भाषाविचार - जीव

विजया वैद्य

मूळ गाव नाशिक. सध्या वास्तव्य पुणे.

निवृत्त माध्यमिक शाळा शिक्षिका, शाळेत गणित व शास्त्र विषयांचे अध्यापन. मराठी भाषेची, वाचन व चित्रकलेची आवड

खूप दिवसांनी माझी बालपणीची ‘जिवलग’ मैत्रीण येणार होती. अगदी ‘जीवाभावाची’ - ‘जीवश्च-कंठश्च’ मैत्रीण. तेव्हा ‘जीवदानी’च्या डोंगरावर जाण्याचं आम्ही ठरवलं.

ती येणार म्हणून तिचे ‘जीव की प्राण’ असणारे गुलाबजाम करायचं ठरवलं. खव्यासाठी खूप फिरले. अगदी ‘जिवाचं रान’ केलं. शेवटी एकदाचा खवा मिळाला. छान मळला. छोटे छोटे गोळे केले आणि गरम-गरम तुपात सोडले अन काय! खव्याचे सगळे गोळे तुपात तोंड पसरून हसायला लागले. माझा तर ‘जीवचं उडून गेला’. शेजारच्या काकूंना कृती विचारून पुन्हा गोळे तयार केले. गरम तुपाशी सोडले खरे, पण ‘जीवाची नुसती धाकधूक’. गोळे छान सोनेरी झाले. माझा ‘जीव भांड्यात पडला’ आणि गोळे पाकात पडले. बाकीची सारी तयारी केली आणि सखीची वाट पाहात बसले.

वेळ टळून गेली. वर पंधरा मिनिटे झाली, अर्धा तास गेला, त्यावर दोन तास उलटले. सखी अजून का येईना? काळजीने ‘जीव अगदी उडून गेला’. तिला काही झालं तर नसेल?अपघात किंवा काही? तिचा फोन तरी येईल म्हणून ‘जीवाचे कान करून’ बसले. मावशी अजून का आली नाही असं सारखं सारखं विचारत मुलांनी ‘जीव अगदी नकोसा केला’.

एवढ्यात फोनची रिंग वाजली. सखीचाच फोन. तिच्या गाडीला अपघात झाला होता. गाडीतल्या काहींच्या ‘जीवावर बेतलं’ होतं पण हिला खरचटण्यापलीकडे काही झालं नव्हतं हे नशीबच. गाडी नाल्यात उलटली होती. पण दिवसाची वेळ होती म्हणून बरं, गावातल्या लोकांनी प्रवाशांना भराभर बाहेर काढलं. ‘पाणी म्हणजे जीवन’, पण ‘तेच जीवावर उठलं’ होतं. बाहेर कसं पडणार ह्या काळजीने गाडीतले लोक ‘जीव मुठीत घेऊन’ बसले होते. सखीच्या मुलाला पोहता येत होतं, त्यामुळे त्याने अनेकांना बाहेर काढून त्यांचे ‘जीव वाचवले’, हे ऐकून माझा ‘जीव अगदी सुपाएवढा’ झाला. सखी आणि तिचा मुलगा सुखरून आहेत हे ऐकून ‘जीवात जीव आला’.

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी