हंटिंग लॉज






बाळकृष्ण पाडळकर
७३ टाकोमा भुलेवाड
ट्रॉय मिशिगन



बाहेर सूर्य आग ओकत होता. वाऱ्याची झुळूक तेवढी अधून मधून उन्हाची तीव्रता कमी करीत होती. पण क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी गर्मीत पुन्हा वाढ होत होती. सूर्य माथ्यावर आल्यापासून पार पश्चिमेकडच्या टेकड्यांच्या मागे गेल्याशिवाय हे थांबणार नव्हते.

राजपुत्र मदनसिंह गेल्या दीड-दोन महिन्यांपासून या वातावरणामुळे त्रस्त होता. त्याला दिवसभर बारा खांबांच्या हवेलीमधील गरम वातावरणात थांबवत नव्हतेहवेलीची पश्चिमेकडील बाजू जरी बरीच उघडी होती, तरी क्षणभर येणाऱ्या सुखावह झुळुकी उष्ण वाऱ्यापुढे फार काळ टिकत नव्हत्या. सेविका ज्योती आणि तिची  सहेली मोठ्या पंख्याची दोरी ओढून ओढून घामाघूम झाल्या होत्या. त्यांना वाटे राजपुत्र मदनसिंह शेजारच्या बागेत पाय मोकळा करायला गेले तर त्यांना थोडी विश्रांती तरी मिळेल. पण राजपुत्राचा तसा काही विचार दिसत नव्हता. ज्योती बऱ्याच वेळापासून पंख्याची दोरी ओढीत होती. तिने आपल्या सहेलीच्या कानांत काहीतरी सांगितले आणि ती पलीकडच्या दालनात गेली. ती गेल्यासरशी दुसरी सेविका, पुरंध्री, तिथे आली आणि तिने पंख्याची दोरी स्वतःच्या हातात घेऊन पंख्याला वेग दिला. त्यामुळे हवेलीत वाऱ्याचा जोर वाढला. परंतु गरम झुळुकीमुळे वारा सुखावह वाटत नव्हता


इतक्यात रसोईघरातील मुख्य सेविका पद्मा तिथे आली. तिने चांदीच्या तबकात बऱ्याच प्रकारची फळे कापून, त्यांना पद्धतशीरपणे सजवून आणले आणि समोर असलेल्या मेजावर ठेवले. दुसऱ्या हातात सुरई होती. सुरईमध्ये  उंची मदिरा होती. पद्माने सुरई ठेवली.  ती पुन्हा जिन्यातून खाली रसोईमध्ये गेली आणि येतांना  सोबत एक पेला घेऊन आली. तोही मेजावर सुरईच्या बाजूला ठेवलानिघून गेली. राजपुत्राने खाद्यपदार्थ ठेवलेल्या मेजाकडे पाहिलेदेखील नाही. अद्याप राजपुत्राचा जीव उष्णतेमुळे कासावीस होत होता. त्याचे मन कुठेच लागत नव्हते.


त्याचे मन लागण्याला तसे काही कारण नव्हते. दुसरे दिवशी तो राजवाड्यातील आपल्या दोन सवंगड्यांसह शेजारच्या जंगलात भटकंती करायला गेला. रात्र फार झाल्यामुळे जंगलात असलेल्या हंटिंग लॉजमध्येच त्यांनी मुक्काम केला. दिवसभर भरपूर भटकंती केल्यामुळे बिछान्यावर पडताच त्या तिघांचा डोळा लागला. राजपुत्राची, त्याच्या सवंगड्यांची खाण्यापिण्याची खातिरदारी केल्यानंतर लॉजमधील खानसाम्यासह सेवकवर्गाने व्हरांड्यात पथाऱ्या पसरल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोणालाही आत झोपण्याची इच्छा नव्हती. दिवसभराच्या काहिलीनंतर रात्री बराच थंडावा जाणवू लागला होता, त्यामुळे सेवकवर्ग थोड्याच अवधीत झोपेच्या आधीन झाला. वर उघड्या गच्चीवजा मोकळ्या जागेवर शाही बिछाने टाकून राजपुत्र, त्याचे सवंगडी केव्हाच झोपले होते. पश्चिमेकडून येणारा वारा सुखावह वाटत होता. थोड्या वेळातच परिसर शांत झाला. घनदाट अरण्यात काजवे तेवढे चमकत होते आणि त्यांना आकाशातल्या चांदण्या साद घालत होत्या. लांब कुठेतरी कुत्र्याचे मधूनच भुंकणे या वातावरणाला छेद देत होते. बाकी सगळीकडे निरव शांतता होती.


अर्धी रात्र उलटून गेली असावी. इतक्यात दोन वाघांच्या डरकाळ्यांनी शांततेचा भंग केला. डरकाळ्या हंटिंग लॉजच्या अगदी जवळच्या भागातून ऐकू आल्या. डरकाळ्या थांबतात थांबतात  तोच खाली झोपलेली मंडळी मोठमोठ्यानेबचाव, बचाव, शेर आया है, बचावअसे ओरडू लागली. दोन वाघ हंटिंग लॉजच्या व्हरांड्यात शिरले, त्यांनी तीन चार सेवकांपैकी एकाच्या मानेला पकडले आणि डोळ्याचे पाते लवते लवते तोच समोरच्या जंगलात पोबारा केला.


राजपुत्र, त्याचे सवंगडी खाली येईपर्यंत दोन्ही वाघ अदृश्य झाले होते. मानगूट पकडून नेलेल्या सेवकाच्या रक्ताचे थेंब जागोजाग दिसत होते. दोन्ही वाघांच्या हालचालींची चाहूल समोरच्या झाडीत दिसत नव्हती


राजपुत्र मदनसिंह या घटनेमुळे अत्यंत निराश झाला. त्याचे दोन सवंगडी दशरथसिंह आणि नरेशसिंह यांनाही काय करावे सुचेना. इतक्या निबिड अरण्यात जाण्याची तिघांचीही हिम्मत नव्हती, परंतु त्यांना गप्प बसणे शक्य नव्हते. शेवटी हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. राजपुत्र मदनसिंहाने मनाशी काहीतरी विचार केला. तो लॉजच्या पहिल्या माळ्यावर सेवकाला घेऊन गेला. त्याला तीन मोठे टेम्भे तयार करायला सांगितले. स्वतःची सवंगड्यांची हंटिंग गन घेतली. निश्चय करून तिघेही खाली उतरले आणि लॉज समोरील जंगलात त्या दोन वाघांचा शोध घेण्याकरता निघून गेले. टेम्भे  असल्यामुळे निदान थोड्याफार अंतरावरील झाडाझुडपातून वाट काढणे त्यांना शक्य झाले. दोन सवंगडी मित्रांशिवाय दोन सेवकही त्यांना सामील झाले होते. मदनसिंहाने त्यांना मना करूनही तेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.


उत्तर रात्र संपून सकाळ व्हायची वेळ झाली. परंतु त्या दोन वाघांचा शोध मदनसिंहाला लागला नाही. सकाळ उजाडल्यावर वाघ दृष्टीस पडणे शक्यच नाही, असे बरोबर असणाऱ्या सेवकांचे मत पडले. थोडा वेळ शोध घेऊन हंटिंग लॉजवर परतण्याचा निश्चय सर्वांनी केलादिवसभर लॉजवर थांबून रात्री वाघांचा नव्याने शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरता राजपुत्राने राजवाड्यात जाऊन आपली विकत घेतलेली नवीन बंदूक आणली आणि निवडक सवंगड्यांना संध्याकाळी हंटिंग लॉजवर येण्यास फर्मावले


संध्याकाळी पंधरा वीस जणांचा जथाहंटिंग लॉजवर दाखल झाला. त्यात एक दोन जाणकार हाकारेही होते. त्यांना जंगलाची माहिती तर होतीच, परंतु वाघाच्या वास्तव्याची संभाव्य ठिकाणेही त्यांना ज्ञात होती. त्यांच्यासोबत मोठे डफ वाजविणारा एक धनगर सोबत चांगली पोसलेली बकरी घेऊन आला होता


रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर मदनसिंहाने थोड्याच वेळात सगळ्यांना तयार राहायला सांगितले. मशाली, टेम्भे पेटवण्यात आले. धनगर डफ वाजवू लागले आणि मदनसिंहाच्या नेतृत्वाखाली पंधरा वीस जणांचा जथा जंगलाकडे निघालादिवसभराच्या उन्हामुळे तप्त झालेली धरणी रात्रीच्या गारव्यामुळे बरीच थंडावू लागली होती. लहान लहान काटेरी झुडुपांना ओलांडून उघड्या मैदानातून जथाघनदाट जंगलात शिरला. हातातल्या मशालींनी, टेम्भ्यानी जंगल उजळून निघाले होते. जो तो एकमेकांना मशाली सांभाळण्याचे, सावध राहण्याचे आवाहन करीत होता. जथाजंगलात खोलवर शिरला तरी कोणत्याही हिंस्त्र प्राण्याचा सुगावा लागेना. साधे हरीण, सांबर नजरेस पडत नव्हते. डफाच्या आवाजाने आणि मशालींच्या उजेडाने जवळ असलेले प्राणी लांबवर जाऊन सुरक्षित स्थानाचा शोध घेत होते. कालचे वाघही दिसायला तयार नव्हते. त्यांनी झडप घालून जंगलात ओढून नेलेल्या सेवकाच्या खाणाखुणाही नजरेला पडत नव्हत्या


जाणकार मंडळींपैकी वयाने पोक्त असलेला गजेंद्रसिंह पुढे आला आणि मदनसिंहाला म्हणाला, “राजन ! आपण हनुमान ठिब्याकडे आपला मोर्चा वळवायला हवा. हनुमान ठिब्बा घनदाट तर आहेच, शिवाय वास्तव्य करायला तो भाग अत्यंत सुरक्षित असल्यामुळे बऱ्याच वेळा वाघांची वर्दळ त्या भागात असते. आपल्याला हवे असलेले जनावर आपण ओळखू शकू, मात्र आपण हनुमान ठिब्याकडे आपला मोर्चा वळविल्यासच  आपल्याला वाघ नजरेस पडण्याची शक्यता आहे.”


मदनसिंहाला गजेंद्रसिंहची कल्पना पसंत पडली. त्याला जथ्याच्या पुढे करून जथाहनुमान ठिब्याकडे कूच करू लागला. हनुमान ठिब्यावर पोहोचण्यास बराच वेळ लागणार होता, कदाचित भल्या पहाटेपर्यंत ते सर्व तिथे पोहोचणार होते. मदनसिंहाला वाटले, आपला वरुण  घोडा आणला असता तर एवढी पायपीट करण्याची वेळ न येती. पण जथ्यामधील सगळ्यांनाच घोडे वापरणे शक्य नव्हते, कारण घोड्यावर स्वार होऊन मशाल सांभाळणे, बंदूक सांभाळणे बरेच अवघड झाले असते. मदनसिंह या विचारांच्या तंद्रीत असताना एक भला मोठा हरणांचा कळप उजव्या बाजूने येऊन डाव्या बाजूकडे सुसाट वेगाने गेला. त्यातील काही हरणे थोडे अंतर गेल्यावर थांबली आणि मागे वळून जथ्याकडेहे आगंतुक कोण आहेत?” या अविर्भावात पाहू लागली. थोड्या वेळाने तीही सुसाट वेगाने पळाली आणि कळपाला जाऊन मिळाली. डाव्या बाजूला एक झरा होता, झऱ्याचे पाणी एका ठिकाणी साचले होते, तो कळप बहुदा पाणी पिण्यासाठी झऱ्याकडे निघून गेला असावा


मदनसिंह आणि जथाजथागजेंद्रसिंह जिकडे नेईल तिकडे जाऊ लागले. ते थोड्याच वेळात हनुमान ठिब्यावर पोहोचणार होते. थोड्याच वेळात पहाट होणार होती याचा अंदाज झोंबणाऱ्या गार वाऱ्यामुळे  सहज येत होता. उंचीवर असल्यामुळे हनुमान ठिब्यावर पोहोचताच थंडगार वाऱ्याची जाणीव होऊ लागली


गजेंद्रसिंह अचानक थबकला, तसे जथ्यातले सगळे जण त्याच्या मागे थांबले. हनुमान ठिब्याच्या डाव्या कपारीत दोन ठिकाणी त्यांना काहीतरी चमकतांना दिसले. टेम्भ्याचा प्रकाश त्यांनी टेम्भा खाली करून कमी केल्यानंतर दोन वाघांचे चार डोळे अंधारात चमकतांना दिसत होते. मदनसिहाला वाटले, हे वाघ काल  हंटिंग लॉजवर हल्ला चढवणारे तर नसावेत? गजेंद्रसिंहाने सगळ्यांना सावधपणे पुढे सरकण्याच्या सूचना दिल्या. मदनसिंहासह पूर्ण जथासावधगिरीने पावले टाकीत पुढे पुढे सरकू लागला. जथ्थ्यातील सगळे एकमेकांमध्ये शक्य तेवढे कमी अंतर ठेवून चमकणाऱ्या डोळ्यांच्या दिशेने सरकू लागले. परंतु काही वेळातच ते चमकणारे डोळे दिसेनासे झाले. त्यामुळे सगळ्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले. मघाशी ज्या ठिकाणी वाघ आहेत असा अंदाज होता, त्या ठिकाणाहून वाघ दिसेनासे झाले, मघाशी चमकणाऱ्या डोळ्यांच्या ठिकाणी आता काहीही दिसत नव्हते


गजेंद्रसिंहला वाटले हनुमान ठिब्याच्या मागून लपत छपत ते जथ्यावर हल्ला तर करणार नाहीत ना? क्षणभरच त्याच्या मनात हा विचार आला. एवढ्या मोठ्या जथ्यावर श्वापद हल्ला करणार नाही असे त्याला वाटले. जथा वाघांचे डोळे ज्या ठिकाणी चमकत होते त्या ठिकाणी पोहोचला, परंतु त्यांना वाघाच्या लिदीशिवाय तिथे काहीही नजरेला पडले नाही. अवतीभवती शोधाशोध करूनही त्यांच्या वाट्याला निराशा आली. जत्थ्याने पुन्हा हंटिंग लॉज कडे जाण्याचे ठरविले. हंटिंग लॉजवर पोहोचण्यास त्यांना उजाडणार होते


बरेच अंतर चालून झाल्यावर जत्थ्याला मघाशी हरणांचा कळप पाणी प्यायला ज्या झऱ्याकडे गेला होता तो झरा पुन्हा नजरेला पडलाउन्हाळा असल्यामुळे झरा आटल्यात  जमा होता. एका ठिकाणी थोडे पाणी शिल्लक असल्यामुळे जंगलातील वन्य श्वापदे तिथे आपली तहान भागविण्यासाठी येत. सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा वावर हमखास झऱ्याच्या भोवताली असेजथा झऱ्याच्या अगदी जवळ आला. त्याबरोबर तिथे आपल्या कुटुंबियांबरोबर दबा धरून बसलेले वाघाचे जोडपे एकदम सावध झाले आणि जत्थ्याच्या पुढे चालणाऱ्या एका सेवकावर दोन्ही वाघांनी झडप घालून त्याला खाली लोळवले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मागून येणारे लोक भयभीत झाले. ते मागे पळू लागले, पण मदनसिंह सावध होता. त्याने डोळ्यांचे पाते लवते लवते तोच आपली नवी बंदूक सावरून त्यातून दोन तीन फैरी वाघाच्या जोडप्यावर झाडल्या. बरोबर असणाऱ्या माणसांना सांभाळून, कमी प्रकाशात अचूक अंदाज घेऊन वाघावर निशाणा साधणे तसे अवघड होते. मदनसिंहाने झाडलेल्या दोन्ही फैरी वाया गेल्या, मात्र त्यामुळे वाघांची घाबरगुंडी उडून त्यांनी धूम ठोकली. त्यांच्या बरोबर त्यांचे दोन बच्चेही होते, हे नंतर लक्षात आले, कारण वाघाची जोडी जिकडे पळाली तिकडे हे बच्चे देखील जीव घेऊन पळत सुटले. क्षणार्धात दोन्ही वाघ झाडीत अदृश्य झाले, परंतु बच्चे त्यांच्या धावण्याच्या कमी वेगामुळे मागे पडले. त्यातल्या त्यात झऱ्याच्या कडेने धावताना एक बच्चा झऱ्याच्या पाण्यात पडला, त्यामुळे त्याचा धावण्याचा वेग अजून कमी झाला. तो पर्यंत मदनसिंह त्याच्या जवळ पोहोचला


त्याने त्या बच्याला चटकन उचलून घेतले. पाण्यात पडल्यामुळे ते बरेच भांबावले होते. मित्राकडे असलेल्या छिद्राच्या गोणपाटात मदनसिंहाने त्याला टाकले आणि ते गोणपाट सेवकाकडे दिले. पिल्लाचा मांजरीच्या पिल्लासारखा बारीक आवाज येत होता. दोन्ही वाघ पाहता पाहता निसटले. त्यामुळे जथ्यातली मंडळी बरीच नाराज झाली. त्यांनी हळहळ व्यक्त केली. मघाशी वाघाने हल्ला केलेला पुढच्या आघाडीतील सेवक बराच जखमी झाला होता. त्याच्यावर तातडीने उपचार करणे मदनसिंहाला गरजेचे वाटले, त्याने त्याला काही मित्रांसोबत पुढे पाठविलेकोंबड्याच्या मोठ्या पेटाऱ्यात वाघाच्या पिल्लाला हंटिंग लॉजवर ठेवण्यात आले. मुक्कामी आलेले राजवाड्यातील लोक आणि गावातली इतर मंडळी  गावाकडे परत फिरली. मदनसिंहाचा आजही राजवाड्यावर परतण्याचा विचार नव्हता, आजचा दिवस एकट्याने विश्रांती घ्यायची आणि त्या वाघांचा बंदोबस्त केल्याशिवाय परतायचे नाही असे मदनसिंहाने मनोमन ठरवले. त्याशिवाय त्याला स्वस्थता मिळणार नव्हती


दोन दिवसानंतर पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात चांगला फास अडकवून त्या दोन वाघांचा खातमा  करायचा असे मदनसिंहाच्या मनात होते. मदनसिंहाने तसा निरोप आपल्या मित्रांना, दशरथसिंहामार्फत कळविला. दशरथसिंहांबरोबर त्याने नरेशसिंहाला दुसऱ्या दिवशी लॉजवर मुक्कामी बोलावले. हंटिंग लॉज राजवाड्यापासून अवघे पांच मैलाच्या अंतरावर होते


दोन दिवस खाण्यापिण्यात, आरामात घालविल्यानंतर निर्धारित दिवशी राजघराण्यातली तरुण लॉजमधे संध्याकाळ होण्याची वाट पाहत होते. दरम्यानच्या काळात मदनसिंहाने पाणवठा असलेल्या झऱ्याच्या ठिकाणी एका मध्यम मोठ्या झाडावर मचाण बांधून घेतले होते. मचाणावर चार पाच जण आरामात बसू शकतील अशी त्याची मजबुती होती.


पूर्वेकडे चंद्रोदय होताच जंगल चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. संध्याकाळ टळून गेल्यामुळे हवेत गारवा आला होता. अद्याप पश्चिमेकडून येणारा वारा गरमच होता. हंटिंग लॉजच्या बाहेर तीन काठेवाडी, उमदे, पांढरे शुभ्र घोडे सज्ज ठेवण्यात आले होते. वाऱ्याशी स्पर्धा करणारे घोडे त्यांच्यावर टांग मारताच वायुवेगाने धावण्यास सज्ज होते. मदनसिंह त्याच्या मित्रांसह हातात बंदूक घेऊन लॉजच्या बाहेर आला, त्याच्या मागोमाग याचे मित्रही मोठ्या आत्मविश्वासाने लॉजच्या पायऱ्या उतरून त्यांच्या घोड्यांजवळ आले. मदनसिंहाने त्याच्या वरुण घोड्यावर थाप मारताच त्याने अंग शहारून त्याला प्रतिसाद दिला. मदनसिंहाबरोबरच दशरथसिंहने आणि नरेशसिंहने त्यांच्या घोड्यावर थाप मारून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. तिघेही आपल्या घोड्यावर स्वार होऊन नियोजित स्थळी पोहोचले. हे स्थळ अनुभवी गजेंद्रसिंहच्या सल्ल्याने निवडले गेले होते. गजेंद्रसिंह वाघाची शिकार करण्याकरिता अख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. त्याने एक भले मोठे बोकड आणून नियोजित स्थळाजवळ एका झाडाला बांधून ठेवले होते. त्या बोकडाचा दोर लांबलचक होता, ज्या योगे त्याला चरण्यासाठी मोठा परिसर उपलब्ध होईल, परंतु रात्रीच्या वेळी जंगलात असे एकटेच कां बांधून ठेवण्यात येत आहे हे बहुदा त्या बोकडाला समजले असावे, त्याचे चरण्यात  लक्ष नव्हते. त्याच्या डोळ्यांत भीती आणि करुणा सामावलेली स्पष्ट दिसत होती


चंद्र बराच वर आला होता. मदनसिंह त्याच्या नियोजित स्थळी पोहोचला. तिथे आधीपासून हजर असलेल्या सेवकांपैकी तिघांना त्यांनी त्यांचे घोडे हवाली केले तसे ते सेवक घोडयावर स्वार होऊन हंटिंग लॉज कडे रवाना झाले. मदनसिंह आणि त्याचे मित्र मचाणावर चढून स्थानापन्न झाले आणि परवाची  वाघाची जोडी बोकडाचा फडशा पाडण्यासाठी केव्हा येते याची वाट पाहू लागलेमध्यरात्र उलटून गेली होती, परंतु परिसरात काहीही हालचाल दिसत नव्हती. आपल्या आखीव योजनेला यश येते की नाही अशी शंका मदनसिंहाला येऊ लागली. चंद्र पश्चिमेच्या बाजूला झुकला होता. अजून तरी सगळीकडे शांतता होतीगजेंद्रसिंहच्या बोलण्यात असे आले की  जर जनावर तीन चार मैलाच्या परिसरात असेल तर ते बोकडाच्या वासाने जवळ येईल, अन्यथा नाही. ते आसपासच्या परिसरात नाही की काय अशी शंका मदनसिंहाच्या मनात आली. जर असे असेल तर आजचे प्रयत्न फोल ठरले असे म्हणावे लागेल


पहाट  झाली. मचाणावर रात्र काढून काहीच हातात पडले नाही. मदनसिंहाला पहिल्या दिवशी यश आले नाही म्हणून त्याची उभारी कमी झाली नाही. मचाणावरून उतरताना तो म्हणाला,”ठीक आहे ! आज रात्री पुन्हा हाच प्रयोग करू, त्यासाठी आज हंटिंग लॉजवर सगळे राहतील. दिवसभर खाऊ पिऊ, आराम करू आणि रात्री पुन्हा याच कामगिरीवर हजर  होऊ.” त्याच्या मित्रांनी त्याला संमती दर्शवली. सेवक त्यांचे घोडे घेऊन मचाणाखाली उभे होते. झाडावरून उतरून त्यांनी हंटिंग लॉज कडे कूच केली

दिवसभर भरपूर आराम झाल्यामुळे सगळे ताजेतवाने होते. मदनसिंह त्याच्या मित्रांसह आणि सेवकांसह पुन्हा कालच्या मचाणाकडे  रवाना झाला. सेवक त्वरेने परत फिरले आणि मदनसिंह  त्याच्या साथीदारांसह मचाणावर स्थानापन्न झाला. कालच्यापेक्षा आज हवेत गारवा वाढला होता. वातावरण उत्साहवर्धक होते. मचाणावर सगळे स्थानापन्न होतात होतात तोच त्यांना पश्चिमेकडील  टेकड्यांच्या मागून वाघाच्या डरकाळ्याकू येऊ लागल्या. डरकाळ्या थांबत नव्हत्या. काही वेळा त्या जवळ तर काही वेळा लांब ऐकू  येत होत्या. थोडा वेळ शांततेत गेला आणि पुन्हा डरकाळ्या कानांवर पडू लागल्या, यावेळी त्या बऱ्याच जवळ असल्याचा भास होत होता. मचाणावरील सगळे सज्ज होते. सगळ्यांची नजर खाली लांबच लांब दोराला बांधलेल्या बोकडावर होती. बोकड डरकाळ्यांनी भयभीत झालेले दिसत होते. ते थरथर कापत असल्यासारखे वाटत होतेचंद्राच्या प्रकाशात जंगल न्हाऊन निघाले होते, मशालीच्या उजेडाची गरज भासत नव्हती


इतक्यात झुडपावरून  लांब उडी घेऊन वाघ बोकडासमोर येऊन उभा राहिला. ती कदाचित मादी असावी. तिला मचाणावरील माणसांचा वास आल्यामुळे ती पुढे येण्यास धजावत नव्हती. तिच्या पाठोपाठ दुसरा वाघ ती होती त्या ठिकाणाहून तशीच उडी मारून आला. क्षणार्धात मदनसिंहाने बंदुकीच्या फैरी झाडल्या. अचूक नेमबाजी मुळे मादी जागीच कोसळली. दुसरा वाघ मदनसिंहाच्या बंदुकीच्या टप्यात आला, परंतु त्याला गोळी वर्मी लागल्यामुळे तो जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला. तो क्षणार्धात दिसेनासा झाला. मदनसिंहाच्या अंदाजाप्रमाणे त्याच्या जिव्हारी गोळ्या लागल्या असाव्या, पण तो त्या अवस्थेतही  निसटला. मदनसिंहाच्या मित्रांच्या अंदाजाप्रमाणे तो थोडे फार अंतर गेल्यावर कोसळला असावा आणि कदाचित गतप्राण झाला असावा. परंतु त्याचे नेमके काय झाले हे कळल्यामुळे कोणीही मचाणाच्या खाली उतरू नये असा निर्वाणीचा सल्ला मदनसिंहाने दिला आणि त्यांनी राहिलेली रात्र मचाणावर घालवली. वाघाच्या जोडप्याबरोबर असणारे दुसरे पिल्लू तिथेच घुटमळत होते, त्याने आपल्या मृत आईकडे जवळ जाऊन पाहिले आणि तिथेच चकरा मारणे पसंत केले. बोकडाच्या अंगावर एक ओरखडा देखील नव्हता


सकाळी मदनसिंह त्याच्या मित्रासह मचाणावरून उतरला. त्याने जखमी वाघाचा शोध घेण्याचे ठरवून वाघ ज्या दिशेने गेला होता तिकडे आपल्या मित्रासह कूच केले. घनदाट झाडीमध्ये शोधाशोध केल्यानंतर बऱ्याच वेळाने त्यांना तो वाघ मृत झालेला आढळला. काही जणांनी वाघाजवळ जाऊन तो जिवंत तर नाही ना  याची खातरजमा करून घेतली आणि सगळे मचाणाकडे निघाले


एव्हाना सेवक घोडे घेऊन हजर झाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर सावज घेरल्याचा आनंद होता. आठ दिवस रात्रंदिवस केलेल्या मेहनतीला यश आले होते, यात मदनसिंहाचा सिंहाचा वाटा होता. वाघाचे पिल्लू या धामधुमीत पार भेदरून गेले होते. ते एका झुडपामागे लपून बसले. सगळ्यांनी त्याची शोधाशोध करून त्याला हुडकून काढले, पण त्याच्या जवळ जाताच ते लांब पळून गेले. त्याच्याशी स्पर्धा करण्यात कोणीच तरबेज नव्हते. शेवटी दशरथसिंहने त्याला मोठ्या शिताफीने पकडून त्याला छिद्राच्या गोणपाटात टाकले आणि सगळ्यांनी हंटिंग लॉजकडे  कूच केलेदुपारी राजधानीतले बरेच हौशी स्त्री, पुरुष वाहनांनी मचाण होते तिथे आले. संध्याकाळी सेवक ठार मारलेल्या वाघांना घेऊन राजधानीत पोहोचले


मदनसिंह दोन वाघाच्या पिल्लांच्या संगोपनामध्ये व्यग्र असायचा. पहिल्या दोन तीन दिवशी  पिल्लांनी कशालाही तोंड लावले नाही. माणसे पाहिली की ती लपून बसायची, पण चौथ्या दिवशी त्यांना बकरीचे दूध पाजण्यात मदनसिंहाला यश आले. मांजर अथवा मांजरीची पिल्ले त्यांना पाहून लांब पळून जात असत. एवढेच काय, राजवाड्यातल्या सेविका देखील त्यांना घाबरून एका बाजूला होतपरंतु  थोड्या दिवसातच राजवाड्यातल्या सगळ्यांना त्यांची सवय झाली. कुत्र्यांचे भुंकणेकून मात्र पिल्ले अजूनही भयभीत होत होती. किंबहुना, कुत्री दिसली की  पिल्ले कुठल्या तरी आडोशाला जाऊन बसत. काही दिवसानंतर त्यांची भीती कमी झाली


मदनसिंहाने हौसेने त्यांची नावे राम आणि लक्ष्मण ठेवली. आपापसात दंगामस्ती, सेवकांबरोबर मस्ती करण्यात त्यांचा बराच वेळ जात असे. मदनसिंहाने त्यांना मोठ्या निग्रहाने मांसाहारी अन्न द्यायचे नाही असे ठरवले होते

पाहता पाहता बछड्यांची जोडी बरीच मोठी झाली. पहिल्यांदा त्यांना पाहणारी व्यक्ती भिऊन दोन पावले मागे सरकत. बछडे एखाद्या अनोळखी माणसाकडे जाऊ लागली म्हणजे त्या माणसाची भंबेरी उडे. दरबारातल्या बहुतेकांना त्यांची सवय झाली होती. मदनसिंह कधी कधी त्यांना घेऊन मुख्य रस्त्यावरून चालू लागल्यास पाहणाऱ्यांची गर्दी उडे. कुत्री त्यांच्यावर लांबून भुंकत, पण त्याचा फारसा परिणाम जोडीवर होत नसे. त्यामानाने बछडे बरेच माणसाळले होते. एखादे वेळी त्यांच्यातली जन्मतः असलेली हिंस्त्र प्रवृत्ती उफाळून येई, अशा वेळी त्यांच्याबरोबर कसा व्यवहार करायचा हे मदनसिंहाला चांगले माहित होते, तो त्यांना थोड्याच वेळात शांत करी


काही दिवसानंतर बछड्यांच्या जोडीला हवेलीमधल्या एका हॉलमधून बाहेर येण्यास बंदी करण्यात आली. कारण त्यांच्या वागणुकीत नैसर्गिक क्रूरतेची वाढ झाल्याचे जाणवू लागले होते. ते आता पूर्ण वाढ झालेल्या वाघाएवढे दिसत होते, त्यामुळे मदनसिंह अलीकडे त्यांना जंगलात सोडून देण्याचा गंभीरपणे विचार करीत होता.




Comments

Popular posts from this blog

हरवले ते गवसले तेव्हा

व्हर्च्युअल शाळेचे इ-विद्यार्थी