किमची
मल्हार मंदसौरवाले |
|
यावर्षी माझ्या उन्हाळी प्रकल्पासाठी कोरियन किमची बनवायचं ठरवलं. त्याआधी या पदार्थाबद्दल मी सिनेमात आणि यूट्यूब व्हिडीओवर पाहिल होतं. किमची आणि ती पण व्हेजिटेरियन किमची करून बघूया अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.
स्वयंपाक आणि स्वयंपाकघरातलं तसं म्हटलं तर मला फार काही माहीत नाही. पण किमचीसारखा चटकदार आणि चविष्ट पदार्थ खाण्याची ओढ लागली आणि करूनच पाहावं असं ठरवलं. किमची म्हणजे भाज्यांत मसाले घालून आंबवलेला पदार्थ आहे. पारंपरिक किमची हा मांसाहारी पदार्थ असतो. महाराष्ट्रात जसा तूप-मेतकूट-भात तसा कोरियात किमची आणि पांढरा भात असा बेत असतो असं म्हणता येईल.
किमचीचं साहित्य विकत घेण्यासाठी आम्ही एका कोरियन किराणा दुकानात गेलो. नापा कॅबेज, चिकट तांदळाचे पीठ, गाजर, डैकोन रॅडिश आणि इतर साहित्य लगेच मिळालं, पण गोजुगारू (कोरियन मिरचीचे फ्लेक्स) आणि गोचूजैंग (कोरियन मिरची पेस्ट) शोधणे ही तारेवरची कसरत होती. पुन्हा पुन्हा गूगलवर त्याचं चित्र पाहिलं आणि नावाचं स्पेलिंग वाचलं, पण गोचूजैंग चा पत्ता लागत नव्हता. शेवटी इन्व्हेंटरी रिपोर्ट तयार करत असलेला एक स्टोअर मॅनेजर एका ग्रोसरी आईलमध्ये आढळला.
त्याला आम्ही गोचूजैंगचा पत्ता विचारला. त्याने टॅबलेटवर बघून गोचूजैंग शोधून आमच्या हातात त्याचा पुडा दिला. पण हा पुडा गुगलवर पाहिलेल्या चित्राप्रमाणे नव्हता. मनात शंका आली आणि पुन्हा गोचूजैंग शोधायचा प्रयत्न केला. शेवटी एकदा पुन्हा त्या मॅनेजरला अख्या स्टोअरमध्ये शोधून, धरून विचारलं आणि शंका दूर केली. त्याने दिलेलं गोचूजैंग आम्ही विकत घेण्याचं ठरवलं.
त्याच संध्याकाळी आमच्या घरी जेवणात आणखी एक नवीन कोरियन पदार्थ असणार होता - त्याचं नाव तेओक बोकि. तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या राईस केक्स वा अतिशय जाड शेवयांचे तुकडे म्हणजे तेओक बोकि. त्यासाठीचे साहित्य घेण्याची कसरत पण चालू होती. दोन वेगळ्या पदार्थांसाठी दोन निराळ्या याद्या खिशात ठेवून आणि ते जिन्नस शोधून खूपच वैताग आला होता. त्यात भर म्हणजे फेस मास्क, चष्म्यावर जमा होणारी वाफ आणि दुकानातली गर्दी! शेल्फवर ठेवलेल्या प्रत्येक साहित्यावर कोरियन लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं आणि इंग्रजी अक्षर सापडणं दुर्मिळ होतं. म्हणजे तो आणखी एक त्रास! आम्ही एक तास गोचूजैंग आणि राईस केक्स शोधण्यात घालवला. शेवटी राईस केक्स रेफ्रिजरेटेड शेल्फमध्ये सापडले. त्या स्टोअर मॅनेजरचे आभारच मानले पाहिजेत! या अनुभवावरून आम्हाला भारतीय किराणा दुकानात जिन्नस शोधण्यात हरवलेल्या कुणा दुसऱ्या देशातील लोकांना पूर्वी आम्ही मदत नाही केली म्हणून आज हे असं घडलं असणार असं वाटलं.
घरी पोहोचलो तेव्हा आमचा ‘ऑली’ ओशाळलेल्या चेहऱ्याने माझी वाट बघत दारावर शेपटी हलवत उभा होता. त्याला कुरवाळलं. हात-पाय धुऊन मग भाज्यांनाही पाण्याने छान धुऊन काढलं. नापा कॅबेज व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिरला आणि मिठाच्या पाण्यात दोन तास भिजवला. त्यादरम्यान व्हेजिटेबल ब्रॉथ आणि तांदळाच्या पिठाचा सॉस करायला घेतला. त्यानंतर गाजर, डैकोन रॅडिश वगैरे भाज्या चिरून, दहा ते बारा लसूण पाकळ्या, थोडं आलं चिरून त्या मसाल्यात आणि आधी केलेल्या सॉसमध्ये घालून सगळं कालवून घेतलं. दोन तासांनी नापा कॅबेज मिठाच्या पाण्यातून बाहेर काढून दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन काढला आणि चाळणीवर ठेवला. त्यातलं पाणी पूर्णपणे जायला हवं. आता नापा कॅबेज आणि आधी मिसळलेले साहित्य एकत्र केले. अशावेळी चमच्याने ढवळण्यापेक्षा हाताने कालवण्याचा चांगला उपयोग होतो. अर्थात वरणभाताला खूप मेहनतीने कालवल्याप्रमाणे सगळं एकत्र करावं लागतं. यानंतर हात साबणाने घासून धुवायला विसरलो नाहीच.
आता किमची काचेच्या रुंद तोंडांच्या बाटल्यांमध्ये भरण्याचं काम केलं. आई लोणचं केल्यावर बाटलीत भरताना घट्ट वरपर्यंत भरते ते आठवून तसंच मी किमची भरताना केलं.लालचुटुक रंगाच्या सहा बाटल्या ओट्यावर एका रांगेत सजवल्यावर काहीतरी मोठं काम केल्याचं समाधान वाटलं. दोन दिवस या बाटल्या ओट्यावरतीच ठेवायच्या असं वाचलं होतं. दुसरा दिवस कुठल्यातरी परीक्षेची माहिती घेण्यात, ऑनलाईन क्लासेस आणि ऑलीबरोबर खेळण्यात सहज निघून गेला. संध्याकाळी किमची बघण्यासाठी कोपऱ्यात नजर टाकली तर फेसाळता रस बाटलीतून वेगाने बाहेर पडलेला दिसला. सबंध ओटा लाल रंगाने सजलेला दिसत होता. किमची भरताना त्यात फसफसण्याच्या क्रियेतून तयार होणाऱ्या वायूसाठी बाटलीत वरच्या बाजूला थोडी जागा रिकामी सोडावी लागते. पण हे आधी माहीत नव्हतं. तरी नुकसान खूप जास्त झालेलं दिसत नव्हतं. आईने कामावरून आल्यावर ओटा स्वच्छ केला आणि एका नवीन बाटलीत थोडी थोडी किमची काढून प्रत्येक बाटलीत थोडी जागा तयार केली. दोन दिवस बाहेर ठेवल्यावर किमची फ्रिजमध्ये पंधरा दिवस ठेवायची असते. पंधरा दिवस उलटल्यावर किमची भाताबरोबर, फ्राईड राईसबरोबर किंवा राईस केक्सबरोबर चविष्ट लागते. आणि खरंच, किमची मस्त तयार झाली होती.
हे किमची प्रकरण आणि ती करतानाचा अनुभव नेहमी माझ्या आठवणीत राहील.
Comments
Post a Comment