अनमोल क्षण

शरद पांडुरंग काळे

निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र.
टिमोनियम, मेरीलँड

















 अनमोल क्षण

असंख्य काजवे रात्रीच्या आसमंतात चमकत असतात
प्रखर हिरव्या रंगात अदृश्य नर्तक तिथे फिरत असतात!
गोष्टींमधील पऱ्याच जणू तिथे प्रकट झालेल्या असतात
फेर धरून नाचतांना गोड गाणीही गात असतात!

चंद्रमादेखील मेघांच्या मागे दडून ती महफिल ऐकत असतो
शीतल प्रकाश कुणाचा म्हणून स्वतःलाच प्रश्न करीत असतो
काजव्यांच्या त्या महफिलीत रजनी अस्तित्व विसरत असते
प्रकाशाच्या त्या लखलखाटात सहज विरघळून जात असते

पावसाच्या धारा मधूनच हळुवारपणे बरसत असतात
महफिलीच्या सम्राटांवर अमृतवर्षाव करीत असतात!
काजव्यांचे ते लखलखणे, रजनीचे ते विरघळणे
चंद्रम्याचे ते हरवणे, पावसाचे ते बरसणे

सारेच कसे प्रसन्न करणारे असते ना!
सारेच कसे सारे विसरायला लावते ना?

वर्डस्वर्थने डॅफोडील्सचे असेच क्षण प्यायले होते
बालकवींच्या नजरेने दवबिंदू असेच टिपले होते

हेच क्षण असतात जे वेचायला हवे असतात
हेच क्षण असतात जे जगायला शिकवीत असतात


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी