आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

प्रविणा आनिखिंडी

मराठी कला मंडळ व बाममं दरम्यान होणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत हा लेख हितगुज अंकाच्या होळी २०२० अंकातून घेतला आहे.

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ विजयी झाली असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.

अत्र्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड ह्या गावी झाला. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ मध्ये 'रत्‍नाकर', १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, १९४० रोजी त्यांनी ‘नवयुग’ साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २, १९४७ रोजी अत्र्यांनी ‘जयहिंद’ हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, १९५६ रोजी त्यांनी ‘मराठा’ हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी ‘नवयुग’ हे वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी अत्रे कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे कॉंग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.

१९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर ‘नारद-नारदी’ चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्चर्स' साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून ‘धर्मवीर’, स्वतःच्याच कथांवरून ‘प्रेमवीर’ ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्यामची आई’ चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले ‘सुवर्ण कमळ’ मिळाले होते.

आचार्य अत्र्यांनी मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी केली. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.

अत्रे जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला त्यांनी टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी ‘नवयुग वाचनमाला’ व दुय्यम शाळेसाठी ‘अरुण वाचनमाला’ ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषाशिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली होती. पुस्तकांची रचना करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला होता. आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आणि त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली.

आचार्य अत्र्यांचे काही सर्वश्रुत किस्से:

(१) “एकटा पुरतो ना?”

एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते; मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ विरोधकांपेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवीत असत. एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले. “अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता खरे; पण त्यांच्या एवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?” बाजुला वळून अत्र्यांनी ज्याच्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला विचारले, “बळवंतराव, कोंबड्या पाळता की नाही?”

“व्हय तर!”
“किती कोंबड्या आहेत?”
“चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!”
“आणि कोंबडे किती?”
“कोंबडा फक्त एकच हाये.”
“एकटा पुरतो ना?”
उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला आणि सर्व पत्रकारही त्या हशांत सामील झाले.

(२) कर्तृत्ववान राष्ट्र-’पती’

भूतपूर्व राष्ट्रपती कै. व्ही. व्ही. गिरी यांना एकूण आठ मुले होती.
त्याच्याबद्दल अत्र्यांच्या ’मराठा’ वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असे.
एकदा अत्र्यांनी श्री. गिरी, सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचे एक छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आणि त्याखाली शीर्षक दिले – गिरी आणि त्यांची ’कामगिरी’.

(३) सहचारिणी

अत्र्यांची आर्थिक परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची गाडी बिघडली म्हणून ते पायीच कामासाठी निघाले.
तेवढ्यात रस्त्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला, त्याने ती संधी साधून खवचटपणें विचारले “काय बाबूराव, आज पायीच? गाडी विकली की काय?”
पण अशा प्रसंगी हार मानतील ते अत्रे कसले?
अत्रे म्हणाले, “अरे, आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाहीत बरोबर? कुणाबरोबर पळून-बिळून गेल्या की काय?”
विरोधक खजिल होऊन निघून गेला.


Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

सूर्य जवाहिऱ्या