दिवाळीची कथा

विदुला कोल्हटकर

आटपाट नगर होतं. तिथे एक बाई रहात होती. छानसं घर, नवरा, दोन मुलं, एकंदर सगळं व्यवस्थित चालू होतं.

आटपाट नगर होतं. तिथे एक बाई रहात होती. छानसं घर, नवरा, दोन मुलं, एकंदर सगळं व्यवस्थित चालू होतं. पण दरवर्षी दिवाळी आली की बाई खंतावे. एकटीच घर साफ करत असे. कसंतरी करून सगळ फराळाचं करे, दिव्याच्या माळा, पणत्या लावे, रांगोळी काढे. सगळ्यांच्या मागे लागून लक्ष्मीपूजा करून घेई. जबरदस्तीने मुलांना फराळ खाऊ घालायचा प्रयत्न करत असे. दिवाळी आनंदात पार पडावी म्हणून कुटुंबाच्या मागे लागत असे आणि ते करता करता दमून, रागावून जात असे. मागे लागल्याने कोणालाच दिवाळी साजरी करण्यात रस वाटायचा नाही आणि बाई दरवर्षी आणखीच खंतावत असे.

एके वर्षी आगळंच घडलं. दिवाळीच्या आधी तिने दरवर्षीप्रमाणे घर साफ केलं, दिव्यांच्या माळा लावल्या आणि बाई थकली. जमेल तेवढाच फराळ केला. एकटीनेच पूजा केली. दिवाळीनंतरच्या शनिवारी खास 'दिवाळी ब्रंच’ आयोजित केला. जमेल तसा केलेला आणि बाकी विकत आणलेला फराळ टेबलावर मांडला, मुलांसाठी पॅनकेक केले आणि ज्याला जे हवं ते घेऊ दिलं. दिवस आनंदात पार पडला. असं ओळीने तीन वर्ष केलं. चौथ्या वर्षी आश्चर्य घडलं. घर साफ करायला नवरा मदतीला आला. दिव्यांच्या माळा लावायला मुलगी मदतीला आली. रांगोळीत रंग भरायला मुलगा मदतीला आला. मुलांनी आणि नवऱ्याने पणत्या लावल्या. लक्ष्मीपूजेसाठी सगळे आपणहून देवघरात आले. शनिवारी 'दिवाळी ब्रंच' आहे ना चौकशी झाली. पॅनकेक तसेच राहिले आणि फराळावर मात्र सगळ्यांनी ताव मारला. बाईने केलेला फराळ आवडल्याचं बाकीच्यांनी आवर्जून सांगितलं. बाईची दिवाळी खरोखर आनंदात पार पडली.

बाई असो अगर बुवा तुम्हाला दिवाळी आनंदाने साजरी करायची असेल तर आधी तुम्ही आनंदात रहा कारण दिवाळी फक्त आजूबाजूला नसते तर ती मनात असावी लागते. मनात असली की आपसूक सगळीकडे पसरते.

बाईची आणि तिच्या कुटुंबाची दिवाळी जशी आनंदात साजरी झाली तशी तुमची आमची सर्वांची होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Comments

  1. कल्पना तर छानच आहे.पण आज समाज हा फार विचित्र झाला आहे.अजिबात उठून स्वतः करणार नाही.मदत तर दूरच..... नया जमाना

    ReplyDelete
  2. मस्त आहे कथा! मांडणी पण अगदी चपखल झाली आहे एखाद्या कहाणी प्रमाणे. म्हणतात ना, results come when you stop caring!

    ReplyDelete
  3. फार छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog