स्क्रीन आणि फॅशन

विदुला कोल्हटकर

"क्काय!" ढॅण ढॅण ढॅण कॅमेरा पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर जात होता. जसं काही पहिल्यांदा ती “क्काय” म्हणाली तेव्हा तुम्ही फोनकडे बघत असाल, तर 'इकडे लक्ष द्या' म्हणून मोठा आवाज आणि हा बघा रिटेक.

जवळपास दोन वर्षांनी माझी मराठी मालिकांशी पुन्हा गाठ पडत होती आणि पुन्हा एकदा नव्याने मला 'बापरे! हे असले कपडे आणि दागिने रोज कोण घालून बसतं?' असा प्रश्न पडला होता. नायिका आणि खलनायिकेच्या भूमिकेत दोन वर्षांपूर्वी होत्या त्याच अभिनेत्री होत्या. खलनायिका पहिल्यापासूनच भरपूर मेकअप केलेली असल्याने मेकअप बजेटमधल्या वाढीखेरीज तिच्यात बदल नव्हता. नायिकेची दोन वर्षांपूर्वीची साधी बारीक जरीच्या काठाची साडी आणि गळ्यातला छोटा नेकलेस + मोठं मंगळसूत्र जाऊन जरा भरजरी साडी, तेच मोठं मंगळसूत्र आणि आता चांगलं ठसठशीत गळ्यातलं आलं होत. गेल्या महिन्यात फोटो पाठवून आईने 'तुला हवंय का' म्हणून विचारलेलं ते गळ्यातलं हेच होतं तर! दरवर्षी नवीन दागिन्यांची फॅशन आता मराठी मालिका आणतात असं दिसतंय! मालिकांच्या यशाचं, लोकप्रियतेचं हे प्रतीकच म्हणायला पाहिजे. एकंदर मराठी मध्यमवर्गीयांमध्ये आलेली सुबत्ता त्याच्या अनेक पटींनी वाढून सामान्य कुटुंब म्हणून मराठी मालिकांमध्ये दिसायला लागली आहे. Not failure, but low aim, is the crime असं लहानपणी सांगायचे. त्याला अनुसरून मध्यमवर्गीय कुटुंब म्हणजे काय यासंदर्भातले नवे-जुने आडाखे low aim म्हणून त्यागून सध्याच्या मालिका मोठी स्वप्न बघायला लागल्या आहेत. घरोघरी आवडीने बघितल्या जाणाऱ्या या मालिकांमुळे त्यातल्या कपड्यांच्या, दागिन्यांच्या फॅशनच्या लाटा अधूनमधून येत असतात. सिनेमा अर्थातच या विषयात मालिकांपेक्षा कोसभर पुढेच आहे.

सत्तरच्या दशकातले सिनेमे आणि फॅशन म्हटल्यावर बेलबॉटम पॅन्ट घातलेली झीनत अमान, मिनीड्रेसमधली नीतू सिंग आणि मोठे डोळे आणि त्यावर भलामोठा मेकअप केलेली शर्मिला टागोर आठवते. सगळ्या नायिकांचे केस बहुतेक डोक्यावर बारीक उशी बांधून त्यावर बांधले जात. डोक्यावर हे मोठं डबोलं घेऊन कशा वावरायच्या, नाचायच्या त्याचं मला आश्चर्यच वाटतं. सामान्य माणूस म्हणून ज्याचे सिनेमे आजही आवडीने बघितले जातात त्या अमोल पालेकरांच्या सिनेमांमध्येसुद्धा या बेलबॉटम पॅन्ट आणि भडक रंग दिसतात. त्यावेळची पाश्चात्य जगातली फॅशनसुद्धा याच प्रकारची होती. आपल्याला आता वाटतं की जग जवळ आलं, पण चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चवर्गियांचं जग कदाचित तेव्हाही जवळच असेल.

ऐंशीच्या दशकात फॅशन जरा जमिनीवरून चालणारी होती. मिडिस्कर्टमधली मैने प्यार किया मधली भाग्यश्री, शिफॉनच्या साडीतली श्रीदेवी किंवा स्टेजवर थिरकणारी पण बाकीच्या दृश्यात साधे कपडे घातलेली तेजाबमधली माधुरी असो.

नव्वदच्या दशकापासून करन जोहर, संजय लीला भन्साळी, यश चोप्रा बॅनरचे भव्य दिव्य सिनेमे यायला सुरुवात झाली. मग काय, लांबच्या लांब पदर, ओढणी सांभाळून पाळणारी नायिका, बर्फातसुद्धा केवळ साडी नेसून आनंदाने गाणारी नायिका, घोळदार कपडे घालून नाचणारी नायिका दिसायला लागली. आजच्या अनेक सिनेमांमध्ये भरजरी, घोळदार, चापून-चोपून, टीचभर अशी सर्व विशेषणे लावता येतील असे कपडे असतात.

सत्तरच्या दशकातले भडक, गडद कपडे असोत, ऐंशीच्या दशकातल्या चापून चोपून नेसलेल्या साड्या, पंजाबी ड्रेस असोत वा अलीकडच्या काळातले घालून न घातल्यासारखे कपडे असोत ते वापराता येण्याजोगे असल्याशिवाय सामान्यतः फॅशन म्हणून बाजारात येत नाहीत. आठवा 'जुते दो पैसे लो' गाण्यात माधुरीने घातलेला पांढरा घोळदार घागरा आणि हिरवा ब्लाउज आणि दुपट्टा. त्या वर्षी हे असे कपडे घातलेल्या बऱ्याच मुली बघितल्याचं मला स्पष्ट आठवतंय. त्याच सिनेमातला लाल ड्रेस आणि 'पेहेला पेहेला प्यार है' गाण्यात माधुरीने गळ्यात घातलेला मोत्याचा नेकलेस माझ्या दोन वेगवेगळ्या मैत्रिणींना दिवाळीनिमित्त मिळाला होता.

Devil Wears Prada सिनेमामध्ये फॅशनच्या जगातली राणी Meryl Streep फॅशन जगतातल्या नवख्या Anne Hathaway ला म्हणते 'तुला असं वाटत असेल की कपडे काही फार महत्वाचे नाहीत. पण हा तू घातलेला निळा स्वेटर निळा नाही, टरकॉईस नाही, लॅपिस नाही तर सेरूलिअन रंगाचा आहे.' मग फॅशनच्या जगात सेरूलिअन रंगांचे कपडे कोणी आणि कधी आणले आणि मग काही वर्षात हा रंग कसा सामान्य दुकानांत आला याचं वर्णन ती करते आणि म्हणते 'तुला वाटत असेल मी फॅशनच्या जगापासून मुक्त आहे पण हा स्वेटर फॅशनच्या जगातल्या माझ्यासारख्या अनेकांनी मिळून तुझ्यासाठी निवडला आहे.’

चित्रपटात काय किंवा मालिकांमध्ये काय, कुठल्या फॅशन येणार हे कोण ठरवत माहीत नाही, मात्र फॅशनचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत या माध्यमातून होतो हे नक्की. आपण जरी तसेच्या तसे कपडे वापरले नाहीत तरी दुकानात किंवा अमॅझॉनसारख्या बाजारात काय उपलब्ध असेल हे कुठेतरी या ट्रेंडवर ठरत असणार. आपण छोट्या/मोठ्या पडद्यावरच्या फॅशन यापासून फार लांब नाही हेच खरं.

जाता जाता आणखी एक. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ सिनेमात आशालता वाबगावकर फिकट रंगाच्या साड्या, त्यावर सगळीकडे नाजूक फुलापानांची नक्षी आणि साडीच्या फिकट रंगाला मॅचिंग ब्लाउज अशा वेषात आहेत. सिनेमा बघताना मला लहानपणी आपण कसे सुरक्षित, कसलीही चिंता, काळजी नसलेले, आनंदात होतो असं एकदम वाटायला लागलं. म्हणजे काही विशिष्ट आठवण आली असं नाही पण अचानक आठवलं आपण कसे छान आनंदात होतो. त्या काळातले बाकीचे सिनेमे बघताना असं वाटलं नव्हतं. मग लक्षात आला माझ्या लहानपणी माझी आई, काकू अशाप्रकारच्या साड्या नेसत असत. नकळतच मला त्याची आठवण झाली. फॅशन म्हणजे विशिष्ट काळातले विशिष्ट कपडे असा अर्थ घेतला तर त्यात वास आणि चव यासारखीच गतकालविव्हलता (nostalgia) जागृत करण्याची ताकद आहे हे नक्की.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

मी पाहिलेला हिमालय