मध्यमा

राजेंद्र मोडक

पूर्वप्रकाशन- हा लेख २०२०मध्ये स.प.महाविद्यालयाच्या पुनर्भेट स्नेहसंमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या ‘मैत्र’ ह्या स्मरणिकेत प्रकाशित झाला होता.

सस्क्वेहॅना नदीच्या किनारी हाडं गोठविणाऱ्या थंडीत छायाचित्रकारांची वर्दळ भल्या पहाटे सुरु होते.

कॅनडा आणि उत्तर अमेरिकेत थंडी वाढल्यावर अनेक पशुपक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी ‘बाल्ड ईगल’ हे त्यांतले विशेष आकर्षण. या नदीच्या काठी ते शिशिर ऋतूमध्ये येतात. ते नदीमध्ये मासे पकडतानाचा क्षण टिपणे हे सगळ्यांचे उद्दिष्ट असते. दोन-अडीच तासाचा प्रवास करून, सूर्योदयापूर्वी जागा गाठून, स्तोत्रं, प्रवचनं, जुनी मराठी-हिंदी गाणी ऐकत पक्ष्यांची वाट बघणं हे माझ्या चांगलं अंगवळणी पडलं आहे. मेघांत आणि धुक्यात अडकली किरणे सोडवत सूर्याने सुद्धा आजचा दिवस चांगला सुरू केला होता. अनेक सीगल, उंच उडणारे बाल्ड ईगल, मध्येच नदीत बुड्या मारून मासे पकडणारी कॉर्मोरंट बदके, यांनी दिवसाची नांदी चांगली केली.

आजचा दिवस विशेष ठरला. बहुतेक सगळे गप्पा, वाफाळलेली कॉफी यात मग्न असतानाच एकदम “8 O'clock, approach, high, fast,” असा ओरडा झाला. डावीकडून एक बाल्ड ईगल नदीपात्राकडे झेपावत होता. एकदम पळापळ सुरु झाली, सगळे आपल्या कॅमेरा सेटअपकडे धावले. काही क्षणांत त्या पक्षाने वेगाने त्या नदीतल्या माशावर झडप घातली. १०-२० सेकंदांचा सगळा खेळ.

इअरफोनमध्ये बाबूजींच्या आवाजात गाणं सुरु होतं - एक धागा सुखाचा. सुन्न होऊन काही काळ तसाच उभा होतो. ना काढलेल्या फोटोंचं भान होतं, ना तो पक्षी शिकार घेऊन कुठे गेला याचं, ना आजूबाजूच्या छायाचित्रकारांचं. काय बघत होतो मी? नदीत पोहणारा स्वछंदी जीव, क्षणात काळाची झेप पडली आणि सगळं संपलं. त्या जीवाची तडफड, त्याची असहाय्यता, पक्ष्याच्या पंज्याची मिठी आणि त्यातली ताकद मनाला सुन्न करून गेली. काळाची झेप ती. त्या असहाय जीवाला काय होतंय, का होतंय हे समजलं असेल का?

बाल्ड ईगल नेहेमी पकडलेल्या माशाकडे मान खाली घालून बघतात. बघताना काय म्हणत असतील कोण जाणे? त्या पक्षाची भूक, त्यासाठी जीवाची हत्या, म्हणून त्या माशाची क्षमा मागत असेल का तो पक्षी? गदिमांचे शब्द मनात घुमत होते - एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे. काय फरक आहे या माशात, या पक्ष्यात आणि आपल्यात? पक्ष्याच्या रूपाने काळाने झडप घातली. क्षणात एकाचा जीव संपला आणि दुसऱ्याचा एक दिवस सरला. ऑस्प्रे आणि असे अनेक पक्षी, प्राणी स्वतःसाठी, आपल्या पिलांसाठी शिकार करताना, त्यांना भरवताना, अनेकदा पाहिले आहेत, फोटो काढले आहेत.

त्या पक्ष्याचा अन्न मिळाल्याचा आनंद, त्या भक्षाची तडफड, हे दोन्ही एकाच वेळी दृष्टीसमोर उमटत होते. वरकरणी पाहता ही निसर्गात नेहमी घडणारी घटना, पण ती आज अंतर्मुख करून गेली. ते दोन्ही जीव, तो संपूर्ण निसर्ग दोन्ही जणू माझ्यात समाविष्ट झाले होते.

जीवो जीवस्य जीवनम अनेकदा हे वचन लहानपणापासून ऐकले आहे, जे आज दृष्टिपटलासमोर पाहिले. मन, बुद्धी यांना भावले, आणि ही घटना त्यापलीकडे एक जाणीव निर्माण करून गेली. ते जीव, तो निसर्ग आणि मी तद्रूप होऊन गेलो. क्षणभरच. नंतर मात्र विचारांचे काहूर उठले. भगवंतांनी सांख्य योगात सांगितले आहे, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत । अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥ - जन्माला आलेले सर्व जीव हे जन्माआधी प्रकट नव्हते आणि नंतरही नसणार आहेत. हे सर्व प्राणिमात्र, मनुष्य सर्वाना लागू पडणारे तत्त्व आहे. खरंच, या पशुपक्ष्यांत आणि माणसांत काय फरक आहे? बहुतेक सगळे लहानाचे मोठे होतात, शिकतात, संसार थाटून आयुष्य आपल्या परीने व्यतीत करतात, आणि एक दिवस अनंतात विलीन होतात - पशुपक्षी आणि मनुष्य, सगळेच. आपल्या पूर्वसुरींनी याचं समर्पक उत्तर दिलं आहे.

आहार निद्रा भय मैथुनं च, सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।
धर्मो हि तेषामधिको विशेष:, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥

धर्म! तो एकमेव. निःसंशय. वरकरणी त्या पक्ष्याने हत्या केली, पण ती त्याच्या, त्याच्या पिलांच्या शरीरधारणेसाठी आवश्यक होती. तो त्यांचा शरीरधर्म आहे. मनुष्याला मात्र त्याचा धर्म ओळखून वर्तन करणे आवश्यक आहे. भागवतात दशमस्कंदात एक महावाक्य आहे - दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः। तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठप्रियदर्शनम्॥ - मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे आणि मिळालेला देह हा क्षणभंगुर आहे, पण त्याहीपेक्षा अवघड म्हणजे मिळालेल्या आयुष्याचा योग्य विनियोग करून ईशस्तत्त्वापर्यंत पोहोचणे.

‘विवेकचूडामणी’मध्ये आचार्य यापुढे सांगतात, दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकम् । मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रय:॥ - तीन गोष्टी मिळवायला अत्यंत कठीण आहेत. ईश्वरकृपेनेच त्या मिळू शकतात. त्या तीन गोष्टी म्हणजे मनुष्यत्व (म्हणजे मनुष्य जन्म), मुमुक्षुत्व (परमार्थाची वाटचाल करण्याची आणि आत्मज्ञान व्हावे ही इच्छा आणि त्यानुसार कृती करणे), आणि महापुरुषांचा सहवास. आपल्याला मनुष्य जन्म का मिळाला? पशु, पक्षी, वृक्ष, बांडगुळं, कृमी, कीटक असा का मिळाला नाही? याचे कारण ईश्वरकृपा हेच. ज्याच्या ठायी हा ज्ञानस्पर्श होतो तिथे कारुण्यभाव प्रकटतो.

पंचमहाभूतात्मक हा देह पंचेंद्रियांच्या आधीन आहे. त्यातही दृष्टीने आपले बहुधा ७०-८० टक्के व्यवहार होतात. पण जे डोळे हे दृश्यविश्व बघू शकतात, ते स्वतःला मात्र बघू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना आरसा लागतो. मनुष्याचे काहीसे असेच आहे. ईश्वराने निसर्गरूपाने हा संपूर्ण देखावा आरशातील प्रतिमेसारखा समोर उभा केला आहे, त्यात ‘स्व’ला पाहणे हे आपले कर्तव्य आहे, आपला धर्म आहे.

ट्रेकिंग करताना डोंगरशिखरापर्यंत जाणं हा एक अवघड प्रवास असतो. शिखर गाठणे हा एकच भाव, एकच उद्दिष्ट समोर असतं. पण एका शिखरावर पोहोचल्यावर दिसतं की पुढे अजून बरंच आहे. फक्त एक मध्यमा आपण गाठली आहे. त्या शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत फक्त गोष्टी ऐकलेल्या असतात, नंतर मात्र अनुभव येतो. आता बहुतेक सगळे असेच या आयुष्याच्या मध्यमेवर आहेत, काही शिखरे पादाक्रांत केली आहेत. अजून बरीच गाठायची आहेत. आपल्या पूर्वजांनी, वरिष्ठ पिढीने, समाजाने हा अमोघ ठेवा आपल्यात संस्काररूपाने संक्रमित केला आहे. हा समजून, उमजून आणि अंगीकारून पुढे संक्रमित करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

स.प. महाविद्यालयाचे बोधवाक्य आहे, निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु| हे वाक्य भर्तृहरीच्या नीतिशतकातून घेतलं आहॆ. भर्तृहरीचा मूळ श्लोक असा आहे -

किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि क्ष्मान्न क्षिपत्येष यत्
किं वा नास्ति परिश्रमो दिनकरस्यास्ते न यन्निश्चलः।
किन्त्वङ्गीकृतमुत्सृजनङ्कृपणवच्छ्लाघ्यो जनो लज्जते
निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम्॥

कासव हे पाठीवर अवघ्या पृथ्वीचा भार वाहते, पण ढकलून देत नाही, त्याला काय ते जड होत नसेल? सूर्याचे चालणे कधीच थांबत नाही, त्याला थकवा येत नसेल? एकदा सुरू केलेले कार्य मध्येच क्षूद्रपणे सोडून देणे हे थोर लोकांना संकोचाचे वाटते (थोर कधी हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडत नाहीत). हाती घेतलेले तडीस नेणे हे अशा थोरांच्या कुलव्रतासारखे असते.

हे धर्मकार्य मोठे कार्य आहे आणि ही शिकवण मार्गदर्शक आहे. भारताला हिंदू धर्माचा आणि महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या कथा, कविता, नाटकं आणि शिक्षणसंस्था यांनी तो स्वीकारून, अंगिकारून आपल्याला फार मोठं देणं दिलं आहे. आपल्या कवींनीसुद्धा या धर्मतत्त्वांचा वापर त्यांच्या वाङ्मयात केला आहे. सुधीर मोघे लिहितात, अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत, निसर्गात भरूनी राहे अनादी अनंत.

य: पश्यति, स पश्यति |

Comments

Popular posts from this blog