गृहलक्ष्मी

श्रीमती चित्रा धाकड
Elkridge MD

"स्वधर्मासी जागली, पतीपुढे ती स्वर्गा गेली। सतधर्माची पूर्ती केली, नारी धर्म हा !!"

जीवन हे एक कोडे आहे. जग एक रंगभूमी आहे. त्यात आपण वेगवेगळी पात्रे आहोत.

आयुष्याची झुकझुक गाडी धावत आहे. कोण कोणत्या स्टेशनवर उतरणार हे त्या विधात्यालाच माहीत आहे व हेच नेमके परमेश्वराने गुपित ठेवले. नाहीतर आपण वर जाण्यासाठीचे सामान बांधून ठेवले असते. रिकाम्या हाताने येतो व रिकाम्या हाताने जातो. येताना मात्र आपले नशीब घेऊन येतो व जाताना कर्म सोबत घेऊन जातो. आठवणी तेवढ्या मागे उरतात. काळ कुणासाठी थांबत नाही. निसर्गाचे चक्र हे चालूच राहणार. अशा वेळेस मला आईची आठवण होते व लेखणी कागदावर भराभर चालू लागते.

माझे आईवडील सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले होते. माझ्या आईचे कष्ट मी पाहिले व मोठी झाल्यावर तिचा सासुरवास पण बघितला. तो काळच तसा होता. आई संसाराच्या रहाटगाडयांत नेहमी पडद्याआड असायची. जरी अशिक्षित होती तरी निसर्गाच्या शाळेत व अनुभवांतून ती खूप शिकली. ती म्हणत असे, "बापाचे नाते भीतीशी असते, तर आईचे नाते वेदनेशी आहे." साप दिसला तर आपण "बाप रे!" म्हणतो पण पायाला ठेच लागली तर आपण "आई...गं !" म्हणतो. वेदना होताना आई आठवते. बालकाचा पहिला गुरु आई आहे.

माझे आजोळ मला आठवत नाही, पण आई सांगते घरात अठराविश्वे दारिद्र्य होते. आईला तिचे वडील आठवत नव्हते. आई लहान असतानाच ते हे जग सोडून गेले. माझी आजी मुलांना सोबत घेऊन धुणीभांडी करायची. बाजरीचा घाटा, घुगऱ्या खाऊन दिवस काढले. जीव रडकुंडीला यायचा. जगणे असह्य झाल्यावर आजी मुलांना घेऊन विहिरीच्या काठावर जीव द्यायला बसली होती. विचाराच्या तंद्रीत असताना तिला कुणीतरी वाचविले. आई म्हणते "त्यामुळे मी हा संसार पाहिला व तुम्ही सर्व पाखरं दिसत आहात. नाहीतर तेव्हाच आमचे जीवन संपणार होते." अशा परिस्थितीतून दोन मामा शिक्षक झाले. आजीने आईला शिकविले असते तर तिनेही काही करून दाखविले असते. आजी भजन खूपच छान म्हणायची, कापडाच्या चिंध्यांच्या चिमण्या बनवायची (तिचे नावही चिंधाबाई होते).

आईचे लग्न १९५४ मध्ये झाले. माझे वडील हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीत साहेब होते व आई गरीब घरातील होती. मोलकरणीची मुलगी म्हणून आईची बाजू कमकुवत होती, परंतू वडिलांनी आईला समजून घेतले. तिला कधी ते जाणवू दिले नाही व शेवटपर्यंत आनंदाने संसार केला. वडिलांना कसलेच व्यसन नव्हते पण शिस्त फार कडक होती. आम्ही साऱ्या बहिणी त्यांना खूप भीत असू. ते लाडपण तितकेच करायचे. आमच्या आईने कधी मारलेले आम्हाला आठवत नाही. थोडीफार रागावली असेल, ते पण प्रेमाने! लग्न करून आली ती, पण परत माहेरी कधीच गेली नाही! हेच तिचे सासर व माहेर होते. माहेरची मंडळी येऊन भेटून जात, पण आईच्या मनातील खंत आईच जाणू शकत होती.

आईने आयुष्यात कुणाकडून काहीच मागितले नाही, जन्मत:च जसे अयाचक व्रत घेऊन आली होती ती! तिने एखाद्या यंत्राप्रमाणे कामे केली. विश्रांती काय असते ते तिला माहीतच नव्हते. कौतुकाचा शब्दही तिला आयुष्यात कधी मिळाले नाहीत. कधी कधी अपमानाचे बोल तिला विषारी नागाप्रमाणे दंश करीत होते. उपाशी राहायची, पण कुणाला सांगायची नाही. जुने लोक फार तापट असायचे. त्या काळी बरीच कामे असायची. जसे दात घासण्या साठी कोळशाचे मंजन बनविणे, मिरची कांडणे, पहाटे चार वाचता उठून दळण दळून मग पाच वाजता नदीवर धुणे धुवायला जाणे. अशातच ८ बाळंतपणे झाली. काय त्राण राहिले असतील माझ्या आईत! खायला पण चारचौघात शेवटून जेवण मिळे. नेहमी आई हसतमुख असे व हिमतीला पण पक्की होती. डोक्यावरचा पदर कधी खाली पडत नसे.

माझ्या लहानपणीचा प्रसंग आहे. वडील डेहरादूनला होते. आई आजीआजोबांजवळ अमळनेरला राहायची. वडिलांनी आईचे व आम्हा पाच बहिणींचे रेल्वे तिकीटांचे रिझर्वेशन केले होते. आई आम्हाला घेऊन इकडून एकटी जाणार होती. रस्त्यात दिल्लीला व सहारणपूरला गाडी बदलावी लागते. विचार केला की आता वाटते, जिला लिहिता वाचता येत नाही, ती माझी आई, ३-४ दिवसाचा प्रवास, गाड्या बदलणे, मुलींना सांभाळणे, सामान व खाण्यापिण्याची व्यवस्था पाहणे, स्टेशन आले की नळावरं पाण्याचा खोजा (जार) भरणे हे सर्व सांभाळत होती. त्यावेळी पत्राने, तारेने व्यवहार होत. वडिलांना विश्वास होता की आई मुलींना सुखरूप आणेल. एकदा दिल्ली स्टेशनाअगोदर डब्यात चोर शिरल्याची कुणकुण आईला समजली. आई सावध झाली! आम्हाला तर काहीच समजत नव्हते. नशीब आमचे की ते चोर पुढच्या दरवाजाने उतरून गेले. आमची आई प्रवासात नेहमी सांगायची की हा डबा महिलांचा आहे, यांचे वडील पुढच्या डब्यात बसले आहेत. सामान उतरवताना पण ती आम्हा मुलींना सांगत असे (खोटे-खोटे), "तुझे अण्णा पुढे चालत आहेत, नीट सावकाश चला!"

घरी पोहोचताच वडील आईला शाबासकी देत असत. वडीलांच्या नोकरीमुळे तिला प्रवासाची सवय झाली होती. अशी माझी आई हिंमतवान होती. साने गुरुजी म्हणतात, "मुलगी झाली म्हणून काय झाले? मुलीचा जन्म का वाईट आहे? मुलीच माता होतात, शूर-वीरांना जन्म देतात." माझ्या आईबाबत मला असेच म्हणावेसे वाटते. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी...!


आईला १६ नातवंडे. आईच्या घरातील पहिला नातू म्हणून माझ्या मुलाला तिने जास्त सांभाळले, जास्त सहवास लाभला. मोठा नातू म्हणून खूप कौतुक व लाड झाले त्याचे. काही वर्षे माझी मुले आईजवळ आजोळी शिकण्यासाठीसुद्धा होती. आईच्या हातचा शिळ्या भाकरीचा काला मुलांना अमृतासमान वाटे. आजोबा रागाविले की आजी जवळ घ्यायची. खूप संस्कार दिलेत दोघांनी!

वडील नोकरीच्या काळात सुखी व धनवान होते. त्यांचे कपडेसुद्धा पिंजलेल्या कापसासारखे पांढरेशुभ्र असत. परंतु, आयुष्याची संध्याकाळ फार वाईट परिस्थितीत गेली. सातही मुलींची लग्ने केली, स्वतःसाठी काहीच ठेवले नाही. अशातच आई घरात पडली, फ्रॅक्चर होते पण ऑपरेशन करूनही हाती यश आले नाही. सहा महिने अंथरुणावर राहिली ती कायमचीच. एकुलता एक मुलगा आठवा, पण तो सैन्यात नोकरीला असल्यामुळे बाहेरगावी होता. एकुलता एक मुलगा सैन्यात पाठवला. “माझी तर आई म्हणून सेवा कारशीलच पण या भारत मातेची सेवा करतो आहे व मी एक सैनिकाची माता आहे”, हा अभिमान तिला होता. त्याला ती आनंदाने औक्षण करायची मुली चिमण्यांसारख्या उडून गेल्या. आता त्या घरात ते दोघेजण आपले उरलेले आयुष्य बोटांवर मोजून काढत होते. सोबतीला आयुष्यभराच्या आठवणी होत्या. सासुरवश्या मुली येऊन दोन दिवस राहून चालल्या जायच्या. सून-मुलगा दोन तीन महिने राहिले, पण नोकरीसाठी त्यालाही जाणे गरजेचे होते.

म्हातारपण खूप वाईट असते. कुणी कुणाचे नसते. पैसे असले तर सर्वकाही आपले असते, मान असतो. एकेकाळी वडिलांचा खूप रुबाब होता. उतारवयाने ते हताश झाले होते. आईने अंथरूण धरल्यामुळे खानावळीचा डबा लावला. शेवटी खूप वाईट परिस्थिती झाली. एकेकाळी कारमध्ये फिरणारे माझे साहेब वडील व आताची त्यांची कृशमूर्ती, दाढी वाढलेली, थरथरणारे हात-पाय, आयुष्याची संध्याकाळ खरंच कठीण गेली. त्यांचे ऑफिसमधील मित्र-सोबती त्यांना त्यावेळी कार घेऊन कधी भेटायला यायचे व ही परिस्थिती पाहून त्यांना पण वाईट वाटायचे. त्यावेळी दोन पश्चातापाचे अश्रू गाळण्यापलीकडे वडिलांजवळ काही नव्हते.

शेवटी शेवटी आईने तर अन्नच सोडून दिले होते. दरवाजाजवळ कुणी येते का ते वाट बघत बसायची. परमेश्वराजवळ प्रार्थना करायची की आता लवकर ने, जास्त हाल करू नको. ती शरीराने व मनाने खचली होती. जगण्याची आशा सोडून दिली होती. एकेदिवशी मी आईला भेटून खूप रडून घेतले. तिलापण कळले की कदाचित ही शेवटची भेट असेल. कधी न रडणारी मी मनसोक्त रडले व मनाने मोठी झाले. म्हटले, "आई! तू आनंदाने जा. कुणातच जीव अडकवू नको. तू मोठ्या आईला, जगदंबेला भेटायला जाणार आहेस. मनाने खचू नको. आम्ही सर्व सुखात आहोत."

त्यानंतर गुढीपाडव्याच्या (२००३) दिवशी पहाटे पाच वाजता आईने या जगाचा कायमचा निरोप घेतला. भरल्या पावलांनी आलेली लक्ष्मी भरल्या पावलांनी निघून गेली. त्या आधी २-३ दिवस तिने मला जवळ घेतले होते, तो स्पर्श, तो प्रेमळ मायेचा हात अजूनही अंगावरून फिरत आहे असे वाटते. तिच्या त्या आशिर्वादामुळेच आज सुखाचे दिवस आहेत यात शंकाच नाही. ती मूर्ती, ते प्रेम, तो सहवास सारे सारे काही आता संपले होते. कोणताही घास ती सर्वांत वाटून खायची. तशी शिकवणच होती तिची! परक्याच्या मुलांना स्वतःची मुले समजून प्रेम द्यायची, गरिबांचे अश्रू पुसायची, अनाथांचा सांभाळ करायची व भुकेल्याला जेऊ घालायची. दारात आलेला अतिथी रिकाम्या हाती कधी परत गेला नाही.

प्रत्यक्ष यमराजानेसुद्धा आईला चांगला मुहूर्त व चांगला दिवस पाहून नेले. आईला मी जिवंतपणी भेटल्यामुळे मनातून सर्व दुःख मी काढून टाकले व स्वतःला समजावले की लहान बालकांना टाकून आई जाते, कुणी ह्रदयविकाराने जाते. तिची सेवा करायचे भाग्य आपल्याला मिळणे यापेक्षा दुसरे कोणते भाग्य पाहिजे? संत ज्ञानेश्वर म्हणतात की ‘भगवंताला सर्वाना प्रेम देता येणार नव्हते म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली.’ मी माझ्या आईला हेच मागेन की आई, आम्हाला जगायला हिम्मत दे, तुझ्या प्रेमाची ऊब दे.

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई!! बोलावू तूज आता .... मी कोणत्या उपायी!!"

आई नेहमी म्हणायची की माझ्या एक एक करून उडालेल्या चिमण्या परत केव्हा येतील? तेव्हा एक कविता आठवली, ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे! घराकडे आपुल्या.... जाहल्या तिन्ही सांजा!’

अशी माझी गृहलक्ष्मी आई, भाग्यलक्ष्मी, मायेचा अथांग सागर असेलेली आई! तुला कोटी कोटी नमन. हा आठवणींचा लेख मातृचरणी अर्पण करते.





Comments

  1. Sundar lekh lihilay Dhakad Madam..aamcha Kapil aahech guni!!

    ReplyDelete
  2. खूप छान ताई काकू च्या आठवणी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी पाहिलेला हिमालय