तिघं



मूळ तेलुगू कथा -
रवी कोप्परपु
अनुवाद - वरदा वैद्य

प्रतिलिपी संकेतस्थळावरील ‘1K स्टोरी चॅलेंज’ स्पर्धेमध्ये मूळ कथा बक्षिसपात्र ठरली.
मूळ कथा सर्वप्रथम मेरीलँड तेलुगू संघाच्या पत्रिकेमध्ये प्रकाशित झाली होती.

परवा माझी बायको म्हणाली, “पुढच्या शनिवारी आपल्याला मिश्राकडे जायचं आहे. पॉटलक आहे. आपल्याला काहीतरी न्यावं लागणार आहे. कोणता पदार्थ नेऊ या?” मला स्वयंपाकातलं फार काही कळतं म्हणून तिने मला हा प्रश्न विचारला नव्हता तर ह्याप्रश्नामागचं कारण वेगळंच होतं. मी मूळचा दक्षिण भारतीय आणि आम्ही एका उत्तर भारतीयांच्या घरी जाणार होतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत मी जरा चोखंदळ, बायकोच्या भाषेत खाण्यापिण्याचे नखरे असणारा, असल्यामुळे तिथे इतरांनी आणलेले पदार्थ मला आवडले असतेच वा मी ते खाऊ शकलो असतोच असं नाही. मग अशा वेळी माझ्या बायकोने केलेला माझ्या आवडीचा पदार्थ बरोबर असला की मला पार्टीत उपाशी राहण्याची वेळ येत नाही. तर हे ते कारण.

“कोणत्यातरी प्रकारचा भात कर. किंवा खिचडी कर,” मी म्हणालो. माझी बायकोही उत्तर भारतीयच आहे, पण माझ्या दक्षिणी जिभेला रूचेलसा स्वयंपाक करणं तिला जमतं. तिने केलेली खिचडी माझ्या फार आवडीची. त्यामुळे खिचडी नेली की मला काही त्रासच नाही!

“आणखी कोणकोण येणार आहे?” मी विचारलं.

“अं… नवीनच्या घरातली मंडळी, नंदिनीचं कुटुंब, उषाच्या घरचे लोक आणि… हां, कोणी नवं कुटुंब आलंय राहायला ह्या भागात म्हणे. रतन कुलकर्णी आणि त्याची बायको. एवढ्यातच आलेत. तो कोणत्यातरी शासकीय विभागात कॉन्ट्रॅक्टर…..”

ती काहीतरी सांगत होती, पण मी मात्र ‘रतन कुलकर्णी’ नावापाशीच अडकलो होतो. रतन आणि इथे? बावीस वर्षं झाली आणि अचानक रतन इथे? रतनपाठोपाठ मला अर्थात समायरा आठवलीच आणि तिच्या नावापाठोपाठ माझ्या चेहऱ्यावर हसूही उमटलंच. ते माझ्या बायकोच्या नजरेतून अर्थातच सुटलं नाही.

“काय झालं?” तिने विचारलं.

मी दीर्घ उसासा सोडत म्हणालो,

“रतन कुलकर्णी नावाचा एक जण माझ्या ओळखीचा होता. बावीस वर्षांपूर्वी. तुझी-माझी भेट तेव्हा झालेली नव्हती. मास्टर्स डिग्री प्रोग्रॅमसाठी म्हणून मी वेगवेगळ्या संस्थांना भेट देत होतो. तेव्हा आयआयटी कानपूरला गेलो होतो. तेव्हा मला कानपूरच्या ट्रेनमध्ये एक रतन कुलकर्णी भेटला होता. तोही तिथे परीक्षेसाठी निघाला होता. आता हा तोच रतन आहे की वेगळा, कुणास ठाऊक!”

“मिश्राची बायको म्हणत होती की हा आयआयटीवाला आहे म्हणून. कदाचित तोच असेल मग... ” माझ्या हातात कॉफीचा कप देत बायको म्हणाली. आम्ही दोघं सोफ्यावर कॉफी पीत बसलो.

“त्यावेळी माझी समायराशीही ओळख झाली होती. ती, मी आणि रतन. आम्ही तिघांनी कानपूर आयआयटीत मजा केली होती. चांगली मैत्री झाली होती आमची. पण मग नंतर विशेष संपर्क राहिला नाही,” मी पुढे म्हणालो.

“आलं लक्षात माझ्या. आता ही समायरा म्हणजे तुझ्या अनेक गर्लफ्रेंडांपैकी एक असणार, बरोबर?” बायको म्हणाली.

मी हसत म्हणालो, “तू चांगली गुप्तहेर आहेस!”

“त्यात गुप्तहेरगिरी करण्याइतकं काहीच नाही. सहज अंदाज लावता आला मला. आता तुझ्या ह्या गोष्टी मला माहीत झाल्या आहेत. बरं, मग काय झालं त्या समायराचं?” तिने विचारलं.

“नंतर सांगतो, मुलं मधेमधे करतील नाहीतर तेवढ्यात,” मी म्हणालो. “मुलं टीव्ही बघताहेत आणि त्यांचं नुकतंच खाऊन झालंय. तू कर सुरू..” ती म्हणाली आणि गोष्ट ऐकायला सरसावून बसली.

माझ्या मूळ गावी माझं बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर मी आणि माझ्या काही मित्रांनी पुढे उच्चशिक्षणासाठी देशभरातल्या विविध संस्थांच्या प्रवेश परीक्षा द्यायला सुरुवात केली. त्यातच आयआयटी कानपूरसाठीची परीक्षाही होती. कानपूरला जाऊन लेखी परीक्षा द्यावी लागणार होती, म्हणून आम्ही ट्रेनची तिकिटं काढली. आमच्या मित्रांमध्ये मोतीरामही होता. मोतीराम मुळचा मारवाडी. तरी आमच्या गावात राहून त्याला तेलुगू थोडीफार यायला लागली होती. शिवाय त्याला हिंदी चांगलं बोलता यायचं, त्यामुळे प्रवासात भाषेची अडचण येणार नाही असं आम्हाला वाटत होतं. मला इंग्लिशमध्ये बोलायला काहीच अडचण नव्हती, हिंदीही थोडीफार येत होती, पण माझं हिंदी आणि मोतीरामचं तेलुगू एकाच पातळीवर होतं. तर असे आम्ही कानपूरच्या ट्रेनमध्ये बसलो.

कानपूरला पोहोचायला दीड-दोन दिवसांचा प्रवास होता. आम्हा मित्रांचा प्रवास हसतखिदळत सुरू होता. प्रवासात मजा येत होती. जेव्हा ट्रेन मध्यप्रदेशात कुठल्याश्या मोठ्या स्टेशनात थांबली तेव्हा विद्यार्थ्यांचा एक घोळका आमच्या बोगीत चढला. आम्ही त्यांच्याकडे आणि त्यांनी आमच्याकडे काही विशेष लक्ष दिलं नाही. ती मुलं दुसऱ्या कम्पार्टमेंटमध्ये जाऊन बसली. आणखी दोन स्टेशनं गेल्यावर तीन-चार मुलींचा एक घोळका आमच्या डब्यात चढला आणि नेमका आमच्या समोरच्या बर्थवर स्थानापन्न झाला. त्यांचं बोलणं ऐकल्यावर आमच्या लक्षात आलं की त्याही कानपूरलाच निघाल्या आहेत आणि त्याही आयआयटीची परीक्षा देणार आहेत.

माकडाला केळं किंवा नारळ मिळाल्यावर कसा आनंद होईल, आणि ते त्याचं काय करेल काही सांगता येत नाही, तशी आमची अवस्था झाली होती. ह्या सुस्वभावी सुंदऱ्याही नेमक्या आम्हाला जायचं होतं तिथेच निघाल्या होत्या आणि त्यांच्यासोबत आम्हाला आख्खा एक-दीड दिवस घालवायला मिळणार होता! अर्थात नुसत्या मानसिक गुदगुल्या उपयोगाच्या नव्हता. त्यांच्याशी बोलण्याचं धाडसही करावं लागणार होतं. मोतीराम सोडला तर फाडफाड हिंदी बोलू शकणारं आमच्यात बाकी कोणीच नव्हतं. मला इंग्लिश बोलता येत असलं तरी अनोळखी मुलींवर माझ्या इंग्लिशचे प्रयोग मी कधी केले नव्हते. तेव्हा कसं बोलावं हा प्रश्नच होता.

आम्ही काय आणि कसं करावं वगैरे आपापसात चर्चा करत असताना आधी डब्यात चढलेला विद्यार्थ्यांचा तो घोळका त्या मुलींशी बोलायला आला. थोडक्यात आता माकडांच्या दोन टोळ्या एकाच फळासाठी भांडणार होत्या तर! त्यात ह्या दुसऱ्या टोळीतल्या माकडांना हिंदी चांगलंच येत असल्यामुळे ओळख करून घ्यायला आणि बडबड करायला त्यांना कोणतीच अडचण नव्हती. त्यामुळे मनातल्या मनात मत्सराने धुमसत त्यांचा संवाद ऐकण्यापलीकडे आमची टोळी काही करू शकत नव्हती. मोतीरामने मात्र हार खायची नाही असं ठरवलं. एकाच वेळी त्याच्या धाडसाचं कौतुक आणि त्याच्या मूर्खपणाची भीतीही आम्हाला वाटली. तो त्या मुलींशी बोलायला म्हणून गेला खरा, पण तो तिथे आला आहे हे त्या मुलांमुलींच्या लक्षातही आलं नाही. त्यांची आपापसात चेष्टामस्करी चालू होती. तो काहीतरी बोलायला गेला तर एक मुलगी म्हणाली, “आम्हाला नकोय!” मोतीरामला काही अर्थच लागेना. काहीतरी विकायला आलेला कोणी फेरीवाला असेल अशी त्यांची समजूत झाली असणार. शेवटी तो हार पत्करून परत आला. त्याचं सांत्वन तर सोडाच उलट आम्ही त्याची चेष्टाच करायला लागलो. “बोलून बोलून घसा कोरडा पडला असेल रे त्याचा, कोणी पाणी द्या रे त्याला!” वगैरे पाचकळपणा करून झाल्यावर बाकी करायला काहीच नाही म्हणून मी थोडावेळ डब्याच्या दारापाशी मोकळ्या हवेत उभं राहायला गेलो.

त्या मुलांच्या टोळीतला एक मुलगा आधीच तिथे उभा होता. आम्ही एकमेकांकडे पाहून मान हलवली. त्याने त्याची ओळख सांगितली - रतन कुलकर्णी. त्यालाही सगळ्या गदारोळापासून थोडी शांतता हवी होती. आम्ही एकमेकांशी बोलत थोडा वेळ उभे राहिलो. एकूण चांगला मुलगा असावा असं वाटलं.

दारात तासभर बोलत उभं राहिल्यावर पाय दुखायला लागले म्हणून आम्ही रतनच्या बर्थपाशी गेलो. आमच्या गप्पा सुरूच होत्या. तेव्हढ्यात मंजुळ आवाजात कोणीतरी म्हणालं, “एक्स्क्यूज मी, ये मेरी सीट है.” एक मुलगी तिथे उभी होती. तिने हातातल्या दोन ब्यागा खाली ठेवल्या आणि चेहऱ्यावर आलेले केस मागे सारले तेव्हा आम्हाला तिचा पूर्ण चेहरा दिसला. एखाद्या सिनेमाची हिरोईन शोभावी अशी दिसत होती ती. चांदोबा मासिकातल्या चित्रात असतात ना तसे मोठे बोलके डोळे, वगैरे. तिचे केसही जणू तिच्या चेहऱ्याकडे ओढले जात असावेत!! मी तिच्या जागेवर बसलो आहे हे लक्षात आल्यावर मी उठलो. तिला सॉरी म्हणालो आणि तिच्या ब्यागा वर ठेवण्यासाठी मदत करू का असं विचारलं. आमचं आधीचं बोलणं तिने बहुधा ऐकलं असावं, कारण आम्ही आयआयटी कानपूरला चाललो आहोत का असं तिने आम्हाला विचारलं. आम्ही हो म्हटल्यावर तीही तिथेच निघाली आहे म्हणत तिनेही आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

तिचं नाव समायरा गुप्ता. आम्ही परीक्षेचा फॉरमॅट, परीक्षेसाठी तयारी कशी केली, कोणाला काय काय आवडतं, छंद, सिनेमा, वगैरे बोलत बसलो. एकूण आम्हा तिघांमध्ये बऱ्याच सारख्या गोष्टी आहेत, आमचे विचार जुळतात असं आमच्या लक्षात आलं. थोड्या वेळाने मी माझा जेवणाचा डबा घेऊन पुन्हा त्या दोघांशी बोलायला गेलो. त्यांनीही त्यांचे डबे काढले आणि आम्ही एकत्र गप्पा मारत जेवलो. अगदी थोडक्या वेळातही दोन चांगले मित्र मिळाले म्हणून मला छान वाटत होतं. आतून एक सुप्त आकर्षणही जाणवत होतं.

दरम्यान पुढच्या कम्पार्टमेन्टमध्ये काहीतरी शोधण्याचा बहाणा करत मोतीराम माझ्यावर हेरगिरी करायला आला. म्हणजे त्याने तसं दाखवलं नाही, पण माझ्या लक्षात आलंच. लगेच परत जाऊन त्याने मित्रांना सांगितलं की मी एका सुंदर मुलीशी बोलतोय. मग एकेक जण तिथे टपकायला लागला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच “मी आलोच” म्हणत उठलो आणि आमच्या माकडांना घेऊन आमच्या जागेवर आलो.

मग अर्थातच माझी उलटतपासणी सुरू झाली. ती मुलगी कोण आहे? तिच्याशी ओळख कशी झाली? कुठे, कधी भेटली? मला हिंदी बोलता येत नसूनही मोतीरामला जे शक्य झालं नाही हे मला कसं काय जमलं? आम्हाला का सांगितलं नाहीस? एका मागोमाग एक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. हे प्रश्न विचारण्यामागे कुतूहल कमी आणि जळफळाटच जास्त होता. मी काहीबाही उत्तरं देत त्यांना शांत केलं. रात्र झाली. सगळ्यांची जेवणं झाली. शत्रूटोळी आणि त्या मुलींच्या टोळींमध्ये चित्रहार वगैरेंमध्ये लागणाऱ्या गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या. त्यांच्या गाण्यांमध्ये माझे मित्रही सामील झाले होते. त्यांचं रेकणं असह्य झाल्यावर मी सुटका करून घ्यायला म्हणून पुन्हा रतनच्या जागेवर गेलो. मी तिथे गेलो तर समायरा एकटीच पुस्तक वाचत बसली होती. शेजारची सीट थोपटत ‘ये बस’ म्हणाली. मी तिकडे चाललेल्या रेकण्यातून सुटका करून घ्यायला म्हणून तिथून पळून आलो आहे असं म्हटल्यावर ती इतकं हसली आणि इतकं मस्त हसली की मी बघतच राहिलो. ती म्हणाली की तिच्या समोरचा बर्थ मोकळाच आहे आणि मला हवं तर मी तिथे येऊन झोपू शकतो. मला ती कल्पना अर्थातच फार आवडली. आवडणारच ना! आता कोण विचारतंय त्यावर ते ठरतं. मोतीरामने मला इथेच झोपायला ये असं म्हटलं असतं तर मी त्याच्या समोरच्या बर्थवरच काय त्याच्या बोगीकडेही फिरकलो नसतो. तेवढ्यात रतनही आला. समायरा म्हणाली की मीही इथेच येतोय झोपायला. आता मला आणखी गप्पा मारता आल्या असत्या त्यांच्याशी. आम्ही रात्री उशीरापर्यंत गप्पा मारत बसलो. आयुष्यात पुढे काय करणार, आमची ध्येयं, कुठे राहायला आवडेल, वगैरे वगैरे. हा प्रवास संपूच नये असं मला वाटत राहिलं.

दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही कानपूरला पोहोचलो. आयआयटीच्या कॅम्पसवर गेलो. हॉस्टेलमध्ये आमची राहण्याची सोय केलेली होती. पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. त्या परीक्षेत पास होणाऱ्यांच्या नंतर मुलाखती असणार होत्या. होस्टेलच्या मेसमध्ये खाण्याची सोय होती. मी आजतागायत इतकं वाईट अन्न कुठे खाल्लं नसेल. तुरुंगातही ह्यापेक्षा बरं अन्न मिळत असावं. मी आणि रतनने जवळच्या रेस्टॉरंटात जायचं ठरवलं. लेडीज होस्टेलवर जाऊन समायरालाही येतेस का विचारलं. तीही लगेच तयार झाली. तिलाही मेसमधलं जेवण आवडलं नव्हतंच.

खाऊन झाल्यावर आम्ही गावात आणि कॅम्पसमध्येही थोडं हिंडलो. मस्त मजा आली. हा दिवस संपू नये म्हणून काहीतरी करता यायला हवं होतं असं वाटलं. रात्री थोडं उशीराच परत आलो आणि आपापल्या खोलीत झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी लेखी परीक्षा झाली. दुपारी परीक्षेचे निकाल जाहीर झाले. मुलाखतीसाठी एकूण चौदा जणांची निवड झाली होती. रतन, सामायरा आणि मी, आम्ही तिघं त्या चौदात होतो. माझ्या इतर मित्रांची निवड झाली नव्हती आणि तशीही ती होणार नव्हतीच. परीक्षा देणं हा त्यांचा मुख्य उद्देश नव्हताच. मित्रांसोबत कानपूरची ट्रिप करण्यासाठी परीक्षेचं केवळ निमित्त होतं. माझी मुलाखत होईपर्यंत तेही कानपूर हिंडत मजा करणार होते. मुलाखती पुढच्या चार दिवसांत होणार होत्या. आम्हा तिघांचे नंबर नेमके शेवटच्या दिवशी होते.

दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांची टोळी कानपूर हिंडायला गेली आणि मी, रतन आणि समायरासोबत आख्खा दिवस घालवला. कॅम्पसवर हिंडणं, खाणंपिणं, सिनेमा, गप्पा - एकूण दिवस मजेत गेला. आता परीक्षाही झाली होती, छान मित्रही मिळाले होते, मला शांत वाटत होतं. एखाद्याबद्दल शत्रुत्व का वाटतं ते सांगणं सोपं असतं. काहींशी पटकन मैत्री का होते ते सांगणं अवघड असतं. पण काही माणसं का आवडायला लागतात हे सांगण तर अगदी अशक्य असतं!

मुलाखतीच्या आदल्या दिवशी आम्हाला मुलाखतीची वेळ आणि ठिकाण समजणार होतं. दुपारी हॉस्टेलवर जाण्यापूर्वी समायरा मला म्हणाली की जरा थांबशील का? मग म्हणाली ‘संध्याकाळी बाहेर जाऊया का?’ मी चालेल म्हणालो. मी आणि रतन संध्याकाळी तुझ्या हॉस्टेलवर येतो तुला बोलवायला. मग ठरवू कुठे जायचं ते. ती म्हणाली ‘आपण दोघंच जाऊया का?’ मला थोडं विचित्र वाटलं, पण हुरहुरही वाटली. मन चौखूर उधळण्यापूर्वीच मी थांबलो. नुकतीच तर ओळख झाली होती तिच्याशी. फक्त मैत्री, बाकी काही नाही, असं मी स्वतःला समजावलं. शिवाय मला मुलाखतीच्या तयारीआड काही यायला नको होतं. तसेही आणखी दोन-तीन दिवसांत आम्ही आपापल्या वाटेने जाणार होतो. भविष्यात पुन्हा भेट होईलच असं नाही. मी तिला हो म्हणालो आणि हॉस्टेलवर परतलो.

संध्याकाळी मी समायराला भेटलो आणि आम्ही दोघांनीं कॅम्पसमधल्या बागेशेजारी रस्त्यावर चालायला सुरुवात केली. छान वातावरण होतं, भोवती बागेतली फुलझाडं होती आणि बागेत बसण्यासाठी बाकंही होती. ‘कुठे जाऊ या?’ असं मी तिला विचारलं तर ती म्हणाली ‘कुठे असं काही नाही, अशाच गप्पा मारू.’ मग ती एक रिकामा बाक हेरून त्यावर बसली आणि मला शेजारी बसण्याची खूण केली. मीही भारल्यासारखा तिच्या शेजारी जाऊन बसलो. एखाद्या मुलीच्या एवढ्या जवळ बसण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे मी जरा संकोचूनच बसलो.

“मग मुलाखत झाल्यानंतर तू काय करणार आहेस?” तिने विचारलं.

“माझी निवड झाली तर मग हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय वगैरे बघावं लागेल. निवड झाली नाही तर लगेच माझ्या गावी परत जाईन.” मी म्हणालो. थोडा वेळ असाच शांततेत गेला.

“आपल्याकडे थोडेच दिवस आहेत, नाही?” ती खाली बघत म्हणाली.

“ह .. हो.” पुन्हा शांतता. आम्ही तिथे नेमकं कशासाठी आलो होतो? नुसतं शांत बसायला? मग आपापल्या हॉस्टेलवरही आम्ही ते करू शकलो असतो.

शेवटी मी तिला विचारलं, “तू कुठेतरी जायचं म्हणत होतीस ना?”

तिने माझ्याकडे रोखून पाहिलं. आता बोलताना कोणी तुमच्याकडे बघत असेल तर गोष्ट वेगळी, पण काही न बोलता कोणी नुसतं रोखून पाहात असेल तर त्यांच्याकडे पाहावं की नाही समजत नाही. त्यात ही बघणारी व्यक्ती एक सुंदर मुलगी असेल तर आणखीच त्रास.

“इथेच यायचं होतं मला… तुला भेटायचं होतं,” ती म्हणाली.

“पण… का?” तिच्या रोखलेल्या नजरेला नजर देत तिच्याशी बोलणं मला अवघड जात होतं. आता हा प्रश्न मी तिला का विचारला? ती काय सांगेल ते ऐकून घ्यायची हिम्मत आहे का माझ्यात?

“का?.. माहीत नाही. तुझ्यासोबत थोडा वेळ घालवावा, तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून. का? तुला बोलायचं नाहीये का?” तिची नजर अजूनही माझ्यावर रोखलेली होती.

“अर्थात… मीही, पण..”

“पण काय?”

“म्हणजे… मी विचारलं तर… म्हणजे कसं विचारायचं ते मला माहीत नाही…” मी काहीबाही पुटपुटलो.

तिचा मऊ, उबदार हात तिने माझ्या हातावर ठेवलेला मला जाणवला. माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात पडत होते की आता ते छाती फोडून बाहेर येणार असं मला वाटायला लागलं.

“विचार की…” ती म्हणाली.

ती पहिल्यांदा दिसली तेव्हाच मला आवडली होती. मी तिला काय विचारणार होतो? काय सांगणार होतो? की तिच्या शेजारी मी बसलोय ह्याचा मला फार आनंद होतोय, असं? आणखी दोन-तीन दिवसात हे सगळं संपेल आणि आपण आपापल्या वाटेला लागू, हे?

“नाही, विशेष काही विचारायचं आहे असं नाही..” मी खाली नजर लावत म्हणालो.

ती पुन्हा विचार म्हणाली तेव्हा मी धाडस करत म्हणालो, “आणखी दोन दिवसात आपण आपापल्या वाटेने जाऊ. तेव्हा…”

“हो, पण निदान तोपर्यंत तरी काही बोलशील की नाही?” तरी मी शांतच होतो.

“आपण भले पुन्हा भेटणारही नाही. पण जे थोडे दिवस आपण एकत्र आहोत त्यात आपल्याला जे काही वाटलं, वाटतंय ते खरंच आहे. आपण ते मोकळेपणाने बोलू या, आणि ते मनात जपून ठेवू या.”

मी नुसतीच मान हलवली. समायराला भेटून मी हॉस्टेलवर परत जात असताना मला रस्त्यात रतन भेटला. मला पाहून तो म्हणाला,

“अरे कुठे गेला होतास? मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. चल, पाणीपुरी खायला जाऊ या का?” आम्ही गेलो.

पाणीपुरी खाता खाता रतन म्हणाला, “तुला एक सांगू का? म्हणजे आपल्या मुलाखती होईस्तोवर थांबणार होतो मी, पण सांगतोच. पण हे आपल्यातच राहू दे बरं का!”

“अर्थातच!” मी म्हणालो, पण आता माझं कुतूहल वाढलं.

“उद्या आपल्या मुलाखती झाल्यावर आपण तिघं भेटणार आहोत ना… पण म्हणजे तुला काही काम असेल तर … म्हणजे तेव्हा काही काम काढशील का तू?” त्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात येईना.

मी गोंधळलो आहे ते त्याच्या लक्षात आलं.

“ अरे… मला ना समायराशी बोलायचं आहे… एकट्याने..”

मला एकदम सगळं सुन्न झाल्यासारखं वाटलं.

“चालेल का तुला?” त्याने विचारलं.

मला चालेल का? तसंही हे सगळं दोन दिवसांत संपणारच होतं. आता ते आणखी लवकर संपणार तर! पण मला तरी नेमकं काय हवं होतं? ती उत्तरेची, मी दक्षिणेचा. अगदी विरुद्ध दिशा. इतका फरक असताना मला तिचा विचार तरी करायची गरज होती का?

मी काही उत्तर देत नाही म्हणजे मला त्याचा प्रश्न आवडला नसावा असं रतनला बहुतेक वाटलं असणार. “सॉरी… मी असं निर्लज्जपणे तुला विचारायला नको होतं. मी नंतर बोलीन ..” तो म्हणाला.

“अरे नाही… काहीच प्रॉब्लेम नाही. मला चालेल की! काय, एवढं काय बोलायचंय तिच्याशी तुला?” मी माझ्या विचारांतून बाहेर येत म्हणालो.

आता काही का बोलेना तो तिच्याशी! मला चोंबडेपणा करायची काय गरज होती? पण एकदा त्याच्या तोंडून थेटच ऐकलं की मला परिस्थितीची जाणीव नीट झाली असती.

तो थोडं हसत म्हणाला, “तुला लक्षात आलंच असेल...... मग भेटू उद्या!”

मुलाखतीनंतर माझी निवड झाली नाही. मात्र रतन आणि सामायरा, दोघांचीही निवड झाली. मी माझ्या ब्यागा भरल्या आणि आम्ही जायला निघणार तेवढ्यात सामायरा मला भेटायला आली. रतनला तिच्याशी बोलायला अजून वेळ मिळाला नसावा बहुतेक. तिने मला तिच्या घरचा फोन नंबर लिहून दिला. तेव्हा सेलफोन नव्हतेच. फोनवर संपर्क ठेऊया म्हणाली. नंतर रतन मला सोडायला रेल्वेस्टेशनवर आला. मी ‘समायराशी बोललास का’ असं त्याला विचारलं तर तो म्हणाला की तो नंतर बोलेल. आता दोघंही तिथेच शिकायला असणार होती.

ट्रेनमध्ये बसल्यावर माझ्या मित्रांनी मला सामायराबद्दल खोदून विचारायला सुरुवात केली. मी काय झालं ते त्यांना सांगितलं. मोतीराम जे म्हणाला ते ऐकून मला कसंतरीच झालं. तो म्हणाला की मुलाखतीत माझी निवड होऊ नये, मला अस्वस्थ वाटावं, मुलाखतीत माझं लक्ष लागू नये म्हणून सामायरा माझ्याशी मुद्दाम आदल्या दिवशी तसं बोलली असणार! पण मला काही ते पटलं नाही. कशाला करेल ती असं? पण मग ती माझ्याशीच का बोलली? रतनशी का नाही? मी उगीच गोंधळात पडलो.

घरी परत आल्यावर मग मी इतर प्रवेशपरीक्षांची तयारी करायला सुरुवात केली. एक-दोन वेळा समायाराला फोन करून तिच्याशी बोललोही. तिचं रतनशी बोलणं होतं का तेही विचारलं. तो तिच्या संपर्कात आहे म्हणाली. मी रतनशीही एकदा बोललो. त्याने समायाराला विचारलं का असंही त्याला विचारलं. तो म्हणाला की तो बोलला, पण सामायरा हो-नाही, काहीच म्हणाली नाही.

गोष्ट सांगता सांगता मी थांबलो आणि बायकोला म्हणालो, “मग नंतर माझी आपल्या विद्यापीठात निवड झाली. तिथे आपण दोघं भेटलो… प्रेमात पडलो, लग्न केलं, मग…”

मला मध्येच तोडत बायको म्हणाली, “हो, हो.. पुढचं मला माहिती आहे. शनिवारी रतन भेटेलच आपल्याला. तुम्हाला तुमच्या जुन्या दिवसांचे कढ काढता येतील मग! … ”

तेवढ्यात मुलं भूक लागली म्हणत आली आणि आम्हाला उठावंच लागलं.

शनिवारी आम्ही मिश्राकडे गेलो. मिश्राला दुसरीकडे चांगला जॉब मिळाला होता, त्यामुळे जाण्याआधी त्याने सगळ्यांना बोलावलं होता. भारतीय पार्ट्यांमध्ये हमखास होतं त्यानुसार पुरुष आणि बायकांनी आपापले घोळके केले. रतन अजून आला नव्हता. तसाही बावीस वर्षांनंतर मी त्याला ओळखू शकलो असतो की नाही कुणास ठाऊक.

तेवढ्यात बेल वाजली. मिश्रा कोणाशी तरी बोलत होता. नवे पाहुणे आत आले आणि मी रतनला ओळखलं. रतन थोडा पोक्त दिसत होता. जाडही झाला होता आणि डोक्यावरचे केस बरेच विरळ झालेले दिसत होते. मिश्राने त्याची इतरांशी ओळख करून द्यायला सुरुवात केली. मला पाहिल्यावर त्याला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झालेला दिसला. त्याने येऊन मला मिठी मारली आणि माझी चौकशी करायला लागला. मी त्याची माझ्या बायकोशी ओळख करून दिली. त्यानेही त्याच्या बायकोला हाक मारली.

तिला दारातून येताना बघून मी मोठमोठ्याने हसत सुटलो… आम्ही तिघं पुन्हा भेटत होतो!!

Comments

Popular posts from this blog

गाईड

कवितेचं पान - शिशिरागम