गतधवा



डॉ. वैजयंती गोविंद असोलकर नागपूर

नागपूरला एका महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांमध्ये विज्ञानविषयक व इतरही विपुल लेखन केले आहे. 'द हितवाद' ह्या वर्तमानपत्रातील ‘ट्विंकल स्टार’ ह्या पुरवणीत 'फिजिक्स कॉर्नर' हे त्यांचे सदर जवळपास अडीच वर्षे फार लोकप्रिय होते. प्रवास, फोटोग्राफी (प्रकाशचित्रण), वाचन, संगीत, आणि सिनेमा हे त्यांच्या आवडीचे इतर विषय आहेत


ती दुरून दिसली, तेव्हा अचानक लक्षात आलं की तिच्याकडे समाचाराला जायचं राहूनच गेलं. फार ओळख नव्हती पण वाटेत भेट झाली तर दोन मिनिटं थांबून थोडं बोलणं व्हावं इतपत माहिती होती. तिच्या हातात नेहमीसारख्या दोन मोठ्या कापडी पिशव्या होत्या आणि ती झपाझप चालत माझ्या दिशेनंच येऊ लागली. मी थांबलेच मग

तिनं गाठलंच मला आणि नेहमीसारखी तोंडभर हसून म्हणाली, “'कश्या आहात? किती दिवसानंतर भेट झाली आपली!” मी थोडावेळ गप्प राहिले आणि मग तिला म्हणाले, "मला कळालं, पण येता नाही आलं. आमच्याकडे वृद्धी होती तेव्हा, आणि पुढे लगेचच बारसं, त्यात राहूनच गेलं." तिनं फारसं मनावर न घेता उत्साहानं म्हटलं, “चला ना घरी, पलीकडेच राहते मी. तुमची भाजी घ्यायची राहिली असेल तर आहे ना मी सोबत! आणि पायी आला असाल तर मी धरते तुमच्या पिशव्या. माझा ठरलेला रिक्षावाला तुम्हाला घरी सोडून देईल आणि भाडं पण नाही घेणार तुमच्याकडून.” 

मला थोडं विचित्र वाटू लागलं पण ती फार आग्रह करू लागली. मग सोबत जावंच लागलं. 

तिनं घर फार छान नीटनेटकं ठेवलेलं होतं. तिनं हातपाय धुवून कपडे बदलले, आणि देवाजवळ एक चंदनाची उदबत्ती लावली. मग माझ्याकडे बघून म्हणाली, "चहा टाकते, माझापण राहिलाच आहे." 

चहा तिनं छान ट्रे मधून आणला, सोबत खारी, कुकीज आणि मठरी. मग चहाचा कप तोंडाला लावत म्हणाली, “मागे तुम्ही मला घरी सोडलं होतं ना, तेव्हा किती पसारा होता घरात! आता अगदी मोजकंच सामान ठेवलं आहे एकट्यापुरतं. ज्याला जे हवं ते घेऊन जा म्हणून सांगितलं. जे काही लागेल असं वाटलं, ते नव्यानं विकत घेतलं.” 

"हो, आपण खूप गोष्टी जमवतो. संसार म्हटलं की लागतंच," मी तिला बरं वाटावं म्हणून म्हणाले खरी, पण मला दिसत होतं की ती आता शांत, निवांत आणि मजेत आहे. परिस्थिती स्वीकारून नीट राहते आहे. “बरं, आता निघायला हवं मला. चहा फार छान केला होतात तुम्ही,” मी म्हणाले आणि उठलेच. 

“तुम्हाला वाटेल, नवरा मेला तरी ही इतकी मजेत कशी? तर खरं सांगू का, मला आता काही वाटत नाही. इतकी वर्षं मी इतकं सहन केलं, नको नको ते ऐकलं. सगळे माझ्या विरोधात गेले, माझ्या तब्येतीचं वाटोळं झालं, पण जगलेच हो मी! आणि माझा नवरा, इतका तगडा गडी, अगदी तोंडात पाणी न पडता प्राण गेले हो त्यांचे. आणि माझा धाकटा दीर तर म्हणाला की हिला रांडमास आलं! दादा ऐवजी हीच का नाही टपकली? नुसती रोगट आणि चिपडी होती ही, आणि आता कशी चकाकी येतेय चेहऱ्यावर, अंगावर मास चढतंय!.... पण काय करू हो, जगले मी!” 

मला हे ऐकून धक्काच बसला. काय बोलावं, सुचेना. मग मी म्हणाले, “इतर काय म्हणतात त्याचा घोर नका लावून घेऊ जिवाला. हळूहळू होईल सर्व सुरळीत.” तिचे खर्च कसे चालतात, असं मनात आलं पण विचारलं नाही. नवऱ्यानं राहतं घर सोडलं तर सगळं फुंकून टाकलं होतं, असं कानावर आलं होतं. 

मग ती दारापर्यंत आली. तिला काहीतरी खूप, आतून बोलायचं होतं असं वाटलं, आणि तसंच झालं. तिनं माझं मनगट अलगद धरलं आणि म्हणाली "तुम्हाला वाटेल, ही काय बोलतेय, हिचं डोकंबिकं फिरलं की काय? पण खरं सांगते, अहो, मला खूप शांत वाटतं आता. रोजचे टोमणे नाहीत, मारहाण नाही. आता दोन वेळ शांतपणे आवडीप्रमाणे चहा करून पिते, शांतपणे स्वतःच्या आवडीच्या, चवीच्या भाज्या करून जेवते. भातुकलीसारखा स्वयंपाक असतो माझा, पण तेव्हढा वेळ बरा जातो. बाजारात दिवसाआड जाते, भाजी आणते, थोडंथोडं वाणसामान आणते. निभतंय." मला काय बोलावं, सुचेना. हात तिनं तसाच धरून ठेवला होता. तिच्या हातात काकणं नव्हती, सोन्याच्या दोन दोन बांगड्या होत्या. 

"तुम्ही आता म्हणाल, माझे खर्च कसे चालतात? तर देवाला डोळे!" तिनं आकाशाकडे बघून हात जोडले. "कुठल्यातरी वारसाहक्कानं एक शेतीचा तुकडा मिळणार होता आईच्या वाटचा. तर मामेभाऊ म्हणाला, तुला नको असेल तर आम्हालाच वीक, आम्ही तुला बाजारभावाइतकेच पैसे देऊ. तर मग त्यांना हवं तिथं सह्या केल्या, आणि त्यांनी पैसे बँकेत जमा केलेत. भरपूर आहेत. महिन्याचं व्याज खाऊन संपत नाही, तोवर दुसऱ्या महिन्याचं व्याज जमा झालेलं असतं." 

"मुलं-सुना, जावई-मुलगी आले होते का? राहिले का दिवस होईपर्यंत?" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलले.

"धाकटा आला होता, तो माझा आहे. मला दुसरेपणावर दिली ना! मोठा मुलगा, आणि त्याच्यापाठची मुलगी आधीच्या बायकोपासून आहे. तुम्हाला कधी लक्षात नसेल आलं. मी कधीच भेदभाव नाही केला, उलट धाकट्याला जरा कमीच केलं, लोकांनी बोलू नये म्हणून," ती बोलत राहिली. "दिवसांचा सगळा खर्च आणि तजविजी धाकट्यानंच केल्या. आता तो मला दर महिन्याला मोठी रक्कम पाठवतो. मोठ्या भावाबहिणीचा मान राखतो. मी त्याच्या पैशाला हात लावत नाही, मला माझा पुरेसा पैसा आहे आता. माझा पैसा माझ्यानंतर तिघांना सारखा मिळेल असं बँकेत लिहून दिलंय... आणि धाकट्यानं पाठवलेला सगळा पैसा त्याला परत मिळेल. व्याजासकट. त्याचा पैसा त्याला." 

"मी निघते आता, उशीर झाला," मी म्हणाले. समोर एक रिक्षा येऊन उभी राहिली. तिनं माझ्या पिशव्या दारापर्यंत आणल्याच होत्या. रिक्षेवाल्यानं त्या रिक्षात ठेवल्या आणि रिक्षा वळवली. 

"तुम्ही आलात, खूप बरं वाटलं जिवाला. सगळीकडून हिडीसफिडीस होत असायची मला नेहमी. आता एकटेपणा बरा वाटतो." ती मनापासून म्हणाली. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं आणि तिनं आतापावेतो घट्ट धरून ठेवलेला माझा हात सोडून दिला.




Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

सूर्य जवाहिऱ्या