संपादकीय
जुलै २०२१ अंक ३ |
मैत्र संपादक मंडळ २०२१ वरदा वैद्य विदुला कोल्हटकर रोहित कोल्हटकर कपिल धाकड मधुर पुरोहित
बाममं कार्यकारिणी २०२१ अध्यक्ष रोहित कोल्हटकर उपाध्यक्ष ऋद्धी आठवले वाडदेकर उपाध्यक्ष- विपणन समीर अहिरराव पाटील चिटणीस मधुर पुरोहित खजिनदार केतन बर्डे सह-खजिनदार रवी महाजन |
नमस्कार मंडळी,
सिकेडा! दर सतरा वर्षांनी झुंडीने जन्मणारे आणि पुढची पिढी जन्माला घालण्याचे कर्तव्य करून पुन्हा मातीत विलीन होणारे जीव. गेला महिनाभर प्रत्येक झाडांवर त्यांच्या जाहीर सभा भरत होत्या. काही सभांमध्ये समूहाने चिपळ्यांचा गजर लयीत होत असल्यासारखा वाटे, काही सभांमध्ये एकामागोमाग एक घोषणा होत असल्याचा भास होई, तर काही सभांचा अनागोंदी कारभार असे. सिकेड्यांच्या सप्तदशवार्षिक सभा आटोपल्यामुळे आता परिसर कसा शांत झाला आहे. सिकेडा सतरा वर्षांनी बाहेर आले, आणि आपण माणसेही सुमारे सतरा महिन्यांनी अधिक मोकळेपणाने घराबाहेर पडू लागलो आहोत, इतरांना भेटू लागलो आहोत. अजूनही लसीकरणाच्या मोहिमेला देशभरात म्हणावा तसा प्रतिसाद नाही. देशातली निम्मी जनता अजूनही लस घेण्यास तयार नाही. भारतातही लसीकरणाचे प्रमाण ४-५ टक्क्यांच्या वर गेलेले नाही. त्यात आता डेल्टा-व्हेरियंटची कुणकुण आहे. तरीही लस घेतलेल्यांना धोका कमी असल्यामुळे लोक आता बाहेर पडत आहेत. ‘बाममं’ने आयोजित केलेल्या उन्हाळी-सहलीलाही चाळीस-पन्नास कुटुंबांनी हजेरी लावली. निसर्गरम्य परिसरात गप्पा, भेंड्या, खेळ, नव्या ओळखी, मेंदी, खाणे-पिणे आणि आईस्क्रीम असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या सहलीमध्ये सर्वांनी मस्त मजा केली. ह्या सहलीचे निवडक फोटो संपादकीयाच्या शेवटी जोडले आहेत. ह्या सहलीची मजा अनुभवण्यासाठी पावसानेही दोनदा हजेरी लावली. त्यावेळी साम्राज्ञी शिंदेने काढलेले धुंद वातावरणाचे प्रकाशचित्र ह्या अंकाच्या मुखपृष्ठासाठी निवडले आहे.
ह्या अंकामध्ये कथा, कविता आणि अनुभव वाचता येतील. ‘केसर’ आणि ‘गाईड’ ह्या कथा, ‘किमची’ आणि ‘स्क्रीन आणि फ़ॅशन’ हे ललित-अनुभव, तसेच ‘पँडेमिक’ ही बाललेखकाने लिहिलेली कविता व एक अनुवादित कविता ह्या अंकात आहेत. ‘कलाकार ओळख’ सदरांतर्गत ‘केदार सुळे’ ह्या संगीतप्रेमी कलाकाराची ओळख करून घेऊ. पाककृतीच्या सदरांतर्गत ताज्या फळांच्या पाककृतींच्या आवाहनाला प्रतिसाद देणारा ‘फळं आणि संपवासंपवी’ हा लेखही ह्या अंकात वाचा. मराठी कला मंडळाचे ‘हितगुज’ आणि आपल्या ‘मैत्र’दरम्यान साहित्यिक देवाणघेवाणीची परंपरा आहे. मैत्रच्या ह्या अंकामध्ये नीलिमा कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले ‘लक्षणीय महेश्वर’ हे प्रवासवर्णन पुनर्प्रकाशित करत आहोत.
ह्या अंकासाठी लेखन पाठवणाऱ्या सर्वांचे संपादक मंडळ आणि ‘मैत्र’च्या वाचकांतर्फे अनेक आभार. पुढील अंकासाठीही लेखन पाठवाल अशी आशा करतो.
मैत्रचा पुढचा अंक ऑक्टोबरअखेरीस प्रकाशित होईल. तोवर गणपती आणि नवरात्र संपून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असे. गणपती आणि देवीसाठी तुम्ही कोणता नैवेद्य करता? गणपतीसाठी तुम्ही उकडीचे मोदक करता की तळणीचे? नवरात्रात पुरणाच्या पोळ्या करता की इतर पक्वान्ने? पुढच्या अंकासाठी गणपती आणि नवरात्रात नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थांच्या पाककृती आम्हाला लिहून पाठवा. पक्वांनांच्या पाककृतींची रेलचेल पुढच्या अंकात करू. तुमच्या अनोख्या पाककृती, त्या करतानाच्या आठवणी आणि अर्थातच त्यांचे फोटो आम्हाला जरूर पाठवा. पदार्थ खास होण्यासाठीचे तुमचे नुस्खेही लिहायला विसरू नका. तुम्ही एखादी कला जोपासत असाल तर कलाकार ओळख सदारांतर्गत तुमची माहिती आम्हाला पाठवा. ह्या उन्हाळ्यात प्रवासाचे बेत तुम्ही आखले असतील तर तुमचे प्रवासवर्णन आम्हाला लिहून पाठवा. शिवाय नेहमीप्रमाणे कथा, कविता, अनुभव, लेख आणि चित्रांचेही स्वागतच आहे. पुढील अंकासाठीचे साहित्य १५ ऑक्टोबरपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवा.
पुढच्या महिनाअखेरीस शाळा सुरू होतील. अनेक मुले सुमारे दीड वर्षांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या अनुभवानंतर शाळेत प्रत्यक्ष जातील. मित्र-मैत्रिणींना, शिक्षक-शिक्षिकांना प्रत्यक्ष भेटतील. आपल्यापैकी अनेक पुन्हा ऑफिसात जाऊ लागले असतील वा जाऊ लागतील. त्यात डेल्टा-व्हेरियंट वा पुन्हा साथ येण्याचा व्यत्यय येऊ नये म्हणून आणि जीवन पूर्वपदावर येण्या/राहण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!
मुखपृष्ठ: बाममं उन्हाळी सहलीत पावसाचा सहभाग
साम्राज्ञी शिंदे |
Comments
Post a Comment