पुरणपोळी

शारदा ग. सबनीस

होळी आली की पुरणपोळीची आठवण येते. लहान असताना आईला पुरणपोळी करताना पहात असे. तिच्या त्या पुरीसारख्या फुगणाऱ्या पोळ्या पाहून मजा वाटे आणि मला अशी करता येईल का असा प्रश्न मनात येत असे. शाळेत जायला लागल्यानंतर पुरणाने भरून पिठाचा गोळा करण्याचे काम माझे असे. पुरण मऊसूत झाले की पोळ्या छान होतात हे वाक्य कायम ऐकत आले आहे.

त्याकाळी पुरण पाट्यावर वाटत असत. आता यू-ट्यूब वर खूप काही पहायला आणि शिकायला मिळते. माझ्या संसारात सुरवातीला आम्हा दोघांसाठी, नंतर मुलांसाठी आणि आता परत आम्हा दोघांसाठी पुरणपोळी करताना जुन्या आठवणी दाटून येतात. अजूनही डाळ शिजवताना शंका मनात डोकावतात. असो!

सामान

एक वाटी (तत्सम माप) चणा डाळ
एक ते दीड वाटी किसलेला गूळ
एक ते दीड वाटी मैदा पीठ
अर्धा चमचा वेलची पावडर
अर्धा चमचा हळद, डाळीत घालायला
अर्धा चमचा मीठ, पिठात घालायला

कृती:

१. डाळ निवडून आणि दोन तीन वेळा धुवून घेणे. प्रेशर कुकरमध्ये धुतलेली डाळ आणि त्यात हळद (हवी असल्यास) घालणे. कोणी थोडे मीठही घालतात. त्यात ३ वाट्या गरम/कडकडीत पाणी घालून ५-७ शिट्या झाल्यावर कुकर बंद करणे. प्रत्येक घरी शिजण्यासाठी शिट्यांचे प्रमाण वेगळे असू शकते. झाकण काढल्यावर डाळ गाळून घेणे. गाळलेले पाणी आमटी (कटाची आमटी) करत असल्यास ठेवणे. डाळ परत कूकरमध्ये घालणे आणि त्यात गूळ घालून मंद विस्तवावर ढवळत राहणे आणि पोटॅटो मॅशरनेने मॅश करत राहणे. डाळीचे दाणे राहू देऊ नये. त्यात वेलचीपूड घालून गोळा होईपर्यत ढवळत राहणे. डाऊल पुरणात उभे राहिले की पुरण तयार झाले समजावे.

२. मैद्यात मीठ आणि दोन तीन चमचे तेल घालून पाण्याने मळून घेणे. पिठाचा गोळा मऊ आणि लवचिक झाला पाहिजे. गोळा झाल्यावर त्यात वरून तेल घालून मळत रहाणे. पिठाचा गोळा तेल शोषून घेईल. जास्त तेलाने पोळ्या मऊ होतात. गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करण्याची पद्धत आहे पण मला मैद्याच्या पिठाच्या पोळ्या जास्त मऊसूत होतात म्हणून आवडतात.

३. पुरणाचा गोळा पिठात भरून तांदळाच्या पिठावर लाटणे. गोळा गव्हाच्या पिठावर लाटल्यास पोळी कडक होते. गोळ्याचे तोंड पूर्णपणे बंद झाले पाहिजे. (ही कृती मोदक भरतो तशीच करणे). पोळी कोणी कागदावर लाटतात तर कोणी पोळपाटावर लाटतात.

४. मंद आचेवर, सपाट तव्यावर किंवा नॉनस्टिक तव्यावर पोळी भाजणे. काही गृहिणी तव्यावरच पोळीला तूप लावून चौपदरी घडी करतात तर काही तशीच पोळीच्या डब्यात ठेवतात. तुम्हा सुगरणींची आपापली पद्धत असेल. मात्र पुरण मऊसूत होणे हे उत्तम पुरणपोळीचे मर्म आहे!

Happy Belated Holi!

Comments

Popular posts from this blog

सूर्य जवाहिऱ्या

गाईड