मदत



पद्मा लोटके


दररोज संध्याकाळी चालायला जायची सवय मला स्वस्थ बसू देईना. त्या दिवशी थोडा उशीरच झाला होता. नऊ वाजून गेले होते. विचार केला की थोडेसेच का होईना पण चालून येऊ म्हणून बाहेर पडले. 

थोडे अंतर चालून जात नाही तर एक अमेरीकन गोऱ्या आजी समोरून येताना दिसल्या. थांबून म्हणाल्या की मला मदत पाहिजे.

“काय झालं?” मी विचारले. त्यांच्या हातात फोन आणि एक छोटी डायरी होती. 

“मला माझा नवऱ्याला फोन लावून देतेस का?” फोन आणि डायरी पुढे करत त्या म्हणाल्या. 

“ठीक आहे“ असे म्हणून फोन आणि डायरी त्यांच्याकडून घेतली. डायरीमध्ये ‘बिल फॉक्स’ हे नाव आणि त्या नावापुढे नंबर होता. तो नंबर मी डायल केला. रिंग्ज गेल्या पण फोन उचलला गेला नाही.

“माझा नवरा आमच्या जुन्या घरी काही दुरुस्तीच्या कामासाठी गेला आहे. आमचे घर इथून जवळच आहे. घराचं काम होईपर्यंत आम्ही इथे अपार्टमेंटमध्ये राहणार आहोत. मी त्याला फोन करत्ये कारण माझ्या ह्या अपार्टमेंटमधील घरात कोणीतरी व्यक्ती घुसलीये आणि जा म्हटले तरी जात नाहीये.” 

“काय?” त्यांचे शेवटचे वाक्य ऐकून मी जरा हबकलेच.

“तू माझ्याबरोबर चल आणि त्यांना जायला सांग,“ त्या म्हणाल्या. 

“अं अं नको. त्यापेक्षा तुमचा नवरा येईपर्यंत तुम्हीच माझ्या घरी थोडावेळ येऊ शकता” मी त्यांना म्हणाले. 

मनात म्हंटले त्या माणसाकडे बन्दूक वगैरे असली म्हणजे! घरी तशीही मी एकटी नव्हते. माझा मुलगा आणि नवरा होते. सगळ्यांनी मिळून काहीतरी विचार केला असता. मी हे सुचवल्यावर नको म्हणाल्या. आता काय करायचे? रात्र होत होती. माझ्या घरचे वाट बघत असतील. त्यातून त्या बाईंचा चेहरा एवढा सुरकुतलेला होता की एक क्षण मी स्वतःशी म्हणाले ‘देवा हे भूत नको असू दे!’ काहीच सुचेना. 

“तुमचे कोणी नातेवाईक जवळपास राहतात का?” मी विचारले. 

“हो, माझी बहीण इथे जवळच राहते,“ त्या म्हणाल्या. 

“ मग तुम्ही तिला फोन करता का?“ मी विचारले. 

“ठीक आहे,“ असे म्हणून त्यांनी बहिणीला फोन केला. बहिणीने फोन उचलला, पण “मी झोपलीये, बाय!” असे म्हणत तिने फोन ठेवला. आता काय करायचे!

शेवटी मी त्यांना म्हणाले आपण ९११ला कॉल करू आणि पोलिसांना बोलावू. तेच योग्य ती मदत करू शकतील. ह्यावर त्या जरा विचारात पडल्या. त्यांच्याकडून फोन घेत मीच शेवटी ९११ डायल करून परिस्थिती सांगितली. पोलीस पुढच्या दहा मिनिटांत आले. आम्हाला बाहेरच थांबायला सांगून तो ऑफिसर घरात गेला.पुढच्या दोन मिनिटांत बाहेर आला. 

“घरात जी व्यक्ती आहे ती विल्यम फॉक्स उर्फ बिल फॉक्स आहे,“ तो ऑफिसर म्हणाला, 

“तुम्ही जाऊ शकता.“ मला घरी जायला सांगून ऑफिसरने त्या बाईंना हाताला धरून घरात नेले. 

मला हसावे का रडावे कळेना. घरी चालत येत असतांना मनात विचार आला की डिमेन्शिया किंवा अल्झायमर असावा त्या बाईंना. असे रुग्ण ज्यांच्या घरी किंवा आयुष्यात आहेत त्यांना किती गोष्टींशी सामना करावा लागत असेल, असे वाटले. 

इथून पुढे जास्त उशीर झाला तर पायी चालायला जायचे नाही असे ठरवून झपझप पावले टाकत घरी पोहोचले. त्या बाईंना माझ्यापरीने योग्य ती मदत केल्याचे समाधान मात्र होते.




Comments

Popular posts from this blog

झटापट ते झटपट

कवितेचं पान - शिशिरागम