चित्रसाहित्य - शेक हॅंड

दिलीप ठकार


जेष्ठ नागरिक. मूळचे पुण्याचे. कंपनीमधून निवृत्त. सध्या मेरीलँडमध्ये मुलाकडे राहावयास. पॉटरी, बागकाम, पेंटिंगचा छंद. थोडेफार स्वैर लिखाण. ‘मोहमयी फुलांच्या दुनियेत’ हे फुलांवर आधारित पुस्तक नुकतेच पुण्यात प्रसिद्ध झाले. पुण्यातील अनेक छंद समूहांवर संचालक म्हणून सध्या कार्यरत

कुत्रा? नव्हे मित्र.
माझा सर्वात आवडता प्राणी. का आवडतो आपल्याला कुत्रा? आणि कुत्राच का?

सगळयात इमानदार प्राणी म्हणून हा ओळखला जातो. तुमच्याशी तो कधीही प्रतारणा करणार नाही. त्याला जेवायला द्या अगर नका देऊ. तो कधीही तुम्हाला जेवायला मागणार नाही की मांजरासारखा चोरून खाणार नाही.

हा एक बुद्धिमान प्राणी आहे. आपल्यापेक्षा ३०० पट जास्त क्षमतेने तो ऐकु शकतो. यामुळेच बारीकसा आवाज जरी झाला तरी तो कान टवकारतो. म्हणूच जे आपल्याला ऐकू येत नाही ते त्याला ऐकू येते. जसे तुम्ही त्याला शिकवाल, तसा तो शिकतो. ‘Shake your hand’ असे म्हटले की प्रेमाने तो आपला हात (पुढचा पाय) पुढे करणार. अशावेळी तुम्ही त्याच्या डोळ्यांत कधी बघितलंय का? आपल्याबद्दलचे प्रेम त्यात ओतप्रत भरलेले दिसते. पोलीस दलात तर याला उच्चतम स्थान आहे.

दृष्टीच्या बाबतीत हा जरा कमीच आहे. रंगांमधला फरक याला कळत नाही, (असे म्हणतात की तयाला फक्त काळे-पांढरेच दिसते.) म्हणूनच की काय देवाने याला तीक्ष्ण नाक दिले आहे. आणि हो, एखाद्या गोष्टीचा, माणसाचा वास त्याने घेतला की कित्येक वर्षे तो त्याच्या लक्षात राहतो.

यांच्यामध्ये जात-पात काही नाही. एकच जात- कुत्रा. आपणच यांच्या जाती पाडल्या आहेत. लहान, मोठा, शिकारी, घरातला, शेतावरचा इत्यादी. आपण त्याला प्रेमाने नावेही ठेवली आहेत. काही काही वेळा माणसांची नावे पण कुत्र्याला! आहे की नाही मजा?

कोविड काळात तर इतर देशांमध्ये रस्त्यावरच्या कुत्र्यांचे फारच हाल झाले. हॉटेल बंद! खाणार काय? कोणाकडे मागणार? त्यांनाही प्रश्न पडला असेल, आपली भाषा माणसांना का कळत नाही? आपल्याला माणसांची भाषा कळते, मग आपली भाषा का समजत नाही त्यांना? का शिकत नाहीत ते आपली भाषा? एक ना अनेक प्रश्न. पण त्याने कधी तक्रार केली का तुमच्याकडे? नाही ना? म्हणूनच तो आपल्यापेक्षा थोडा वरचढ आहे. आणि हे आपल्याला मान्य करायलाच हवे.

पटतंय ना सगळं? मग द्या टाळी ! आणि करा माझ्याशी शेक हॅन्ड!

एप्रिल २०२२ च्या अंकात दिलेले चित्रसाहित्य; छायाचित्रकार: अरुण वैद्य

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी