कलाकार ओळख - माझा छंद

शीतल वनारसे

लहानपणी शाळेत असताना मला चांगले जमते म्हणून माझ्या मैत्रिणी जीवशास्त्राच्या आकृत्या माझ्याकडून आपल्या प्रयोगवहीत काढून घ्यायच्या. तीच माझ्या चित्रकलेची सुरुवात म्हणण्यास हरकत नाही. चित्रकला हा माझा अतिशय आवडीचा विषय होता. त्यात गुणही चांगले मिळायचे. तरीही त्यावेळेस मी चित्रकला एवढी सिरीअसली घेतली नाही.

दिवाळी तशी सगळ्यांनाच आवडते पण म‌ला खास करून आवडायची कारण दारापुढे मोठी रांगोळी काढता यायची. गंमत म्हणजे सर्वांच्याच दारांपुढे  रांगोळी असल्यामुळे कुणी पोरे येऊन पुसायची हिम्मत नाही करायचे. मेंदी काढायलाही खूप आवडायची. अगदी स्वतः मेंदी गाळून कोन बनवून काढायचे. तरीही तेव्हाही, कधी चित्रकला सिरीअसली घेतली नाही. खऱ्या अर्थाने मी पेंटिंगला सुरुवात केली ती माझ्या ग्रॅज्यूएशन नंतर. एकदा मी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये चित्रांचे प्रदर्शन पहायला गेले होते. तिथले चित्रे बघून मी इतकी प्रभावित झाले की मी ठरवले की आपल्यालाही असे पेंटिंग काढता यायला पाहिजे. पण त्यावेळी कॅनव्हास आणि ऑईल पेंटिंगविषयी काहीच कल्पना नव्हती. आधी ते काय असते आणि हे रंग कसे वापरतात हे शिकायला पाहिजे होते. मग ऑईल पेंटिंग शिकवणारे एक शिक्षक शोधून काढले आणि महिनाभर त्यांच्याकडे शिकवणी केली.

हा शिकवणी करत असतानाच माझे एक आजोबा जे न्यू इंग्लिश मधले निवृत्त चित्रकलेचे शिक्षक होते, त्यांच्या मदतीने मी चित्रकलेची इंटरमिजेट परीक्षा दिली. आश्चर्यचकित झालात ना, हो, मी माझ्या ग्रेज्यूएशननंतर ही परीक्षा दिली जी मी शाळेत असताना द्यायला हवी होती. पण असो, देर आये दुरुस्त आये म्हणतात ना. पण त्यामुळे चित्रकलेतल्या मूलभूत गोष्टी स्पष्ट झाल्या.

सर्वप्रथम मी पेन्सिल शेडींगचे चित्र काढायचे. नंतर Camlin च्या पोस्टर कलर्सने रंगीत चित्रे काढायला लागले. पण ऑईल पेंटस वापरायला चालू केल्यावर तर ऑइल कलर्सच्या प्रेमातच पडले. आणि लवकरच ऑईल पेंटिंग हे माझे आवडीचे माध्यम झाले. स्टील लाईफ, लँडस्केप, पोर्ट्रेट सगळ्या प‌द्धतीची चित्रे काढली अगदी मॉडर्न आर्ट किंवा अबस्ट्रॅक्ट काढायचाही प्रयत्न केला. पण सुरु करताच लक्षात आले की तो आपला प्रांत नाही. तसेही ते मला कधीच पटले नाही. रियलीस्टीक पेंटिंग्स मला जास्त आवडतात. त्यात बेशक मेहनत जास्त करावी लागते. शिवाय ते किचकटही असतात. पण तुम्हाला एखा‌द्या गोष्टीची आवड असेल तर तुमची कितीही मेहनत घ्यायची तयारी असते.


शक्यतो बरेच कलाकार जलरंग किंवा ऍकरेलीक रंगांना प्राधान्य देतात. साधारणतः हे दोन्ही प्रकारचे रंग लवकर वाळतात. आणि त्यामुळे कमी वेळात तुमचे चित्र पूर्ण होते. याउलट तैलरंगांमध्ये एक थर सुकण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात. जेवढा थर जाड तेवढा जास्त वेळ लागतो. पण त्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला किरकोळ बदल किंवा दुरुस्ती करायलाही जास्त वेळ मिळतो. त्यामुळे एकाच वेळी बसून चित्र पूर्ण करायची गरज नसते. रोज थोडे थोडे केले तरी चालते. म्हणूनच मला हे माध्यम जास्त आवडते. माझे काही पेंटिंग्स इथे शेअर करतेय. तुम्हाला आवडतील अशी आशा.





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी