मुंबई विमानतळ

गजानन सबनीस

बाल्टिमोर परिसरात राहणारे बहुतेक मराठी रहिवासी मुंबईच्या नवीन विमानतळावर उतरून घरी गेले असतील. मुंबईच्या विमानतळाचा इतिहास त्यापैकी किती जणांना माहीत असेल असा विचार करून माझ्या अनुभवांतून त्याबद्दल काही लिहावे ह्या हेतूने हा लेख लिहिला आहे.

साधारण १९६० साली सांताक्रूझ येथे हवाई वाहतूक चालू झाली. आम्ही तेंव्हा माहीमला राहात होतो. त्यावेळी आम्ही लहान भावंडांसह विमाने पाहण्यासाठी माहीमहून ‘सांताक्रूझ हवाईअड्डा’ ह्या बसने जात असू. तिकडे पोहोचल्यावर दुसऱ्या मजल्यावर म्हणजे गच्चीवर जाऊन विमाने उडताना आणि उतरताना बघताना खूप मजा यायची. लहान भाऊ ९-११ वर्षांचे असतील. अर्थात आम्हा मोठ्या भावंडांनाही कुतूहल होतेच. ही गोष्ट १९६०-६१ची. पुढे आयआयटी मुंबईतून माझे M.Techचे शिक्षण संपले आणि इंडियन ऑइल कंपनीमध्ये काम करताना १९६२-६३ मध्ये अमेरिकेला येण्याची तयारी झाली. त्याचवेळी ऑफिसच्या कामासाठी मला अंदमानला (पोर्ट ब्लेअर) पाठवण्यात आले. मला पाठवण्यामागे कारणही विचित्र होते - कारण माझा पासपोर्ट तयार होता. मात्र पोर्ट ब्लेअरला जाणे फार सोपे नव्हते. त्यावेळी तिथे केवळ रंगूनमार्गे जाता येत असे. ब्रह्मदेशातून (म्यानमार) जायचे म्हणजे पासपोर्ट हवाच. माझी तयारी असल्याने साहेबाने मला त्या कामावर पाठवले. प्रवास लांबचा होता - मुंबई, नागपूर, कलकत्ता, रंगून आणि पोर्ट ब्लेअर ह्या प्रवासासाठी रात्री साडेआठाला निघालो आणि रात्रभर प्रवास करून सकाळी १० वाजता पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. त्यावेळी आठवड्यातून केवळ एकच दिवस ही वाहतूक होत असे. तसेच मे-जून मध्ये पावसाळ्यात जाणार असल्याने गरज पडली तर एक दिवस ते एक आठवडा असे कितीही दिवस राहावे लागेल अशा तयारीने मी गेलो होतो. ह्याचे कारण असे की त्या ऋतूमध्ये जर विमानाला उतरायला जास्त वेळ लागला तर विमान पुन्हा रंगूनला नेत असत. अंदमानात त्यावेळी विमानात इंधन भरण्याची सोय नव्हती. त्यासाठीच मला तेथे जायचे होते. तिथली जमीन, दगड, बांधकामाची गरज वगैरेंचा अभ्यास करून त्यावर अहवाल लिहायचा होता. माझ्या सुदैवाने माझे काम दिवसभरात संपले व दुसऱ्या दिवशी तेच विमान मला कलकत्त्याला दुपारी २ वाजता परत घेऊन आले. परत येतानाचा कलकत्ता-मुंबई प्रवास मी Vis -count नावाच्या नव्या विनाथांबा विमानाने केला व रात्री ८ वाजता पोहोचलो. हा माझ्या आयुष्यातील पहिला दोन दिवसांचा विमानप्रवास. त्यानंतर आजवर लाखो मैलांचा प्रवास करून झाला तरी हा पहिला प्रवास मात्र अविस्मरणीयच म्हणायला हवा.

त्या प्रवासानंतर सांताक्रूझ विमानतळाला भेट दिली ती अमेरिकेत येण्यासाठीच्या पहिल्या खेपेसाठी. अमेरिकेला जाणारा घरातला मी पहिलाच मुलगा म्हणून बालमोहनचे मुख्याध्यापक कै. दादा रेगे, घरचे नातेवाईक वगैरे मिळून जवळपास ५० माणसे तरी मला सोडायला आली होती. त्यावेळच्या शिरस्त्याप्रमाणे विमानतळावर गेल्यावर पासपोर्टावर शिक्का, ४० पौंड वजनाची बॅग, इत्यादी सर्व करून १९६४ साली ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवासाला सुरुवात केली. तेंव्हा विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वगैरेंचा मागमूसही नव्हता असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मी अमेरिकेला युरोप-इंग्लंडमार्गे आलो असलो तरी त्यानंतर ३ वर्षांनी पीएचडी करून १९६७मध्ये परतीचा प्रवास केला तेव्हा तो शेवटचा प्रवास असेल असे गृहीत धरून मी हवाई-जपान-हॉंगकॉंग इत्यादी ठिकाणी जाऊन मग बँकॉकमार्गे मुंबईला आलो. कॉर्नेल विद्यापीठाची पीएचडी आणि यू.एस. ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सची दोन वर्षांसाठीची वीस हजार डॉलर्सची संशोधन शिष्यवृत्ती घेऊन भारतात कायमचा स्थायिक होण्यासाठी मी पृथ्वीप्रदक्षिणा करून पोहोचलो. मात्र सांताक्रूझ विमानतळाशी असलेली माझी गाठ पक्की होणार ह्याची काहीच कल्पना तेव्हा नव्हती. माझ्याकडे शिष्यवृत्ती असूनही ह्या ना त्या सबबीने आयआयटी पवईने मला तिथे संशोधन करू देण्यास नकार दिल्यावर ४ महिन्यांतच जानेवारी १९६७ मध्ये मुंबई-न्यूयॉर्क-फिलाडेल्फिया ह्या माझ्या दुसऱ्या अमेरिका खेपेची सुरुवात सांताक्रूझच्या जुन्या विमानतळापासून झाली.

त्यानंतर अनेक विमाने बदलली. ७२७, ७३७ जाऊन ७०७ विमान वापरात आले. सांताक्रूझ विमानतळ थोडा वाढवण्यात आला, पण तोच तळ १९७९पर्यंत वापरात होता. १९७९च्या सप्टेंबरमध्ये वडील गेल्याने मी १६ सप्टेंबरला मुंबईत पोहोचलो. हॉवर्ड विद्यापीठातून २ आठवड्यांची सुट्टी काढून गेलो होतो. मात्र त्यावेळी मुंबईत असताना सप्टेंबरच्या २१ तारखेला सांताक्रूझ विमानतळाला कोणीतरी आग लावली अशी बातमी मी माझ्या भावाकडे टीव्हीवर पाहिली. त्यानंतर हा विमानतळ बंद झाला. जवळजवळ एका आठवड्यानंतर माझी आई व माझ्यासाठी दोन तिकिटे आम्ही मिळवू शकलो. ह्या आगीनंतर सांताक्रूझच्या विमानतळाच्या दुरुस्तीचे, इमारतीचे काम सुरू असल्यामुळे अंधेरीला तात्पुरता विमानतळ सुरू केला गेला. त्याच विमानतळावरून मी आणि माझी आई अमेरिकेत आलो आणि विमानतळ तात्पुरताही असू शकतो ह्याचा अनुभव घेतला.

हा तात्पुरता विमानतळ सुमारे एक वर्ष तरी वापरात असावा. त्यानंतर जुन्या विमानतळाची इमारत वाढवून आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अंतर्गत (डोमेस्टिक) विमानतळ असे दोन विमानतळ सुरू झाले. अर्थात ७०७ जाऊन ७४७ विमाने आली. त्यानंतर इमारती वाढवून आंतरराष्ट्रीय विमानतळ आणखी मोठा करण्यात आला आणि तो २००५ सालापर्यंत टी-१ टर्मिनल म्हणून वापरला जात होता. जुलै २००५ मध्ये मुंबईच्या मिठी नदीला पूर येऊन अंघेरी-सांताक्रूझ-वांद्रे येथे रस्त्यांवर पाणी साठले. त्यात काही माणसेही दगावली आणि मोटारी वाहून गेल्या. तेव्हा विमानतळ काही दिवस बंद होता. हे सांगण्याचे कारण म्हणजे या घटनेच्या १ आठवड्यानंतर मला माझ्या कामासाठी भारतात जावे लागले होते. मुंबईचा विमानतळ मिठी नदीच्या शेजारी असल्याने तेव्हा मुख्य विमानतळ बंद होता. त्यावेळी पुन्हा तात्पुरत्या विमानतळावरून प्रवास करण्याचा अनुभव आला. मुंबई विमानतळाच्या तिन्ही स्थित्यंतराच्या वेळी प्रवास करणारा मी बहुधा एकटाच असीन. पण त्या विमानतळाशी माझा संबंध अजून संपला नव्हता. त्यानंतर काही वर्षांनी, २०१२ साली नवीन विमानतळाच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्या स्थित्यंतरातही आमचा प्रवास सुरू होताच.

ह्या विमानतळाच्या बाबतीत महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या विमानतळाचे कामकाज पूर्णवेळ सुरू ठेऊन मुंबईच्या अंधेरीच्या परिसरात नवे बांधकाम पूर्ण करण्याचे कठीण काम करणे. हे बांधकाम सुरू असताना आमचा मुक्काम वर्षातल्या पाच महिन्यांसाठी मुंबईत आणि उरलेले ७ महिने कोलंबिया, मेरीलँडमध्ये असा होता. वर्षातून दोनदा तरी भारतात जाणे-येणे करावे लागत असल्यामुळे ह्या विमानतळाचे काम वरचेवर पाहायला मिळत होते. सर्व कामे पुरी होण्यासाठी काही वर्षे लागतील असा माझा अंदाज होता. मात्र २०१४ साली फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मला मुंबईहून टोकियोला जावे लागले. तिथून परतण्यासाठी मी आणि माझा सहकारी वरूण साखरे १२ फेब्रुवारीला हॉंगकॉंग-मुंबई ह्या ‘कॅथे पॅसिफिक’च्या विमानात बसलो, तेव्हा त्यांनी घोषणा केली की आपण मुंबईच्या नवीन विमानतळावर उतरणार आहोत. बरोबर १२ वाजून ५ मिनिटांनी आमचे विमान मुंबईला पोहोचले तेव्हा नव्या विमानतळाने आमचे स्वागत केले. मी स्वतः ह्याच व्यवसायात असल्यामुळे माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट होती. आणखी १ महिन्याने त्याच टर्मिनलमधून निघताना शारदाने, माझ्या पत्नीने मला सुचवले की अमेरिकेतील ASCE (अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स) ह्या संस्थेच्या OPAL (आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अँड लीडरशिप) पारितोषिकासाठी मी मुंबई विमानतळाची शिफारस का करू नये. ते मनावर घेऊन मी अमेरिकेत आल्यावर सुमारे महिनाभर राबून, मुंबई विमानतळाचे इंजिनिअर, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर, मालक वगैरे सर्वांच्या मागे लागून २०१४च्या मे महिन्यात विमानतळातर्फे अर्ज दिला. त्यानंतर जवळजवळ एका वर्षांनंतर मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला ओपलच्या अंतिम फेरीत स्थान मिळाले. ही जागा मिळवून देण्याची कामगिरी मी मुंबई विमानतळ आणि भारतासाठी करू शकलो ही मला मोठी अभिमानाची गोष्ट वाटते.

थोडक्यात काय तर प्रत्येक स्थित्यंतरात ह्या विमानतळाचा अनुभव घेतलेला मी बहुधा एकटाच प्रवासी असीन ह्याबद्दल मला शंका नाही आणि त्याचा अभिमानही आहे.

Comments

Popular posts from this blog

व्हर्च्युअल शाळेचे इ-विद्यार्थी

हरवले ते गवसले तेव्हा