर्धेविषयी अविस्मरणीय आठवण म्हणजे स्पर्धेचा फॉर्म भरतानाच अप्पा म्हणाले, "जा, मधुकंस गा, तूच जिंकणार आहेस." अप्पांचा शब्द न शब्द खरा ठरला. प्रथम पारितोषिक मिळाल्याची ट्रॉफी अप्पांकडे क्लासमध्ये घेऊन जाताना अप्पा दारात म्हणाले, "मी सांगितलं होत ना, तूच जिंकणार आहेस!" ही गुरुला शिष्याची जाण असण्याचं उदाहरण. नागपुरात असताना रेडिओवरील ‘युवावाणी’ या कार्यक्रमात गाण्याची संधीही त्याला मिळाली.

संगीतसाधना चालू असतानाच नागपूर सोडण्याची वेळ आली. नाशिकला आल्यावर ‘संगीत विशारद’चा प्रवास पूर्ण झाला.

एक मजेदार प्रसंग म्हणजे सख्ख्या मोठ्या भावाच्या लग्नाच्या दिवशी दिलेली मराठी ‘सा रे ग म प’च्या पहिल्याच पर्वाची ऑडिशन. लग्नातून २-३ वेळेस येऊन जाऊन ऑडिशन झाली. आमची वाहिनी घरी आली आणि TVवर केदार ची निवड झाली अस कळलं. त्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्याला गाण्याची संधी मिळाली.

पुढे केदारने MA(म्युझिक) पण केलं. भारतात असताना केदारने नाशिक, पुणे, मुंबई, अहमदाबाद (गुजरात), जबलपूर (मध्य प्रदेश) अशा विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले. अजूनही त्याचा हा संगीतप्रवास सुरु आहे. आजही पंडित हेमंत पेंडसे (पुणे) यांच्याकडे त्याचे संगीत शिक्षण चालू आहे. त्याचप्रमाणे केदारने हल्लीच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे वर्ग सुरु केले आहेत. अशाप्रकारे केदार विद्यार्थी आणि शिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावत आहे.

अशा या संगीतप्रेमी कलाकाराला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा!

केदार सुळे : +१-७८६-७१९- ९४५५


Comments

Popular posts from this blog

चित्रसाहित्य - अमळनेरचा दगडी दरवाजा

गृहलक्ष्मी