चंद्रस्पर्श

सायली अवचट

२३ ऑगस्ट २०२३ रोजी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यशस्वीपणे अंतराळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला.

सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ (पूर्वीचा रशिया), अमेरिका आणि चीननंतर अशाप्रकारे चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इसरो) चंद्रयान-३ (CH३) मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे ७० अंश दक्षिणेकडील अक्षांशावर 'विक्रम' लँडर, त्यातील 'प्रज्ञान' या रोव्हरसहित, यशस्वीरित्या उतरविले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभागाच्या, इसरोच्याच चंद्रयान-२ (CH२) ऑर्बिटरवरील कॅमेराने काढलेल्या, आणि या लेखात जोडलेल्या, छायाचित्रामध्ये मध्यभागी विक्रम लँडर दिसत आहे. दक्षिण ध्रुवाजवळील अनेक विवरे आणि खड्ड्यांनी भरलेला चंद्राचा हा भाग विशेष संशोधनीय आहे. येथील काही विवरे कायमस्वरूपी अंधारात (permanently shadowed regions/PSRs) असल्याचे आढळून आले आहे, आणि त्यामुळे तिथे पाणी बर्फस्वरूपात उपलब्ध असण्याची शक्यता आहे. चंद्रावरील पाण्याच्या संभाव्य उपस्थितीचा भविष्यातील अंतराळप्रवास आणि संशोधनासाठी मोठा उपयोग होऊ शकतो.

चंद्रयान हे भारताच्या अंतराळ मोहिमांच्या मालिकेचे नाव आहे. उद्देश आहे अर्थातच चंद्राचे संशोधन. या मोहिमेतील पहिले, चंद्रयान-१ (CH१), हे २००९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. CH१ बरोबर NASA चा Moon Minerology Mapper (M३) चंद्रावर पाठवण्यात आला होता. याद्वारे, चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या खनिज स्वरूपातील पाण्याच्या रेणूंचा अभ्यास करण्यामध्ये आणि शोध लावण्यामध्ये CH१ चा मोठा सहभाग होता. त्यानंतर, २०१९ मध्ये CH२ या मोहिमेद्वारे इसरोने सर्वप्रथम चंद्रावर यान उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पृष्ठभागाजवळ पोहोचताना यानाचा वेग नियंत्रित करण्यामध्ये तंत्रज्ञांना अपयश आल्याने लँडर चंद्रावर आदळले. परंतु, CH२ चा ऑर्बिटर अचूकपणे काम करीत राहिला आणि त्यावरील शास्त्रीय उपकरणे चंद्राच्या PSRs मधील पाण्याचे प्रमाण आणि वितरण यांचा सखोल अभ्यास करण्यात यशस्वी झाली. CH२ ऑर्बिटरवरील ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडारने (DFSAR) ध्रुवीय निरीक्षणांमधून चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या बर्फ स्वरूपातील पाण्याची असंदिग्ध ग्वाही दिली.

CH२ प्रमाणेच CH३ चे प्राथमिक उद्दिष्ट यानाचे यशस्वी लँडिंग आणि भारताची प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतची अंततः क्षमता प्रस्थापित करणे हे होते, तसेच चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे आणि CH१ आणि CH२ च्या चंद्रावरील खनिजशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या निरीक्षणांवर आधारित पुढील अभ्यास करणे, हेही होते. त्यानुसार CH३ वरील अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) वापरून, प्रज्ञान रोव्हरने दक्षिण ध्रुव परिसराच्या मूलभूत रचनेचा अभ्यास केला. चंद्राच्या ध्रुवीय भागांत १५ दिवस उजेड (चंद्रीय दिवस) आणि १५ दिवस अंधार (चंद्रीय रात्र) अशी परिस्थिती असते. यामुळे, चंद्राच्या ध्रुवांवरील रात्रीचे तापमान उणे २०० सेल्सिअस पेक्षा कमी आणि दिवसा ५५ सेल्सिअस च्या वर जाऊ शकते. तापमानांतील इतक्या प्रचंड तफावतीमुळे, यानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर परिणाम होऊ शकतो. या कारणाने CH३ च्या सुरुवातीच्या नियोजनानुसार, प्रज्ञान रोव्हरचे जीवनमान केवळ १४-१५ दिवस असणार होते. त्यानंतर विक्रम आणि प्रज्ञानवरील उपकरणे निद्रिस्तावस्थेमध्ये जाणार होती. सुरुवातीच्या १५ दिवसांत प्रज्ञानने चंद्रावरील भूकंप, उल्कापातांमुळे होणारे परिणाम, तसेच विक्रमच्या हालचालींमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या कंपनांचा अभ्यास केला. प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लास्मा वातावरणाचे तसेच पृष्ठभागाच्या १० सेंटिमीटर खालील तापमानाचे देखील विश्लेषण केले. या अभ्यासाच्या प्राथमिक निकालांनुसार चंद्राच्या पृष्ठभागावर लोह, अल्युमिनियम, कॅल्शियम, टायटेनियम याचबरोबर अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात सल्फर आढळून आले आहे. सल्फरची उपस्थिती जरी नवीन नसली, तरी त्याचे आढळून आलेले प्रमाण हे ग्रहशास्त्रज्ञांनुसार भविष्यातील मानवी अंतराळ सफरींसाठी मोठेच वरदान आहे. याशिवाय, पृष्ठभागावर सापडलेल्या वेगवेगळ्या घटकांच्या प्रमाणांवरून शास्त्रज्ञांना चंद्राच्या उत्पत्तीबद्दल महत्त्वपूर्ण माहितीही मिळू शकेल. सल्फरचे पृष्ठभागावरील प्रमाण निश्चित करण्यामध्ये पुढील काही महिन्यांत शास्त्रज्ञांना यश येईल अशी अपेक्षा आहे.

प्रज्ञानच्या कार्यकाळात ते विक्रमपासून साधारण १०० मीटर अंतरामध्ये फिरत होते. विक्रम लँडरकडे परतून येताना प्रज्ञानने काढलेले त्याचे छायाचित्र खाली जोडले आहे. आपल्या एकमेव नैसर्गिक उपग्रहाची सारासार रचना समजून घेण्यासाठी घेतल्या गेलेल्या अनेक छोट्या पण सातत्यपूर्ण पावलांचे सुंदर प्रतिनिधित्व करणारी ही प्रतिमा आहे.

A close-up of a surface

Description automatically generated

Comments

Popular posts from this blog