निवांत

विदुला कोल्हटकर

सुमारे १५ मे १९९१:
मस्त मे महिन्याची सुट्टी चालू आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल लागून काही दिवस झाले आहेत त्यामुळे चांगल्या मार्कांचा आनंद आणि चांगल्या नसलेल्या मार्कांचं दुःख दोन्हीचा विसर पडलाय. दहावीला अजून ३-४ वर्ष असल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या अभ्यासाची भीतीही लांबच आहे.
.

अशा सुट्टीतल्या सकाळी मी आणि मैत्रिणी बागेत खेळत असायचो. खरंतर उन्हाळा बऱ्यापैकी वाढलेला असायचा, पण अंगणात झाडांच्या सावलीत, चिखल, माती आणि पाण्यात खेळताना वाढलेलं ऊन काही जाणवायच नाही. घरात आई स्वयंपाक करत असायची. त्यामुळे अंगणात कुकरच्या शिट्टीचा आवाज, कुठल्यातरी भाजी किंवा कोशिंबिरीवर घातलेल्या फोडणीचा चुर्रर्र आवाज, पोळ्या करताना विष्णुसहस्त्रनाम म्हणतानाचा आवाज, अधूनमधून आजी आजोबांच्या बोलण्याचा आवाज, आजूबाजूच्या घरांमधून येणारे कुकरच्या शिट्ट्यांचे, कुठेतरी काम चालू असेल तर ठोकाठोकीचे, मधूनच शेजारच्या गल्लीत खेळणाऱ्या मुलांचे आवाज असे अनेक आवाज ऐकू यायचे. बाराच्या सुमारास हळूहळू सगळ्यांना जेवायला घरी जायला लागायचं. १०मिनिट, ५मिनिट असं दोन-तीन वेळा झाल्यावर आईची हाकच अशी यायची की निघायलाच लागायचं. जेवायला वरण-भात, गरम पोळ्या, भाजी, आमटी, कोशिंबीर अस उजवी-डावी बाजू भरलेलं ताट असायचं. जेवण आणि मग नंतरची आवराआवर झाली की सगळ्या घरांमध्ये आई, आजी मंडळी वामकुक्षीत व्यस्त असायच्या. अशावेळी दुपारचा काही वेळ तरी घरातच थांबायला लागायचं. दुपारी त्यावेळात बऱ्याचदा काही करायला नसायचं. मग काय काहीतरी टिवल्या-बावल्या करत वेळ घालवायचा. कधी पुस्तकं वाचायची, कधी आवाज न करता रसना करायचं, कधी रसनाचं पेप्सीकोला करायचा प्रयत्न करायचा, कधी फ्रीझरमध्ये करायला ठेवलेलं आईस्क्रीम किंवा कुल्फी झाली आहे का असं दर १० मिनिटांनी बघत तर कधी चक्क खिडकीतून बाहेर बघत वेळ घालायचा.

तेव्हा अर्थातच नाही जाणवलं, पण मस्त निवांतपणा होता त्या सुट्टीत.


सुमारे १५ मे २०२२:

रविवारची सकाळ. आरामात उठून चहा प्यावा, नेटाने सकाळची कामे उरकून घ्यावीत. मग जरा उशिरानेच मुद्दाम हेडफोन घरी ठेवून एखाद्या ट्रेलवर जावं. सुरुवातीला आपल्याच पावलांचा, श्वासाचा आवाज ऐकावा मग हळूहळू पक्षांचे, वाऱ्याने हलणाऱ्या पानांचे, बाजूने वाहणाऱ्या पाण्याचे आवाज ऐकावेत. मग आजुबाजूने जाणाऱ्या लोकांचे, कुत्र्यांचे, मधूनच बोलणाऱ्या, रडणाऱ्या लहान मुलांचे, कुठेतरी लांबवर चालू असलेल्या बांधकामाचे आवाज ऐकावेत. तोपर्यंत ऊन चांगलं तापायला लागावं, म्हणजे अगदी त्या गरम हवेने जणू आलिंगन दिलंय असं वाटावं आणि अचानक तो १५ मे १९९१ च्या निवांत दुपारचा अनुभव म्हणजे मैत्रिणींबरोबर बरोबर खेळतानाचा आनंद, प्रेमाने आणि निगुतीने केलेल्या साध्या स्वयंपाकाचा गोडवा आणि दुपारचा निश्चिंतपणा असा एकदम एकत्र गोळीबंद रूपात येऊन भिडावा! तशीच गरम हवा, आजूबाजूचे आवाज आणि महत्त्वाचं म्हणजे मनात असलेला निवांतपणा.

मला वेळच होत नाही असा बाणा आणि बहाणा सोडून अनेक वर्षांपूर्वी दिवसभर मिळणारा निवांतपणा या उन्हाळ्यात तास-दोन तास तरी उपभोगून घ्यावा. उन्हाळाच पाहिजे असं नाही उन्हाळा, जराशी थंडी, खूप थंडी सगळ्या ऋतूंमध्ये निसर्ग त्या त्या वेळच सौंदर्य घेऊन असतोच. आपण आपले बहाणे सोडून त्याला भेटायला जायला पाहिजे. तर असा निवांतपणा तुम्हाआम्हाला वारंवार लाभो ही सदिच्छा!


Comments

  1. Khup chaan lihile ahe
    Brought back childhood memories

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी