चित्रसाहित्य - जेथे जातो तेथे

दीपा अनिल नातू

टिपू, काळ्या, मोती, टफी, कुकी, विनी, डेझी, जॅस्पर ही सगळी कोणाची नांवे आहेत बरं? मला वाटतं सगळ्यांनी बरोबर ओळखलं आहे. ही तर आपल्या भूभूंची नाव आहेत म्हणजेच बहुसंख्य लोकांचा लाडका पाळीव प्राणी असलेला कुत्रा.

बाकीच्या प्राण्यांच्या तुलनेत कुत्र्यांच्या आकारमानात आणि जातींमध्ये विविधता आढळून येते. कुत्र्यांच्या जवळपास ४०० जाती आहेत. ऑल्सेशिअन, बीगल, जर्मन शेपर्ड, बुलडॉग, पामेरिअन वगैरे. सुरवातीच्या काळात त्यांचा उपयोग खेड्यामधील घरे, शेते यांचे रानटी श्वापदांपासून रक्षण करण्याकरता होत असे. जसजशी कुत्री माणसाळत गेली तसतसा त्यांचा पाळीव प्राणी म्हणून उपयोग होऊ लागला आणि तो माणसाचा सर्वात चांगला सोबती बनला. साधारणपणे कुत्र्याचे आयुष्य १० ते १५ वर्षांचे असते.

कुत्र्यांची घ्राणेंद्रिये अतिशय चांगली असल्याने ठराविक जातीच्या कुत्र्यांना शिक्षण देऊन सैन्यात आणि पोलीस खात्यात दाखल केले जाते. आरोपी ओळखणे, बॉम्ब शोधून काढणे, गुन्हेगाराचा माग काढणे या कामांसाठी त्यांचा उपयोग केला जातो. त्यांची नीट देखभाल केली जाते. त्यांचे वय झाल्यावरही नीट सांभाळ केला जातो.

कुत्र्याइतका प्रेमळ, इमानदार प्राणी दुसरा कुणी नाही. माझ्या लहानपणापासून आमच्या घरी कुत्रा पाळलेला होता आणि अजूनही माझ्या भावाकडे एका कुत्र्याचे निधन झाले की दुसरा त्याची जागा घेतोच. मला तर वाटते माणसांपेक्षा हा आपल्याला जास्त जीव लावतो. आपल्या घरातला एक सदस्यच असतो तो. त्याच्या घरातले कोणी बाहेर निघाले की अस्वस्थ होणार आणि सगळ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणार हा मुका जीव. बोलता येत नसले तरी डोळ्यांतून, कृतीतून आणि भुंकून त्याच्या भावना तो व्यक्त करतो आणि त्या त्याच्या घरातल्या माणसांना बरोबर कळतात.

ज्यांना कुत्री खूप आवडतात ती लोक त्यांच्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित करतात. वेगवेगळ्या ऋतुमानाप्रमाणे त्यांच्यासाठी वेगवेगळे कपडे शिवतात. त्यांच्या खाण्यापिण्याची तंत्र सांभाळतात. थोडक्यात लहान मुलाला आपण जशी वागणूक देतो तशी यालाही मिळते. वेळच्यावेळी त्यांचे लसीकरण करणे, केस कापणे, ठराविक दिवसांनी त्यांना अंघोळ घालणे, सकाळ-संध्याकाळ त्यांना फिरायला घेऊन जाणे, त्यांची स्वछता ठेवणे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे, त्यांच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, त्याकरीता त्याला योग्य ते शिक्षण देणे, अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या ओघाओघाने येतातच.

काही ठिकाणी असेही बघायला मिळते की मुलांची हौस म्हणून कुत्रे पाळले जाते. थोडे दिवस मुले त्याचे हौसेने सर्व करतात आणि मग स्वतःच्या व्यापात बुडून गेले की आवड असो किंवा नसो घरातल्या बाईला नाईलाजास्तव त्याचे सर्व करावे लागते. असे होता कामा नये. सर्वानी जबाबदारी सारखी वाटून घेणे आवश्यक असते. घरातली एक तरी व्यक्ती कुत्रा घरात असल्यामुळे अडकून पडते. बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर त्याचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो. कुणी नातेवाईक त्याला ठेऊन घ्यायला तयार असतील तर ठीक, नाहीतर सगळ्यांना बरोबर जाता येत नाही. हल्ली काही हॉटेल किंवा रिसॉर्ट मध्ये कुत्री घेऊन यायला परवानगी नसते. त्यांची पाळणाघरे पण आहेत, पण बऱ्याच लोकांचे तिथले अनुभव चांगले नाहीत त्यामुळे तिथे ठेवायला नको वाटते.

मध्यंतरी आम्ही आमच्या मुलीकडे सॅन फ्रान्सिस्कोला गेलो होतो. तिला कुत्रा फार आवडतो. त्यामुळे तिच्याकडे तिच्या मैत्रिणींची कुत्री त्या कुठे २-४ दिवसांसाठी जाणार असतील तर सांभाळण्यासाठी असतात. आम्ही गेलो तेंव्हाही जास्पर नावाची एक कुत्री तिच्याकडे होती. पण ह्यावेळी तिचा मुक्काम जवळ जवळ ३ आठवड्यांसाठी होता. पहिल्यांदा ती आम्हाला पाहून जरा बिचकत होती पण नंतर छान रुळली. माझा नातूही तिच्याशी छान खेळत होता. पण एक आठवड्याने तिला तिच्या घरच्या लोकांची आठवण यायला लागली. हे तिच्या देहबोलीतून जाणवत होते. शांत राहत होती, जरा दाराचा आवाज झाला तर धावत यायची तिच्या घरातली लोक दिसली नाहीत की निराशा तिच्या डोळ्यांत जाणवत असे. माझ्या मुलीकडून नंतर ती अजून दोन जणांकडे जाणार होती. तिच्या घरातले सगळेजण दोन अडीच महिन्यांकरता परदेशी गेले होते. आम्हालाच तिच्याकडे बघून खूप वाईट वाटत होते. अशा वेळी वाटते की तुम्ही जर एक मुका जीव तुमच्याकडे सांभाळला आहे तर कोणीतरी एकाने घरी राहा नाहीतर त्याला सोबत घेऊन जा.

माझ्या माहेरी बरेच वर्ष एक कुत्री होती. विनी नाव तिचे. भाऊ-भावजय कामावर गेले, मुले शाळेत गेली तरी माझी आई कायम घरीच असायची. त्यामुळे तिला विनीचा आणि विनीला तिचा खूप लळा होता. तिचे जेवणखाण सगळे आईच देत असे. विनीला काही हवे असेल तर ती आईच्या समोर जाऊन तिच्याकडे बघत बसायची की आईला लगेच लक्षात येत असे हिला काहीतरी पाहिजे आहे. चार वर्षांपूर्वी माझी आई अचानक झोपेतच देवाघरी गेली. विनी आईच्या खोलीबाहेर नुसतीच येरझारा घालत होती पण खोलीत अजिबात आली नाही. आई गेल्यानंतर बरोबर आठवड्याभरात तिनेही ह्या जगाचा निरोप घेतला. एका पाठोपाठ एक असे दोन धक्के आम्हाला सर्वाना बसले. आता घरी कुकी नावाची कुत्री पाळली आहे.

भारतात घरातील कुत्र्याला घरात त्याने कुठे घाण करायला नको म्हणून बाहेर फिरायला नेतात पण बाहेर रस्त्यावर त्याने केलेली घाण नीट उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावताना दिसत नाहीत. त्यामुळे सकाळच्या वेळी फिरायला जाताना रस्त्यावर खाली नीट पाहूनच चालावे लागते. तुमचे घर स्वच्छ राहावे म्हणून तुम्ही रस्ता खराब करता काम नये एवढी साधी गोष्टही लक्षात घेत नाहीत. परदेशात मात्र कुत्र्याला फिरायला नेताना प्रत्येकाकडे प्लास्टिक पिशवी दिसली त्यात सगळेजण नीट ती घाण उचलून ठेवत होते. तसे केले नाही तर दंड म्हणून भरपूर मोबदला आकाराला जातो असे कळले. तसेच भारतात रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची फार समस्या आहे. काही ठिकाणी तर टोळीच असते त्यांची आणि स्कूटर चालवताना, विशेषतः रात्रीच्यावेळी, ती मागे लागतात. जोरजोरात भुंकत अंगावर धावून येतात आणि घाबरून अपघात होण्याचे अनेक प्रसंग घडतात. परदेशात मात्र कुठे अशी भटकी कुत्री आढळून आली नाहीत आणि भुंकण्याचे आवाजही येत नाहीत.

एवढे मात्र नक्की, हा असा प्राणी आहे की तुम्ही जेवढे प्रेम त्याच्यावर कराल त्याच्यापेक्षा कितीतरी तो आपल्यावर करतो आणि निखळ आनंद देतो. त्याच्याशी खेळल्यावर तुमचा ताण तणाव निश्चितच कमी होतो. एकदा तुम्ही त्याला शिस्त लावलीत की तो त्या शिस्तीतच वागतो.

नुकतेच सारे जग कोविडच्या महामारीचा जवळपास दोन वर्ष सामना करत आहोत. या काळात बऱ्याच जणांना फार तणावपूर्ण आयुष्य जगावे लागले. ज्यांच्या घरात कुत्रा पाळलेला होता त्यांना तुलनेने खूप कमी तणाव आला असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. थोडक्यात काय तर हा आपला लाडका पाळीव प्राणी म्हणजे

असतो हा आपल्या जिवाभावाचा सोबती
तो बरोबर असल्यावर नसते कशाचीच भीती
धन्यासाठी देतो प्राणांचीही आहुती
जेथे जातो तेथे तो असतो सांगाती

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी