फळंबिळं आणि संपवासंपवी
वरदा वैद्य |
आमच्या वाड्यात मी लहानाची मोठी झाले. मात्र ‘वाडा’ म्हटल्यावर जे स्वरूप डोळ्यासमोर येतं, त्यापेक्षा आमचा हा शहरी वाडा वेगळा होता. आमचा वाडा तिमजली. वाड्याच्या दर्शनी बाजूंना दुकानं होती.
बहुतेक दुकानं किराणा-भुसार मालाची. वाडा दोनशे वर्षांपूर्वी बांधलेला असल्यामुळे मातीचा होता. मातीचा वाडा आणि किराणामालाची दुकानं म्हणजे तिथे उंदीर असणारच. अधूनमधून उंदरांची बिळं आम्हाला सापडत असत आणि आई-आजी ती लिंपून बुजवत. त्यामुळेच आमच्याकडे कायम किमान एक मांजर पाळलेलं असे. मांजराला उंदरांचा नियमित खुराक मिळत असे.
तर आम्ही बहिणी शाळकरी असतानाची गोष्ट. दुपारचं जेवण झाल्यावर माझ्या मोठ्या बहिणीला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली. तिने विचारलं की आपल्याकडे काही फळबीळ आहे का. तेव्हा मी तिला हसत म्हटलं, “फळ नाही पण बीळ आहे. हवंय का?” तर फळांचा विषय निघाला की आम्हाला हमखास ह्या विनोदी प्रसंगाची आठवण होते.
मला तशी सगळीच फळं आवडतात, पण संत्री, कलिंगड, अननस आणि आंबा माझ्या खास आवडीची. आधी माझा ताज्या फळांचा उपयोग फळं चिरून खाणे, पेरूची वा केळ्याची दह्यातली कोशिंबीर, शिकरण, फ्रुट सॅलड, फळांचे मिल्कशेक, आंब्याचं लोणचं आणि कैरीचं पन्हं वगैरेंपुरता मर्यादित होता. मुलं लहान असताना मी बेकिंग करू लागले आणि माझा ताज्या फळांचा वापर विस्तारला.
केळी अगदी आवडीने खाणारे किती असतात कुणास ठाऊक. पण केळी हमखास आणि सर्वत्र उपलब्ध असतात, शिवाय स्वस्तही असतात आणि त्यामुळे नेहमी आणली जातात. त्यातली काही कोणीच न खाल्ल्यामुळे पडून राहतात आणि मग ती खपवण्यासाठी नवनवे मार्ग शोधणं हे सुगरणींचं आणि आयांचं अनंत काळापासून चालत आलेलं काम आहे. मी सुगरण नसले तरी असे मार्ग शोधण्यात मीही अधूनमधून यशस्वी होते. केळी किती उरली आहेत आणि ती नेमकी किती पिकली आहेत, किती प्रमाणात काळी पडली आहेत, त्यावर त्यांचं काय करायचं ते ठरवावं लागतं. एखादंच केळं उरलं असेल तर हमखास यशस्वी होणारा पदार्थ म्हणजे केळं घातलेला शिरा. त्याच धर्तीवर मुलांच्या आग्रहाखातर संत्र्याचा शिरा आणि अननस शिरा मी करत असे. विशेषतः आणलेल्या फ्रुटकप्स पैकी एखादाच कप रेंगाळत पडला असेल तर मी तो शिऱ्यात घालून संपवलाच म्हणून समजा. ह्याच शिरामालिकेतलं पुढचं पाऊल म्हणून काही दिवसांपूर्वी माझ्या एका मामींच्या यूट्यूब वाहिनीवर पाहून मी आमरसाचा शिरा करून बघितला (स्वयंपाकघर.कॉम- आमरस शिऱ्याची पाककृती - https://youtu.be/z9GzL71ay1U)
तीन-चार पिकलेली केळी संपवायची असली की हमखास केला जाणारा दुसरा पदार्थ म्हणजे बनॅना ब्रेड. मग कधी त्यात उरलेल्या ब्लूबेरी, इतर कशात वापरून उरलेले चमचाभर चॉकलेट चिप्स, उरलेला सुकामेवा वगैरे गोष्टीही ढकलता येतात. केळी खूप पिकायच्या आत संपवायची असली की मग एक तर शिकरण करून खायची वा ती कुठल्याश्या केक वा मफिन्समध्ये ढकलून द्यायची. केक करण्याचा पुरेसा सराव झाला की मग हळूहळू मूळ पाककृतीत नसलेल्या पण संपवायला झालेल्या गोष्टी त्यात बेमालूम कशा ढकलायच्या ते बरोबर समजायला आणि जमायला लागतं. चॉकलेट-बनॅना केक, बनॅना-कोकोनट केक, बनॅना स्पाइस कॉर्न मफिन, बनॅना-पीनट बटर मफिन्स वगैरे दिव्य नावांनी उल्लेखत मुलांपुढे ठेवले की ते पदार्थ अगदी मिटक्या मारत खाल्ले जातात. गोष्टी खपतात, आपल्या सुगरणपणाची कॉलर ताठ करता येते आणि शिवाय सोशल मीडियावर फोटो टाकून ओळखीच्यांत थोडं मिरवताही येतं!
एकदा मुलांना घेऊन स्ट्रॉबेरी पिकिंगला गेलो होतो. आपण तोडलेल्या सर्व स्ट्रॉबेरी आपण विकत घ्यायच्या असल्यामुळे त्या ढिगाने घरात आल्या. मग घरी स्ट्रॉबेरी-सप्ताह साजरा करावा लागला. स्ट्रॉबेरी केक, स्ट्रॉबेरी मिल्कशेक, स्ट्रॉबेरी साल्सा, स्ट्रॉबेरी लेमोनेड, टार्ट वगैरे पदार्थांनी हा सप्ताह गाजवला.
चिरून ठेवलेल्या कलिंगडाच्या फोडी रेंगाळत आहेत असं लक्षात आलं की मी त्या ब्लेंडरमध्ये घालून त्यात पुदिन्याची पानं, लिंबाचा रस आणि थोडी साखर घालून फिरवते. कलिंगडाचं हे घरगुती सरबत सगळ्यांना आवडतं. एकदा कलिंगड चिरल्यावर त्याची सालं टाकून न देता मी सोलाण्याने सालाचा भाग सोलला आणि पांढऱ्या गराच्या फोडी करून त्याची दुधीची करतो तशी भाजी केली. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात कढीलिंब, आवडीनुसार हिरव्या किंवा सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालून त्यावर ह्या पांढऱ्या फोडी घालून परतल्या. मीठ आणि किंचित साखर घालून दोन वाफा आणल्या. मग त्यात दाण्याचं कूट, खवलेला नारळ घातला आणि वरून थोडं लिंबू पिळून, कोथिंबीर पेरून भाजी ढवळली. आता मी कलिंगड आणलं की नेहमी हा पांढरा भाग तुकडे करून ठेवते. लगेच भाजी करायची नसली तर ते तुकडे फ्रीझरमध्ये टाकते. अनेक दिवस उत्तम टिकतात. हवे तेव्हा काढून भाजी करता येते. माझी आजी दुधीच्या सालांची परतून, त्यात तीळ आणि सुकं खोबरं घालून कोरडी चटणी करत असे. त्याच धर्तीवर कलिंगडाच्या सालीचीही तशी चटणी छान लागते. पण ही सालं चिरून वा किसून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तेलावर परतावी लागतात. हे जरा वेळखाऊ प्रकरण असल्यामुळे क्वचितच केलं जातं.
एकदा माझ्या विविध केक उत्तम करणाऱ्या मैत्रिणीकडे मी ऍपल स्पाइस केक खाल्ला. तो एवढा रुचकर होता की तिच्याकडून पाककृती घेऊन तो करून पाहिल्याशिवाय मला चैन पडेना. त्यानंतर असंख्य वेळा मी हा केक केला असेल आणि प्रत्येकवेळी तो उत्तमच झाला. मार्था स्टुअर्टच्या ऍपल स्पाइस केकच्या मूळ पाककृतीत पूर्ण मैदा न घेता अर्धा मैदा आणि अर्धी कणिक घेणे, अंड्यांऐवजी दही (१ अंडं = पाव कप दही) वापरणे, दुकानातून आणलेल्या ऍपल सॉसऐवजी घरीच सोलून चिरलेल्या तीन-चार सफरचंदांचे तुकडे कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरला फिरवून केलेला घरगुती ऍपल सॉस वापरणे, असे बदल माझ्या मैत्रिणीने केले होते. मीही तिच्या बदलांसकट हा केक करते आणि तो हमखास यशस्वी होतो. रेंगाळत पडलेली सफरचंदही खपतात. (मार्था स्टुअर्टची ऍपल स्पाइस केकची मूळ पाककृती: https://www.marthastewart.com/351254/apple-spice-cake)
ऍपल सॉसऐवजी आमरस घालून केलेला मँगो स्पाइस केकही छान होतो. पायनॅपल अप-साइड-डाऊन केक तर करायला अगदीच सोपा. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय एकत्र जमणार असलो की मी बरेचदा केक करून नेते. वेगवेगळे केक करून पाहता येतात आणि खाणारे बरेच असल्यामुळे लगेच खपतातही.
तर अशी ही फळफळावळ आणि त्यांची संपवासंपवी आणि खपवाखपवी.
Very Nicely written !! keep it up !!
ReplyDeleteअतिशय निर्भेळ, निर्लेप लेखन! त्यामुळे1जास्तच
ReplyDeleteचविष्ट!