संपादकीय


एप्रिल २०२१
अंक २


मैत्र संपादक मंडळ २०२१ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

 

बाममं कार्यकारिणी २०२१ 

अध्यक्ष 

रोहित कोल्हटकर 

उपाध्यक्ष 

ऋद्धी आठवले वाडदेकर 

 उपाध्यक्ष- विपणन 

समीर अहिरराव पाटील 

चिटणीस 

मधुर पुरोहित 

खजिनदार 

केतन बर्डे 

सह-खजिनदार 

रवी महाजन

नमस्कार मंडळी,

गतवर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. अजूनही ही लढाई संपलेली नाही. सध्या भारतातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. आपल्या सर्वांचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळ भारतात आहेत. ते सर्व सुखरूप राहोत ह्या शुभेच्छा! इथे परिस्थितीत थोडीफार सुधारणा होत असली तरी लढा सुरू आहे आणि तो आणखी काही काळ सुरूच राहणार आहे. कोरोनासाठीची लसीकरण मोहीम जगभरात वेगात सुरू आहे. आपल्यापैकी काहींचे दोन्ही डोस घेऊन झाले असतील, काही दुसऱ्या डोससाठी रांग लावून असतील तर काही लवकरच लशीचा पहिला डोस घेणार असतील. ह्या लसीकरणामुळे कोरोनाच्या ह्या संकटातून थोडा दिलासा मिळत आहे. लवकरच वेगाने लसीकरण होऊन कोरोना आटोक्यात येईल अशी आशा करू.

दीर्घकाळ लांबलेली थंडी आटोक्यात येऊन चैत्र महिना उजाडला की नवी पालवी, नवा बहर सर्वत्र दिसू लागतो.

मी चैत्रबनातील चैत्रपालवी, तू तर हिरवा चाफा
रंग प्रीतीचा लेवून सजला, बकुळफुलांचा ताफा

चाफा आणि बकुळीची फुले इथे दिसणे अवघडच, पण हयासिंथ, ट्युलिप, डॅफोडिल्स, प्रिमरोज वगैरे फुले मन उल्हासित करतात. सर्वत्र हिरवेपणाला जाग येऊ लागते आणि वसंत ऋतूच्या, ऋतुचक्राच्या नव्या आवर्तनाच्या स्वागतासाठी आपण गुढी उभारतो. बाममंने दिलेले ‘गुढी किट’ वापरून छोटी गुढी तुम्हीही ह्यावेळी उभारलीत की नाही? आपल्या सदस्यांनी उभारलेल्या गुढींचे काही फोटो संपादकीयाच्या शेवटी जोडले आहेत.

मैत्रचा हा अंक कथा, ललित लेख, अनुभव, पाककृती आणि चित्रांनी सजला आहे. वसंत ऋतू आणि वॉशिंग्टन डीसीचा चेरी ब्लॉसम महोत्सव ह्यांचे अतूट नाते आहे. अमित गोडसेंनी काढलेले ह्या महोत्सवाचे काही फोटो ह्या अंकात आहेत. तसेच ह्या अंकात ‘गतधवा’, ‘हंटिंग लॉज’ ह्या कथा, ‘मदत’ ही अनुभवाधारित कथा, आणि ‘तिघं’ ही अनुवादित कथा आहे. ‘कपडे पाहावे शिवून’ हा अनुभवात्मक ललित लेख आणि ‘छान’ हा भाषेतील गंमतीजमतींवर आधारित असलेला लेखही ह्या अंकात वाचायला मिळेल. गेल्या अंकामध्ये सारण भरून केलेल्या गोडाच्या (उदाहरणार्थ पुरणपोळी, गुळपोळी) वा तिखटाच्या पोळ्या/पराठे हे पदार्थ पाककृती सदरासाठी सुचवले होते. त्याला प्रतिसाद देत शारदा सबनीस काकूंनी मऊसूत पुरणपोळ्यांची पाककृती पाठवली आहे. सबनीस काकांनी मुंबई विमानतळाच्या स्थित्यंतरांचा थोडक्यात आढावा घेणारा लेख लिहिला आहे.

मराठी कला मंडळाचे ‘हितगुज’ आणि आपल्या ‘मैत्र’दरम्यान साहित्यिक देवाणघेवाणीची परंपरा आहे. होळीनिमित्त प्रकाशित झालेल्या ‘हितगुज’च्या अंकामध्ये पूवी ‘मैत्र’मध्ये प्रकाशित झालेला मधुर पुरोहितचा ‘स्लॅंग’ हा लेख पुनर्प्रकाशित झाला होता. मैत्रच्या ह्या अंकामध्ये प्रविणा अनिखिंडी ह्यांनी लिहिलेला प्रह्लाद केशव अत्रेंवरचा माहितीपर लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.

ह्या अंकासाठी लेखन पाठवणाऱ्या सर्वांचे संपादक मंडळ आणि मैत्रच्या वाचकांतर्फे अनेक आभार. पुढील अंकासाठीही लेखन पाठवाल अशी आशा करतो.

मैत्रचा पुढचा अंक जुलैअखेरीस प्रकाशित होईल. तोवर उन्हाळा चांगलाच जाणवू लागला असेल. भारतात उन्हाळा आला की वाळवणांचे प्रकार, लोणची घरोघरी होतात. इथे घरी वाळवणे फारशी होत नाहीत, पण अनेक घरी ताजी लोणची केली जातात. आंबा, लिंबू, मिरच्या आणि भाज्यांची लोणची तुम्ही घालता का? आता बाजारात वेगवेगळी फळे दिसू लागली आहेत. तुम्हीही काही फळझाडे तुमच्या अंगणात लावली असतील. तर पुढच्या अंकासाठी ताजी फळे वापरून तुम्ही करत असलेल्या पाककृती आम्हाला लिहून पाठवा. ताजी फळे वापरून केलेल्या लोणची, मुरांबे, जॅम, जेली, सरबते, मिल्कशेक, आईस्क्रीम, पाय, केक, सॅलड्स, साल्सा, वगैरे पाककृतींची रेलचेल पुढच्या अंकात करू. तुमच्या अनोख्या पाककृती, त्या करतानाच्या आठवणी आणि अर्थातच त्यांचे फोटो आम्हाला जरूर पाठवा. पदार्थ खास होण्यासाठीचे तुमचे नुस्खेही लिहायला विसरू नका. शिवाय नेहमीप्रमाणे कथा, कविता, अनुभव, लेख आणि चित्रांचेही स्वागतच आहे. पुढील अंकासाठीचे साहित्य १५ जुलैपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवा.

संपादक मंडळातर्फे सर्वांना नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा!




Comments

Popular posts from this blog

कवितेचं पान - शिशिरागम

जीवनशैली