छान

सौ. श्रीया दीक्षित-नाचरे, पुणे

भारतीय विद्या पारंगत,
मोडी लिपी वाचक-शिक्षक व अभ्यासक
shreeyanachare@gmail.com
सदर लेख ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झाला होता.

छान म्हणजे काय? हा काय प्रश्न झाला? प्रश्नाचं उत्तर सोपं आहे! छान म्हणजे छान, मस्त, उत्तम इ. हो ना? छान हा शब्द आपण एखादी गोष्ट कशी चांगली आहे हे सांगण्यासाठी वापरतो. पण मग त्यात सांगण्यासारखं किंवा लिहिण्यासारखं काय आहे?

सांगते. लिहिण्याचं कारण असं की एखाद्या शब्दाचा अगदी वेगळाच अर्थ असतो वा असू शकतो हे आपल्या गावीच नसतं किंवा एखादा शब्द एका ठराविक अर्थासाठी इतका गृहीत धरलेला असतो की या शब्दाचा काही वेगळा अर्थ असू शकतो याची आपण कल्पनाही केलेली नसते. या 'छान'बद्दल माझंही असंच झालं.

बरेचदा जुनी पुस्तकं वाचताना त्यातील भाषा, शब्द मराठी असूनही खूप वेगळ्या प्रकारे आणि अर्थाने वापरलेले आपल्याला दिसतात. मोडी लिपितील कागदपत्रांचे वाचन करताना तर मला हा प्रत्यय वारंवार येतो. पण छान या शब्दाचे एकच नाही तर दोन-तीन वेगवेगळे अर्थ पाहून मला फारच गंमत वाटली.

झालं असं की एक जुनं म्हणजे साधारण १९३०च्या सुमारास लिहिलेलं पुस्तक वाचत होते. त्यामधे छान हा शब्द चक्क खुलासा अथवा स्पष्टीकरण देणे या अर्थाने वापरलेला होता. दुसऱ्या एका ठिकाणी तो एखाद्या गोष्टीची व्यवस्था अथवा तोपर्यंत चालू असलेली रुढ पद्धत याही अर्थी वापरलेला होता. आहे की नाही गंमत!

याचा थोड्या वेगळ्या प्रकारे विचार करुन पाहूया. म्हणजे जर आपण कोणाला विचारत असू की तुमच्याकडची पद्धत काय आहे? त्या ऐवजी आपण त्या व्यक्तीला 'तुमच्याकडची छान काय आहे?' असं म्हणालो तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काय भाव उमटतील याचा विचार करुन मौज वाटली. तसेच घरी उशिरा आलेल्या मुलांना आईने रागावून संगितले की 'तुला यायला उशीर का झाला याची प्रथम छान कर पाहू!’ यावर मुलांची प्रतिक्रिया 'आईला काय झालंय?' या अर्थाची वा तशीच काहीतरी असेल. रागावून अद्वातद्वा बोलणाऱ्या व्यक्तीला समोरची व्यक्ती जर ‘ही काय तुमची बोलायची छान आहे?’ असं म्हणाली तर राग विसरुन ती व्यक्ती 'छान'चा छानसा अर्थ शोधल्या किंवा विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

असाच एक शब्द जरा वेगळ्या अर्थी वापरलेला दिसला, तो म्हणजे 'तैनात'. मूळ फार्सी असलेला हा शब्द मराठीत अनेक अर्थांनी वापरलेला दिसून येतो. नियुक्ती, स्वाधीन, सेवेत असणे वा नोकरीत असणे या अर्थी वापरलेला पाहायला मिळतो.

काही दिवसांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या शिष्यांना लिहिलेली काही पत्रं वाचनात आली. त्यामध्ये या तैनात चा थोड्या वेगळ्या अर्थाने वापर केलेला दिसला. तो अर्थ म्हणजे आज्ञा. त्यांच्या शिष्यांंना उद्देशून ते म्हणतात, ‘अमुक अमुक गोष्ट तुम्ही करावी ही माझी तुम्हाला 'तैनात' आहे.’ सुरुवातीला इंग्रजांकडे असणाऱ्या फौजेला तैनाती फौज म्हटले जायचे त्यामध्ये हा अर्थच अंतर्भूत असावा असं वाटतं.

एकाच शब्दाचे असे वेगवेगळे अर्थ अभ्यासताना एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे भाषा मराठीच, पण त्या त्या काळात शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेले दिसतात. मोडीत लिहिलेल्या कागदांतून वारंवार येणारा असाच एक शब्द म्हणजे 'सुमारे'. सुमारे हा शब्द आपण आज ढोबळमानाने किंवा साधारण अशा अर्थी वापरतो. पण हाच शब्द त्यावेळी ‘exact’ या म्हणजे आजच्या अर्थाच्या सपशेल विरुद्ध अर्थाने वापरलेला असतो.

आपल्या पिढीपर्यंच्या लोकांना 'छटाक' हा शब्द परिचयाचा आहे. भाजी बाजारात, वाण्याच्या दुकानात, निदान लहानपणी छटाक हा शब्द आपण वापरलेला आहे. काय आहे हा छटाक? तर छटाक मधला टाक म्हणजे पूर्वीचे वजनाचे परिमाण असून छ म्हणजे छह -६ आहे. त्याचा अर्थ एक वजन असा असला तरी त्या शब्दाची छान (उकल/ स्पष्टीकरण) किती मनोरंजक आहे नाही!

तर अश्या शब्दांच्या गमती जमती, त्यांचे वेगवेगळे अर्थ, त्यांचे मूळ रूप, हे सर्व पाहिलं की वाटतं आपण रोज जी भाषा बोलतो, आपले सर्व व्यवहार ज्या भाषेत करतो ती भाषा खरंच आपल्याला किती माहीत आहे? काळाच्या ओघात बदलणारे शब्दांचे अर्थ अभ्यासण्ं ही भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास होणं ही एक महत्त्वाची पण अगदी सहज, हसत खेळत होणारी प्रक्रिया आहे.

ज्ञानेश्वरी वाचताना आपण अनेकदा सहज म्हणून जातो की त्या काळाची मराठी आपल्याला समजत नाही किंवा खूप प्रयत्न करुन ती समजावून घ्यावी लागते. याचं कारण हेच आहे की त्या काळात वापरले जाणारे शब्द आज आपल्या परीचयाचे नसतात. आपल्याला त्यांचे अर्थ माहिती नसतात आणि याचमुळे भाषेतील शब्दसंख्या कमी कमी होत जाते. शब्दसंख्या कमी होत गेली की ती भाषा आपोआप नामशेष व्हायच्या मार्गावर जाते.

कोणतीही भाषा काळाच्या ओघात किती टिकू शकेल हे त्या भाषेत असणाऱ्या शब्दसंख्येवर अवलंबून असतं. त्यामुळे आपली भाषा जास्तीतजास्त काळ टिकवायची असेल तर शब्दांचा वेगवेगळ्या अर्थांसह वापर होणं फार गरजेचं आहे. थोडा विचार करुन पहा...तुम्हालाही असे अनेक शब्द आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ सहज सापडतील. प्रयत्न करुन तर बघा!

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

सूर्य जवाहिऱ्या