वीर जवानांचे गाव: सैनिक टाकळी

डॉ. सुनील दादा पाटील, जयसिंगपूर

कृष्णेच्या कवेतील टाकळीमधल्या शूरांनी पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्या कारगिल युद्धापर्यंत प्राणाची बाजी लावली आहे.

गावच्या चारही रस्त्यांना जाग येते ती तरुणांच्या रपेटीने. टाकळी येथील पाच-पाच पिढ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेले आहे, म्हणूनच हे गाव 'सैनिक टाकळी' म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते. आज भारतातील असे एकही लष्करी तळ नाही की, जिथे या गावातील जवानाने सेवा बजावलेली नाही. सैनिक टाकळीत सामुदायिक भवनाच्या शेजारी ‘अमर जवान’ स्मारक असून; या स्मारकावर युद्धात कामी आलेल्या १८ जवानांची नावे कोरलेली आहेत.

स्वातंत्र्यासाठी अनेकांनी दिलेले बलिदान, संघर्ष आणि लढा आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यासाठी अनेक सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. सैनिक टाकळीतील तरुणांनी देशसेवेची परंपरा सातत्याने जोपासली आहे. २०२३ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्ञात-अज्ञात लाखो वीरांनी जीवाची आहुती देऊन आपणास स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अजूनही अनेक कुटुंबे आपल्या घरातील एकतरी सदस्याला भारतीय लष्करात दाखल करण्याची परंपरा राखून आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी.

विस्तीर्ण कृष्णेने तिन्ही बाजूंनी कवेत घेतलेले, कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर शिरोळ तालुक्यात असलेले हे ‘सैनिक टाकळी’ गाव. दरवर्षीच्या पुराने या गावची माती सुपीक होत राहते, तशीच येथील माणसाची मनेही सुपीक आहेत. मन आणि मेंदूही बळकट. येथील विशाल हृदयाच्या अनेक शूरांनी पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्या कारगील युद्धापर्यंत प्राणाची बाजी लावली आहे. ‘सैनिक टाकळी’ ही बिरूदावली गाव केवळ अभिमानाने मिरवते असे नाही तर त्या बिरुदावलीला आजही जागत आले आहे. निवृत्त झालेले असले तरी ये‌थील जिंदादिल जवानांमध्ये देशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील जवळपास प्रत्येक परिवाराने एक तरी सैनिक देशाला सुपूर्त केला आहे.

कोल्हापूर जिल्हा संपन्न. त्यातला शिरोळ तालुकाही सुपीक. ऊस, केळी, कसदार फळभाज्या आणि भाजीपाला पिकविणारा हा तालुका. कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेलया सैनिक टाकळी गावात जवळपास सोळाशे एकराची मुबलक जमीन आहे. पैकी अकराशे एकर बागायत जमीन आहे. गावात जवळपास सातशे माजी सैनिक असून, महिन्याला कोटींची उलाढाल होते. एवढे आर्थिक स्थैर्य असतानाही येथील तरूण सैन्यात भरती होण्यासाठी आसुसलेला असतो. गावातील निवृत्त जवान ही येथील तरुणांची खरी प्रेरणा आहे. गावातली सैनिकी परंपरा सुरू झाली ती पहिल्या महायुद्धापासून. त्या काळात गावोगावी देशी, मर्दानी खेळ खेळले जात. लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा अशी सर्वांगानं मेहनत होणार्‍या खेळाने अंगात रग येते. सैनिक टाकळीतही लाठीकाठी, लेझीम, दांडपट्टा खेळून घाम गाळणारे, पीळदार बाहूंचे तरुण रोज सराव करीत. पहिल्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा गावोगावचे तगडे जवान सैन्यात भरती करण्यात आले. त्यात सैनिक टाकळीतील ६० जवान हेरून त्यांना सैन्यात भरती केले. त्यासाठी तत्कालीन सरकारने जमिनीही दिल्या. आजही या जमिनी ‘लष्करी पट्टा’ म्हणून ओळखल्या जातात. युद्धसमाप्तीनंतर काहीजण सहा वर्षे पायपीट करत निव्वळ ग्रह, तार्‍यांच्या सोबतीने दिशेचा अंदाज घेत गावी परतले. एवढ्या वर्षांत आपल्या माणसाचा थांगपत्ता लागला नाही म्हणून काही कुटुंबीयांनी त्यांचे पिंडदानही केले होते. ‌मात्र काही जिगरबाज महिलांनी पतीचे प्रेत पाहिल्याशिवाय कुंकू पुसणार नाही, अशी शपथ घेतली होती ती शेवटपर्यंत पाळली. ज्याच्या नावाने पिंडदान केले तो माणूसही काही वर्षांनी परतला. मेलेल्या माणसाबद्दल अनेक दंतकथा पसरत राहतात. या गावाने मात्र त्या प्रत्यक्ष अनुभवल्या. दुसर्‍या महायुद्धात लढताना हवालदार तुकाराम केशव पाटील यांचे शीर धडापासून वेगळे झाले होते. तरीही शीर नसलेले हे धड दीर्घकाळ गोळीबार करीत राहिले. शत्रूच्या काळजात धडकी भरविणारा हा प्रसंग होता.

ब्रिटिश सरकारने हवालदार तुकाराम केशव पाटील यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांच्या मातोश्रींना त्यावेळी रोख सात हजारांचे बक्षीस दिले आणि पेन्शनही सुरू केले. ‘युद्ध्स्य कथा रम्या’ असे म्हटले जाते. मात्र युद्धभूमीवरील समरप्रसंगात साक्षात मृत्यू समोर असतानाही त्याला भिडायचे कसे, याचा वस्तुपाठच येथील नव्या पिढीला आजी-माजी सैनिकांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि अनुभवातून मिळतो. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पंचगंगा साखर कारखान्यासाठी उभारलेल्या इरिगेशन स्किमच्या उद्घाटनासाठी १९६८ मध्ये जनरल पी. पी. कुमारमंगलम् आले होते. तेव्हा कुमारमंगलम् यांची टाकळी भेटही नियोजिली होती. त्यांच्या स्वागतासाठी ‌सर्व निवृत्त जवान लष्करी गणवेषात उपस्थित होते. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेले जवान पाहून, “इतके निवृत्त जवान कुठून आले?’ असे त्यांनी विचारले. तेव्हा ते सर्वजण याच गावचे असल्याचे सांगितल्यानंतर कुमारमंगलम् यांनी कौतुकाने “अरे, ये टाकळी नहीं, ये तो सैनिक टाकळी हैं!” असे गौरवोद्गार काढले. त्या दिवसापासून गावाला ‘सैनिक टाकळी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. कागदोपत्री आणि सरकार दरबारी जी प्रक्रिया होणे आवश्यक आहे, ती होत राहील. मात्र, आता लोकांनीच ‘सैनिक टाकळी’ हे नाव वापरण्यास सुरूवात केली आहे. यामुळे हे नाव वापरण्यासाठी आणखी कुणाच्या परवानगीची गरज नाही.

केवळ हजार-दीड हजार कुटुंबे असलेल्या या गावाने देशाला दीड हजाराहून अधिक सैनिक दिले आहेत. इसवी सन १९१४ ते २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंब महाराष्ट्रातील वैशिष्टयपूर्ण कुटुंब ठरले. सैनिक टाकळी येथील रावसाहेब मालोजीराव जाधव हे पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते. ते टाकळी गावातील पहिले सुभेदार होते. त्यांच्या पश्चात या कुटुंबाला ‘सुभेदार’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. दुसर्‍या महायुद्धामध्ये त्यांचा मुलगा ज्ञानदेव रावसाहेब जाधव यांनी सहभाग घेतला होता. ते सुभेदार मेजर पदावर कार्यरत होते. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावित होऊन इंग्रजांच्या नोकरीचा त्याग केला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. त्यांचा मुलगा ऑ. कॅप्टन बापूराव जाधव यांनी इसवी सन १९६५ व इसवी सन १९७१ च्या भारत-पाक युद्धात भाग घेतला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गावातील आजी-माजी सैनिकांना एकत्र करून ‘माजी सैनिक कल्याण मंडळा’ची स्थापना केली. पहिले व दुसरे महायुद्ध, स्वातंत्र्योत्तर काळात चीन व पाकिस्तानविरोधात झालेली युद्धे आणि श्रीलंकेत पाठविलेल्या शांतीसेनेच्या ‘लिट्टे’शी झालेल्या संघर्षात आणि आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या युद्धांत शहीद झालेल्या सैनिक टाकळी गावच्या १८ जवानांचे प्रेरणादायी ‘अमर जवान’ स्मारक येथे उभारण्यात आले आहे.

इसवी सन २००७ साली सैनिक समाज कल्याण मंडळाने या स्मारकाची स्थापना केली. गावातील वीरमाता, वीरपत्नी व आजी-माजी सैनिकांच्या समस्या शासनासमोर मांडल्या. त्यांचा मुलगा भरतकुमार बापूराव जाधव बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपमध्ये नाईक पदावर होता. त्यांनी इसवी सन १९८४ पासून इसवी सन २००१ पर्यंत देशसेवा केली. सध्या सुभेदार कुटुंबाच्या पाचव्या पिढीतील अक्षय भरतकुमार जाधव हा देखील इसवी सन २०१६ पासून सिपाई पदावर भरती झाला आहे. इसवी सन १९१४ पासून इसवी सन २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत उल्लेखनीय कुटुंब ठरले आहे. त्याबद्दल सुभेदार कुटुंबाचे प्रतिधिनी म्हणून नाईक भरतकुमार बापूराव जाधव यांना ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ चे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी शाल, श्रीफळ, पदक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

महाराष्ट्रातील सैनिक टाकळी हे गाव पहिल्या महायुद्धाच्या काळापासून सशस्त्र सैन्यदलात सैनिक पाठवीत आहे. सैनिक टाकळीची ही ‘सैनिकी परंपरा’ मनोहर महादेव भोसले या तरुणाने सचित्र पुस्तकरुपाने संकलित केली असून ती सचित्र माहिती कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ‘सैनिकी परंपरेचे गाव - सैनिक टाकळी’ या शीर्षकाने ग्रंथरूपाने दोन भागांत प्रकाशित झाली आहे. सैनिक टाकळी गाव वसले कसे याचा मागोवा घेत त्यात टाकळीचे मूळ लखोजी जाधवांच्या घराण्यापर्यंत असल्याचे संदर्भ उपलब्ध केले आहेत. हा शोध घेताना हेळव्यांच्या दप्तराचासुद्धा आधार घेतला गेला आहे.

Comments

Popular posts from this blog