संपादकीय


जुलै २०२२
अंक 3


मैत्र संपादक मंडळ २०२ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

 

बाममं कार्यकारिणी २०२ 

अध्यक्ष 

मोनिका देशपांडे 

उपाध्यक्ष 

रुचिरा महाजन  

 उपाध्यक्ष- विपणन 

शिल्पा बेंगेरी  

चिटणीस 

स्मितेश लोकरे 

खजिनदार 

दीपान्विता काळेले 

सह-खजिनदार 

रमा गंधे



नमस्कार मंडळी,


सोनेरी उन्हात, हिरव्या रानांत, कोसळे असा हा पाऊस खुश्शाल
हवेत हलतो, झुलतो, डुलतो, सारिसरींचा हा रुपेरी महाल

जून महिना लागला की भारतीय मनाला पावसाची सय येते. वळवाच्या पावसाने चिंब झालेले ते भारतीय मन पावसाळी खरेदी, सहली वगैरेंची आखणी करायला सुरुवात करते. ‘आषाढस्य प्रथम’ दिवशीच्या मेघाच्छादित आभाळाची वाट पाहाते. अमेरिकेत अशी पावसाची वाट पाहणे नसले तरी पूर्वी केलेल्या पावसाळी गोष्टींची आठवण आल्यावाचून राहावत नाही. मग इथल्या पावसाळी हवेत आपण कांदाभजी आणि वाफाळता चहा करतोच. भारतातल्या पावसाळी सहलींच्या आठवणी ताज्या करणाऱ्या बाममंच्या सहलीला तुम्ही हजेरी लावली असेलच. नव्या लोकांशी ओळखी, गप्पा, खाणे-पिणे आणि बिंगो असा मस्त कार्यक्रम होता.

कोविडमध्ये गेले दोन उन्हाळे प्रवासाशिवाय गेल्यानंतर प्रवास करण्यासाठी असा हा अनुकूल उन्हाळा असल्यामुळे ह्यावर्षी अनेकांनी भारतवारीची आणखी केली असेल. त्यामुळेच की काय, पण ह्या अंकासाठी नेहमीसारखे मोठ्या प्रमाणात लेखन मिळाले नाही. तर मंडळी, पुढच्या अंकासाठी मात्र तुम्ही भरभरून लिहाल अशी आशा करतो. तुमच्या भारतवारीचे अनुभव वाचायला सगळे उत्सुक आहोत. मैत्रचा पुढला अंक ऑकटोबर अखेरीस प्रकाशित होईल. त्यासाठी लेखन १५ ऑक्टोबरच्या आत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर आम्हाला पाठवा. आम्ही वाट पाहात आहोत.

२०२२ वर्षातील हा तिसरा अंक. ह्या अंकासाठी लेखन पाठवलेल्या सर्वांचे अनेक आभार. ह्यापुढील अंकांसाठीही तुम्ही लेखन पाठवत राहाल अशी आशा करतो.

‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर ह्यावर्षी सुरु केले आहे. त्याला तुम्ही ह्या अंकातही प्रतिसाद दिलात. ह्या चित्रांवरून सुचलेलया तीन लेखांचा ह्या प्रतिसादांमध्ये अंतर्भाव आहे. विशेष म्हणजे त्यातला एक लेख राघव महाजन ह्या बाललेखकाने लिहिलेला आहे. ह्या सदराअंतर्गत वेगळी चार चित्रे पुढे दिलेली आहेत. त्यावरून सुचलेले लेखन तुम्ही आम्हाला ऑकटोबरच्या अंकासाठी पाठवायचे आहे आणि त्यात कविता, लेख, अनुभव, स्थलवर्णन, स्फुट विचार, कथा वगैरे सर्व साहित्य प्रकारांचे स्वागत आहे.

कलाकार ओळख ह्या सदरामध्ये ह्यावेळी शीतल वनारसे ह्या चित्रकर्तीची ओळख करून घेऊ. ह्या चित्रांमध्यें प्राधान्याने तैलरंग वापरलेला आहे. ही चित्रे तुम्हाआम्हाला आवडावी अशीच आहेत. अंकाचे मुखपृष्ठ योगिनी दहिवदकरच्या वारीच्या चित्राने सजले आहे. ह्या महिन्यात नुकत्याच होऊन गेलेल्या आषाढी एकादशीच्च्या निमित्ताने तिने काढलेले हे समर्पक चित्र आवडावे असेच आहे. हा अंक तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.

येत्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कळावे,
संपादक मंडळ

मुखपृष्ठ - तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

मुखपृष्ठ चित्रकार - योगिनी दहिवदकर

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी