कपडे पाहावे शिवून

मुग्धा मुळे

दिवसा सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि रात्री फ़ॅशन डिझायनर.

मायन दिनदर्शिकेप्रमाणे २०१२ ह्या वर्षी जग संपेल असे भाकीत होते. पण २०२० ह्या वर्षाने खरोखरीच तसे होईल की काय ह्याची जाणीव करून दिली. लोक एकांत मिळायला हिमालयात जातात किंवा इकडे अमेरिकेत जंगलात राहतात, पण २०२० ने एकांत घरातच आणून ठेवला. कोरोना नामक सूक्ष्मजीवाने जगभर भल्याभल्या बलवान लोकांनाच काय, पण बलाढ्य राष्ट्रांनादेखील जेरीस आणले. उगाच नाही म्हणत Powerful things come in small packages.

अचानक दिनचर्या बदलली. सकाळी ऑफिसची गडबड कमी झाली. मुलांचे डबे भरायचे नाहीत, आरामात उठायचे, ९ वाजता लॉगिन करायचे, कोडिंग करता करता मध्ये मध्ये स्वयंपाक करायचा. एरवी नेहमी उलटे व्हायचे, असो. (एक बरे आहे की माझ्या मॅनेजरला मराठी येत नाही, म्हणजे त्याने हे वाचायचा प्रश्नच नाही.)

तर अचानक घबाड हाती लागावे तसा घरुन काम करणाऱ्या तमाम लोकांना वेळ हाती लागला. मग कुणी स्वयंपाकघरात घुसले तर काहींनी डंबेल्स उचलली.

तसेही मला घरात असलेली वस्तू कधीच दिसत नाही, कारण बाजारात असलेली नवीन वस्तू हवीशी असते. असो. तर माझ्या नवऱ्याने शिवणयंत्र मुद्दाम आमच्या सनरूममध्ये आणून ठेवले. अचानक अमेरिकेत मास्कचा तुटवडा झाला आणि मग मी भीत भीत ४-५ व्हिडियो पाहून मास्क शिवायला घेतले.

माझी भीड चेपली. खूप वेळा झटापट करून शिवणयंत्रावर हात बसला. सासूबाई आणि बाबा आमच्याकडे अमेरिकेत आहेत. तेव्हा मी त्यांच्यासाठी मॅचिंग ट्युनिक्स शिवायचे ठरवले. तेही खूश की सून आपल्यासाठी काहीतरी करते आहे आणि माझा सूक्ष्म डाव असा की त्यांच्यावर माझ्या नवीन खुळाचा प्रयोग करता यावा. यशस्वी झाले, तर खूप कौतुक आणि नाही झाले तरी उत्तेजनार्थ बक्षीस तरी कुठेच जात नाही.

तर बरीच खटपट करून मी दोघांना मॅचिंग कपडे शिवले. ते ठीकच झाले होते, पण दोघांनी आनंदाने घातले. नंतर मात्र ते कपडे मला कधीच दिसले नाहीत! एवढे करताना माझ्या आईला आणि मावशीला मी फॅशन डिझायनर असल्याची खात्री पटली (किंबहुना मीच पटवून दिली). मग त्या दोघीनी मला मॅचिंग ड्रेसेसची ऑर्डर दिली.

पण एव्हाना माझे कान आणि डोळे ह्यांनी मला चाळीशी उलटल्याची जाणीव करून दिली व ते मशीन पुन्हा खोक्यात गेले. मी ते सनरूममध्ये न ठेवता तळघरात, जिथे माझा नवरा कधीच पोचत नाही, अश्या ठिकाणी ठेवले.

अश्यातऱ्हेने ह्या जगाने एक हुशार आणि स्टायलिश फ़ॅशन डिझायनर गमावला.

Comments

Popular posts from this blog

हरवले ते गवसले तेव्हा

आप्पाची गोष्ट